लियोनेल मेस्सी... फुटबॉल विश्वातील दिग्गज नाव. आर्थिक अस्थिरतेचा सामना करणाऱ्या अर्जेटिनाचा मसिहा. फुटबॉल जगतातील बादशाह आणि बरंच काही... मेस्सी म्हटलं की, जगभरातील असंख्य चाहत्यांच्या नजरा खिळतात. फुटबॉल विश्वातील असंख्य रेकॉर्ड आपल्या नावे करणारा मेस्सी. मेस्सीनं जवळपास सगळे विक्रम आपल्या नावे केले, पण खंत होती ती विश्वचषकाची. अन् आज अखेर मेस्सीनं हा दुष्काळ संपवलाच... मेस्सी आता खऱ्या अर्थानं विश्वविजेता बनला. मेस्सीची जादू फुटबॉल विश्वात फक्त आजच नाहीतर, भविष्यातही कायम राहील. 


दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागात सुमारे 5 कोटी लोकसंख्या असलेला अर्जेंटिनामध्ये (Argentina) सध्या आनंदाचं वातावरण आहे. संपूर्ण देश आज आपल्या विश्वविजयाचा आनंद साजरा करतोय. कारण त्यांचा देश आज जग्गजेता ठरलाय. लियोनेल मेस्सीच्या (Lionel Messi) नेतृत्त्वात खेळणाऱ्या त्यांच्या अर्जेंटिना फुटबॉल संघानं (Argentina National Football Team) जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेच्या खिताबावर आपलं नाव कोरलंय.  


फुटबॉल (Football) हा जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा खेळ. याच खेळाची जगातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे, फिफा. याच फिफा : फुटबॉल विश्वचषकाच्या ट्रॉफिवर अर्जेंटिनानं आपलं नाव कोरलं आहे. हे स्वप्न पूर्ण केलंय अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीनं. जगाच्या पाठीवर अर्जेंटिनाची सर्वात मोठी ओळख म्हणजे, लियोनेल मेस्सी. अर्जेंटिनातील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा, ज्यानं आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर अर्जेंटिनाचं नाव जगभरातील प्रत्येक घरात पोहोचवलं. 


राजकीय आणि आर्थिक अडचणी नेहमीच अर्जेंटिनाच्या पाचवीला पुजलेल्या. लोकशाहीबाबत बोलायचं झालं तर, अर्जेंटिनामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही आली ती, 1983 मध्ये. त्यापूर्वी तब्बल 6 वेळा देशात सरकार स्थापन झालं. पण लष्करानं सत्तापालट करून पुन्हा सत्ता काबीज केली. अखेर 1983 मध्ये अर्जेंटिनात लोकशाही आली आणि ती आजतागायत अबाधित आहे.


1983 नंतर अर्जेंटिना आपल्या जुन्या जखमा विसरून विकासाच्या दिशेनं पुढे पावलं टाकत होता. अशातच अर्जेंटिनाचं भाग्य खऱ्या अर्थानं बदलणारा दिवस उगवला,तो म्हणजे 24 जून 1987. या दिवशी अर्जेंटिनामधल्या एका सामान्य कुटुंबात एका चिमुकल्याचा जन्म झाला. हा चिमुकला म्हणजे, फुटबॉल जगतातील दिग्गज खेळाडू आणि अर्जेंटिनाची ओळख असलेला लियोनेल मेस्सी. 


एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मेस्सीने फुटबॉल जगतात आपला ठसा कसा उमटवला, हे जाणून घेणं औत्सुक्याचं आहे. त्याची स्वतःची एक वेगळी कहाणी आहे. मेस्सी' होणं एवढं सोप्पं नव्हतं. जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अर्जेंटिनामधील एका सामान्य कुटुंबातील हा लिओनेल आंद्रेस मेस्सी (Lionel Andrés Messi) संपूर्ण जगाचा लाडका 'मेस्सी' बनला.


अर्जेंटिनामध्ये राहणारं मेस्सी हे मध्यमवर्गीय कुटुंब. याच कुटुंबात लियोनेलचा जन्म झाला. लियोनेलचे वडिल एका कारखान्यात काम करायचे. तर आई सफाई कर्मचारी म्हणून काम करायची. तसं पाहायला गेलं तर मेस्सीनं लहानपणापासूनच घरात फुटबॉलचं वातावरण अनुभवलं होतं. कारण मेस्सीचे वडिल आंद्रेस मेस्सी एका फुटबॉल क्लबमध्ये प्रशिक्षकाचं काम करायचे. मेस्सीनंही वयाच्या पाचव्या वर्षापासूनच फुटबॉलचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. तिथूनच दिग्गज मेस्सीचा फुटबॉल प्रवास सुरू झाला. मेस्सीनं फुटबॉलचं बेसिक शिकण्यास सुरुवात केली. पण कालांतरानं वयाच्या आठव्या वर्षी मेस्सीने आपला क्लब बदलला आणि नेवेल ओल्ड बॉईज क्लबमध्ये प्रवेश केला. पण काळानं आपला खेळ रचला आणि मेस्सीच्या आयुष्यात खूप मोठं संकट येऊन उभं ठाकलं.


वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी लहानग्या मेस्सीला एका दुर्लभ आजारानं ग्रासलं. मेस्सीला ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी नावाच्या आजाराचं निदान झालं. या आजारानं ग्रासलेल्या व्यक्तीची शारीरिक वाढ खुंटते. या आजारावरील उपचार फारच खर्चिक असतात, त्यावेळी मेस्सी कुटुंबाकडे त्यांच्या मुलावर उपचार करण्यासाठी पैसे उभं करण्याचं मोठं आव्हान होतं. पण आधीपासूनच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबासाठी हे अत्यंत अवघड होतं. 


दुसरीकडे छोटा मेस्सी क्लब मॅचेसमध्ये दमदार फरफॉर्मन्स देत होता. रिवर प्लेट क्लबनं मेस्सीला आपल्याकडून खेळण्यासाठी ऑफर दिली. पण ते मेस्सीच्या औषधांचा खर्च उचलू शकत नव्हते. पण ते म्हणतात ना, नशीबाच्या खेळांचा कोणीच अंदाज बांधू शकत नाही, तसंच काहीसं लियोनेल मेस्सीच्या बाबतीत घडलं. फुटबॉल क्लब बार्सिलोना त्यावेळी चिमुकल्या फुटबॉलर्सवर नजर ठेवून होता. टॅलेंट हंट अंतर्गत, लहान शहरं, शाळा, महाविद्यालयं आणि विविध क्लब्समधून काही खेळाडूंना मोठ्या क्लबमध्ये खेळण्याची संधी दिली जाते. त्यावेळी बार्सिलोनानं मेस्सीला हेरलं. 


बार्सिलोना फुटबॉल क्लब के स्पोर्टिंग डायरेक्टर कार्ल्स रॅजॅक यांना लियोनेल मेस्सी नावाच्या लहानग्याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ क्लबकडून मेस्सीला साइन केलं. एवढंच नाहीतर चिमुकल्या मेस्सीच्या उपचारांसोबतच त्याच्या औषधांचा खर्च करण्याचीही तयारी दर्शवली. पण त्यावेळी क्लबनं एक अटही घातली. ती अट म्हणजे, मेस्सीला अर्जेंटिना सोडून बार्सिलोनाला शिफ्ट व्हावं लागणार होतं. मेस्सीचं आजारपण आणि त्याचं भविष्य यांचा सारासार विचार करुन कुटुंबानं क्लबची अट मान्य केली. अन् लियोनेल मेस्सीच्या प्रोफेशनल फुटबॉल करियरला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. 


2001-2002 चा काळ लिओनेल मेस्सीसाठी युरोपमध्ये स्थायिक होण्यासाठी आणि क्लब हस्तांतरणाची औपचारिकता पूर्ण करण्यातच गेला. परंतु त्याची बार्सिलोना-बी संघात निवड झाली, त्या दरम्यान त्यानं जवळजवळ प्रत्येक सामन्यात किमान एक गोल केला. संपूर्ण सीझनमध्ये त्यानं 30 सामन्यांत एकूण 35 गोल केले. वयाच्या 14 व्या वर्षी लिओनेल मेस्सी एका संघाचा भाग होता. मेस्सी छोट्या-छोट्या लीगमध्ये स्वत:चं नाव कमावत होता आणि आपला गेम आणखी दमदार करत होता. 


2004-05 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी लिओनेल मेस्सीनं बार्सिलोना क्लबसाठी आपला डेब्यू केला. बार्सिलोनाकडून फुटबॉल खेळणारा तो तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला. लिओनेल मेस्सीनं 1 मे 2005 रोजी सीनियर टीमसाठी पहिला गोल केला. लिओनेल मेस्सीनं 24 जून रोजी सीनियर प्लेयर म्हणून बार्सिलोनासोबत करार केला आणि त्यानंतर जे घडलं तो इतिहास म्हणून सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं.  


आज मेस्सीनं फिफा टायटलही आपल्या नावापुढे लावलंय. अर्जेटिना आणि बार्सिलोनासाठी (Barcelona) त्यानं केलेली कामगिरी अतुलनिय आहे. सात वेळा फुटबॉल विश्वातील बॅलोन डी'ओर, सहा वेळा युरोपियन गोल्डन शूज, बार्सिलोनासह विक्रमी 35 खिताब, ला लीगामध्ये 474 गोल, एका क्लबसाठी (बार्सिलोना) सर्वाधिक 672 गोल करणाऱ्या मेस्सीच्या नावापुढे आता फिफा टायटलही जोडलं गेलं आहे. 


आज मेस्सीच्या नेतृत्त्वात अर्जेंटिनानं विश्वचषक जिंकून इतिहासच रचला आहे. आजच्या विजयासही मेस्सीचं नाव पेले आणि डिएगो मॅराडोना यांसारख्या दिग्गज फुटबॉलर्सच्या यादीत सहभागी झालं आहे. 


अर्जेंटिनानं 1986 मध्ये शेवटचा विश्वचषक जिंकला होता, तेव्हा डिएगो मॅराडोना (Diego Maradona) अर्जेंटिनासाठी देव ठरले होते. माराडोना यांच्या विक्रमाच्या जवळ जाणारा मेस्सी हा एकमेव फुटबॉलर आहे. मेस्सीसह त्याच्या जगभरातील चाहत्यांच्या मनात केवळ एकच खंत होती. ती म्हणजे, मेस्सीनं फिफा विश्वचषक पटकावणं. 2014 च्या फिफा फायनलमध्ये जर्मनीनं अर्जेंटिनाचा एका गोलनं पराभव केला आणि जगभरातून मेस्सीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. तसेच, यंदाच्या फिफामध्ये ज्यावेळी पहिल्या सामन्यात सौदी अरेबियानं अर्जेंटिनाचा परभाव केला, त्यावेळीही मेस्सी आणि अर्जेंटिनावर असंख्य प्रश्न उभे राहिले होते. पण म्हणतात ना... मेस्सी है तो मुमकीन है! आणि मेस्सीनं करुन दाखवलं. आपल्या कारकिर्दीत अर्जेंटिनाचं नाव त्यानं फिफा विश्वचषकावर कोरलंच. 


क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचं नाव क्रिकेटच्या इतिहासात कोरलं गेलंय. तसंच, फुटलबॉलच्या इतिहासात मेस्सीचं नाव कोरलं गेलंय. काल, आज अन् उद्याही फुटबॉलच्या रोमांचावेळी, विक्रमावेळी फुटबॉल चाहत्यांच्या ओठांवर मेस्सीचं नाव असेल, यात शंकाच नाही...!