Kiran Thakur, BLOG : ठाकूर सर कमी बोलायचे. ऐकण्यावर त्यांचा भर असायचा . पत्रकारांसाठी तसा हा दुर्मिळ गुण . रानडे इन्स्टिट्यूट च्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांचा दरारा किंवा जरब वाटायची नाही. वाटायचा तो आपलेपणा . वर्गात आले की समोरच्या विद्यार्थ्यांवर एक मिश्किल नजर फिरवायचे . पत्रकारितेचं शिक्षण घेण्यासाठी दाखल झालेले अनेकजण सुरुवातील टिळक - आगकरांचा अभिनिवेश बाळगून असतात . व्यावसायिक पत्रकारितेच्या पाण्
BLOG : किरण ठाकूर; शांत आणि तरीही स्पष्ट
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
28 Dec 2024 08:37 PM (IST)
Photo Credit - abp majha
पत्रकारितेच्या परंपरागत शिक्षणाबरोबर नवं तंत्रज्ञान आत्मसात करायला हवं हे पटवून द्यायचा त्यांचा प्रयत्न असायचा . याचाच भाग म्हणून रानडे इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी टेक्निकल रायटिंग कोर्सची सुरुवात केली . अनेकांना त्यावेळी त्याच महत्व पटलं नाही . पण ज्यांनी ठाकूर सरांचं ऐकलं आणि तो कोर्स केला ते पुढे गेले .
व्यवसायिक पत्रकारिता आणि त्याचवेळी समाज आणि लोकांबद्दलची बांधिलकी जपणं हे तसं कौशल्याचं काम . ठाकूर सरांनी तीस वर्षांच्या पत्रकारितेत ते कौशल्य कमावलं होतं . अध्यापनाच्या क्षेत्रात उतरल्यावर देखील तो पीळ त्यांनी कायम राखला .
रानडे इन्स्टिट्यूट मध्ये देशातील अनेक नावाजलेल्या पत्रकारांना आमंत्रित केलं जायचं . मुंबई आणि कधी दिल्लीहून ते पत्रकार लेक्चर घेण्यासाठी यायचे . फक्त पत्रकारिता क्षेत्रातीलच नाही तर सामाजिक चळवळी आणि राजकीय क्षेत्रांमध्ये काम करणारे अनेकजण त्यावेळी लेक्चरर म्हणून बोलावले जायचे . विद्यार्थ्यांना त्या लेक्चरर म्हणून येणाऱ्या व्यक्तीला हवा तो प्रश्न विचारता यायचा आणि लेक्चर देण्यासाठी आलेल्या त्या व्यक्तीलाही तिची मतं कितीही टोकाची असली तरी मोकळेपणाने मांडता यायची . आज याच अप्रूप वाटणं साहजिक आहे . रानडे इन्स्टिट्यूटचा गाडा हाकणं तसं सोपं नव्हतं . अनेक वल्ली इथं होत्या . गेस्ट लेक्चरर म्हणून येणाऱ्या अनेकांच्या अनेक तऱ्हा होत्या. राजकारणही होतं . पण ठाकूर सरांचा शांतपणा आणि संयम त्यावेळी वरचढ ठरला . रानडे इन्स्टिट्यूटची प्रत्येकावर्षी ची ब्याच म्हणजे विविधतेचा गुच्छ असायचा. राज्यातील वेगवगेळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी निवडले जायचे. त्यामध्ये इतर राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची भर पडायची . एक दोन परदेशी विद्यार्थीही असायचे . साहजिकच ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी सुरुवातीला कोमेजायचे . आजुबाजाचं वातावरण बघून भांबावून जायचे . अशांना ठाकूर सरांची नजर अचूक हेरायची. यु एन आय , द ऑब्झर्व्हर , इंडियन पोस्ट अशा माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं होतं आणि वर्गातही ते इंग्रजीतूनच शिकवायचे . पण मराठी भाषेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नजरेत दुय्य्मपणाचा भाव कधीही जाणवला नाही . अगदी सहजपणे अशांशी ठाकूर सर बोलायचे . त्यातून त्या विद्यार्थ्याला त्याच्याही नकळतपणे आत्मविश्वास मिळायचा . ठाकूर सरांच्या या हातोटीने अनेकांची गाडी पुढे सरकली.
ठाकूर सरांच्या बोलण्यात कधीही आमच्या काळात असं होतं आणि आता हे असं झालंय असं यायचं नाही . त्यामुळं त्यांना चिडलेलंही कुणी पाहिलं नाही . शिकवायला येणारे अनेकजण पत्रकारितेत होणारे बदल आवडत नसल्याने चिडचिड करायचे आणि आमच्याचवेळी कसं व्याकरण तपासलं जायचं आणि पत्रकारितेचं पावित्र्य जपलं जायचं हे सांगायचे . ठाकूर सरांनी हे असं भूतकाळात रमणं टाळलं . म्हणूनच अखेरपर्यंत ते सक्रिय पत्रकार राहिले . अनेक संस्थांसाठी काम करताना पत्रकार म्हणून त्यांचं लेखन त्यामुळेच सुरु राहिलं . पत्रकाराच्या एखाद्या बातमीबद्द आज सोशल मीडियावर टोकाच्या प्रतिक्रिया उमटतात . काहीवेळा कौतूक होतं तर काहीवेळा शिव्यांची लाखोली वाहिली जाते . कौतुक करणाऱ्यांमध्ये जसे काही तोंडदेखलेपणा करणारे असतात तसं नावं ठेवणाऱ्यांमध्ये पूर्वग्रह बाळगणारेही असतात . या उलट - सुलट प्रतिक्रियांमुळे अनेकदा तो पत्रकार गोंधळतो . आपण राईट ट्रॅकवर आहोत का , की काहीतरी चुकलंय असं त्याला वाटायला लागतं . अशावेळी ठाकूर सरांचा फोन किंवा मेसेज आल्याचा अनुभव त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी अनेकांना आलाय . त्यांच्या त्या फोन किंवा मेसेजनंतर शंका - कुशंकांचा धुरळा खाली बसायचा . चित्र शांत आणि स्पष्टपणे उंटायचं . ठाकूर सर असेच लक्षात राहतील . शांत आणि तरीही स्पष्ट ...
Published at:
28 Dec 2024 08:37 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -