पुलंनी त्यांच्या अजरामर “माझे खाद्यजीवनमध्ये लिहून ठेवलंय, “अस्सल खवय्याला चांगल्या खाण्यासाठी प्रसंगी मैलोनमैल पायपीट करायची तयारी ठेवायला लागते”. आत्ताच्या काळात जरी ते शक्य नसलं तरी एका रस्त्यावर मैलोनमैल गाडी चालवायची असेल, तर उत्कृष्ट खाद्यभ्रमंती होवू शकते.


पुण्यातून रायगड जिल्ह्यात उतरायला ताम्हिणी हा आजकाल आद्य राजमार्ग झाला आहे. मुळशी तालुक्यातल्या जिल्ह्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर अनेक उत्कृष्ट स्पॉट आपली वाट बघत असतात. आजचा फेरफटका ह्याच मार्गावर.


चांदणी चौकातून पुढे भुगावात पोहोचायच्या आधी दौलत धाब्याच्या पुढे त्रिमुर्तीमध्ये मिसळ छान असायची(आता माहिती नाही). मंदिरासमोर आजकाल जिथे फक्त ट्रॅफिक जाम असतो; त्याच्या आसपास 2-3 हॉटेलातपूर्वी कोरडी भेळ मस्त मिळायची, पूर्वी म्हणजे अगदी 7-8 वर्षांपूर्वी. पांढऱ्याशुभ्र चुरमुऱ्यांवर ताज्या फरसाणीबरोबरच सिझन आणि आपले नशीब जोरावर असेल तर जवळच्या शेतातले भुईमुगाचे ताजे कोवळे दाणेही पडायचे. भेळेत खाल्लेत कधी? भाजलेल्या दाण्यांपेक्षाही ती चव लैच भारी लागते. आता भूगावच्या आसपास शेती आणि ती करणारे शेतकरी शोधणे हाच एक संशोधनाचा विषय होईल, भेळेत भुईमुग कसले कप्पाळ शोधणार?


त्यापुढे थांबावं, तर एकदम पिरंगुटलाच. लवळे फाट्यावर असलेल्या ‘श्रीपादचा उल्लेख तर आधीच्या एका ब्लॉगमध्ये केला होता, मस्त मिसळ आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला गरम कांदाभजी. खाताना ताक प्यायला नसलं तर वरती कोल्ड किंवा हॉट कॉफी घेऊन पौडकडे मार्गस्थ व्हायचं.


मिसळ प्रेमी असून काही कारणांनी जर ‘श्रीपादला नाहीच थांबलात, तर पुढे पौडला न चुकता थांबावं. पौड पंचायत ऑफिसच्या अलीकडच्या वळणावर ‘दिपकमध्ये मावळी चवीची उत्कृष्ट मिसळ खाता येईल. मिसळ सांगाल तशी तिखट/कमी तिखट. ताज्या बनवलेल्या मिक्स उसळीमध्ये हॉटेलमध्येच बनवलेल्या फरसाणची भर घालून मिसळीचा स्टीलचा बाऊल समोर आला कि त्यात ताजा पाव बुडवून बिनधास्त जास्तीचा सँपल मागवून मिसळ निवांत संपवायची. दिपकमधेही ताजी, गरम भजी झकास मिळते. वरती एखादा छानपैकी पेशल च्याहाणावा, मालकांना रामराम करुन पुढच्या वाटचालीला लागावे.


पण मिसळ वगैरे न खाता जर घरगुती चवीचे विशेषतः नॉनव्हेज खायचे असेल तर गेले अनेक वर्ष पौडवरून पुढे गेल्यावर डावीकडे “हॉटेल २२ मैलला पर्याय नाही. नावाचं आश्चर्य वाटतं ना? त्याचे कारण आहे, ह्या हॉटेलचे पुणे GPO पासूनचे अंतर बरोब्बर 22 मैल आहे. एकाच घरातल्या महिलांनी (आई आणि मुलींनी )चालवलेले हे हॉटेल. इथे टिपिकल हॉटेलची ग्रेव्हीवाली चव तुम्हाला मिळणार नाही आणि जेवण तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर बनवलं जातं, त्यामुळे इथे जेवणार असाल तर कारभारी ‘थोडं दमानं’ घ्या. निवांत वेळ काढून जा, पण जेवण मिळेल ते एकदम ताजे. स्टीलच्या मोठ्या हंडीमध्ये केलेलं चिकन, भाकऱ्या त्यावर इंद्रायणी तांदुळाचा ओलसर भात. त्याच्या आधीच घरगुती ऑप्शन पाहिजे असेल आणि मुस्लीम पद्धतीचे जेवण आवडत असेल, तर पौडच्या अलीकडे डावीकडेच 'हॉटेल अमीरनावाचे छोटेसे हॉटेल दिसेल. फक्त अमीरमधल्या भाभीकडचे जेवण म्हणजे मुबलक खडा मसाला घातलेले 100%नॉनव्हेज, त्यामुळे व्हेजवाल्यांना फारतर तडका मारलेली दाल आणि फडफडीत राईस वर समाधान मानायला लागतं.


