जन्मजात पुणेकराची हॉटेलात मिसळ खायची सुरुवात साधारण हाफ पँटमधून फुल पँटमध्ये जाताना व्हायची. म्हणजे होते अजूनही त्याच वयात, फक्त आजकालची पोरंच फुलपँटमध्ये बालवाडीत जायच्या आधीच येतात. नाहीतर पूर्वी आपले चिरंजीव एखाद्या मिसळीच्या हॉटेलाबाहेर मित्रांच्या कोंडाळ्यात घुटमळताना दिसले तर पुण्यातले ‘बाप’ लोक त्यांना तातडीने फुलपँट घेऊन द्यायचे,असं ऐकिवात आहे. इतर शहरांनी काही दावे करावेत पण पुण्यातल्या मिसळीबद्दल लिहिलेला लिखित इतिहास पुण्यातली मिसळ ही 18 व्या शतकापासून आहे हेच सांगतो.
आचार्य प्र.के अत्रेंच्या “मी कसा झालो”मध्ये 19 व्या शतकाच्या सुरुवातीच्या पुण्यातल्या माटेकरांच्या प्रसिद्ध हॉटेलच्या मिसळीचे वर्णन आहे.तसं माझ्या माहितीत महाराष्ट्रात(पुण्याच्या भाषेत अखिल भारतात )मिसळीचे अजूनही सुरु असलेले सर्वात जुने हॉटेल म्हणजे फडके हौद चौकातले वैद्य उपहार गृह.आचार्य अत्रे, वि.स.खांडेकर, यशवंतराव चव्हाण, वसंतराव देशपांडे ह्यांच्यासारखी व्यक्तीमत्व वैद्य मिसळीला नियमित भेट द्यायची. आपणही आज इथूनच सुरुवात करायची?
महाराष्ट्रात लालभडक मिसळी तर गल्लीबोळात मिळतात,पण वैद्यांच्या मिसळीचे वैशिष्ट्य म्हणजे मिसळीची रेसिपी गेल्या 106 वर्षापासून एकच आणि त्यात लाल तिखटाचा वापर शून्य! दचकलात? पण हे खरंय.
वैद्यांनी मिसळ बनवायला सुरुवातच केली ती मुळातच आपण जे खाद्यपदार्थ विकू, त्यातून गिऱ्हाईकांच्या तब्येतीला त्रास होऊ नये ह्या सच्च्या भावनेने. त्यांनी मिसळीची स्वतःची रेसिपी तयार केली. त्यामुळे तिखट लागली तरी त्यावर लालभडक ‘तर्री’ तुम्हाला ह्या मिसळीत दिसणार नाही.
मला कधी किरकोळ सर्दी असेल तर सहसा मी तडक वैद्य उपहार गृहाचा रस्ता धरतो. गेल्यागेल्या फक्त मिसळीची ऑर्डर सोडतो; इतरवेळी त्याच्याबरोबर(सकाळी बटाटा/संध्याकाळी कांद्याच्या) भज्याही असतात, मिसळीएवढ्याच चविष्ट.
चिनीमातीच्या खोलगट बाऊलमधे पोहे आणि चिवड्यावर वाढलेला, आलं आणि हिरव्या मिरचीयुक्त कांद्या-बटाट्याचा रस्सा समोर येतो. त्यावर पेरलेला कच्चा कांदा आणि कोथिंबीरीचा सुगंध माझा ताबा घ्यायला सुरुवात करतो. त्यावर लिंबू पिळलेल्या मिसळीच्या प्रत्येक घासागणिक पाहुणी आलेली सर्दी, नाक आणि कानावाटे बायबाय करायला सुरुवात करते. मिसळ संपल्यावर बसल्याजागीच तांब्याभर पाणी आणि एखादा चहा हाणायचा. बिल देऊन दुकानाच्या बाहेर पडेपर्यंत कान, नाक, घसा सगळं मोकळं झालेलं असतं. तृप्तीने ढेकर देत आपण सुखेनैव मार्गस्थ व्हायचं.
सर्दीवर ‘अॅक्शन’ घेण्याचा दावा करणाऱ्या बाजारातल्या गोळ्यांपेक्षा हे चविष्ट औषध मला ‘गॅरेंटी के साथ’ बरं करतं.
वैद्य उपहार गृहाचे सध्याचे संचालक श्री. दीपक जोशी ही त्यांची चौथी पिढी. पणजोबांनी ‘सेट’ केलेली चव, आजीने घर सांभाळून काम करायची ठरवलेली वेळ आणि हॉटेलात घरच्यासारखे पिढीजात काम करणारे कामगार ह्यांना अंतर द्यायला जोशी कधीच तयार नाहीत. ते हॉटेल चालवतात केवळ आपल्या पूर्वजांनी सुरु ठेवलेल्या परंपरेसाठी. नाहीतर हॉटेलातल्या कामगारांना अतिरिक्त कमाईसाठी हॉटेलच्या बाहेरच संध्याकाळी वडापाव, भज्यांची गाडी लावायला मदत करणारे मालक माझ्या माहितीत तरी दुसरे नाहीत. इथले कामगारही त्याच बांधिलकीने दिवसा वैद्यांचे उपहार गृह सांभाळतात.
मालक-कामगार ह्या नात्यातला तिखटपणा नष्ट करणाऱ्या ह्या एकंदर चविष्ट रेसिपीलाच मी ‘वैद्य उपहार गृह’ मानतो.
खादाडखाऊ ब्लॉग मालिकेतील याआधीचे ब्लॉग
खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा