2001 च्या ऑक्टोबरमध्ये कुणाच्या ध्यानी मनी नसताना नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री बनले, तोवर गुजरातच्या बाहेर किंवा भाजप संघटनेच्या बाहेर हे नाव फारसं कुणाला परिचित नव्हतं. मात्र आपल्या मेहनतीने त्यांनी पक्षातील आणि बाहेरील विरोधकांवर मात करत गुजरातमध्ये सलग तीन वेळा सत्ता मिळवली. त्यानंतर थेट देशपातळीवर मिळालेली जबाबदारी पेलत पक्षाला दिल्लीचं तख्त मिळवून दिलं. पंतप्रधान म्हणून आपलं नेतृत्व सिद्ध करत सलग दुसऱ्यांदा दिल्ली जिंकली. हे सगळं त्यांना कुणीही आयतं समोर आणून दिलं नाही. अनेकदा पराकोटीचा विरोध सहन करावा लागला आहे. प्रचंड संयम आणि वाट पाहण्याची क्षमता दाखवावी लागली आहे. शिस्तीला प्रचंड मेहनतीची जोड त्यांनी दिलीय. आधी संघाचं आणि संघटनेचं कार्य करत असताना ते देश फिरले आहेत. देशातील जनतेच्या.. सामान्य मतदारांच्या मानसिकतेचा अंदाज त्यांना आहे... अगदी बारीक बारीक गोष्टींचं निरिक्षण करण्याचं कसब आहे त्यावरून योग्य निष्कर्ष काढून ते काम करतात. काटेकोर नियोजन ही आणखी एक जमेची बाजू, अंमलबजावणी करणारी सक्षम टीम आहे. त्यामुळेच देशातील युवक आणि त्यातही पहिल्यांदाच मतदान करणारा नव मतदार तसंच महिला वर्ग या दोन घटकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपलं लक्ष केंद्रित केलं. खरं तर गुजरातमध्ये त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला होता त्यामुळेच सलग तीन वेळा ते बहुमताने निवडून येऊ शकले. तोच प्रयोग ते देश पातळीवर राबवत आहेत. गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये देशातील,महाराष्ट्रातील त्यातही मुंबईतील युवा मोदी आणि भाजपच्या मागे उभा राहिला असं चित्र आहे. भारतातील 65 टक्के जनता 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. 50 टक्के जनतेचं वय 25 च्या आत आहे. म्हणजे 140 कोटींपैकी 70 कोटींपेक्षा जास्त जनता 1998 नंतर जन्मलेली आहे. 140 कोटींपैकी 91 कोटी जनता 1988 नंतर जन्मलेली आहे. त्यातही 18 ते 25 वयोगटातील युवा मतदारांची संख्या 18 ते 19 कोटी तरी असेल. 


2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या युवा पिढीलाच आपलंस करण्यात मोदींना यश आलं होतं. यातल्या फर्स्ट टाईम व्होटर्स नी मोदींसाठी भाजपला पसंती दिली होती. 2014 साली 41 टक्के युवा मतदारांनी मोदींना मत दिलं होतं त्यातले 68 टक्के फर्स्ट टाईम व्होटर्स होते, त्यातही महिला मतदारांची संख्या जास्त होती. 2014 ते 2019 या काळात ४.५ कोटी मतदार नोंदणी झाली. 2019 साली पहिल्यांदा मतदान करणारांची संख्या होती सव्वा कोटी. म्हणजे हे या सहस्त्रकाच्या पहिल्या वर्षात जन्मले होते. यावेळी सुद्धा या नव मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने मोहीम उघडली आहे. 


फर्स्ट टाईम वोटरला त्यांच्याच भाषेत आणि त्यांच्याच प्लॅटफॉर्मवर साद घातली, त्याला स्वप्न बघायला शिकवलं, नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा तरुण घडवण्यासाठी प्रयत्न केले. हा युवा मतदार मोदींच्या मागे उभा ठाकला. या म्हणजे 2024 च्या लोकसभेला पहिल्यांदा मतदान करणारा मतदार 2014 साली अवघ्या 8 वर्षाचा पोरगा पोरगी होते, ते तेव्हापासून सगळीकडे मोदी मोदी, विकास विकास, पप्पू, फेकू, राम मंदिर, जिहाद, हिंदू, सनातन, सर्जिकल स्ट्राईक, विश्वगुरु, अशा शब्दांच्या फेऱ्यातच वाढले आहेत. हा वर्ग जेव्हा पहिल्यांदा ईव्हीएम चं बटन दाबून तेव्हा त्याच्या डोक्यात हेच चित्र हेच विचार फिरत असण्याची शक्यता जास्त. 


2019 लोकसभेसाठी मतदानाचा  हक्क असलेले मतदार  91 कोटी 20 लाख होते.  यातल्या 30 कोटींनी मतदानाचा हक्क बजावलाच नाही. या वेळच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांची संख्या 95 कोटी पेक्षा जास्त असेल. म्हणजे 2019 ते 2024 या गेल्या 5 वर्षात जवळपास 4 कोटी नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे आणि यातल्या किमान 2 ते 2.5 कोटी महिला आहेत. 1951-52 साली देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हा मतदार  17 कोटी 32 लाख होते. गेल्या 70 वर्षात जवळपास सहा पट (78 कोटी) मतदार वाढले आहेत. 


यात अर्थातच महिला मतदारांचा वाटा लक्षणीय आहे त्यामुळेच पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी देशातील सर्व सामान्य महिलांच्या चूल,मूूल, शौचालय, घर, बँक अशा मूलभूत गरजांकडे लक्ष दिलं. महिला बचत गटाकडे लक्ष दिलं, लाडली बहन, लखपती दीदी अशा अनेक योजना दिल्या. आता त्यात महिलांच्या आस्थेच्या श्रद्धेचा विषय असलेल्या अयोध्या राम मंदिराची भर पडली आहे. 2019 साली पुरुष मतदारापेक्षा महिला मतदानासाठी जास्त संख्येत बाहेर दिल्ली ६७.१८ टक्के महिला तर ६७.०१ टक्के पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 


2024 च्या निवडणुकीत 95-96 कोटी मतदारांपैकी 68 कोटी मतदार मतदान करतील असा अंदाज आहे, त्यातले ४९ टक्के म्हणजे ३३ कोटी महिला मतदार असतील तर ३५ कोटी पुरुष मतदार असतील. पण पुढच्या म्हणजे 2029 च्या निवडणुकांपर्यंत तर महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त असेल असं एसबीआयचा एक सर्वे सांगतो. त्यावेळी महिला मतदार 37 कोटींवर पोहोचतील असा अंदाज आहे. त्याहून इंटरेस्टिंग बाब म्हणजे 2047 च्या निवडणुकीपर्यंत मतदानाला बाहेर पडणाऱ्या महिला मतदारांचा आकडा 55 टक्के पार गेला असेल. यावरुन मोदी महिलांच्या प्रश्नांकडे इतकं का लक्ष देतात याचा अंदाज येईल. तरुण आणि महिला या दोघांची स्वप्न आपणच पूर्ण करु शकतो असं चित्र उभं करण्यात मोदी यशस्वी ठरले. या दोन्ही गटांनी मोदींवर विश्वास दाखवला आणि सत्तेचा मार्ग निष्कंटक केला. आता तिसऱ्यांदा भाजपला सत्ता काबीज करायची असेल तर या दोन्ही घटकांवर मोदींची मोठी मदार असणार आहे. त्यामुळेच नाशिक मध्ये आज युवा शक्ती आणि स्त्री शक्तीला नरेंद्र मोदींनी साद घातली. त्याला कसा प्रतिसाद देतात ते येत्या महिना दोन महिन्यात कळेलच.