Kurak Movie Review: गेली काही वर्ष इराणमधल्या महिलांचे मानवी हक्क यावर ज़ोरदार चर्चा होतेय. द सीड ऑफ द स्क्रेड फिग (2024) हा दिग्दर्शक मोहम्मद रसॉल्फचा सिनेमा जगभरात गाजला. हिजाब विरोधात तिथल्या महिलांनी सुरु केलेल्या खऱ्या खुऱ्या आंदोलनाची दृश्य या सिनेमात आपल्याला दिसली. जगभरात त्याची चर्चा झाली. मोहम्मद रसॉल्फला इराण सोडून जर्मनीमध्ये शरणार्थी म्हणून राहावं लागलं. इराणपासून काही हजार किलोमीटर असलेल्या किर्गिझस्तान या देशातही महिला हक्कांसाठी जोरदार निदर्शनं होतायत. अपहरण करुन जबरदस्तीनं लग्न करणं, बाल-विवाह हे वरवरचे मुद्दे आहेत. आत समाजात महिलांवर अन्यायाची साखळीच तयार झालेली आहे. पुरुषसत्ताक समाजात महिला भोगवस्तू म्हणून पाहिल्या जातात. 2020 ला या विरोधात एक मोठं आंदोलन झालं. महिलांचा मोर्चा निघाला त्यात अचानक काही बुरखाधारी घुसले आणि त्यांनी आंदोलक महिलांना मारहाण करायला सुरुवात केली. डोकी फुटली, हात पाय तुटले. मग तिथं पोलीस आले. पोलीसांनी मारहाण झालेल्या महिलांनाच अटक केली. त्यांना जेलमध्ये डांबून टाकलं. त्यांचा छळ केला. त्यांच्यावर अनेक केसेस चालल्या. अजूनही सुरु आहेत. मारहाण करणारे राहिले बाजूला, ज्यांच्यावर अन्याय होतोय, मारहाण होतेय, त्यांनाच जेलची हवा खावी लागली. इर्के झुमक्मतोवा या किर्गिझ दिग्दर्शिकेच्या कुराक (2025) सिनेमाची सुरुवात याच टेलिव्हिजन फुटेजने होते. पाच ते सहा न्यूज चॅनल्सनी हे फुटेज इर्केला उपलब्ध करुन दिले. 2025 येईपर्यंत ही सर्व न्यूज चॅनल्स पद्धतशीरपणे बंद पाडण्यात आली. महिलांच्या आंदोलनाची न्यूज स्टोरीही सरकारी पातळीवर घातक आहे. अशी गळचेपी सुरु असताना कुराक या महिलांच्या हक्काची गोष्ट सांगणारा कुराक सिनेमा जगभरात पोचला. दक्षिण कोरियात झालेल्या बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याला दोन महत्त्वाचे पुरस्कार ही मिळाले. बुसानमध्ये सिनेमाचा वर्ल्ड प्रिमियर झाला. तिथं किर्गिझ सरकारचे काही प्रतिनिधी होते. किर्गिझस्तानच्या डिपार्टमेन्ट ऑफ सिनेमॅटोग्राफीनं या सिनेमाच्या निर्मितीत मदत केलीय. त्यामुळं हे असं देशाची बदनामी करणारं सिनेमात दाखवू नका नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी थेट धमकीच इर्केला देण्यात आली.
कुराक (2025) ही किर्गिझस्तानमध्ये महिलांवर होणाऱ्या अतोनात अत्याचाराची गोष्ट सांगते. नरगीस आणि मरिईम या 17-18 वर्षांच्या मुली, गरगीसची आई आणि एक टेलिव्हिजन अँकर यांच्याभोवती सिनेमाचं कथानक फिरतं. पण ही चौरचौघींची गोष्ट नाही तर तिथल्या प्रत्येक महिलेला ज्या दहशतीतून जावं लागतंय. त्याची ही गोष्ट आहे. इर्केनं न्यूज फुटेडचा कलात्मक वापर केला आहे. महिलांना सेक्स ऑब्जेक्ट म्हणून पाहणाऱ्या या पुरुषी समाजाविरोधात काही वर्षांपुर्वी तिथल्या महिलांनी एल्गार पुकारला. एका प्रदर्शनात काही महिला नग्न झाल्या. 90 टक्के सुन्नी मुस्लिम असलेल्या या देशात हे असं आंदोलन करणं म्हणजे मृत्यूला सामोरं जाणं. हे माहित असताना आमचं शरिर हे फक्त भोगण्यासाठी नाही असं या महिलांनी ठणकावून सांगितलं. या महिलांना अटक झाली, खटले चालले, हे नव्यानं सांगायला नको. सिनेमाची मुख्य पात्रं नरगीस आणि मरिईम आर्ट्सच्या स्टुडंट आहेत. वयात आलेल्या या दोन मैत्रिणींचं भावविश्व वेगळं आहे. नरगीस आईसोबत आहे. तिच्यावर ही तरुणपणी बलात्कार झालाय. हे नरगीसपासून तिनं लपवलंय. या बलात्कारातूनच नरगीसचा जन्म झालाय. बापाशिवाय तिनं आपल्या मुलीला वाढवलंय. दुसरीकडे मरिईम पैसे कमवण्यासाठी कॅम गर्ल म्हणून काम करते. त्यावर तिचा शिक्षणाचा खर्च चालतोय. कॅमगर्ल म्हणजे कॅमेऱ्यासमोर एक एक करुन कपडे काढणं किंवा मग समोरच्या पुरुषाशी सेक्ससंदर्भात बोलणं. कट्टर मुस्लिम असलेल्या किर्गिझस्तानमध्ये कॅमगर्लची मोठी इंडस्ट्री उभी राहिलीय. अश्या या दोघी जिवलग मैत्रिणी पुरुषसत्ताक फेऱ्यात अडकतात. एक आत्महत्या करते आणि दुसरीला तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासोबत मर्जीविरोधात लग्न करावं लागतं. कुराकच्या गोष्टीतली टेलिव्हिजन अँकर ही मुकनायक आहे. एव्हढं काही आसपास घडत असताना ती काहीच करु शकत नाही. न्यूज हे तिचं माध्यम आहे. पण त्यावर ही सरकारचं नियंत्रण आहे. त्यामुळं त्याना जशा हव्या तश्या बातम्या द्याव्या लागतात. अशा फेऱ्यात ती अडकलेय.
किर्गिझस्तानमध्ये आला काचू ही प्रथा आहे. आला काचू म्हणजे वयात येणाऱ्या तरुण मुलींचं अपहरण करायचं आणि त्याच्यावर बलात्कार करायचा आणि तिच्याशी जबरदस्तीनं लग्न करायचं. या प्रक्रियेत त्या तरुण मुलींचे प्रचंड शारिरीक आणि मानसिक हाल होत असतात. ज्यानं आपल्याला पळवून आणलंय, बलात्कार केलाय, त्याच्यासोबत आयुष्यभर संसार करायचा आहे, पुढचं आयुष्य काढायचं आहे. ही कल्पनाच किती भयावह आहे. मुलींच्या गायब होण्याचं प्रमाण ही खूप आहे. महिला पोलीसांची संख्या फारच कमी आहे. आला काचूची 80 टक्के प्रकरणं रिपोर्ट होत नाहीत. झालीच तर त्याचा तपास करताना महिला पोलीस नसतात. अनेकदा बलात्कारी पुरुष आणि पिडीत महिला या दोघांना एकाच रुममध्ये समोरासमोर बसवून चौकशी केली जाते. त्यानं नक्की कसा बलात्कार केला, काय केलं हे सर्व पुरुष तपास अधिकाऱ्यासमोर त्या पिडीत महिलेनं सांगायचं. हे सर्व अपमानास्पद आहे. यात ही पुरुषाची बाजू वरचढ असते. अश्याच एका प्रकरणात चौकशी दरम्यान बलात्कारी आरोपीनं पीडीतेचा चाकू खुपसून खून केला. ती मुलगी फक्त 17 वर्षांची होती. या घटनेतूनच कुराक या फिल्मची निर्मिती झालीय असं इर्केनं सांगितलं.
या सर्व त्रासाला कंटाळून अनेक महिला आत्महत्या करतात. इस्लाममध्ये आत्महत्या म्हणजे पाप. या आत्महत्या करणाऱ्या महिलांसाठी प्रार्थना करायचे धर्मगुरु टाळतात. मग त्यांना पैसे द्यावे लागतात. मग आपोआप प्रार्थना होते. असा धार्मिक भ्रष्टाचार ही फोफावला आहे.
हिजाब विरोधात किर्गिझस्तानमध्ये आंदोलनं झाली. त्यानंतर महिलांच्या पेहराववर शिथीलता आली. कुराक सिनेमातली मरिईमची भूमिका करणारी अभिनेत्री झानर अलीयेवा तिथली प्रसिद्ध ब्लॉगर आहे. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. राजधानीचं शहर बिश्केक इथं झालेल्या सरकारी फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिने काळा मॉडर्न ड्रेस घातला होता. स्लिव्हलेस आणि पारदर्शक ड्रेसवरुन हंगामा झाला. धर्मांध भडकले. सरकारी यंत्रणा हलली. डिपार्टमेन्ट ऑफ सिनेमॅटोग्राफीच्या उपसंचालकावर गुन्हा दाखल झाला. सरकारी कार्यक्रमात तिने स्लिव्हलेस ड्रेस घातलाच कसा असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांना नोकरी गमवावी लागली. अश्या पध्दतीचं अंगप्रदर्शन करणाऱ्या कृत्याला आम्ही सपोर्ट करत नाही, ही आपली संस्कृती नाही अशी प्रेस रिलीज सरकारच्या सांस्कृतिक खात्याकडून काढण्यात आली.
किर्गिझस्तानमध्ये हा सिनेमा रिलीज झाल्यावर माझं काय होईल मला माहित नाही, असं कुराक सिनेमाच्या दिग्दर्शिका इर्के आवर्जून सांगतात. सध्या तरी स्विडन आणि फ्रान्सच्या मदतीनं हा सिनेमा जगभरात पोचवणं हेच आपलं ध्येय असल्याचं त्यांनी म्हटलंय. कदाचित कुराक किर्गिझस्तानमध्ये रिलीज ही होणार नाही. त्यावर बंदी येईल. पण तोवर जगभरात हा सिनेमा पोचला पाहिजे. आमच्या महिलांच्या समस्या जगाला समजल्या पाहिजे. असं त्यांना वाटतंय. ही फक्त किर्गिझ बाईची गोष्ट नाही तर जगभरात जिथं जिथं महिलांवर अन्याय अत्याचार होतायतय तिथल्या प्रत्येक बाईची ही गोष्ट आहे आणि ती प्रेक्षकांपर्यत पोचायलाच हवी असं इर्के म्हणतात.