पंजाबी जेवण आवडत असेल, तर पूर्वीच्या मुळशी गेटच्या इथल्या माले नंतरचा छोटा घाट चढून वर गेल्यावर उजवीकडे सरदार फॅमिली चालवत असलेले पॅराडाईज. पण मला स्वतःला तिथल्या जेवणापेक्षा त्याचे लोकेशन जास्ती आवडते. भल्याभल्या स्टार हॉटेलनाही मत्सर वाटावा असा सुरेख व्हॅलीचा व्ह्यू बघत शेजारी टेबलखुर्चीवर बसून कोणाला अगदी कारल्याची भाजी देखील आग्रह करुन वाढली तरी समजणार नाही. तिथे जर समोर भरपूर मसाला लावलेली तंदूर किंवा टिक्का आला तर होणारा आनंद काय शब्दात सांगावा? समजा तिथे न थांबता चांगल्या फॅमिली रेस्तराँमधेच जेवायचे असेल तर त्याच्या पुढे मुळशी रेसिडेन्सी क्लबच्या आवारात बिनदिक्कतपणे गाडी घालून जेवण्याची ऑर्डर सोडावी. त्याच्या थोडं पुढे झालेल्या ‘बॅशोज’ मध्येही थांबता येतं, पण मला रेसिडेन्सीचं जेवण जास्ती बरं वाटतं. शाकाहारी असाल मग गाडी थेट ‘क्विक बाईट’ ला थांबवायची. झुणका भाकरी किंवा उसळ घ्या, लाईट स्नॅक्स घ्यायचे असतील तर थालीपीठ, साबुदाणा खिचडी हे पदार्थ असतातच. बाकी मुळशी आणि त्याच्यापुढे लहानसहान हॉटेल्सची रेलचेल आहेच. त्यातले आचारी आलटूनपालटून तिथल्याच हॉटेलात फिरत असल्याने बहुतेकांकडे साधारण एकाच चवीची खात्री असते.


हिरवाईने नटलेल्या ताम्हिणी घाटाची मजा पावसाळ्यात जास्ती. त्यामुळे आजूबाजूच्या(अजूनतरी शिल्लक असलेल्या) भागाकडे अधूनमधून बघत, गाडी चालवायची मजा घेत पुढे जात राहायचे. घाटाखालच्या दरीत अनेक दुर्मिळ ऑर्किड आणि औषधी वनस्पती वगैरे सापडत असल्याने वनस्पती तज्ञांपासून ते घाटातल्या धबधब्यांचा, पावसाचा आनंद (ओला) करायला आलेल्या पब्लिकपर्यंत सगळ्यांचीच इथे गर्दी असते. 4-5 वर्षांपूर्वीपर्यंत ताम्हणीच्या रस्त्यावर डावीकडे जांभळाची झाडं असायची, दोन्ही बाजूंना किंचित आत करवंदाच्या जाळ्या दिसायच्या. काही वर्षात अमाप वृक्षतोड झाल्यामुळे आता त्यातलं काहीच दिसत नाही. पण उन्हाळ्यात कधी गेलो, तर गावातली पोरं, म्हातारी माणसं शेजारच्या डोंगरावरुन जांभूळ, करवंदांचे वाटे पळसाच्या पानात घेऊन रस्त्याच्या कडेला उभे दिसतात. त्यांच्याकडून 10-20 रुपयांचा तो रानमेवा घेऊन त्यांच्या बिया दरीत भिरकावून देणे. पुण्यातून त्या बाजूला जाताना मुद्दाम नेलेली पेरु, चिक्कूसारखी फळं घाटात बसलेल्या माकडांना खिलवणं हा माझ्यासाठी एक आवडता उद्योग असतो. त्याच्यामुळे आलीच असतील काही देशी झाडं, तर खाण्याच्या आनंदाबरोबरच आपल्याकडून जाताजाता थोडा परमार्थही साधला गेला असं समजायचं.


ताम्हिणी गावाजवळचा छोटासा भाग सोडला, तर पुढचा रस्ता सहसा कायमच छान असतो. ना टोल ना कुठे अती ट्रॅफिक. भारतीय क्रिकेट टीमलाही भुरळ पडलेल्या गरूडमाचीच्या आसपास तर रोड म्हणजे एकदम मक्खन! गाडी मग एकदम सन्नाटच सुटते. कंटाळा आल्यावर आपण थांबतो, त्या हॉटेलात मिसळीऐवजी वाटाणे घातलेला रस्सा-वडा मिळाला कि समजायचं रायगड जिल्ह्याने आपल्याला वेलकम केलंय.


पुणेरी तळटिप-वर वर्णन केलेले पदार्थ एकाच फेरीत खाणे सुचवलेले नाही.त्यापेक्षा ताम्हणी घाटात 3-4 वेळा जाणे हितावह आहे.