अमेरिकन अभिनेत्री अलिसा मिलानोने लैंगिक छळवणुकीविरोधात सुरु केलेल्या #Metoo या हॕशटॕग कॅम्पनला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तिने लिहिले “Suggested by a friend: If all the women who have been sexually harassed or assaulted wrote “Me too” as a status, we might give people a sense of the magnitude of the problem”. सोमवारी तिने #Metoo हा हॕशटॅग वापरुन लिहिलेल्या या पोस्टने जगभरातील नेटीझन्सना कौटुंबिक वा सामाजिक भितीपोटी दडवून ठेवलेले लैंगिक छळाचे अनुभव व्यक्त करण्यासाठी उद्युक्त केले. आज घडीला जवळजवळ दोन कोटी लोकांनी #Metoo हा हॕशटॕग वापरुन स्वतःचे आणि सोबतच जवळच्या मैत्रीणी-बहिणींचे लैंगिक छळासंबंधीचे अनुभव निर्भिडपणे मांडले आहेत. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा हॕशटॅग वापरुन व्यक्त होणारे 30 टक्के पुरुष आहेत. मोठ्या प्रमाणावर पुरुषांनी स्त्रियांबाबतीतल्या आपल्या चुकीच्या वर्तनाची कबुलीही दिली आहे. मला वाटतं हे #Metoo मोहीमेचं मोठं यश आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी अलिसाचे धन्यवाद मानायला हवेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मला माझ्याही बाबतीत घडलेला एक प्रसंग आठवला, की जो मी यापूर्वी (अपवाद एखादा मित्र वगळता) कुणाशीही शेअर केलेला नाही. नेहमीप्रमाणे एके दिवशी बसस्टॉपला बसची वाट पाहत मी उभी होते. मोबाईलवर फेसबुक पोस्ट वाचून कंटाळा आल्याने मान उचलून इकडे तिकडे बघितले. रस्त्याच्या पलिकडे असलेल्या पत्र्याच्या घरात माझं लक्ष गेलं आणि जितकं किळसवाणं तितकंच धक्कादायक दृश्य माझ्या नजरेस पडलं. त्या घराच्या दरवाज्यात उभा राहून एक वीस-बावीस वर्षांचा मुलगा आम्हां दोघींकडे (माझ्या शेजारी माझ्याच वयाची एक मुलगी उभी होती) बघून मास्टरबेशन करत होता. त्याचे ते विकृत चाळे बघून माझ्या अंगातलं अवसानच गळून गेल्यासारखं झालं. डोकं गरगरायला लागलं. मी या धक्क्यात असतानाच माझ्या शेजारची मुलगी तिची बस आल्याने निघूनही गेली होती. मला तिथं उभं राहायला भयंकर भीती वाटली. माझं लक्ष गेलंय हे ध्यानात येताच त्या मुलाने झटकन दरवाजा लावून घेतला म्हणून मला काहीच करता आले नाही. दुसऱ्या क्षणाला पुढच्या बसस्टॉपला मीही निघून गेले. त्या रात्री मला नीट झोप लागली नाही. ते घाणेरडं दृश्य कायम डोळ्यासमोर येत राहिलं आणि मग मला आठवत राहिल्या असंख्य बलात्कार झालेल्या मुली. ऐकू आल्या निष्पाप मुलींच्या जिवघेण्या किंकाळ्या. " समजा त्या मुलाने दार लावून न घेता त्याची कृती पुढे तशीच चालू ठेवली असती तर मी त्याविरुद्ध अॕक्शन घेऊ शकले असते का?" हा प्रसंग आठवला की मी मलाच अनेकदा हा प्रश्न विचारते. मला आजही या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळालेलं नाहीय.
माझ्यासमोर पन्नासेक फुटांवर उभा राहून दूरुन का होईना एका पुरुषाकडून माझ्या शरीराचा उपभोग घेतला गेला ही गोष्ट आठवली की आजही डोक्यात तिडीक जाते. खरंतर हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं म्हणून माहित झालं, अन्यथा आपलं लक्ष नसताना किती पुरुष आपला असा उपभोग घेत असतील या विचाराने मन गोंधळून जातं. अप्रत्यक्ष अथवा प्रत्यक्ष लैंगिक छळासंबंधीच्या अनेक प्रसंगांना प्रत्येक बाईला सामोरं जावंच लागतं, मग ती लहान मुलगी असो वा साठीतली वृद्धा. आपल्या भोवतालचे शारीरिक व मानसिकदृष्ट्या विकृत पुरुष कधी स्पर्शातून तर कधी शब्दांतून स्त्रीचा शारीरिक छळ करु पाहतात. कारण त्यांना पक्कं ठावूक असतं की ही मुलगी/बाई आपल्याला ना काही बोलू शकते ना आरडाओरड करु शकते. यामुळेच अशा विकृती समाजात अधिकाधिक फोफावत चालल्या आहेत. माझ्यासारख्या निर्भीड मुलीची ही कथा तर इतर लाजऱ्या बुजऱ्या मुलींचं काय होत असेल!
माझ्या एका मैत्रीणीच्या बाबतीत वारंवार घडलेला प्रसंगही मला इथे नमूद करावासा वाटतोय. मैत्रिणीच्या सख्ख्या बहिणीच्या नवऱ्याने तिच्या शरीराशी लगट करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. कधी हात धरणे, कधी मागून गुपचूप येऊन पकडणे, छातीला स्पर्श करणे असे प्रकार केले. पण ती सांगणार कुणाला. कुणाशी काही बोलावं तर बहिणीच्या संसार मोडण्याची भीती. म्हणून अनेक दिवस तिने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला. मुलींच्या बाबतीत जेव्हा जवळच्या नात्यातल्याच पुरुषाकडून असा अत्याचार होतो तेव्हा त्यांची स्थिती ही धड सहन ही होईना ना सांगता ही येईना अशी केविलवाणी होऊन जाते. अशा मुली एकट्या असो वा गर्दीत कायम धास्तावलेल्या, घाबरलेल्या वाटतात आणि याचा दूरगामी वाईट परिणाम म्हणजे त्यांच्या मनात पुरुषाच्या आणि स्वतःच्याही शरीराबद्दल किळस निर्माण होते.
अनैतिक वा जबरदस्तीच्या मार्गाने लैंगिक सुखाची अभिलाषा बाळगणाऱ्या पुरुषांचं पहिलं सावज असतं नात्यातली मुलगी. जीव गेला तरी ती याविषयी ब्र काढणार नाही असा त्यांच्याठायी मोठाच आत्मविश्वास असतो आणि घडतही तंतोतंत तसंच. मोठ्या मुली नाईलाजाने सहन करतात आणि लहाण मुलं-मुलींना तर नेमकं आपल्या बाबतीत काय घडतंय हेच नीट उमगत नसतं. कारण लैंगिक शिक्षणाचा आपल्याकडे फार मोठा बाऊ करून ठेवलेला आहे. टिव्हीवरच्या पडद्यावरचा साधा किसिंग सीनही आपण कुटुंबीयांसोबत एकत्र पाहू शकत नाही. लहान मुलामुलींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्याचे प्रकार यामुळेच घडतात.
घरात, शाळेत, रस्त्यावर, मंदिरात, बाजारात, दवाखान्यात, आॕफिसात अगदी कुठेही मुलींना चित्रविचित्र प्रकारच्या लैंगिक छळांना सामोरं जावं लागतं. घाणेरड्या नजरेने टक लावून बघणं, द्वैअर्थी अश्लील कमेंट पास करणं, गर्दीत धक्का देणं हे प्रकार तर राजरोज घडतात. 'कुठे रोडरोमिओंच्या वाटेला जा आणि आपली बदनामी करुन घ्या,' असा विचार करुन मुली चूपचाप सगळं सहन करतात. कधीकधी तर हे प्रकार इतके टोकाला जातात की मुली आतल्या आत उद्ध्वस्त होतात, जीवन संपवून टाकायलाही कमी करत नाहीत. कितीही लैंगिक छळ प्रतिबंधात्मक कायदे केले तरी हे प्रकार कमी होण्याची अजिबातच चिन्हे दिसत नाहीत. पहिलं कारण जर काय असेल तर ते म्हणजे या प्रकारातील बळींचं गप्प बसणं. गप्प बसण्याचे छळ थांबत वा संपत नाही तर अधिक वेगाने वाढतो हे ध्यानी येत नाही.
'आपकी अदालत' या कार्यक्रमात कंगणा राणावतने इंडस्ट्रीमध्ये आपला कसा शारीरिक वापर करुन घेतला गेला याची वाच्यता केली. त्याबद्दल तिचे कौतुक आहेच. ती मोठी अभिनेत्री आहे. तिला ग्लॕमर आहे म्हणून तिच्या आयुष्यावर या तिच्या निर्भीड अभिव्यक्तीचा फारसा परिणाम होणार नाहीही पण सामान्य स्त्रियांचं काय? लग्नाआधी बापभावाला भ्यायचं आणि लग्नानंतर नवऱ्याला. सासर आणि माहेर दोन्हीकडची तथाकथित अब्रू सांभाळण्याचा ठेका तिनेच घेतलेला असतो जणू. कारण तिच्यावर जन्माला आल्या क्षणापासून कौटुंबिक प्रतिष्ठेची पालनकर्ती तू आहेस असं बिंबवलं जातं. रोज न चुकता कित्येक स्त्रियांना लैंगिक छळांना सामोरं जावं लागतं, पण तिला तो अत्याचार आतल्या आत दाबून ठेवायचा असाही संस्कार तिच्यावर इमानेइतबारे केला जातो. पुरुष असेच असतात, आपणच चापून चोपून राहायला हवं अशी रुढीबद्ध शिकवण तिला दिली जाते. स्वतःच्या सोईसाठी रुळवले गेलेले पुरुषप्रधान संस्कृतीचे हे सो कॉल्ड डावपेच तिला आजवर कळले नव्हते पण आता ती आधीइतकी बाळबोध राहिली नाही. #Metoo मोहीमेत तिने निर्भीडपणे घेतलेला सहभाग हे त्याचच द्योतक आहे.
"माझ्याबरोबर अथवा माझ्या आजूबाजूच्या कुठल्याही स्त्रीबरोबर (लहान मुलंमुलींसुद्धा) साधी छेडछाड जरी झाली तरी मी त्याविरुद्ध आवाज उठवेन." असा ठाम निर्धार प्रत्येक स्त्रीने करायला हवा आणि पुरुषांनीही आपल्या फसव्या मान-प्रतिष्ठेला फाट्यावर मारुन अशा मुलींच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायला हवं, तरच #Metoo या जगव्यापी मोहीमेचा उद्देश पूर्ण होईल.
कविता ननवरे, सोलापूर
#Metoo आणि मी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Oct 2017 12:55 PM (IST)
अनैतिक वा जबरदस्तीच्या मार्गाने लैंगिक सुखाची अभिलाषा बाळगणाऱ्या पुरुषांचं पहिलं सावज असतं नात्यातली मुलगी. जीव गेला तरी ती याविषयी ब्र काढणार नाही असा त्यांच्याठायी मोठाच आत्मविश्वास असतो आणि घडतही तंतोतंत तसंच.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -