फेकन्यूजचा जमाना आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात खऱ्यासारखा मास्क लावून खोट्या बातम्या येताहेत की सराईत वृत्तपत्रं आणि न्यूज चॅनल्सही गांगरून त्या खऱ्या म्हणून छापून / प्रकाशित करून मोकळे होतात. वॉशिंग्टन डीसीमध्ये एक न्युजियम – न्यूज म्युझियम आहे, ज्यात बातम्यांचा इतिहास अनुभवता येतो. तिथंही आता फेक न्यूजचा एक विभाग सुरु झालेला आहे.


फेकन्यूज ओळखायच्या कशा हे सांगणाऱ्या वेबसाईट्सही आता वाढू लागल्या आहेत. सर्व फेकन्यूजमधला सनसनाटीपणा समान असला तरी यात दोन प्रकारच्या बातम्या असतात. एक म्हणजे गंभीर स्वरुपाच्या विघातक अफवा आणि दुसऱ्या काहीतरी हलक्याफुलक्या, आचरट, असभ्य, विचित्र बातम्या.

पहिल्या प्रकारातल्या फेकन्यूजविषयी गेल्या काही महिन्यांमध्ये भरपूर चर्चा झाल्या आहेत आणि अनेक तज्ज्ञ मंडळींनी त्यांची उदाहरणं व घातक परिणाम देखील दाखवून दिले आहेत. दुसऱ्या प्रकारातल्या बातम्या लोक कुतूहलाने वाचतात, व्हॉट्सअपवरून एकमेकांना पाठवतात, फेसबुकवर शेअर करतात. कारण त्यांचं वैचित्र्य मनोरंजनमूल्य धारण करुन आलेलं असतं.

मुलं पळवणाऱ्या टोळ्या गावात आल्याची अफवा आमच्या लहानपणीही अधूनमधून कानी पडत असे आणि दुसरी अशीच लोकप्रिय अफवा होती ती वेणी कापणारा वेडा माणूस गावात आल्याची. मग आया मुलांवर अतिबंधनं घालत आणि त्यांना फारच जपत. शाळा– कॉलेजात जाणाऱ्या मुली वेण्या घालणाऱ्या असत, त्या वेण्या गुंडाळून वर बांधल्या जात आणि मुली घोळक्याने येऊ जाऊ लागत. सुंदर दिसणं वा चालू फॅशन हे मुद्दे झपकन मागे पडत. काही काळाने या अफवा होत्या, असं स्थानिक वृत्तपत्रांमधून छापून येई आणि पोरं पुन्हा मोकळी उंडारत, वेण्या पुन्हा पाठीवर लहरू लागत. बाकी फेकन्यूज निरुपद्रवी असत. कुठल्याही फळातून वा भाजीतून गणपतीचा आकार दिसला ही एक दोन तोंडांचं वासरू वा माकडाच्या चेहऱ्याचं केसाळ मूल या अजून दोन बातम्या असत, ज्या दीर्घकाळ चघळल्या जात.

वृत्तपत्रांमधील मनोरंजन जगताच्या गॉसिप्स, चालू फॅशन्स, नट्यांच्या कपडे व दागिन्यांचं वजन, विक्षिप्त केशभूषा, हास्यास्पद मेकअप, सेटवर झालेली फजिती वा किरकोळ दुखापती या फुटकळ माहितीत भर पडली ती प्लास्टिक सर्जरीची. फाटलेले ओठ शिवणे, भाजलेले चेहरे नेटके करण्याचा प्रयत्न करणे इतपत कामांच्या बाबत माहिती असलेल्या या शस्त्रक्रिया आता अनेक अभिनेत्री आपली नाकं आणि ओठ यांचे आकार बदलण्यासाठी करु लागल्या. यात ऐकलेलं पहिलं नाव श्रीदेवीचं होतं; पुढे त्यात प्रियंका चोप्रा, शिल्पा शेट्टी, आयेशा टाकिया, कोएना मित्रा, मनिषा लांबा, अनुष्का अशा अनेकानेक नावांची भर पडत गेली. लेन्सेस लावून डोळ्यांचा रंग तात्पुरता बदलणं, गालांवर कृत्रिम खळ्या लावणं हे उद्योग तर प्रत्यक्ष उच्चमध्यमवर्गात, मध्यमवर्गातल्या स्त्रियाही विशेष समारंभांसाठी करत असल्याचं पाहिलं होतंच.

मेकअप करणं, हातांवर मेंदी काढणं, केस रंगवणं, केस हायलाईट करणं, अंगावर कुठेही पर्मनंन्ट टॅट्यू रंगवून घेणं; नाक-कान टोचले जातातच, खेरीज भिवया, ओठ, हनुवटी, बेंबी इत्यादी जागीही टोचून घेऊन तिथं रिंग वा खडा अडकवणं असे विचित्र प्रकारही वाढत गेले होते. तरी प्लास्टिक सर्जरी मात्र अजून इतकी सरसकट होताना दिसत नसल्याने कुतूहलाचा विषय राहिलेली होतीच.

त्यात ही बातमी आली आणि प्रचंड वेगाने पसरली. एका इराणी तरुणीने आपला चेहरा अँजेलिना जोली या अभिनेत्रीसारखा दिसावा म्हणून तब्बल पन्नास वेळा प्लास्टिक सर्जरी करून घेतली! बातमीसोबत अर्थात अँजेलिना जोलीचा एक फोटो आणि दुसरा भयाण, भेसूर, भुतासारखा दिसणारा चेहरा अर्थातच त्या १९ वर्षं वयाच्या इराणी तरुणीचा. इंस्टाग्रामवर तिचे फोटो अपलोड झाले आणि इतके व्हायरल झाले की, Trending News म्हणून अनेक मोठ्या वृत्तपत्रांच्या मनोरंजन पुरवण्यांमधून तिची दखल घेण्यात आली.



कुणाला बार्बी वा तत्सम बाहुलीसारखं दिसायचं असतं, कुणाला एखाद्या अभिनेत्रीसारखं. मग कुणी प्लास्टिक सर्जरी करतं, कुणी वजन कमी करण्यासाठीचे अघोरी प्रयोग करतं, तर कुणी चक्क लिंगबदलाची शस्त्रक्रिया करण्यापर्यंत मजल गाठतं.  या इराणी मुलीनं अँजेलिना जोली सारखं दिसण्यासाठी ४० किलो वजन कमी केलं, प्लास्टिक सर्जरीने चेहरा बदलवून घेतला आणि वरतून दोन्ही गाल टोचून त्यांत एकेक नाजूक मोरणीसारखा दागिनाही डकवला. तिचे ते विचित्र फोटो पाहून ज्यांचं मनोरंजन होत होतं, त्या हजारो ‘चाहत्यां’नी तिला फॉलो करायला सुरुवात केली.

मग हळूहळू खरी बातमी समोर येऊ लागली. ही मुलगी १९ वर्षांची नसून २२ वर्षांची आहे, असा पहिला खुलासा होता. मग ५० शस्त्रक्रिया झाल्याच नाहीत, असा दुसरा खुलासा आला. मग तिसरा खुलासा तिच्याकडूनच आला की, “ही परदेशी प्रसारमाध्यमं अत्यंत बायस आहेत आणि ती अजूनही १८व्या शतकातल्या मानसिकतेत अडकलेली आहेत. या लोकांना साधं मेकअप किंवा डिजिटल करामती यांविषयी देखील माहीत नाही. कुणाचाही फोटो फोटोशॉप करुन कसाही बदलवता येऊ शकतो, याचंही भान या माध्यमांना नाही. हे नसते उद्योग माझ्याविषयी मत्सर वाटणाऱ्या कुणीतरी केलेले असणार. या एकाही वृत्तपत्राने माझी थेट मुलाखत घेऊन खातरजमा केलेली नाही. माझ्या पोस्ट पाहिल्या तर त्यात कुठेही मी अँजेलिना जोलीचा साधा उल्लेखदेखील केलेला नाही.”

आता ही मुलगी कुठल्या मन:स्तापातून गेली असेल, याचा आपण केवळ अंदाज करू शकतो. तिच्या व्यक्तिगत आयुष्यात यामुळे नेमक्या काय घडामोडी झाल्या, हे कदाचित आपल्याला कधीच समजणार नाही. कुणाकुणाचे चेहरे वापरून अश्लील फोटो, व्हिडीओ तयार केले जातात, त्याहून हे सौम्य आहे असेही कुणी म्हणताहेत; पण हे म्हणणे म्हणजे बलात्काराहून लैंगिक छेडछाड सौम्य म्हणण्यासारखेच आहे. मत्सर कुठल्या थराला जातात आणि जी माणसं समाजात स्वत:चं उचित स्थान निर्माण करु शकत नाहीत ती आपलं उपद्रवमूल्य कसं वाढवत नेतात हे बाकी अशा फेकन्यूजमधून समजतं. या अफवांमध्ये वाहवत जायचं की सारासार बुद्धीचा वापर करायचा हे मात्र आपलं आपल्यालाच ठरवावं लागेल.

‘चालू वर्तमानकाळ’ सदरातील याआधीचे ब्लॉग :

चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही...


चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये!

चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं

चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन

चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’  

चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं

चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर

चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड

चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे

चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं

चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं

चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या

चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात…

चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…

चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत

चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!

चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब