नवरात्र संपले की वेध लागतात कोजागिरीचे. नवरात्रीचे समापनच कोजागिरीने होते असे म्हटले तर वावगं होणार नाही. शरद ऋतूतील आश्विन महिना. आश्विन महिन्यातील आश्विन पौर्णिमा म्हणजेच "कोजागरी पौर्णिमा" किंवा "शरद पौर्णिमा". या पौर्णिमेला अजूनही बरीच नावे आहेत.

कोजागिरी पोर्णिमा ! 
कोऽजार्गति? कोऽजार्गति?
म्हणजे कोण जागे आहे ?, कोण जागृत आहे?

असे विचारत देवी सर्वत्र फिरते असे म्हणतात. नवरात्राचे नऊ दिवस शक्ति व बुध्दिच्या दैवताचे आराधान करून दसऱ्याला म्हणजेच विजया दशमीला विजय संपादनासाठी सीमोल्लंघन करतात व त्यानंतर येणारी ही पोर्णिमा अर्थात अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी ! कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो. चंद्राच्या या गुणांमुळेच 'नक्षत्राणामहं शशी' म्हणजे 'नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे', असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे.  कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. काही मान्यता नुसार अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचा जन्म झाला आणि समुद्र मंथनाच्या दिवशी लक्ष्मी देवी भूतलावर प्रकट झाली, असे सांगितले जाते.

या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करतात. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे. या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा प्रघात आहे. ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला 'कोजागरव्रत' म्हणतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी, या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवावा. दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, नैवेद्य दाखविला जातो. देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते आप्तेष्टांसह स्वतःही सेवन करावेत.


रात्री उशिरापर्यंत गप्पा-गोष्ठी करत, रास व गरबा खेळत, आठवणीतील गाणी गात सर्वजण जागरण करतात. दूध आटवून बदाम, केशर, पिस्ता वगैरे सुकामेवा घालून लक्ष्मी देवीला व चंद्राला नैवेद्य दाखविला जातो आणि ते मसाला दूध मग प्राशन केले जाते. चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात सबंध पृथ्वीला न्हाऊ घालत असतो. कोजागरी पौर्णिमेच्या अनेक कथा आहेत, त्यापैकी एक अशी सांगितली जाते की, एकदा एक राजा आपले सगळे वैभव्य आणि संपत्ती गमावून बसतो. त्याची राणी महालक्ष्मीचे व्रत करते आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देते आणि त्या राजाचे वैभव त्याला परत मिळते. असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्रमंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात "अमृतकलश' घेऊन प्रत्येकालाच विचारते, की  "को जागर्ति...? को... जागर्ति...?' म्हणजे आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का? कुणी जागं आहे का? अन् तिच्या हाकेला साद देण्यासाठी सगळेच जागे राहतात. मग तिची वाट पाहणाऱ्या, साद देणाऱ्या सगळ्यांना ती "अमृत' म्हणजे लक्ष्मीचं वरदान देते, धनधान्य, सुखसमृद्धी देते. या दिवशी द्यूत खेळावे, असेही सांगितले आहे. लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इ. ठिकाणी असंख्य दीप लावावेत.

सनत्कुमार संहितेत ह्या व्रताची  अजून एक कथा दिली आहे. प्राचीन काळी याच दिवशी 'कौमुदी महोत्सव' साजरा करीत. 'कौमुदी पौर्णिमा' व 'शरद पौर्णिमा' अशीही नावे ह्या दिवसास आहेत.पावसाळ्यानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही पौर्णिमा असल्यामुळेही तिला उत्सवाचे महत्त्व आले असावे. या दिवशी विधीपूर्वक स्नान करून उपवास ठेवायला पाहिजे. काही लोक तांब्याच्या किंवा मातीच्या कलश्यावर वस्त्राने झाकलेली सोन्याची लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर सोने, चांदी किंवा मातीचे तुपाने भरलेले दिवे लावतात. देवीला नैवैद्य दाखविला जातो. तूप घातलेली खीर तयार करून व बर्‍याच पात्रात भरून ती चंद्र किरणांखाली ठेवली जाते. तीन तासानंतर संपूर्ण खीर लक्ष्मीला अर्पित करून जेष्ठांना प्रसाद म्हणून वाढावी. त्याबरोबर मांगल्यमय गाणी म्हणून, भजने म्हणत रात्री जागरण करावे. सकाळी सुर्योदयावेळी स्नान करून लक्ष्मीची सुवर्णाची प्रतिमा आपल्या गुरूंना अर्पित करावी. अशीही काही ठिकाणी पद्धत, परंपरा आहे.

शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असतात..एकीकडे पावसाळा संपत असतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरु होत असतो. दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते. चंद्र प्रकाशातील दुधामुळे पित्त प्रकोप कमी होतो. याच कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रधा आहे. कोजागरीचं शीतल चांदणं अंगावर घेतलं, की मनःशांती, मनःशक्ती, उत्तम आरोग्य लाभतं.

अशा या संपन्नतेमध्ये शरद पोर्णिमेला शबरीचा जन्म झाला. शबरी ही शबर राजाची कन्या होती. कोणी तिच्या वनवासी भिल्ल समाजाची असण्यावर भर देतात. कोणाला मातंग ऋषीं समोर अध्यात्मिक आस पूर्ण करण्यासाठी गुरू उपदेश घेणारी शबरी भावते. तर कोणाला आपल्या दैवताला जे आहे ते, प्रसंगी उष्टी बोरे देऊनही समर्पित होणारी शबरी आठवते. कोणाला सीतेच्या शोधार्थ निघालेल्या दशरथ नंदन राम लक्ष्मणांना मार्गदर्शन करणारी शबरी आठवते. किती विविध रूपे ! सगळीच अनुकरणीय आणि म्हणूनच आदर्शवत रूपे !!

चला तर मग … कोजागरी साजरी करूया … मसाला दूध पिऊया … धम्माल करुया !!!