शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल, काहीही काय? बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त हिट चित्रपट देणाऱ्यांची यादी पाहिली तर त्यात ज्युबिलीकुमार राजेन्द्र कुमार, राजेश खन्ना, जितेंद्र, अमिताभ बच्चन यांची नावे प्रामुख्याने घेतलेली दिसतात. याशिवाय देव आनंद, राज कपूर, शम्मी कपूर यांचे चित्रपटही प्रचंड यशस्वी झालेले दिसून येतात. असे असले तरी ही-मॅन धर्मेंद्र या सगळ्या नायकांपेक्षा किती तरी पावले पुढे आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण धर्मेंद्रने थोडे थोडके नव्हे तर तब्बल 100 हिट सिनेमे दिलेत. 8 डिसेंबर हा धर्मेंद्रचा वाढदिवस आहे. त्यनिमित्ताने त्याच्या या कारकिर्दीची माहिती एबीपी माझाच्या वाचकांसमोर आम्ही ठेवत आहोत.


धर्मेंद्रचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी झाला. तो 86 वर्षांचा झालाय. धर्मेंद्रने 100 पेक्षा जास्त असे चित्रपट दिलेत ज्यांनी निर्मात्यांवर पैशांची बरसात केलीय. यापैकी जवळ जवळ 60 चित्रपट हे ज्युबिली हिट्स आहेत. मात्र धर्मेंद्रने कधीही पब्लिसिटीवर लक्ष दिले नाही, त्याच्यावर कोणी पुस्तके लिहीली नाहीत, त्यामुळे तो सुपरहिट असूनही सुपरिहट नसल्याचे बॉलिवूडमध्ये आणि मीडियामध्येही दिसत आहे. धर्मेंद्रचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अन्य नायकांप्रमाणे तो उगाचच फुकाचा आव आणून मोठमोठ्या पुड्या सोडत नाही. त्यामुळेही तो तसा मीडियापासून लांबच आहे. एवढंच नव्हे तर त्याला त्याची प्रशंसा केलेलीही आवडत नाही. आपण भले आणि आपले काम भले यात तो मश्गुल असल्याने तो मीडिया का लाडला झाला नाही आणि त्यामुळेच त्याचे कर्तृत्व प्रेक्षकांसमोर खऱ्या रूपात आले नाही.




धर्मेंद्रच्या जागी दुसऱ्या एखाद्या नायकाने इतके हिट चित्रपट दिले असते तर त्याचे हात आभाळाला लागले असते. तो स्वतःला सुपरस्टार समजू लागला असता. याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. पण धर्मेंद्रचे पाय अजूनही जमिनीवर आहेत.


1960 मध्ये धर्मेंद्रचा पहिला चित्रपट 'दिल भी तेरा हम भी तेरे' प्रदर्शित झाला होता. निर्माता-दिग्दर्शक अर्जुन हिंगोरानी यांनी या चित्रपटासाठी मानधन म्हणून धर्मेंद्रला 51 रुपये दिले होते. या चित्रपटाने या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि या दोघांनी अनेक हिट चित्रपट दिले. बॉलिवूडमध्ये म्हटले जाते की धर्मेंद्र मैत्रीला जागणारा आहे. आणि याचे अनेक किस्से पार्ट्यांमध्ये रंगवून सांगितले जातात. शेरोशायरीची आवड असलेला धर्मेंद्र खाजगी भेटींमध्ये शेरोशायरी सहजपणे म्हणत असतो. मी स्वतः याचा एकदा अनुभव घेतलेला आहे.




1960 मध्ये काम करण्यास सुरुवात केलेला धर्मेंद्र आजही कार्यरत आहे. आजही त्याचे दोन चित्रपट सेटवर असून यापैकी एका चित्रपटात तो सनी, बॉबी या मुलांसह नातू करणसोबतही दिसणार आहे. धर्मेंद्रच्या चित्रपटांनी केवळ निर्माता, वितरक, चित्रपटगृह मालक यांनाच श्रीमंत केले नाही तर ब्लॅक मार्केट आणि कँटीनवाल्यांनाही श्रीमंत केले. देशात धर्मेंद्र असा एकमेव नायक आहे ज्याचे चित्रपट संपूर्ण देशभर हिट झालेले आहेत. संपूर्ण देशभर चित्रपट हिट करणाऱ्या नायकांमध्ये धर्मेंद्रचे नाव फार वरचे आहे. आज तसा कोणीही नायक दिसत नाही. एवढेच नव्हे तर धर्मेंद्रच्या चित्रपटांना रिपिट व्हॅल्यूही आहे. आजही त्याचे चित्रपट यूट्यूबवर आणि छोट्या पडद्यावर आवडीने पाहिले जातात.




धर्मेंद्रने सामाजिक विषयांवरील चित्रपटांपासून तद्दन व्यावसायिक चित्रपटापर्यंत अनेक चित्रपट केले. विनोदी चित्रपटही त्याची खासियत होती. सत्यकाम. चुपके चुपके, अनुपमा, देवर, कहानी किस्मत की, आझाद, राम बलराम, धरम वीर, शोले, यकीन हे काही चित्रपट धर्मेंद्रच्या वैविध्यपूर्ण भूमिकांची आठवण करून देणारे आहेत. त्याच्या अँक्शनमुळेच त्याला ही-मॅन ही पदवीही प्रेक्षकांनी दिली होती. त्याचे चित्रपट पैसे मिळवून देत असल्याने निर्माते पैशाच्या थैल्या घेऊन त्याच्याकडे जात असत. नायक म्हणून काम करीत असतानाच धर्मेंद्रने निर्मात म्हणूनही अनेक चांगले आणि वेगळ्या विषयावरील चित्रपट तयार केलेत. एवढेच नव्हे तर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलालसोबतही काही चित्रपट त्याने प्रस्तुत केलेत. त्याच्या चित्रपटातील गाण्यांनी म्यूझिक कॅसेट कंपन्यांना प्रचंड पैसा कमवून दिला आहे.


आज एखादा चित्रपट तीन दिवस चालला की नायकाचा उदो उदो केला जातो पण धर्मेंद्रचे अनेक चित्रपट 100 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेले आहेत. धर्मेंद्रच्या 100 हिट चित्रपटांच्या जवळ बॉलिवूडमधला एकही नायक पोहोचलेला नाही. यावरूनच धर्मेंद्र किती श्रेष्ठ आहे हे दिसून येते. पब्लिसिटीपासून दूर राहिला असला तरी धर्मेंद्र प्रेक्षकांच्या मनाचा आणि बॉक्स ऑफिसचा राजा आहे यात शंका नाही.


धर्मेंद्रला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!