"ऐ अगं उद्या कुठला रंग आहे गं? माझ्याकडं त्या रंगांची साडी आहे का बघावं लागल नं."
तिघीतली पहिली प्रश्नार्थक चेहऱ्यानं म्हणाली.


"उद्या ना भगवा रंग आहे. अगदी भडक भगव्या रंगाची कडक साडी हवीय बरं का. रस्त्यावरून जाताना म्हटलं पाहिजे सगळ्यांनी. आलं रे आलं भगवं वादळ आलं." तिघीतली दुसरी उत्साहाने सळसळत क्रांतिकारी आवेशात म्हणाली.

"हो हो हे काय बोलणं झालं. भगवी साडी, भगव्या बांगड्या, नेलपेंट, टिकली, कानाताले सगळं भगवं हवं. आणि माझ्याकडे तर भगवी लिप्स्टिक सुद्धा आहे. मी ओठ सुद्धा भगवे करणारय." तिघीतल्या दोघींना डोळा मारत, टाळ्या देत तिसरी बोलली.

नऊ रंगांच्या साड्यांची, त्याला साजेशा मॕचिंग इमिटेशन ज्वेलरीची चर्चा करणाऱ्या महिलांच्या तोंडून असे डोक्यात तिडीक आणणारे संवाद माझ्याप्रमाणे अनेकांच्या कानांवर (शाळा, कॉलेज, रस्ता, चौक, बस, बसस्टॉप कोर्ट, हॉस्पिटल) अनेक ठिकाणी पडले असतील. आणि सोबतच, व्हॉट्सअॅप डीपी आणि स्टेटसवर, फेसबुकच्या आपल्या टाईमलाईवरही नटूनथटून त्या त्या रंगांच्या दिवशी त्या त्या रंगाचा ड्रेस, साडी परिधान केलेल्या स्त्रीयांचे फोटो दिसले असतील. हे मनोरम (?) स्त्रीरूप पाहून कुणाचे डोळे तृप्त बिप्त झाले असतील तर काही व्यक्तींना ते इरिटेटही वाटलं असेल. तर असो.

नऊ दिवस नऊ रंगात नखशिखान्त न्हावून निघालेल्या किती स्त्रियांना आपण नेमक्या कुठल्या कारणासाठी या रंगाचा पोषाख परिधान करतोय हे माहिती असेल? नऊ रंगांच्या पोषाखाबाबतची ऐतिहासिक, सामाजिक फलनिष्पत्ती काय असेल? असा विचार किती जणींच्या डोक्यात डोकावला असेल.! आपल्या उत्सवप्रिय महान भारत देशातल्या देवभोळ्या, धर्मभोळ्या आणि रंगभोळ्या तमाम भगिनींनी मेंढरांचा गुण आत्मसात केलेला आहे असं त्यांच्याच एकूण वागण्यावरून वारंवार प्रत्ययास येतं. एकीच्या मागे दुसरी, दुसरीच्या मागे तिसरी, तिसरीच्या मागे चौथी असं करत करत हजारो स्त्रिया विविध प्रथा-परंपरा,पद्धतींचं अनुकरण करतात. का? कशासाठी? कुणासाठी? असे सगळ्याच प्रश्नांचे कीडे त्यांच्या डोक्यात घनदाट निद्रा घेत असतात.

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला नऊ वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसवल्या जातात. पिवळा, हिरवा, करडा, पांढरा, केशरी, लाल, निळा, गुलाबी, काळा असे ते रंग. हे नऊ रंग फार्फार पूर्वी ठरविले गेले आहेत. पौराणिक ग्रंथांमधून त्याचे पुरावे सापडतील. पांढरा शांततेचा, हिरवा समृद्धीचा, केशरी क्रांतीचा अशी विविध प्रतिकंही या रंगांशी जोडलेली आहेत. एका रंगाचा पोषाख करायचा म्हणजे समाजातील उच्च वर्गापासून तळागाळातील वंचित वर्गापर्यंत सगळ्यांनी एकत्र यायचं. आपापसात सलोखा प्रस्थापित करायचा. भारत आणि इंडियामध्ये असलेली दरी मिटवण्याचा प्रयत्न करत माणूसकीच्या, एकत्मतेच्या, बंधूभावाच्या रंगात सगळ्यांनी रंगून जायचं. आणि 'हे एकात्म चित्र, हा सलोखा स्त्रीशक्तीच निर्माण करू शकते.' हे पुराणकाळापासून चालत आलेलं ब्रीद पुन्हा पुन्हा सत्यात उतरवून दाखवायचं. असाच बहुतांशी अर्थ या नवरात्रीचा आहे.

खरं तर स्त्रियांनी नऊ दिवस नऊ रंगांचा पोषाख करून तो मिरवायचा हे लोण 2004 पासून सुरू झालं. किंबहुना केलं गेलं. महाराष्ट्र टाईम्सने त्या वर्षी महालक्ष्मीला नऊ दिवस नेसवल्या जाणाऱ्या साड्यांच्या नऊ रंगाची यादी आपल्या वर्तमानपत्रातून जाहीर केली. आस्ते आस्ते अधिकाधिक खपाची गणितं सोडवण्यासाठी अमक्या दिवशी तमक्या रंगाची साडी नेसून आम्हांला तो फोटो पाठवा आम्ही तो प्रसिद्ध करू अशी अमिषं स्त्रीयांना दाखवण्यात आली आणि तमाम महाराष्ट्रीयन/ नॉनमहाराष्ट्रीयन स्त्रिया अशा अमिषाला बळी न पडतील तर नवलच. बहुसंख्य धर्मभोळ्या आणि कायम नटण्यामुरडण्यास उत्सुक महिलावर्गासाठी ही मोठी नामी संधी ठरली. यानंतर अनेक वर्षापासून सर्व वर्तमानपत्रं याचा कित्ता गिरवत आहेत. प्रत्येक वर्षी नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या/ड्रेस परिधान करण्याची फॕशनच झाली.सोशय मिडीया हाती आल्यापासून तर त्या त्या दिवशीच्या रंगाची साडी नेसून फोटो फेसबुकवर पोस्टायचा एक ट्रेंडच निर्माण झाला. नऊ दिवस नऊ रंगात न्हाऊन निघण्यामागच्या उद्देशाला आपसूकच तिलांजली दिली गेली हे वेगळं सांगायला नको.

नऊ रंगाच्या पोषाखात मध्यमवर्गीय स्त्रीवर्ग उत्साहाच्या धबधब्यात न्हावून निघत फोटोशेशन करत असतो, ( सद्यकाळात हे नऊ रंगाचं फ्याड केवळ फोटोसेशनसाठीच आहे हे कुणीही सुज्ञ छातीठोकपणे सांगू शकेल.) ते फोटोज सोशलमिडीयावर अपलोड करून चार कौतुकाच्या शिंतोड्यांनी कृतकृत्य होत असतो अगदी त्याचवेळी तळागाळातील बहुसंख्य भगिनी मळकट कळकट साडीत कचरा वेचत असतात,फाटक्या साडीत शेतात खुरपत असतात,विरलेल्या साडीत धुणीभांडी करत असतात,आहे ती साडी खराब होऊ नये म्हणून ती गुडघ्यापर्यंत खोचून संडास साफ करत असतात.नऊ दिवसांच्या नऊ रंगांचं तथाकथित महात्म्य त्यांच्या खिजगणतीतही नसतं.आणि कुणी चुकून घातलच त्यांच्या कानावर तर नऊ दिवसासाठी नऊ रंगाच्या नऊ साड्या त्या कुठून मिळवणार? की त्यासाठी धुण्याभांड्याची अजून चार घरं धरणार?

तर बायांनो, तुम्ही नऊ रंगाच्या या सगळ्या रंगरंगाटात भारत आणि इंडियामधली दरी मिटवत नाही आहात तर ती अधिकाधिक मोठी करताय. तुम्ही आपापल्या मस्तीत, उत्सवात मश्गुल आहात. तुम्ही तुमच्यापुरता उजेड कमावला आहे. त्यातच लखलखण्यात धन्यता मानता आहात. माध्यमांच्या आहारी जाऊन स्वतःचं वस्तूकरण करून घेताय शिवाय बाईच्या बाजारमूल्याला अधिकाधिक पुष्टी देताय हे तुम्हांला जराही आकळत नाही. मान्य आहे त्या निमित्ताने तुम्हांला एकमेकींना भेटता येतं, एकमेकींशी संवाद साधता येतो पण तुमचा संवाद साड्या, दागिणे, मेकअप यापुढे सरकतो का? हे तुम्ही स्वतःला विचारायला हवं. तुमच्या कामाच्या धबडग्यातून मिळणारा अमूल्य वेळ हा नवे नवे टाईमपास पायंडे पाडून स्वतःला एखादा शोपीस म्हणून मिरवण्यात खर्ची घालू नका. माध्यमांनी तुमचा वस्तू म्हणून वापर सुरू केलाय. बाईच्या असण्या-दिसण्यावर धंद्यांची गणितं, डावपेच ठरवले जातायत. एखाद्या शोकेसची शोभा वाढण्यासाठी जशी नटवून सजवून बाहुली त्यात ठेवली जाते तसच धोरण माध्यमांमधून बाईसंदर्भात अवलंबलं जातय. हे ही तुमच्या ध्यानात येत नाही. बायांनो वेळीच सावध व्हा नाहीतर शोकेसमधली दिखाऊ निर्जीव बाहुली होण्यापासून तुम्हाला कुणीच काय खुद्द तुम्हीसुद्धा रोखू शकणार नाही.

आणि तरीही तुम्ही तुमचा कित्ता असाच पुढेही गिरवत आणि " कालचाच गोंधळ बरा होता " म्हणत राहिलात तर आम्हांला नजिकच्या काळात

ओ नौ रंग में रंगने वाली
स्त्री हो या हो दिखाऊ गुडीया
या हो तुम कोई चिज बिकाऊ
मेरे सवालों का जवाब दो,दो न.

असा तुम्हांला जवाब मागावा लागेल.

कविता ननवरे यांचे आधीचे ब्लॉग

BLOG : मग तुम्ही खुशाल करा उत्सव साजरे.!

खोलेबाईंचे विचार किती खोल खोल खोल

BLOG : माझ्या मराठा बांधवांनो..!