चार वर्षाची चिऊ मागचे आठ दिवस झाले अगदीच कावरीबावरी झालीय. तिच्या पूजादीदीची तिला खूप आठवण येतेय. तिला काखेत घेऊन एक घास चिऊचा..एक घास काऊचा करून दुधभाताचे घास भरवत, तिचे लाड करत, तिला गोष्टी सांगत अंगणभर फिरणारी तिची पूजादीदी मागचे आठएक दिवस झाले तिच्या बाळनजरेला कुठेच दिसली नाहीय. चिऊचे निरागस डोळे तिच्या पूजादीदीला शोधून शोधून थकून गेले आहेत.




बाबांना, पप्पांना, आजीला, मोठ्या आईला, मम्मीला, युवराजदादाला चिऊ दिवसातून शंभरवेळा तरी विचारतेय आपली पूजादीदी कुठंय म्हणून. तिच्या प्रश्नाला एकच उत्तर मिळतय. " पूजादीदी गावाला गेलीय. पूजादीदी गवाला गेलीय." पण कुणाचंच उत्तर तिला पटलेलं नाहीय. कारण तिला माहितीय तिची पूजादीदी तिला अशी न सांगता कॉलेजलाही जायची नाही. आणि एवढे दिवस तर ती कुठेही जाणार नाही. चिऊ कधी रडवेल्या चेहऱ्याने तर कधी लडिवाळपणे सगळ्यांना पुन्हा पुन्हा विनावणीही करते, "फोन लावून द्या ना पूजादीदीला. मला बोलायचंय तिच्याशी. तिच्यावल लागवायचंय आणि तिच्याशी कत्तीपण कलायचीय." चिऊच्या लडिवाळ बोलण्याने, मधाळ शब्दांनी कुणीही विरघळत नाही. तिच्या प्रश्नांपासून सगळे दूरदूरच पळतायेत. तिच्या पूजादीदीला कुणीही फोन लावून देत नाही की तिच्याकडे घेऊन जात नाही.


मागचे आठ-नऊ दिवस झाले चिऊ निटशी जेवलेलीही नाहीय. मैत्रिणींत जाऊन खेळलेली नाहीय की आवडीची कार्टून मालिकाही तिने बघितली नाहीय. पूजादीदीच्या कुशीत झोपायची सवय असलेल्या तिला पोटभर झोपही लागलेली नाहीय. रात्री गाढ झोपली की सकाळीच उठणारी चिऊ आताशा रात्रीतून चारचारवेळा जागी होतेय. शेजारी झोपलेल्या मम्मीच्या हनुवटीला धरत म्हणतेय " मम्मी मला पूजदीदीकलं घिऊन चल ना आत्ताच्या आत्ता." मम्मी तिच्या पाठीवर थोपटत ,"उद्या घेऊन जाते हा माझ्या बाळाला पूजादीदीकलं."असं खोटंच सांगून तिची समजूत काढते.


टीव्हीवर ठेवलेली पूजदीदीच्या फोटोची फ्रेमही गायब आहे. युवराजदादाच्या मोबाईलमध्ये पूजदीदीचे आणि आपले खूप फोटो आहेत हे चिऊला माहित होतं. तिने युवराजदादाला कित्तीदा मस्का मारला फोटो दाखव म्हणून पण प्रत्येकवेळी त्याचं उत्तर ठरलेलंच, " चिऊ सगळे फोटो डिलीट झालेत. जा बरं तिकडे मला अभ्यास करायचंय. त्रास नकोस देऊ मला." चिऊ हिरमुसून जायची. न चुकता रोज पूजदीदीची ओढणी साडी म्हणून नेसणाऱ्या चिऊला तिची ओढणी ही कुठे दिसली नाहीय की तिचा ड्रेसही दोरीवर नजरेस पडला नाही. परवा तिने मोठ्या आईकडे पूजादीदीची ओढणी मागितली तेव्हा मोठ्या आईने रागारागात स्वतःचीच साडी दिली होती नेस म्हणून. पूजदीदीची कॉलेजची बॅग घेऊन त्यातल्या वहीवर काहीतरी रेघोट्या मारायला जावं तर तिची बॅग ही कुठेच दिसली नाहीय तिला. झाडावर नुकतंच फुललेलं टपोरं फूल दुसऱ्या क्षणाला कोमेजून जावं अगदी तसंच चिऊच्या बाबतीत झालंय.


पूजाच्या घरात नसण्याला आज दहा दिवस झाले आहेत. नेहमीप्रमाणनं आजही चिऊनं सकाळी सकाळी मळ्याकडं जाणाऱ्या बाबांना हटकलंच. बाबांची विजार ओढत "सांगा ना बाबा आपली पूजदीदी कुथय. सांगा ना बाबा आपली पूजदीदी कुथय"चं टूमनं लावलं होतं. बाबा कधी नव्हे ते आज जास्तच चिडले. चिडून घरातल्या सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात ओरडले." तुझी पूजादीदी मेलीय..मेलीय ती. आज दहावंही झालं तिचं. सूतक फिटलं आज काहीतरी गोडधोड खायला करा." बाबांना एवढं रागावलेलं, लालबुंद झालेलं तिनं पहिल्यांदाच बघितलं होतं. ती घाबरुन आजीच्या पदराखाली जाऊन लपली. आणि थरथरत्या आवाजात आजीला विचारलं "आजी खरंच आपली पूजादीदी मेली का गं..?" आजीनं तिला छातीशी कवटाळत दाबून धरलेला हुंदका फोडला. स्वयंपाकघरातूनही मुसमुसल्याचे आवाज ऐकू आले. ओसरीत बसलेला युवराजदादाही झरकन त्याच्या खोलीत निघून गेला.


वाड्यातलं सुतकी वातावरण महिन्याभरात जरासं निवळत निवळत पूर्ववत होत गेलं. चिऊही बऱ्यापैकी पूजादीदीच्या आठवणीतून बाहेर आली. नीट जेऊ-खाऊ लागली. मैत्रिणीत रमू-खेळू लागली. तिच्या आवडत्या कार्टून मालिकेतील शिजूका, नोबिता, डोरेमोन या पात्रांमध्ये पुन्हा नव्याने हरवून गेली. तिच्या पूजादीदीबद्दल कुणालाच काही विचारेनाशी झाली.


अशीच एका दुपारी सगळी सामसूम झालेली. पप्पा ऊसाला पाणी देऊन येऊन सोफ्यात आडवे झाले होते. बाबा त्यांच्या खोलीत वर्तमानपत्रांचा ढीग समोर ठेवून काहीतरी शोधत गुंतून गेलेले होते. आजी ओसरीत शेंगा फोडत बसली होती. मोठी आई आणि मम्मी जेवण करत होत्या. युवराजदादाही कॉम्पुटरवर त्याचं त्याचं काम करत बसलेला होता. चिऊ खिडकीतून रस्त्यावरची ये-जा बघत, रस्त्यापलीकडची घरं बघत रमून गेलेली होती. आणि अचानक तिला रस्त्यापलीकडच्या छोट्याशा घरातून हातात धुण्याची बादली घेऊन बाहेर येत असलेली पूजादीदी दिसली. पूजादिदीच्या अंगावर पंजाबी ड्रेस नव्हता तर साडी होती. केस आधीप्रमाणे मोकळे नव्हते तर बांधलेले होते. तरीही चिऊने ओळखलंच. कारण शेवटी ती तिची पूजादीदी होती ना.


चिऊनं आनंदानं जागीच उडी मारली. टाळ्या पिटल्या. पळत पळतच बाबांच्या खोलीकडं गेली. वर्तमानपत्राच्या ढिगाशेजारी भिंतीला टेकून,डोळे मिटून बसलेल्या बाबांना गदागदा हलवत म्हणाली.." बाबा..बाबा..आपली पूजादीदी आहे..समोलच्या घलातनं..बाहेल आलेली दिशली..चला की बाबा..दालाची कली कालून आपून पूजादीदीला आपल्या घली आणू."...बाबांच्या कपाळावरची रेषली बदलली नाही की इतरवेळी होतात तसे बाबा चिऊच्या आनंदानं उल्हासितही झाले नाहीत. उलट बाबांनी चिऊकडे होता होईल तेवढं दुर्लक्षच केलं. पप्पांना झोपेतून उठवायचं चिऊचं धाडस झालं नाही. चिऊ आजीकडे गेली. आजीचा पदर ओढत म्हणाली, " आजी आपली पूजादीदा मेली नाही गं. आहे ती. तुम्ही मला शगले खोतं बोललात. चल ना मोथ्या दालाची कली काल ना. आपण पूजादीदीला घली आणू." आजीने साधं तिच्या चेहऱ्याकडेही बघितलं नाही. तिचं तिचं शेंगा फोडण्याचं काम पुढे चालू ठेवलं. चिऊ ने आपला मोर्चा  मोठ्या आई आणि मम्मी कडे वळवला. ती किचन मध्ये गेली. जेवता जेवता दोघींनीही ताटं बाजूला सारुन ठेवली होती. दोघींच्या डोळ्यांत पाणी बघून ती त्यांना काहीच बोलली नाही. ती परत सोफ्यात आली. युवराजदादाला मस्का मारावा तर  युवराजदादाही कुठे गायब झाला होता.


पूजादीदीला बघून चिऊला किती किती आनंद झाला होता पण चिऊला झालेल्या आनंदाचं कुणालाच सोयरसूतक नव्हतं. चिऊला वाड्याच्या मोठ्या दाराची कडी काढून पूजादीदीला घरात आणायचं होतं. तिच्याशी खोटं खोटं भांडायचं होतं. तिने घरातल्या सगळ्यांना कडी काढण्याची विनंती केली होती पण कुणीही तिला दाराची कडी काढून दिली नव्हती.


खिडकीत जाऊन चिऊ रस्त्यापलीकडे धुणं धूत असलेल्या साडीतल्या पूजादीदीला बघत बसली. तिनचारवेळा ' पूजादीदी, पूजादीदी अशी हाक ही तिने मारली.पण तिच्या पूजदीदीपर्यंत चिऊची कोवळी हाक पोहचलीच नाही.