आमच्या जुन्या पुण्यात हे मानपानाचं, पहिलं असण्याचं वगैरे फारच असतं. म्हणजे भारतात स्थापन झालेला पहिला सार्वजनिक गणपती, पुण्यातला मानाचा पहिला गणपती, गुलाल उधळणारं पहिलं गणपती मंडळ. येवढंच नाही तर मिरवणुकीत शेवटून पहिला नंबर लावणारे मंडळ वगैरे. या मान देण्याच्या पद्धतीत बोलायचं तर रास्ता पेठेला फक्त पुण्यातल्याच नाही, तर अखिल भारतातल्या पहिल्या ‘कॉस्मोपॉलिटिन’ पेठेचा मान मिळायला पाहिजे.


पेशव्यांच्या काळात सरदार रास्तेंच्या वास्तव्यामुळे वसलेली रास्ता पेठ म्हणजे पंजाब, सिंधु, गुजरात, मराठाचं पुण्यातलं पूर्वापार उदाहरण. शेजारी असलेल्या नाना पेठ, भवानी पेठ या व्यापारी पेठांमुळे  मूळ मराठी लोकवस्तीच्या जोडीला गुजराती, मारवाडी, पंजाबी आणि दाक्षिणात्य समाजही इथे एकवटला आहे. एवढे सगळे एकत्र आल्यामुळे रास्ता पेठ म्हणजे खाद्यप्रेमींसाठी नुसती रेलचेल. मिसळ, इडली-डोसा सांबार मागा नाहीतर छोले भटुरे; खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या गाड्या, हॉटेलांची इथे कमी नाही. इथल्या खाण्यावर लिहायचं ठरवलं तर कित्येक लेख धारातीर्थी पडतील. पण सुरुवात करतो दोन ‘युनिक’ शेजाऱ्यांपासून. दोघेही आपापल्या पदार्थांच्या बाबतीत मानाचे आहेत असे म्हणू शकता.

अपोलो टॉकीजकडून केईएम हॉस्पिटलकडे जाताना डावीकडे बघितलं तर साधारण 100 फुटांवर एका गल्लीच्या तोंडाशी एक हातगाडी उभी दिसेल. त्यावर बोर्ड वगैरे दिसणार नाही पण आजूबाजूला 4-5 जणांची गर्दी आणि 2-3 जण मान खाली घालून काम करताना दिसले की समजा, तीच ठक्कर यांची कच्छी दाबेली. माझ्या माहितीत पुण्यात अजून सुरु असलेली सगळ्यात जुनी कच्छी दाबेलीची गाडी. 1990 साली  अगदी शब्दशः अपघातानेच सुरुवात झाली या गाडीची.



ठक्कर बंधूंपैकी थोरले बंधू सुरेश यांना एका ट्रकने उडवलं, जिवावरच्या दुखण्यातून ते नशिबाने वाचले, तरी बि-बियाण्यांच्या कंपनीतली फिरतीची नोकरी मात्र सुटली. मग कॉलेजमध्ये शिकत असलेल्या धाकट्या बंधूंच्या किशोरच्या वाढदिवसाला त्यांनी घरी बनवलेल्या दाबेलीची त्यांच्या मित्रांना आठवण झाली आणि इतर काही व्यवसाय करण्यापेक्षा त्यांनी कच्छी दाबेलीच करुन विकायचं ठरवलं.



दाबेलीचा पुण्यातला इतिहास फार साथ देणारा नव्हता, त्याआधीही एकदोन जणांनी पुण्यात दाबेली करुन विकायचा असफल प्रयत्न केला होता. इथे ठक्कर बंधूंचा आत्मविश्वास कामी आला. त्यांनी आत्ताच्या जागी दाबेलीची गाडी सुरु केली.

फार कोणाला माहिती नसतं म्हणून सांगतो, आज गल्लीबोळात जी दाबेजी मिळते त्याची खऱ्या अर्थानी मुहूर्तमेढ रचली आहे, ती याच ठक्कर बंधूंनी. यांनी दाबेली बनवायचं मूळ स्वरुपच बदललं. तोपर्यंत वडापावासारखी पावात गार मिश्रण असलेली दाबेली, सर्वप्रथम तव्यावर भाजून द्यायला सुरु केली, तीही अमूल बटर लावून. त्याबरोबरच ग्राहकांच्या भुकेचा विचार करुन आणि वडापावपेक्षा वेगळे म्हणून पावाचा साईझ मोठा घ्यायला सुरुवात केली.



मला आठवतंय, साधारण 92-93 मध्ये मित्रांबरोबर अपोलोला मॅटीनी टाकून झाला होता. सायकली रस्त्यांवर लावून वाचवलेला सायकल स्टँडचा एक रुपया; आणि अजून 1-2 रुपये जिन्समधे खूळखूळत होते. घरी जायला चिक्कार वेळ होता(सुज्ञांनी कारणं विचारु नयेत). त्याकाळच्या पुण्यात, मित्रांबरोबर बाहेर जायचं असेल तर वडापाव आणि मिसळीच्या बाहेर फार ऑप्शन्स आणि बजेटही नसायचे. सहसा कॉलेजबाहेर दोन अडीच रुपयात मिळणारा वडापाव हाच भुकेल्या पोटाला (आणि रिकाम्या खिशाला) आधार असायचा. त्यामुळे 5-7 सायकलींवरच्या 10-12 मित्रांचा मोर्चा कॉलेजकडे वळवावा का, ह्या विचारात निरर्थक फिरत असतानाच, ‘जय जलाराम खवय्या’ दाबेलीशी माझा परिचय झाला.

कॉलेजबाहेरच्या छोट्या वडापावच्या रटाळ चवीला तसाही कंटाळलेलो होतो. त्यामुळे दोन-अडीच रुपयामधे एका सणसणीत पावात भरलेलं आणि अमूल बटरवर भाजलेलं भरपूर मिश्रण तेव्हा ‘दिल खुश’ करुन गेलं होतं. त्या दिवसापासून दाबेली खायची असेल आणि वेळ असेल तर मी तडक ठक्करांची वाट धरतो.



ज्याला बनपावच म्हणता येईल, येवढ्या पावात ठासून भरलेलं दाबेलीचं अस्सल ‘गुज्जू’ मसाल्याचं घरगुती मिश्रण. या मिश्रणाची चव कधीही चाखा, एकसारखीच. वरती तव्यावर खरपूस भाजताना कद्रूपणा न करता सोडलेलं, (खरं)अमूल बटर. चिज दाबेली असेल बटरच्या बरोबरीने चिज घातलेली दाबेली म्हणजे ‘मिनी मिल’च म्हणायला लागतं.

वर्ष जात आहेत, दाबेलीची चव बदलली नसली तरी दाबेली बनवायच्या पद्धतीत त्यांनी काही बदल केले आहेत. त्यात निदान मी तरी कुठे न पाहिलेला म्हणजे, दाबेली तव्यावर भाजताना ती लाकडी पोळपाटासारख्या प्लेटखाली दाबून आतले मिश्रण ते पावाबरोबर एकजीव करतात. एकजीव झालेलं हे मिश्रण अफाट लागतं.



5-7 वर्षांपूर्वी ज्या इमारतीच्या बाहेर ते गाडी लावायचे त्याच इमारतीतला दुकानाचा एक गाळा त्यांनी विकत घेतला, त्यावर नावाचा चकाचक बोर्डही लावला पण आजही त्याचा उपयोग ते स्टोररूम सारखा करतात.आपला रोजचा व्यवसाय ते जुन्याच हातगाडीवरच करतात.ठक्कर बंधू रोज दुपारी दोनच्या आसपास आपली गाडी उघडतात ती रात्री ८ पर्यंत. शक्यतो त्याच्या आधीच सगळं मटेरियल आणि त्यांचा कामाचा दिवसही संपतो.

ठक्करांची गाडी ज्या बोळाच्या तोंडाशी आहे, त्याच बोळात 1968 साली म्हणजे 49 वर्षांपूर्वी सुरु झालेले पुण्यातले पहिले भेळ हाऊस, ’इंटरव्हल भेळ हाऊस’ आहे.



त्याकाळी सहकुटुंब भेळ खायची संकल्पना मांडणं हे ‘रिस्की’च म्हणायला पाहिजे. पण हीच कल्पना घेऊन कै. लक्ष्मण जोशी यांनी ‘इंटरव्हलची’ सुरुवात केली आणि आगळ्या नावाच्या या भेळ हाऊसला पुणेकरांनी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला. आसपासची ऑफिसेस, केईएम मधल्या रुग्णांचे नातेवाईक, अपोलोमध्ये येणाऱ्या लोकांना उत्तम पर्याय म्हणून ‘इंटरव्हल’ लवकरच प्रसिद्ध झालं. आता प्रशांत आणि केदार हे पितापुत्र इंटरव्हल भेळ चालवतात.



‘इंटरव्हल’मध्ये सुरुवातीला जनता,राजस आणि बादशाही असे भेळेचे तीन प्रकार मिळायचे. आता त्यातले पहिले दोन प्रकार बंद करुन आता ,फरसाण आणि भडंग भेळ असे दोन नवीन प्रकार इथे सुरु झाले आहेत.



चुरमुऱ्याची आंबटगोड भेळ आवडत असेल बादशाही घ्यावी. चुरमुऱ्याला पर्याय म्हणून फरसाण भेळ आणि तीही नको असेल तर सांगली, इचलकरंजी बाजूला मिळते तशी भडंग भेळ घ्यायची. इथले मसाले जहाल तिखट नाहीत. पण आपल्याला तिखट पाहिजे असेल तर, मिसळीच्या हॉटेलात रस्याचा तांब्या ठेवतात तसा इथे प्रत्येक टेबलावर चिंचगुळाच्या गोड पाण्याचा तांब्या आणि तिखट हिरव्या मिरचीच्या पाण्याची वाटी ठेवलेली असते.



आपल्याला पाहिजे तसे पाणी घालून घ्या भेळ बनवून. इथली शेवपुरी, पाणीपुरीही आपल्यासमोर येताना स्वच्छ डिशमधे येते. आपल्याला ज्या प्रमाणात रगडा, आंबटगोड, तिखट पाणी पाहिजे तशी आपल्या हातानी बनवून घ्या.



इथे मला भेटले त्यांचे 40 वर्षांपासूनचे ग्राहक, स्वतः किराणा मालाचे दुकानदार असलेले श्री.दिलीप लोढा. एखादा माणूस 40 वर्षे सतत एकाच दुकानात भेळ, पाणीपुरी खातो यातच त्यांची क्वालिटी न बदलल्याची खात्री पटते.

‘इंटरव्हल’ आणि ठक्कर यांची दाबेली ही फक्त झलक आहे रास्ता पेठ आणि आसपासच्या खाऊगल्लीची. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, फक्त काही ‘इंटरव्हल’ होतील मध्ये.