कशाचीही गणितं करणारा एक मित्र होता. एकदा त्यानं ‘एका आयुष्यात माणसं किती जगतात?’ याचं गणित करण्याचा एक उपक्रम केला. या गणितासाठी एक फॉर्म भरायचा असे. एखाद्याच्या आयुष्यात किती काळात सर्वसाधारणपणे किती माणसं येतात, किती घटना घडतात, सुखं आणि दु:खांचं प्रमाण किती असतं, तो किती कामं करतो, समाधानाचे क्षण किती, अडचणी-संकटं यांचं प्रमाण किती आणि त्यांना कसं तोंड दिलं इत्यादी गोष्टींची एक भलीथोरली यादी त्याने केली होती... आपण फक्त एकेका मुद्द्यावर टिक करत जायचं. आहे की नाही, घडलं की नाही इत्यादी. तसं मी करून दिलं. लपवाछपवी करण्याचं कारण नव्हतंच.
तर निष्कर्ष निघाले. तो म्हणाला -
आयुष्यातली पहिली २५ वर्षं तू एकूण ४० वर्षं जगलीस.
मग २६ ते ३५ अशा १० वर्षांत एकूण २० वर्षं. म्हणजे ६० झाले.
थोडक्यात तुझी पहिली कादंबरी प्रकाशित झाली, तेव्हा तू ६० वर्षांचं आयुष्य अनुभवलेली स्त्री होतीस. तरीही भाबडी होतीस पुष्कळ, त्यामुळे पुढच्या काळात फारच जास्त घोळ घातलेस आणि स्वत:हून काही गोष्टी ओढवून घेतल्यास.
त्यानंतर ३६ ते ४४ पर्यंतचा टप्पा पाहू, कारण ४५ ला एक मेजर घटना आहे. या ८ वर्षांत तू सर्वांत जास्त जगलीस, प्रचंड घडामोडी आणि उलथापालथी या काळात झाल्या. इतक्या की दर एका वर्षात तू १० वर्षे म्हणजे सुमारे ८० वर्षे जगलीस. एकूण १४० झाले.
४५ ते ५० वर्षांत तुलनेत घटना कमी घडल्या, आयुष्यातली नव्या माणसांची संख्याही कमी झाली. पण जवळच्या लोकांचं आजारपण आणि मृत्यू यांचे दोन जबरदस्त दणके असे मिळाले की त्या स्फोटाचा परिणाम खूप मोठा ठरला. त्यामुळे या ५ वर्षांत ६० वर्षं जगून झाले. म्हणजे आत्ता तू एकुणात २०० वर्षं आयुष्य जगलेली बाई आहेस.
माणूस जास्तीत जास्त ८० वर्षांचं आयुष्य 'सहन' करू शकतो; किंवा तितकंच त्याला जास्तीत जास्त पेलू शकतं. कुणी अधिकच चिवट असेल तर अजून ५ वर्षं धरू, मात्र या काळात त्याच्या शरीराने दगा द्यायला वेगाने सुरुवात केलेली असते. अनुकूल गोष्टींचं प्रमाण आणि प्रतिकूल गोष्टींचं प्रमाण योग्य असेल तर सहनशीलता चांगली टिकते. अनुकुलता फार वाढल्या तर जगण्यावर मेद चढतो आणि प्रतिकूलता फार वाढल्या, तर कुपोषण होतं.
निष्कर्ष : तू जरा जास्तच तग धरला आहेस. वेग मात्र खूप घसरतो आहे. अजून ५ ते ६ वर्षं अशीच व्यग्रतेने जगलीस तर अजून ५० वर्षांचं आयुष्य जगशील; मग मेंदू फुटून मरशील किंवा देवाला दया आली तर एखाद्या अपघातात जाशील. वयाच्या ५५ पर्यंत तुझा ताळा होणार.
जेवढ्याला तेवढं जगतात लोक किंवा सहसा कमीच जगतात जास्त लोक. उदाहरणार्थ मी. माझ्या आयुष्याचं असं गणित करून पाहिलं तर, मी माझ्या ६१ वर्षांच्या आयुष्यात केवळ ७ वर्षं जगलेलो आहे.
.....
मी विचारलं, “तू गणित करतोहेस की भविष्य सांगतोहेस?”
म्हणाला, “गणितच करतोय. त्यावरून हे अंदाज बांधले.”
म्हटलं, “या उचापती करून आणि असले निष्कर्ष काढून काय उपयोग?”
म्हणे, “उरलेलं जगायला मदत होऊ शकते. काही राहिलं असेल तर करून घेता येईल तुला.”
“राहिलेलं काय असतं?” ...मला किंचित हसू आलं. मी म्हटलं, “काही राहिलेलं नाही. ‘आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा’ म्हणतात, तसं व्हावं इतका आता कशात जीव अडकलेला नाही. जिवंत आहे तोवर करायच्या गोष्टी खूप आहेत; मात्र अमुक एक गोष्ट करण्यासाठी जगलंच पाहिजे, असं काही शिल्लक नाही. त्यामुळे काही करायचं ‘राहिलेलं’ आहे, असं वाटत नाही.”
तो शांत बसला... यावरून अजून एखादं नवं गणित त्याला सुचत असावं... मला नवी कविता सुचते तसंच.
मग मी त्याच्या अधुऱ्या गणिताचा कागद माझ्या अधुऱ्या कवितांच्या डायरीत ठेवून दिला शांतपणे. डायरीत काही जुनी प्रेमपत्रंही ठेवलेली होती... ती अजून एकदा वाचली. जुनी प्रेमपत्रं वाचणं फार आनंदाचं असतं. काही क्षण आपण किती जिवंत आणि रसरशीत जगलो, हे पाहून स्वतःच चकित व्हायला होतं. इतकं रंगांनी भरलेलं, मोहक आणि देखणं प्रेम आपल्या वाट्याला पडलं होतं हे पाहून स्वतःचाच हेवा वाटू लागतो. स्वतःला दुसर्याच्या नजरेनं पाहणं, दुसर्याला आतून-बाहेरून ओळखीचं करून घेणं... कोणतेही प्रश्न विनासंकोच विचारता येणं, तुटण्या-बिनसण्याची धास्ती वाटू नये इतका अतोनात व सार्थ विश्वास एकमेकांवर असणं... हे सारं आनंदाचंच. कृतज्ञ वाटतं की असं प्रेम आपल्याला कल्पनेत, कवितेत नव्हे, तर प्रत्यक्षात लाभलं होतं. मग त्या प्रेमपत्रांना 'जुनी' म्हणवत नाही, ‘आधी’ची म्हणावं फारतर.
आधीच्या वर्षांच्या डायऱ्यांच्या चवडीवर आता 2017 सालची डायरी ठेवून देईन. मग 2018 सालच्या नव्या कोऱ्या डायरीवर प्रथम एखादी कवितेची ओळ लिहीन, मग नव्या वर्षाचा हिशेब सुरू होईल... कामं, लिहिणं आणि अर्थात जगणं!
जुन्याविषयी कृतज्ञता आणि नव्याचं स्वागत!
‘चालू वर्तमानकाळ’ सदरातील याआधीचे ब्लॉग :
चालू वर्तमानकाळ (19) : रोशनी रोशनाई में डूबी न हो...
चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या
चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही...
चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये!
चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं
चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन
चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’
चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं
चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर
चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड
चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे
चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं
चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं
चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या
चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात…
चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…
चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत
चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!
चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब
चालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Dec 2017 08:00 AM (IST)
आधीच्या वर्षांच्या डायऱ्यांच्या चवडीवर आता १९१७ सालची डायरी ठेवून देईन. मग १९१८ सालच्या नव्या कोऱ्या डायरीवर प्रथम एखादी कवितेची ओळ लिहीन, मग नव्या वर्षाचा हिशेब सुरू होईल... कामं, लिहिणं आणि अर्थात जगणं!
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -