विधानसभा निवडणुकीचे अधिकृत बिगुल अजून वाजायचे आहे. मात्र नोव्हेंबरच्या मध्यात निवडणुका होण्याची शक्यता असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने प्रचार सुरु केला आहे. दुसरीकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही प्रचार सुरु केला आहे. एकीकडे प्रचार सुरु असतानाच महाविकास आघाडीत मात्र मुख्यमंत्रीपदावरून जोरदार वाद होताना स्पष्टपणे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मविआत एक बॉम्ब टाकला होता. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली होती. एवढेच नव्हे तर ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी तर उद्धव ठाकरे यांनाच मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा अशी जाहीर मागणी केली होती. यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडेही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या मागणीला स्पष्टपणे नकार दिला होता.


काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी म्हणजे नाना पटोलेंपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत सगळ्यांनीच निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची काँग्रेसची परंपरा नसल्याचे सांगत उद्धव ठाकरेंची मागणी फेटाळली होती. तरीही उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी आग्रही होते.  लोकसभा निवडणुकीलाही काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंमध्ये सांगलीच्या जागेवरून वाद झाला होता. काँग्रेसशी सल्ला-मसलत न करताच उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा घोषित करून टाकली. खरे तर सांगलीची जागा काँग्रेसची होती, मात्र उद्धव ठाकरेंनी जागा घोषित केल्याने काँग्रेस नेते नाराज झाले होते. त्यानंतरच विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांचा दारुण पराभव केला होता. त्यावेळेपासूनच काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंच्या वर्तनाबाबत साशंकित असल्याचे सांगितले जात होते.


उद्धव ठाकरे यांचे शरद पवारांशी सध्या चांगले सख्य जमले आहे. संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार जवळ आले आहेत. अर्थात सत्ता हाच या दोघांमधला महत्वाचा दुवा आहे. मुख्यमंत्रीपदाच्या मागणीला शरद पवार पाठिंबा देतील असा विश्वास उद्धव ठाकरेंना वाटत होता. पण काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतचे विचार स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले होते की, निवडणुकीला सामोरे जाण्याआधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणे योग्य ठरणार नाही. निवडणूक निकालानंतर संख्याबळावर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाईल असे शरद पवारांनी स्पष्ट केल्यानं उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला. त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे बोल बदलले. 


काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी जागा वाटपात जास्त वाटा मागणार 


निवडणुकीनंतर मविआ जो चेहरा देईल त्याला पाठिंबा असेल असे उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे बोलून दाखवले तर संजय राऊत यांनीही मविआचा निर्णय मान्य असेल असे म्हटले. खरे तर उद्धव ठाकरेंना निवडणुकीत पाडापाडी होण्याची शक्यता वाटत आहे. संख्याबळावर मुख्यमंत्री निवडायचा म्हटल्यास तिन्ही पक्ष एकमेकांच्या जागा पाडतील, त्यामुळेच चेहरा जाहीर करण्याची मागणी ते करीत होते. मात्र त्यांच्या या मागणीला फेटाळून लावल्याने उद्धव ठाकरे काहीसे नाराजही झाल्याचे दिसत आहे. लोकसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसपेक्षा ठाकरेंची कामगिरी काहीशी सुमारच होती. काँग्रेसने सगळ्यात जास्त जागा जिंकल्याने तसे पाहिले तर सध्या काँग्रेस मविआमध्ये मोठा भाऊ झाला आहे. शरद पवारांनीही लोकसभेला चांगले यश मिळवले होते. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी जागा वाटपात जास्त वाटा मागणार यात शंका नाही.


ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज


काँग्रेस आणि शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत सर्व काही स्पष्ट केले असताना आदित्य ठाकरे मात्र अजूनही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा असे सुचवत आहेत. एका मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरे हाच आमचा चेहरा असून लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. प्रत्येक जण त्यांना कुटुंबप्रमुख म्हणून पाहतो असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मिलिंद नार्वेकर यांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केले तरच उद्धव ठाकरेंनी मविआचे प्रचारप्रमुख पद घ्यावे, अन्यथा त्यांचा वापर करून काँग्रेस आणि शरद पवारच त्याचा फायदा घेतील. लोकसभेला असेच झाले होते असेही पत्रात लिहिण्यात आले होते. यावरून ठाकरे गटाचे कार्यकर्तेही नाराज असल्याचे दिसून आले होते.


ठाकरे गट आणि काँग्रेस, शरद पवारांमध्ये आलबेल नाही


काँग्रेसने सांगलीत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहिले होते. उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रण दिले होते. पण उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला गेले नाहीत. एवढेच नव्हे तर सांगलीतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही या कार्यक्रमाकडे पाठ पिरवली होती. मंचावरही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसाठी आसने ठेवण्यात आली नव्हती. एकूणच ठाकरे गट आणि काँग्रेस, शरद पवारांमध्ये आलबेल दिसत नाही हेच स्पष्टपणे दिसून येत आहे.