त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला, सगळी राजकीय यंत्रणा कामाला लागली, पोलिसांना आदेश देण्यात आले. काही संघटनांकडून लागलीच मंदिर प्रवेशद्वारावर शुद्धीकरण करण्यात आले, राजकीय नेते पोळी भाजून गेले. चर्चेत असलेले त्र्यंबकेश्वर या घटनेने पुन्हा चर्चेत आले. दोन तीन दिवस गदारोळ झाला. परिस्थिती निवळली. मात्र दुसरीकडे यांच त्र्यंबक तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून आणि आजही भीषण पाणी टंचाई जाणवत आहे, दोन दोन तीन तीन किलोमीटर पायपीट करून महिला मंडळ पाण्यासाठी धावाधाव करत आहेत. साठ सत्तर फूट खोल विहिरीत, जिचं पाणीही आटलंय तरीही भाबड्या आशेने महिलासंह पुरुष वर्ग जीव टांगणीला लावून पाण्यासाठीचा संघर्ष करत आहेत. मात्र या गदारोळात पाण्यासाठीचा संघर्ष राजकीय नेत्यांना काही दिसला नाही, त्याच त्र्यंबकेश्वरची गोष्ट!


नाशिकपासून (Nashik) जवळच असलेल्या त्र्यंबकेश्वर शहरात प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग (Trimbakeshwer Jotirlinga) मंदिर आहे. वर्षभर भाविकांचा त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी राबता असतो. मात्र 13 मे रोजी संदल मिरवणुकीदरम्यान उरूस आयोजकांनी दरवर्षीप्रमाणे धूप दाखविण्याचा प्रयत्न केला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिथूनच वादाची ठिणगी पडली. घटनेच्या दोन दिवसांनंतर देवस्थानच्या माध्यमातून पोलिसांना पत्र लिहित चौकशीची मागणी करण्यात आली. आणि त्यानंतर सर्वच स्तरावरून विषयाला खतपाणी घालण्यात आले. मुळात घटनेच्या दिवशीच दोन्ही बाजूंच्या मंडळींकडून वाद मिटवण्यात आला होता. मात्र पुढील तीन ते चार दिवस आंदोलने, बैठका, आरोप प्रत्यारोप करण्यात आले. आणि त्र्यंबकेश्वरच वातावरण दूषित झालं. 


मुळात त्र्यंबक शहर म्हटलं की अनेक धार्मिक ठिकाणे या शहरात असल्याने भाविकांसह पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे मंदिर शेजारी, बाहेर परिसरात इथल्या आजूबाजूच्या गावातून आलेला नागरिक आपला उदरनिर्वाह करत असतो. त्याचबरोबर गावातील सर्वच समाजातील नागरिक मंदिर परिसरात व्यवसाय करत असतात. त्यामुळे आजच्या घडीला ही घटना झाली, आणि नागरिकांची पाचावर धारण बसली. कुणीही बोलण्यास तयार नव्हते. जे झालं ते चुकीचं झालं, असंही सांगण्यात आले. एकूणच सर्व गदारोळानंतर त्र्यंबक शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. असं घडायला नको होतं, गेल्या अनेक वर्षांपासून शहरात वास्तव्य करत असताना असं झालं नाही, सर्वांचं पोट त्र्यंबकराजावर असताना शहराला कुणाची नजर लागली, असंही सांगण्यात आले. 


दुसरीकडे घटना घडल्यानंतर तीन ते चार दिवस त्र्यंबकेश्वर शहर बातम्यांची हेडलाईन झालं. मात्र याच त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाण्याची (Water Crisis) विदारक अवस्था आहे. ज्या घटनेनंतर संपूर्ण राजकीय यंत्रणा कामाला लागली. गृहमंत्री फडणवीस यांच्या आदेशानंतर अनेकांवर गुन्हे दाखल झाले. संघटनांकडून आंदोलने झाली. मग याच त्र्यंबक तालुक्यात बायामाणसांना जीव मुठीत घेऊन पाणी पाणी करावं लागत असताना कुठे आहे यंत्रणा? कुठे आहेत संघटना? पाण्यासाठी का आंदोलन झालं नाही, होत नाही? इथला पाणी प्रश्न नित्याचा आहे, मग या पाणी प्रश्नावर तातडीने निर्णय का होत नाही. असे असंख्य प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. 


इगतपुरीनंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो… मग ते पाणी गेलं कुठं? गेल्या अनेक वर्षांपासून महिला वर्गाची पाण्यासाठीची वणवण सुरूच आहे. कुठं एखाद्या तळ न सापडणाऱ्या विहीरीवर, कुठं झिऱ्यावर तर कुठं खोल दरीत, हे इथल्या बाया माणसांना नित्याचं झालं आहे. काही ठिकाणी तर झिऱ्याला (एखाद्या झाडाखाली पाझर फुटून डबकं भरलेलं असत ते) रात्री पाणी जमा होत म्हणून रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या साहाय्याने गडी माणसाला हाताशी धरून बाया माणसं जीव धोक्यात घालून फक्त पाण्यासाठी हिंडत असतात. आजही साठ ते सत्तर फूट खोल विहिरीत उतरून एक हंडा पाण्यासाठी जीव टांगणीला लावताना दिसत आहेत. वर्षानुवर्षे बायामाणसाचं निम्मं आयुष्य वणवण भटकून पाणी आणण्यात चाललंय, पण याच राजकीय नेत्यांना सोयर सुतक नाही. याबाबत कधी आवाज उठवला जात नाही.... यासाठी आंदोलने होत नाहीत. 


खरं तर त्र्यंबकची घटना निमित्त झालं.... आज इथला प्रत्येक समाज कोणत्याही कार्यात एकत्र येऊन नांदत असतो.. अडीनडीला एकमेकांच्या काम येत असतो. मात्र कुठूनतरी अशा पद्धतीने रान पेटवलं जात, आणि त्या आगीचा भडका उडवला जातो. यात सामान्य माणूस होरपळला जातो. गाव कुठेतरी नकारात्मक गोष्टीसाठी चर्चेत येतं. हेच गावच्या माणसाला नको असत. गावच्या माणसाला गावातली पाणी समस्या, आरोग्य समस्या, शैक्षणिक समस्या यावर कुणीतरी बोलणारं, आवाज उठविणार हवं असत, ना कि अशा पद्धतीने.... यावर वेळीच विचार होणे आवश्यक आहे. एकीकडे त्र्यंबक मंदिर परिसरातील घटना दुसरीकडे याच तालुक्यातील भीषण पाणीटंचाई मात्र महत्व कशाला तर राजकीय पोळी भाजून मिळणाऱ्या विषयाला.... हे थांबलं पाहिजे...म्हणून गावकऱ्यांनीच सजग होऊन लढलं पाहिजे.... तरचं आरोग्य, पाणी, शिक्षण या समस्या सुटू शकतील, आणि गावचं गावपण टिकून राहील.... 


(या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी एबीपी माझा, abpmajha.com किंवा एबीपी नेटवर्क सहमत असतील असं नाही)