जोपर्यंत कोरोनाविरोधात लस येत नाही तोपर्यंत सगळ्यांनीच सुरक्षिततेचे नियम पाळले पाहिजेत, जे नागरिक कोणत्याही कारणानिमित्त घराबाहेर पडत आहे. त्यांनी मास्क लावलाच पाहिजे सोशल डिस्टंसिंगचे पालन केलेच पाहिजे. कारण या व्यतिरिक्त कोरोनाचा प्रतिबंधात्मक बचाव करण्याचे कोणतेही मार्ग अस्तित्वात नाही. महाराष्ट्र आज कोरोनाच्या विळख्यात घट्ट सापडलाय, त्यातून सुटका करण्यासाठी सर्व नागरिकांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे अथवा मोठ्या संख्येने या कोरोनसारख्या संसर्गजन्य आजाराने ग्रासले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाला जे काही उपाय करायचे आहेत ते शासन करतच आहे, मात्र या सगळ्या गोष्टींचा कोरोनावर कोणताही परिणाम होताना दिसत नाही, रोज कोरोना बाधितांची आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढतच आहे. कोरोनाला 'हलक्यात' घेणाऱ्यांनी कोरोनाचं हे रौद्र रूप बघून आता तरी शिथिलतेच्या नावाने बोंबाबोंब करणे बंद केले पाहिजे. नागरिकांना उपचार द्यायला 'प्राणवायू'ची टंचाई भासू शकते अशी परिस्थिती आज राज्यात निर्माण झाली आहे.
शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, जिम या काळात उघडणे म्हणजे साथीच्या आजाराला बळ देण्यासारखेच आहे. दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत चालली आहे. जगात सर्वाधिक वेगानं कोरोनाचं संक्रमण भारतात वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. तब्बल 96 हजार 551 ने कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. तर मृतांचा आकडा देखील 1 हजार 209 ने वाढला आहे. सलग दहाव्या दिवशी देशात कोरोनाचे 1 हजारांपेक्षा जास्त बळी गेले आहेत. राजेश टोपेंनी दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 9,89,934 वर गेला आहे. यातले 7 लाख 715 बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 261432 अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर राज्यात 27,787 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. हा एकूण आकडा लक्षात घेतला तर महाराष्ट्र राज्य कोरोनाबाधितांच्या संख्येत पाचव्या स्थानी आलं आहे.
ज्या देशातून या कोरोनाच्या विषाणूंचा उगम झाला त्या चीन देशातील रुग्णाबाधितांची एकूण संख्या ८५ हजार १६८ इतकीच आहे, यापेक्षा एकट्या ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या १ लाख ५० हजारापेक्षा जास्त आहे. सगळ्यात जास्त तरुण रुग्ण कोरोनाने बाधित झाले आहे. २१ ते ३० वयोगटातील १ लाख ६७ हजार ३३३, ३१ ते ४० वयोगटातील २ लाख ०५ हजार ३२०, ४१ ते ५० वयोगटातील १ लाख ७१ हजार ९४७ नागरिक बाधित झाले आहे. तर ० ते १० वयोगटातील
३८ हजार १४४ मुले या आजाराने बाधित झाले आहे. प्रत्यके वयोगटातील वयातील माणसाला कोरोनाने बाधित केलेले आहे. त्याशिवाय ज्या पद्धतीने रोज हा आकडा वाढत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात धडकी भारत आहे. काही नागरिकांना खरोखरच घराबाहेर जाण्यास भीती वाटत आहे, मात्र नोकरी उद्योगधंद्यांच्या नाईलाजास्तव त्यांना घरभर पडावेच लागत आहे.
ऑक्सिजनच्या समस्येने सारा महाराष्ट्र हादरून गेला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे ऑक्सिजनचा पुरवठा योग्य आहे असे सांगतिले जात असले तरी प्रत्यक्षात रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. वैद्यकीय उपचारांसाठी ऑक्सिजनची टंचाई होऊ शकते अशी परिस्थिती महाराष्ट्र राजयात येईल असे कोणत्या डॉक्टरने स्वप्नात पण विचार केला नसेल. सध्याच्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणा रुग्णांवर उपचार करीत आहे. यामध्ये डॉक्टरांचा किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नाही. मात्र रुग्णसंख्या इतकया अफाट संख्येने वाढली आहे कि आहे ती व्यवस्था अपुरीच पडणार. प्रत्येक नागरीकाला चांगल्या आरोग्य सुविधा हव्या असतात, त्यामुळे या काळात कुणी आजरी पडलं तर त्यांचा रुग्णालयात दाखल होण्याकडे ओढा जास्त असतो. त्यांना जंबो फॅसिलीटी म्हटलं कि भीती वाटते, काहीना मात्र बेड मिळतच नसल्यामुळे दाखल व्हावे लागते. प्रशासनाला नागरिकांसोबत संवाद वाढवावा लागणार आहे. अनेक गोष्टीची अनाठायी भीती लोकांच्या मनात आहे त्या शंकेचे निरसन करावे लागणार आहे.
शासनाने, रुग्ण लवकर बरे व्हावेत याकरिता विविध उपाय योजना आखल्या आहे. त्याप्रमाणे अतिदक्षता विभागात (आयसीयु) उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणार आहे. त्यासाठी ‘टेलीआयसीयु’ सुविधेचा वापर केला आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे रुग्ण बरे झाल्यानंतर सुद्धा त्यांना विविध व्याधीचा त्रास होत आहे आणि त्याकरिता त्यांना पुन्हा रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहे. त्याकरिता विविध रुग्णलयात 'पोस्ट-कोविड' ओ पी डी सुरु करण्यात आली आहे. कोरोना सोबत अन्य आजाराच्या व्याधी होत असल्याच्या तक्रारींनी जोर धरला आहे.
गेले अनेक महिने संपूर्ण देश या कोरोनाबाधितांची संख्या या काळात कमी कशी करता येईल या करता रात्र-दिवस झटताना दिसत आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढतच आहे. एका बाजूला लॉक डाउन मधील शिथिलता वाढवून आर्थिक व्यवहाराची घडी बसवतानाचे प्रयत्न सुरु असताना रुग्णवाढ होणे निश्चितच सध्याच्या घडीला आपल्याला परवडणारे नाही. कारण सध्या राज्यात काही ठिकाणी पावसाने चांगलाच जोर धरला असून दरवर्षीप्रमाणे येणाऱ्या पावसाळी आजारांना दुर्लक्षित करून चालणार नाही. अनेक वेळा हा युक्तिवाद केला जातो की टेस्टिंगचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. मात्र मूळ मुद्दा तसाच राहतो, तो म्हणजे ते टेस्टिंग केल्यामुळे जो रुग्ण निर्माण झाला आहे तो रुग्णच आहे त्याला उपचाराची, विलगीकरणाची आणि अलगीकरणाची गरज आहेच. त्यामुळे या 'रुग्णसंख्या वाढीला केवळ टेस्टिंग वाढ' जबाबदार असल्याचे साधं लेबल लावण्याऐवजी ती रोखता कशी येईल यासाठीच प्रयत्न केला गेला पाहिजे.
याकाळात नागरिकांनी स्वतःला शिस्त लावून घेणे गरजेचे आहे अन्यथा मोठे धोके संभवतात. या परिस्थितीत कुटुंबातील एखादी व्यक्ती 'आजारी पडणे ' म्हणजे एखाद्या मोठ्या संघर्षाची सुरुवात त्या नातेवाईकांना वाटत आहे. कारण हा संघर्ष करताना ऍम्ब्युलन्स पासून ते रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोठ्या दिव्यातून जावे लागत आहे. त्यात जर रुग्ण दुर्दैवाने गंभीर झाला तर त्याला आय सी यू बेड मिळण्याकरिता पुन्हा मारामारी करावी लागत आहे. पैसे असून सुद्धा अनेकवेळा हव्या त्या आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याच्या काळातून आपण जात आहोत. अनेक वेळा उपचारासाठी आवश्यक असणारी औषधे, प्लास्मा मिळत नसल्याच्या तक्रारी आता नवीन राहिल्या नाहीत. एकंदरच सर्व परिस्थिती पाहता महाराष्ट्र भयंकरच्या दारात आहे, त्यातून सहीसलामत बाहेर यायचं असेल तर प्रत्येक नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी पाहिजे.