Aurangabad News: शिवसेनेतील बंड आणि अर्जुन खोतकर हे नातं जरा वेगळचं आहे. कारण जेव्हा-जेव्हा शिवसेनेत बंड झाला त्या-त्यावेळी खोतकरांचीही चर्चा झाली. विशेष म्हणजे शिवसेनेत बंड करणाऱ्या नेत्यांसोबत प्रत्येकवेळी खोतकरांच नाव जोडलं जातं. मात्र शेवटच्या क्षणी खोतकरांचा बाण मान्य होतो हे सुद्धा एक इतिहास आहे. आता सुद्धा तशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घेऊनही खोतकरांचा निर्णय अजूनही तळ्यात-मळ्यात आहे. त्यामुळे खोतकर यांचा मागील गोंधळलेला इतिहास पाहता, ते शिवसेना सोडणार नाही असा विश्वास अजूनही शिवसेनेच्या नेत्यांना आहे. त्यामुळे कोणताही शिवसेनेचा नेता खोतकरांवर थेट बोलण्यासा पुढे येतांना दिसत नाही.
खोतकरांचा गोंधळलेला राजकीय इतिहास काय सांगतो तेही पाहू यात...
भुजबळांच बंड...
कधीकाळी कट्टर शिवसैनिक समजल्या जाणाऱ्या छगन भुजबळांनी पक्षांतर केल्यावर त्यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यामध्ये अर्जुन खोतकरांचे नाव आघाडीवर होते. त्यावेळी शिवसेनेत बंड करणाऱ्या भुजबळांसोबत असणाऱ्या 15 आमदारांनी एकाच लेटर हेडवर स्वाक्षऱ्या करत आमचा वेगळा गट तयार करा अशी मागणी केली होती. मात्र यावेळी अर्जुन खोतकर यांच्याकडून स्वतंत्र लेटर हेड देण्यात आल्याने ते वाचले आणि शिवसेनेत कायम राहिले.
मंत्रिपद गेल्यावर बंडाची भाषा...
मनोहर जोशी हे शिवसेनेचे मुख्यमंत्री असतांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घेतला. याचवेळी अर्जुन खोतकर, सुरेश नवले आणि गुलाब गावंडे यांना खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा द्यायला सांगितले. त्यांनतर खोतकर यांनी बंडाची भाषा केली. मात्र गोंधळलेल्या अवस्थेत असलेले खोतकर पुढे मातोश्रीला शरण आले.
राणेंचं बंड...
शिवसनेच्या बंडातील महत्वाचा बंड समजल्या जाणाऱ्या नारायण राणेंच्या बंडात सुद्धा खोतकरांनी उडी घेतली होती. या दरम्यान त्यांनी राणे यांची कनकवलीला जाऊन भेटही घेतली होती. मात्र त्यावेळी सुद्धा त्यांनी रीव्ह्स गेर टाकत माघार घेतली आणि शिवसनेत कायम राहण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत खोतकर विरुद्ध दानवे असा वाद चांगलाच चर्चेत आला होता. यावेळी दानवे यांच्याविरुद्ध लोकसभा लढवण्याची खोतकारांची जोरदार तयारीही झाली होती. दरम्यान याचवेळी खोतकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. त्यासाठी त्यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतली असेही बोललं जातं. मात्र ऐनवेळी सेना-भाजपाची युती झाली आणि इथेही खोतकर यांनी माघार घेतली.
आता एकनाथ शिंदेंचा बंड...
आता एकनाथ शिंदेंच्या बंडात सुद्धा खोतकर गोंधळलेले दिसतायत. एकीकडे एकनाथ शिंदेच्या सोबत भेटीगाठी करतायत तर दुसरीकडे आपण अजूनही शिवसनेतच असल्याचा दावा करतायत. त्यातच आमच्यातील वाद मिटला असल्याचा दावा रावसाहेब दानवे करत आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा दानवेंसोबतचा वाद मिटवावा का? याबाबत अर्जुन खोतकर गोंधळलेले होते हे ही तेवढच सत्य आहे.
गोंधळलेला 'अर्जुन'
अशा गोंधळलेल्या स्थितीत राहिल्यामुळे अर्जुन खोतकर यांचा तीन वेळा पराभव तर, एक वेळा दीडशे मतांनी विजय झाला. 1990 पासून सलग सातव्यांदा खोतकर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरताना पाहायला मिळाले. मात्र 1995 मध्ये दुसऱ्यांदा आमदारकी मिळवल्यानंतर सलग सहा निवडणुकांमध्ये त्यांना सलग विजय मिळवता आला नाही. तर राजकीय कुरुक्षेत्रात अर्जुन खोतकर यांची अवस्था आजही गोंधळलेली आहे.
सुरेश भटांच्या दोन सुंदर ओळी आहेत, 'एकनाथांनी मलाही बसवावे पंगतीला, नाम या हाती बनावे हे जिने गोपालकाला,'... आज गोंधळलेल्या अर्जुन खोतकर यांची अशीच काही अवस्था आहे. एकनाथांच्या पंगतीला बसावे की उद्धवांच्या गोपालकाल्यात सहभागी व्हावे याबाबतीत त्यांचा निर्णय होत नाहीये. तर कुरुक्षेत्रावरती गोंधळलेल्या अर्जुनाला मार्ग दाखवण्यासाठी कृष्णा भेटला होता. आता हा अर्जुन नाथांच्या मार्गावर चालेल की उद्धवाच्या हे येणारा काळच ठरवेल.