कॅशलेस अभियानात जळगाव व नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका सक्रिय आहे. जळगावच्या जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी प्रशासनासह व्यापारी, दुकानदार व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेवून कॅशलेस व्यवहारांचे आवाहन केले आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनीही कॅशलेस व्यवहाराच्या संदर्भात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेवून दैनंदिन खरेदी-विक्रीत कॅशलेस व्यवहार करावेत असे आवाहन केले आहे. नागरिकांनाही अशा व्यवहारात सहभागी करुन मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारी यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यात सहभागी झाल्याचे विविध कार्यालयांच्या प्रमुखांनी सांगितले. यासाठी युनियन बँकेने पुढाकार घेतला आहे. शाखा व्यवस्थापक अशोक पवार यांनीही कॅशलेस व्यवहार करण्यासाठी मोबाईल ॲप, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकींग अशा सुविधांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
जळगावच्या बाजारपेठेत सध्या कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण ६० टक्केपर्यंत पोहचल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या कॅशलेस गावे अभियानाचा पहिला प्रयोग जामनेर तालुक्यातील सवतखेडा येथून सुरू झाला. मंत्री महाजन यांनी विकास योजनांसाठी सवतखेडी हे गाव दत्त घेतले आहे. दि. ४ डिसेंबर २०१६ रोजी गावात ग्रामसभा घेवून कॅशलेस व्यवहार सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला. या अभियानांतर्गत ग्रामस्थांना कॅशलेस प्रणालीची माहिती देण्यात आली. त्यानंतर गाव कॅशलेस करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला. गावातील दुकानात पेटीएम व्यवस्था सुरु करुन एसबीआय मार्फत सर्व ग्रामस्थांना डेबीट कार्ड देण्याचे ठरले. गावातील दुकानदारांना स्वॅपिंग मशीन दिले जाणार आहे. गावातील प्रत्येक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी पेटीएम सुविधा घ्यावी असे सांगण्यात आले. या अभियानासाठी मंत्री महाजन यांचे जनसंपर्क प्रतिनिधी तथा आरोग्य सेवा विभाग प्रमुख अरविंद देशमुख यांनी नियोजन केले.
जळगाव जिल्हा प्रशासन व सीएससी( (कॉमन सर्व्हिस सेंटर) यांनी संयुक्तपणे गो कॅशलेस, गो डिजिटल हा उपक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३०० सीएससी केंद्रे सुरू केली जातील. प्रत्येक गाव कॅशलेस करण्याचा प्रयत्न होणार आहे. यासाठी ई गव्हर्नन्स सर्विसेसतर्फे कॅशलेस व्यवहार कार्यशाळा झाली. कॅशलेसच्या विविध पर्यायांची माहिती देण्यात आली.
कॅशलेस ग्रामचा दुसरा प्रयोग जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे सुरू झाला. मंत्री महाजन यांचे हे जन्मगाव आहे. या गावात दि. ७ डिसेंबर २०१६ पासून कॅशलेस व्यवहारांचा श्रीगणेशा झाला. तेथे आयसीआयसीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसभा घेऊन दुकानदार व ग्रामस्थांना प्राशिक्षण दिले.
मंत्री महाजन कॅशलेस ग्राम अभियान राबवित असतान जिल्ह्यात अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने आर्थिक साक्षरता कार्यक्रम राबवून ग्रामस्थांना डिजीटल व्यवहारांबाबत माहिती देणे सुरू केले आहे. जिल्हा अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक सुनिल दामले हे ठिकठिकाणी आर्थिक साक्षरता शिबीर घेत आहेत. सेंट्रल बॅंकेच्या वराड शाखेने पिंपळकोठा, एक लग्न येथे अशा शिबिरांचे आयोजन केले. कॅशलेस व्यवहार कसे करावेत याविषयी माहिती देण्यात आली. ग्रामस्थांना रुपे कार्डचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागात बॅंक मित्रांमार्फत बँक खाती उघडण्यासाठी सेवा सुरु झाली आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनाने जिल्हा कॅशलेस होण्यासाठी नागरिकांचे बँक खाते सुरू करण्याकडेही लक्ष दिले आहे. शेतकरी, शेतमजूर यांना बॅंक खाते उघडणे सोईचे व्हावे यासाठी जिल्ह्यात १०९ ठिकाणी बॅंक मित्रसेवा उपक्रम सुरू केला. तेथे ३००५ खाती उघडण्यात आली. जिल्ह्यातील ८६ मंडळ असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात त्याचप्रमाणे १५ तहसिल कार्यालये, ७ उपविभागीय कार्यालये व जिल्हाधिकारी कार्यालयात अशा २३ ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. दि. २९ पासून ८६ मंडळ ठिकाणी प्रत्येकी दोन बॅंक मित्र, तर तहसिल, उपविभागीय कार्यालये व जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रत्येकी ५ बॅंक मित्र उपस्थित आहेत. या केंद्रांवर सेंट्रल बॅंकेने १५२६ , आयडीबीआय बॅंकेने २६३, बॅंक ऑफ बडोदाने ६३, बॅंक ऑफ महाराष्ट्रने ४४, कॅनरा बॅंकेने ५६, तर स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ११०३ अशी एकूण ३००५ खाती शून्य बॅलन्सने सुरु केली आहेत.
मंत्री महाजन व जिल्हा प्रशासनाचे हे कॅशलेस गावे अभियान विस्तारल्यास त्याचा प्रचार जळगाव पॅटर्न म्हणून होण्याची शक्यता आहे. यात जळगाव जिल्हा प्रशासन, अग्रणी बँक व इतर राष्ट्रीय कृत बँकांचे सहकार्य उत्तमपणे मिळत आहे.