माझ्या आईचं आणि माझं नातं सांगायला शब्द अपुरे पडतील. ती कधी माझी आई असते, तर कधी मोठी बहीण, कधी धाकटी बहीण, कधी मी तिची मुलगी असते तर कधी ती माझी मुलगी असते, अभिनेत्री अमृता खानविलकर (Actress Amruta Khanvilkar) आपल्या आईबद्दल सांगत होती. ती पुढे म्हणाली, माझी आई गौरी खानविलकर हिला माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीची बारकाईने माहिती असते.


आईने तिच्या वागण्याबोलण्यातून मी आणि माझ्या बहिणीवर संस्कार केलेत.


तिने इतकी दु:खं, इतक्या घडामोडी पाहिल्यात. इतकी संकट पेललीत. तरी मी तिला कधीही ढासळताना, कोलमडताना पाहिलेलं नाही. एखाद्या बुरुजासारखी ती खंबीरपणे कोणत्याही अडचणीच्या वादळांमध्ये उभी राहिलीय. त्याच वेळी ती संकटं, ते दु:ख आपल्या चेहऱ्यावर दिसू न देता, जाणवू न देता ती लोकांसाठी हसतमुखाने गोष्टी करत राहते, हा तिचा गुण मला भावतो.


तिची हीच वृत्ती मी आणि माझ्या बहिणीतही आलीय. आम्ही कोणतंही काम करताना ते एन्जॉय करत असतो. मी जिथे जाईन तिथे मित्रमैत्रिणी करत असते. माझी आई ही अत्यंत फ्लेक्झिबल आहे, ती कोणत्याही गोष्टीसाठी अडून बसत नाही. तिचा हा गुण आमच्यातही मुरलाय. कोणतंही काम अत्यंत निग्रही वृत्तीने आणि रिस्पेक्टफुली करणं हे तिने आमच्या मनावर ठसवलंय.


माझ्या आयुष्यातील आव्हानात्मक क्षण सांगायचा झाल्यास जेव्हा करिअरसाठी मी पुण्याहून मुंबईला शिफ्ट झाले. त्या स्ट्रगलिंग काळात आईबाबांची मोलाची साथ लाभली. म्हणजे तिथे पुण्यात बाबांनी माझ्या धाकट्या बहिणीचा सांभाळ केला तर आई त्या आव्हानात्मक काळात माझ्यासोबत होती आणि आजही आहे.


संसाराचे दोन भाग करुन दोन्हींकडे तितक्याच समर्पित वृत्तीने लक्ष देणं हे आईच करु जाणे.


आजही माझं घर, स्वत:चं घर आणि दुबईतील बहिणीचं घर अशा तिन्ही घरांकडे ती अत्यंत काळजीपूर्वक, मायेने लक्ष देते.


ती नेहमी आम्हाला सांगत आलीय, जे काही कराल ते अतिशय ताठ मानेने आणि झोकून देऊन करा. कधी कुणाचं नुकसान करु नका. तसंच ज्यांचं पोट आपल्यावर अवलंबून आहे, त्यांना कधी रडवू नये, हे तिने आम्हाला कायम सांगितलंय.


आईने माझ्यासाठी जी स्वप्नं पाहिलीत ती मी काम करताना पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करते.


आईचं कायम सांगणं आहे की, तुम्ही आर्थिकदृष्ट्या कुणावरही अवलंबून राहणार नाही याची दक्षता घ्या. अनावश्यक खर्च टाळा, असं माझी आई मला नेहमी बजावत असते.


तिचं असं म्हणणं आहे की, एखाद्या दिवशी मला जर वाटलं की, मला आता काम करायचं नाही, थांबायचंय तर मी त्या वेळी माझी आर्थिक स्थिती इतकी सक्षम हवी की, मी मला वाटेल त्या क्षणी मी काम थांबवू शकेन.


आम्हा दोघींनाही फिरण्याची आवड आहे. माझ्या आईने वर्ल्ड टूर करावी, अशी माझी मनापासून इच्छा आहे. आम्ही हे स्वप्न साकार कऱण्याच्या अगदी जवळ आहोत.


माझी मावशी नुकतीच गेली, नाहीतर आईचं आणि तिचं कायम जगभ्रमंतीबद्दल बोलणं व्हायचं.


आम्ही दोघीही पक्क्या खवय्या आहोत. ती मासे अप्रतिम करते. तिच्या हातचा कोलंबी रस्सा, भरलेलं पापलेट माझं फेव्हरेट आहे.


तर मी केलेले डेझर्ट्स आणि अंड्याचे पदार्थ तिला आवर्जून आवडतात. असंही संवादाअखेरीस अमृताने सांगितलं.