Maharashtra Political Crisis : बरोबर एक वर्षांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडलं. शिंदे गटाच्या बंडाची वर्षपूर्ती असतानाच राष्ट्रवादीमध्ये देखील नवं बंड झालं आहे. काल राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
राज्यातील दोन पक्षात दोन वर्षात दोन मोठी बंड झाली. एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर अजूनही दर काही दिवसानंतर कोणीतरी एखादा नेता एकनाथ शिंदे यांच्या गटात जाताना दिसतो. आता पुन्हा अजित पवार यांचं बंड झालं आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पुन्हा एकदा पक्षांतर पाहायला मिळतील. पण या सगळ्या पक्षांतराच्या खेळात नक्की कोण कोणत्या पक्षात हेच समजत नाही, अशी भावना राज्यातील जनतेच्या मनात आहे.
लोकांच्या मतांच मूल्य काय?
अजित पवार यांनी काल शपथ घेतल्यापासून सोशल मीडियावर या सगळ्यांवर अनेक मिम, चित्रपटातले डायलॉग व्हायरल होत आहेत. अगदी पुढच्या वेळेस कोणाला मतदान करायचंच नाही, इथपासून मतदान कार्ड जाळण्यापर्यंत लोकांची मजल गेली. लोकांनी आपल्याला मतं कशासाठी दिली होती. याचं उत्तर या पक्ष आघाड्या बदलणाऱ्या लोकांना देता तरी येईल का? असा प्रश्न आहे.
पण यावर काही महिन्यापूर्वी ‘मी पुन्हा येईल’ नावाच्या एका वेबसिरीज मधील एक डायलॉग पुन्हा व्हायरल होतो आहे. मुख्यमंत्री पदाचा काय खेळ झाला, याच्याशी जनतेला काय संबंध आहे. लोकशाही आहे पण पंतप्रधान, मुख्यमंत्री निवडणं हे जनतेचं काम नाही. आमदार, खासदार निवडून देण्यापर्यंतच जनतेचं काम आहे. अशा आशयाचा डायलॉग त्यातला आहे.
एका अर्थी ही बाब खरी वाटावी अशी परिस्थिती आहे. २०१९ साली एकाद्या मतदारसंघातून निवडून दिलेला आमदार आतापर्यंत तीन - चार आघाड्यात सहभागी झाला असेल तर त्या मतदाराने नक्की काय म्हणायचं. तर या सगळ्या बदलाला राज्याच्या विकासाचा मुलामा दिला जातो. मतदारसंघाचा, राज्याचा विकास करण्यासाठी आम्ही इकडून तिकडे गेलो. असं उघडपणे सांगितलं जातं आहे. पण राज्यात संपूर्ण कारकीर्द विरोधी पक्षात काढणारे अनेक आमदार राज्यात होऊन गेले. मग त्यांनी आपल्या मतदारसंघात विकास केलाच नाही, असं म्हणायचं का?
राजकारणातल्या निष्ठेचं काय ?
यापूर्वी एकनाथ शिंदे यांचं बंड असेल किंवा आताच अजित पवार यांचं बंड असेल सोशल मीडियावर गणपतराव देशमुख यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरु झाली. गणपतराव देशमुख यांनी आपली ५५ वर्षाची राजकीय कारकीर्द दोन-चार वर्षाचा अपवाद वगळता विरोधी पक्षात काढली. त्यांना विकास करण्यासाठी सत्ता जवळची वाटली नसेल का? असा प्रश्न आहे.
काही दिवसापूर्वी गणपतराव देशमुख यांच्याबद्दल वाचताना एक किस्सा वाचण्यात आला होता. गणपतराव देशमुख सोलापुरातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले होते. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यांनतर यशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी शेकाप राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष होता. यशवंतराव चव्हाण यांनी शेकापमधले अनेक नेते त्यांनी काँग्रेसमध्ये नेले. पुढे यशवंतराव दिल्लीला गेल्यानंतर वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री झाले. शेकापमधले नेते काँग्रेसमध्ये नेण्याचे प्रयत्न त्यांनीही तसेच चालू ठेवले.
याच प्रयत्नातून वसंतराव नाईक यांनी शंकरराव पाटलांच्या मार्फत आमदार असलेल्या गणपतराव देशमुख यांना निरोप पाठवला. त्यांनी सांगितलं की “तुम्ही कॉंग्रेसमध्ये या. सोलापूर जिल्ह्यातून कोणी मंत्री नाही. तुम्हाला आम्ही राज्यमंत्रिपद देऊ.”
मंत्रीपदाची ऑफर मिळाली आणि पण गणपतरावांनी मुख्यंमत्री असलेल्या वसंतराव नाईक यांना परत निरोप पाठवला, “आम्ही राजकारणात पदं मिळावी म्हणून कधीही आलो नाही. सत्तेचं अजिबात आकर्षण नाही. माझ्याकडं काही नसताना मला लोकांनी मदत केली आहे. माझे सहकारी जिवाभावाचे आहेत. माझ्या हातून पक्षांतर घडणार नाही.”
पुढे आणखी ४० वर्ष गणपतरावांनी शेकापचा झेंडा घेऊन राजकारण केलं. पण ६० वर्षात एक पक्ष, एक झेंडा आणि एकच मतदारसंघ घेऊन राजकारण केलं. दोन वर्षांपूर्वी गणपतराव गेले, पण आज जे राज्यात लोकांचा विकास करायचा म्हणत जी पक्षांतर होत आहेत. त्यावर त्यांच्या सारख्या माणसाला काय वाटतं असेल असा प्रश्न पडतो.