" BBA student from Mysuru allegedly committed suicide after she suffered excessive hair fall due to a failed hair straightening."
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात वरील हेडिंगची एक बातमी वेगवेगळ्या भाषेतल्या ई-पेपर्सच्या वेबसाईटवर, न्यूज पोर्टलवर, न्यूज चॅनल्सवर झळकली. आत्महत्येच्या एका वेगळ्या कारणामुळे अनेक नेटिझन्सनी या बातमीची लिंक आपापल्या फेसबुक पेजवरुन, व्हॉट्सअॅप-ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली. परंतु नेहमीप्रमाणे आत्महत्यांच्या बातम्यांनी काही सेकंद हळहळणारा नेटिझन वर्ग दुसऱ्या मिनिटाला ही घटना विसरुनही गेला.
या बातमीच्या डिटेलिंगसाठी मी जेव्हा ऑनलाईन सर्चिंग केलं तेव्हा पुढील माहिती समोर आली. नेहा गंगनम नावाची मैसूरची विद्यार्थिनी आपले कुरळे केस सरळ ( Hair Straightening) करण्यासाठी ब्युटी पार्लरला गेली होती, पण संबंधित ट्रीटमेंट करण्यासाठी पुरेसे पैसे तिच्याकडे नसल्याने तिने अर्धे केस सरळ करुन घेतले तेही ब्युटीशियनच्या सल्ल्याने. पुढील काही दिवसांत फार मोठ्या प्रमाणावर तिचे केस गळायला सुरु झाले. अर्धे केस सरळ केल्याने आधीच अपमानास्पद कमेंट करणारे कॉलेजमधले मित्र आपल्याला जास्तच चिडवतील म्हणून तिने कॉलेजला जाणंही बंद करुन टाकलं. घरच्यांनी समजावून परत पाठवलं परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. असेच केस गळत राहिले तर आपण लवकरच पूर्ण टकले होऊ या भीतीने नेहाने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. सामाजिक दडपणापोटी तिने आपलं स्वतःचं मौल्यवान आयुष्य संपवलं.
नेहा असो किंवा कुणीही अगदी तुम्ही किंवा मी सुद्धा आपण स्वतःचं बाह्यरुप स्वतःच्या नजरेने बघत असलो तरी उठल्यापासून झोपेपर्यंत 'आपण जगाला कसे दिसू?' याच विचारात असतो. तयार होताना आरशासमोर उभे राहतो ते अधिकतर लोकांच्या आपल्यावर खिळणाऱ्या नजरांसाठीच. कारण आपल्यावर प्रेशर असतं ते समाजाने ठरवून दिलेल्या सौंदर्याच्या मापदंडांचं. आपण जन्मल्यापासून समाज आपल्याकडे त्याच ठराविक नजरेतून बघत असतो. आपल्या दिसण्यातल्या त्रुटी दाखवून द्यायला बाह्यसौंदर्यप्रेमी समाज पावलापावलावर उभा असतो. जन्मलेल्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत तो कुणालाच सूट देत नाही. फॅशनेबल, ब्रॅंडेड कपडे वापरणं असो, वेगवेगळ्या हेअरस्टाईल करणं असो की मेकअप करणं असो बाह्यरुपातल्या त्रुटी दूर करण्यासाठी, अधिकाधिक सुंदर आणि चारचौघात उठून दिसण्यासाठी रोजच्या रोज आपण वरीलपैकी कशाचान् कशाचा आधार घेत असतो. वर म्हटल्याप्रमाणे आपल्यासमोरचा आरसा म्हणजे आपण नसतो तर आपला समाज असतो ज्या समाजाकडून आपल्याला कायम अप्रिसिऐशन हवं असतं. ही जी अप्रिसिऐशनची गरज आहे ती समाजच आपल्याही नकळत आपल्यात निर्माण करतो.
चार व्यक्तींच्या समूहामध्ये एक सावळी व्यक्ती असेल तर तिच्या रंगाची तुलना इतर तीन व्यक्तींबरोबर केली जाते. आणि त्यातही ती मुलगी असेल तर तिच्या एकूणच दिसण्याची तुलना करायला भोवतालचा समाज जास्तच सावरुन बसतो. मुलामुलींची लग्न जमताना तर त्यांना अधिक मोठ्या प्रमाणावर या समस्येला सामोरं जावं लागतं. लग्नाच्या बाजारात रंगाने सावळ्या, उंचीने जेमतेम असणाऱ्या मुला-मुलींना वारंवार बाह्यरंगावरुन होणारे विखारी अपमान आवंढे गिळावे तसे गिळून टाकावे लागतात. एका घरात एक सावळं आणि एक गोरं अशी दोन भावंडं असतील तर क्षणाक्षणाला रंगावरुन हिणवणारे काही कमी नाहीत. असं नाही की दिसण्यावरुन अवमानकारक शब्द हे फक्त बाहेरच्याच लोकांच्या तोंडून ऐकावे लागतात तर खुद्द त्या मुलीचे/मुलाचे आईबाबाही संधी मिळेल तेव्हा दोन अपत्यांची तुलना करत असतात. सावळ्या मुलाला/मुलीला सतत काळे/काळ्या म्हणून हाक मारतात. थोरली बहिण सावळी असेल आणि धाकटी गोरी तर थोरलीला बघायला आलेले पाहुणे धाकटीला मागणी घालून जातात तेव्हा सावळीच्या मनावर होणाऱ्या परिणामांची पर्वा कोण करतं. काळे, काळ्या, काळोबा, काळतोंड्या, काळूबाई अशी रंगाने सावळ्या असणाऱ्या मुलामुलींची पुढे टोपणनावंच होऊन जातात.
जन्मलेल्या नवजात बाळाचंही वर्णन काळं-गोरं, नकटं-सरळ नाकाचं, लहान-मोठ्या डोळ्यांचं असं त्याला बघायला जाणारे करत असतात. रस्त्याने चालताना समोर येणाऱ्या, आजूबाजूने क्षणार्धात निघून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे निकोपपणे बघणारा आपला समाज नाही. हा बुटकाच आहे, ही फारच लंबू दिसते, तिचा रंग काळा आहे, तो टकला आहे, ती किती बेढब आहे, त्याची ढेरी सुटलेली आहे, तिचं नाक कसं म्हशीने पाय दिल्यासारखं आहे, त्याचे दात दुकानातल्या फळ्यांसारखे आहेत, तिची छाती कॅरम बोर्डसारखी आहे, त्याचे गाल खप्पडच आहेत, तिचा चेहराच नितळ नाही. व्यक्तीच्या समोर किंवा पाठीमागे अशा कमेंट करुन कित्येक लोक आपलं तात्पुरतं मनोरंजन करुन घेतात. त्या लोकांमध्ये आपणही असतो. बहुतेकवेळा संबंधित व्यक्तीला शरम वाटेल अशाच टोनमध्ये कमेंट्स मित्र-मैत्रीणींकडे पास करत असतो. एखाद्या व्यक्तीला केवळ माणूस म्हणून न बघता त्याच्या बाह्यरंगाला सौंदर्याचे पारंपरिक मापदंड लावून बघतो. क्वचित कधी ते अनवधानानंही होऊ शकतं पण अनवधानाने झालेली चूक लक्षात येताच आपण समोरच्या व्यक्तीला सॉरी म्हणतो का?
शरीराने कृश असणारे, तब्येतीने वजनदार असणारे, डोक्यावरचे केस विरळ होऊन तारुण्यात टक्कल पडलेले, चिंता-काळज्यांनी चेहरा निस्तेज झालेले, उंची कमी असणारे किती तरी तरुण-तरुणी लग्नाच्या बाजारात सतत डावललं गेल्याने त्यांच्यात नाकारलेपणाची भावना निर्माण होऊन ते प्रचंड डिप्रेशनखाली जातात. समाजाच्या सतत हिणवलं जाण्याने आपल्यातल्या त्रुटी दूर करण्यासाठी अनेकांचे पाय मग सावळा रंग सात दिवसांत गोरा करणाऱ्या, पंधरा दिवसांत वजन कमी करण्याची, महिन्यात उंची वाढवण्याची, केस गळलेल्या डोक्यावर पुन्हा नव्याने केस उगवण्याची शंभर टक्के हमी देणाऱ्या बाजारु प्रॉडक्टकडे वळतात. व्यक्तिमत्वात रातोरात जादुई बदल करण्याचे आमिष दाखवून कंपन्या ग्राहकांकडून मुबलक पैसे लाटत असतात. जास्त पैसे जवळ असलेले लोक स्वतःत आमुलाग्र बदल करायचा असेल तर प्लास्टिक सर्जरीसारखे मार्गही अवलंबतात. दिसण्यातून आलेला न्यूनगंड घालवून स्वतःच्या नाही तर समाजाच्या नजरेत सुंदर दिसण्याची खटपट करणाऱ्यांसाठी अशा जाहिराती, अशा ट्रीटमेंट्स म्हणजे जणू शेवटचा पर्याय असतो. अशा जाहिरातींना बळी पडून शरीरावर, त्वचेवर वेगवेगळ्या केमिकल्सचा मारा केल्याने चांगले बदल होतात पण ते तात्पुरते, ही प्रॉडक्टस ग्राहकांना सवय लावतात. अजून एक दुर्दैवाची बाब म्हणजे नेहाच्या आत्महत्येची बातमी स्प्रेड करणाऱ्या वेबसाईटवर त्या बातमीच्या कोपऱ्यातही केस गळती कमी होणाऱ्या औषधांच्या जाहिराती झळकत होत्या. अशा या कंपन्या कोणत्याही प्रकारे ग्राहकाला अकर्षित करुन अॅडिक्ट करुन सोडतात. ग्राहकाने प्रॉडक्ट वापरायचे कमी केले किंवा पूर्णच बंद केले की शरीराच्या इंटर्नल आणि एक्स्टर्नल दोन्ही भागांवर विपरित परिणाम होऊन संबंधित व्यक्ती आपल्या दिसण्यामुळे आधी होती त्यापेक्षा अधिक नैराश्यामधे जाण्याची दाट शक्यता असते.
नेहाला न्यूनगंड होता तो कुरळ्या केसांचा कारण कुरळे केस सौंदर्यात बाधा निर्माण करतात हा गैरसमज समाजाने तिच्यावर बिंबवला. याच न्यूनगंडातूनच तिने हेअर स्ट्रेटनिंगची ट्रीटमेंट घेतली. तिच्या आत्महत्येला ती कमी पण तिला आपल्यात काहीतरी कमी आहे, या न्यूनगंडात ढकलणारा समाज कारणीभूत आहे. केस गळून आपण टकले झालो तर समाजाला कसं फेस करणार? ही भीती तिच्या मनात निर्माण करणारा तिचा संपूर्ण भोवताल जबाबदार आहे. आणि आपणही त्याच अप्रगल्भ समाजाचा एक अविभाज्य भाग आहोत. दिसण्यातल्या उणिवेला दुर्लक्षित करुन किंवा तिच उणीव आपलं बलस्थान बनवून यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तींकडे आदर्श म्हणून पाहणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे.
एखाद्याच्या शारीरिक उणिवेविषयी त्याच्यासमोर किंवा पाठीमागे कुठलाही अवमानकारक शब्द न वापरणे ही एक माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे. दिसणं हे काही माणसाच्या हातात असत नाही. माणूस दिसण्यामुळे नाही तर असण्यामुळे सुंदर असतो. हे आपल्याला कधी कळणार आहे? प्रत्येकाला समोरच्याच्या अंतरंगात उतरुन त्यांचं आंतरिक सौंदर्य जाणून घेता आलं पाहिजे. एखाद्याला जर आपण त्याच्या केवळ बाह्यरुपावरुन निगलेक्ट करत असू, डावलत असू किंवा पदोपदी त्याचा अपमान करत असू तर आपण माणूस म्हणून घ्यायला अपात्र आहोत. एखाद्या व्यक्तीला त्याच्या दिसण्यावरुन समाजाने बहाल केलेला न्यूनगंड ही डिप्रेशनची आणि त्याच्या भविष्यातील आत्महत्येची पहिली पायरी असते. अशा व्यक्ती हळूहळू चारचौघात मिसळायचं कमी करतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी बोटांवर मोजण्याइतकेही राहत नाहीत. जगण्यातला संपूर्ण रस निघून जाण्यापर्यंत हे डिप्रेशन त्यांना घेरतं मग एखादी नेहा संपूर्ण केस गळून आपण टकले होऊ या भीतीने स्वतः ला संपवते. आजघडीला जर आपण आपल्या मित्र-मैत्रिणीला, भावंडाला, सहकाऱ्याला अगदी अनोळखी व्यक्तीलाही बाह्यरंगातल्या उणिवेवरुन चिडवत असू तर त्याला आपण केवळ डिप्रेशनमध्ये ढकलत नाही तर आत्महत्येसाठी प्रवृत्त करतो आहोत.
बाह्यसौंदर्य, डिप्रेशन आणि आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Oct 2018 11:36 AM (IST)
शरीराने कृश असणारे, तब्येतीने वजनदार असणारे, डोक्यावरचे केस विरळ होऊन तारुण्यात टक्कल पडलेले, चिंता-काळज्यांनी चेहरा निस्तेज झालेले, उंची कमी असणारे किती तरी तरुण-तरुणी लग्नाच्या बाजारात सतत डावललं गेल्याने त्यांच्यात नाकारलेपणाची भावना निर्माण होऊन ते प्रचंड डिप्रेशनखाली जातात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -