“मम्मी, पप्पाला मारुन आले का?”…अनिकेत कोथळेच्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीचे हे बोल काळजाला चटका लावणारे होते. या प्रश्नावर कुणाही माणसाने नि:शब्द व्हावं, इतका भिडणारा चिमुकलीचा हा प्रश्न. घरातल्यांच्या बोलण्यातून, शेजाऱ्यांच्या कुजबुजीतून आणि टीव्हीवरच्या सततच्या बातम्यांमधून आपल्या वडिलांच्या हत्येचं हे भयानक सत्य त्या निष्पाप जीवाला कळलं असेलच. त्यातूनच या अजाणत्या वयात पोलिसांबद्दल या चिमुरडीच्या मनात काय चित्र निर्माण झालं असेल?... इमॅजनिही करवत नाही.


अनिकेत कोथळे. सांगलीत एका बॅगेच्या दुकानात काम करणारा एक सर्वसामान्य तरुण. आई-वडील, भाऊ, बायको आणि छोटी मुलगी. इतकंच छोटसं सुखी कुटुंब. दुकानातल्या नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून त्याचं घर चालायचं. हातावर पोट असणाऱ्या अनिकेतच्या आयुष्यात एका भयंकर गोष्टीने प्रवेश घेतला आणि सुरळीत चाललेल्या घराची सारी घडीच विस्कटली.

अनिकेत ज्या बॅगेच्या दुकानात कामाला होता, त्या दुकानात चालणाऱ्या अश्लिल चित्रफितीच्या रॅकेटबद्दल त्याला आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या अमोल भंडारेला कळलं. या अवैध धंद्याचा सुगावा लागणं, हे पुढे जाऊन आपल्या जीवावर बेतेल, असं कदाचित अनिकेतला स्वप्नातही वाटलं नसेल. पण घडायचं, ते घडलंच. अनिकेतला अश्लिल चित्रफितीच्या रॅकेटबद्दल कळल्याची कुणकुण दुकानाच्या मालकाला लागली आणि अनिकेतसमोरील संकटांचा मरणयातना देणारा ससेमीरा सुरु झाला.

चोरीचा आळ ठेऊन अनिकेतला आणि अमोलला गजाआड करण्यात आलं. मात्र तेवढ्यानं हे दोघंही गप्प बसणार नाहीत, हे लक्षात येताच सुरु झाले अनन्वित अत्याचार. दोघांनाही पोलिसांनी शत्रुराष्ट्रातल्या कैद्यांनाही होत नसेल अशी बेदम मारहाण सुरु केली.

कधी पंख्याला उलटं टांगून तोंड पाण्याच्या बादलीत बुडवून मारणं, तर कधी लोखंडी पाईपनं फटके मारुन मारहाण करणं...  पोलिसी खाक्याला लाजवेल अशी ही मारहाण. पोलिसांच्या फटक्यांच्या आघातानं काही वेळानं अनिकेतचं शरीर थंड पडलं. सगळं संपलं होतं. हे नराधम पोलिस तरीही एवढ्यावरच थांबले नाहीत.

निपचित पडलेला अनिकेतचा मृतदेह पोलिसांनी आंबोलीत नेला आणि तिथे जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह नीट जळला नाही म्हणून आंबोलीच्या खोल आणि निर्जन दरीत फेकला गेला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आंबोलीलाही कदाचित पोलिसांच्या हे क्रौर्य पाहावलं नसेल!

अमोलचं दैव बलवत्तर म्हणून तो मरणाच्या दाढेतून वाचला. दुसऱ्या दिवशी सत्य बाहेर आलंच. अनिकेत पळून गेल्याचा बनाव रचणाऱ्या पीएसआय युवराज कामटेसह त्याच्या साथीदारांना बेड्या घालण्यात आल्या.

सांगलीतल्या या घटनेनं महाराष्ट्र पोलिसांची लक्तरं वेशीला टांगली गेलीच. मात्र त्याचलसोबत मुख्यमंत्र्यांपासून संपूर्ण पोलिस यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. कायदा सुव्यवस्थेचे रक्षकच कसे भक्षक बनू शकतात, याचं हे भयंकर उदाहरण.

खरंतर पोलिस म्हणजे अन्याय-अत्याचारग्रस्तांसाठी धावून येणारे, पीडितांचे कैवारी वगैरे वगैरे. मात्र याच पोलिसांमधील हैवानाचं रुप सांगलीतल्या कामटेच्या रुपाने दिसलं. अर्थात, सर्वच पोलिस तसे नसले, तरी पोलिसांवरील विश्वासाला तडे जाण्यासाठी ही घटना पुरेशी आहे.

मी स्वतः एका निवृत्त पोलिसाची मुलगी आहे. त्यामुळे जेव्हा वाहतूक पोलिसांना जीवघेणी मारहाण होते, तेव्हा खूप वाईट वाटतं. मला आठवतं गणपती, दिवाळी किंवा कोणत्याही सणाला बाबा कधीच घरी नसायचे. बाबांना गणपती विसर्जनाची मिरवणूक संपेपर्यंत अगदी 24-24 तास ड्युटी असायची. तेव्हा आम्ही काकासोबत मिरवणुकीच्या त्या गर्दीत बाबांना शोधून जेवणाचा डबा द्यायचो.

कुठे मोठा अपघात झाला, खून झाला तर ते मृतदेहही बाबांना उचलावे लागायचे. लहान असताना मी कधीकधी बाबांसोबत पोलीस स्टेशनलाही जायचे. त्यांचं काम बघायचे. त्यामुळे पोलिसांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल मनात नेहमीच आदराची भावना राहिली आहे. मात्र सांगलीतल्या घटनेमुळे ही आदराची भावना अविश्वासात रुंपतरीत होऊ पाहत आहे.

अनिकेतप्रमाणेच उद्या तुमच्या किंवा माझ्या हातातही निष्कारण बेड्या पडू शकतात. आपल्यावरही पोलिसांच्या बंद कोठडीआड अत्याचार होऊ शकतो. आपणही कुठे सुरक्षित नाहीत, हेच सत्य आहे. घरात नाही, रस्त्यावर नाही, रेल्वे स्टेशनवर नाही आणि पोलिस स्टेशनमध्ये तर नाहीच नाही.

आता अनिकेतच्या घरी आणखी काही दिवस मंत्री येतील, राजकीय नेते येतील, पोलिसांची रीघ लागेल. पोलिस डिपार्टमेंट सुधारण्याच्या आणाभाका घेतल्या जातील. अनिकेतच्या कुटुंबियांवर आश्वासनांची खैरात होईल. माध्यमंही पोलिस ठाण्यांमधील सुरक्षेचा मुद्दा लावून धरतील. मात्र काही दिवस लोटल्यानंतर, जैसे थे. एक प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहील – “या सगळ्यामुळे त्या चिमुरडीला तिचा पप्पा परत मिळेल का?”