पुणे मुंबई रस्त्यावरचा सुखद गारवा लोणावळा
मुंबईच्या कोलाहलातून खंडाळ्याच्या घाटातून वर आल्यावर टाकलेला निश्वास लोणावळा
आणि पुण्याच्या ट्राफिकला कंटाळून घेतलेला मोकळा श्वास लोणावळा..
मुसळधार पावसात भुशी, वळवण डॅमवर गर्दी करणारं लोणावळा
आणि तुंगार्लीच्या शांततेत मनमोकळ होणं म्हणजे लोणावळा..
कधी बाईकवर मस्ती करत आणि कधी
खंडाळ्याच्या घाटापर्यंत हातात हात घालून चालत जाणं म्हणजे लोणावळा..
नखशिखांत भिजून रस्त्याच्या कडेच्या टपरीवर खाल्लेल्या गरमागरम मिक्स भज्यांचा
आणि त्यावर मारलेल्या 2-3 ‘कटिंग चाय’ चा ‘ मझा ’ म्हणजे लोणावळा..
एक्स्प्रेस हायवेवरुन ‘ भन्नाट स्पिडने’ येऊन सुळकन खाली उतरुन गर्दीत सामील होणं
म्हणजे लोणावळा..
जुन्या "बॉम्बे–पुणा हायवे" च्या सतत वाहत्या रहदारीचं लोणावळा
आणि सिंहगड ,डेक्कन क़्क्विनचा बरोबर मधला ‘जंक्शन हॉल्ट’ म्हणजे लोणावळा ..
झुक्झुक्गाडीत आलेली “मगनलाल चिक्की”, आणि हायवेवर आल्यावर नॅशनल आणि A1 चिक्की मिळणारं लोणावळा..
आणि दर्दी लोकांना ‘फ्रेंड्स'च्या शेंगदाणा चिक्कीने खरं समाधान देणारं लोणावळा.
‘कुपर्स'च्या आणि मगनलालच्या ‘फज’ करता जीव टाकणारं लोणावळा
भल्याभल्यानी वाखाणलेल्या “जोशी” ह्यांच्या “अन्नपूर्णा”च्या उपमा, खिचडी आणि ब्राम्हणी जेवणाची गोडी लोणावळा..
मम्मीज किचनच्या चिकन रश्श्याची झणझणीत चव लोणावळा..
चंद्रलोकच्या भरगच्च गुजराथी थाळीची मजा लोणावळा
‘गुलिस्तान’ च्या इराणी स्टाईल आम्लेट ब्रेडची चव लोणावळा..
आलं, लसूण आणि चवीला अस्सल मावळी मिरची घातलेल्या बटाटावड्याची चव गल्लीबोळापासून
थेट सातासमुद्रापार नेणारं पण लोणावळा..
प्रेमी युगुलांना लाँग ड्राईव्हला जायला लोणावळा
आणि निवृत्तीनंतरचं सेकंड होम बांधायला पण लोणावळा..
महाराजांच्या ‘लोहगडाच्या’ नावाचे ‘उद्यान’ करणारं लोणावळा आणि धरणाला प्रेमाने ‘रेल्वे भुशी’ म्हणणारं पण लोणावळा..
ट्रेकर्सकरता लास्ट लोकलने येऊन स्टेशनवरचा उकळ्या चहा घेऊन राजमाची-ढाकच्या बहिरीच्या नाईट ट्रेकची केलेली ‘Exciting’ सुरुवात लोणावळा.
पौर्णिमेच्या रात्री वाघदरीत पाठीवर ‘सॅक ‘ ,पायात ‘हंटर’शूज आणि हातात एखादीच काठी घेऊन केलेल्या नाईट वॉकचा थरार पण लोणावळा...
चोवीस तास गर्दीच्या नॅशनल हायवेवर असूनही लोहगड, विसापूर, तुंगी, राजमाचीच्या निकट सहवासात निर्धास्तपणे पहुडलेलं लोणावळा..
कार्ल्याच्या एकविरा आईचा उदोउदो लोणावळा..
रायवूड पार्क मधला महाशिवरात्रीचा “हर हर महादेव”चा जयघोष लोणावळा..
भांगरवाडीतल्या राममंदिरामधला रामनामाचा गजर म्हणजे लोणावळा..
पावसाळ्यात प्रेमी युगुलांना चिंब भिजवणारे लोणावळा..
त्याचवेळी बुजुर्गांची रोमँटीक आठवण लोणावळा..
पावसाळा असो वा उन्हाळा कायम हवंहवंस वाटणारं आपलं लोणावळा..
पुणे आणि मुंबईकरांच एकाच बाबतीत होणारं एकमत म्हणजे लोणावळा..
पूर्वी निवांत असणारं जुनं लोणावळा आता 180 अंशात बदललंय.
खंडाळ्याच्या घाटातून वर आल्यावर दोन्ही बाजूला दिसणारे सह्याद्रीचे बुलंद कडे आता सिमेंट-काँक्रीटच्या आड लपलेत.
हिरवीगार समजली जाणारी तुंगार्ली आता काँक्रीटची 'गोल्ड व्हॅली' म्हणवण्यात धन्यता मानायला लागले आहेत.
पूर्वी राजमाचीला जाताना हायवे ओलांडून गवळीवाड्याच्या रस्त्यावरुन जाताना नाकात जाणाऱ्या गाईम्हशीच्या शेणाचा टिपिकल वास कधीच गायब झाला.
आता तिथून जाताना वाहनांच्या धुराने श्वास गुदमरायची वेळ येते.
पूर्वी मुसळधार पावसात मनसोक्त भिजणाऱ्या लोणावळ्याला आता वॉटर पार्कमधे भिजायची सवय लागली आहे.
पूर्वी आस्थेने खाणारं,खिलवणारं गावरान लोणावळा आता महागडं झालं.
अशावेळी जुने दिवस आठवून कधीकधी उदास वाटतं.
पण त्याचवेळी भांगरवाडीत लोहगड उद्यानाशेजारच्या भैय्याकडच्या खरपूस तळलेल्या समोस्यांची, जिलब्यांची गोडी आठवते. सध्या रिन्युएशन सुरु असल्याने जागा तात्पुरती बदलली असली तरी चव अजूनही तश्शीच आहे.
चंद्रलोकला तर गाड्यांच्या रांगा लागतातच पण बाजारात सोमण हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जाताना उजव्या बोळात असलेल्या 'सिद्धीविनायक'च्या ललितकडची लिमिटेड गुजराथी, जैन थाळी खाऊन पोट शंभरेक रुपयात अजूनही भरतं.
उन्हाळ्याच्या 'सिझनला' आसपासच्या गावांतून जांभळं, करवंद, जामच्या टोपल्या घेऊन हौसेने बाजाराच्या रस्त्यावर येऊन बसणाऱ्या मावश्या काकांच्या हाळ्या कानावर पडल्या, की पुन्हा एकदा 90 च्या दशकातलं लोणावळा आठवतं. " दिल बस गार्डन गार्डन हो जाता है " ,अगदी रायवूड पार्कच्या महादेवाशप्पथ !
खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jul 2017 10:50 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -