कमल देसाईंची ‘हॅट घातलेली बाई’ नावाची एक सुंदर, लहानगी कादंबरी आहे. मी ती अनेकदा वाचत असते. पुस्तक हरवलं कधी, तर पुन्हा घेते; पण अधूनमधून वाचत राहिलंच पाहिजे असं ते पुस्तक आहे. त्यात अजून एक अशीच लहान कादंबरी आहे – ‘काळा सूर्य.’ दोन्हीही सकाळीच आठवण्याचं यावेळचं कारण म्हणजे ‘सूटस्टुडिओ’ नावाच्या एका कंपनीच्या देखण्या व वेगळ्या जाहिराती. त्या खरंतर अभिजात वाटाव्यात अशाच आहेत, पण पारंपरिक लोकांच्या डोक्यात जाणाऱ्या असल्याने त्यांना भडक, चीप वगैरेही वाटू शकतात. अश्लीलता कलाकृतीत नव्हे, तर  ज्याच्यात्याच्या वा जिच्यातिच्या नजरेत असते, असं म्हणतात; तसंच हे. जाहिरात ही पासष्टावी कला मानली गेली आहेच, त्यामुळे एखाद्या उत्कृष्ट जाहिरातीला कलाकृती म्हणण्यातही काही वावगं वाटू नयेच. तर या जाहिरातींमध्ये काय आहे? त्या ‘सूट’च्या जाहिराती आहेत हे खरं, पण ‘सूट’खेरीज ‘खास’ काय आहे त्यांच्यात की, इतकी चर्चा व्हावी?




आपल्याकडे अनेक जाहिरातींचं हे वैशिष्ट्य असतं की बराचवेळ, म्हणजे अगदी शेवटी सस्पेन्स उलगडावा तसं, त्या नेमक्या कशाच्या आहेत हे समजतच नाहीत. शर्टची वाटणारी जाहिरात परफ्युम्सची निघते, पर्यटन कंपनीची वाटणारी जाहिरात टायर्सची निघते आणि कॉन्डोम्सच्या आहेत असं वाटणाऱ्या अनेक जाहिराती तर कपडे, वॉशिंग मशीन्स, खाद्यपदार्थ, मोबाइल, घड्याळ अशा कशाच्याही असू शकतात... त्यात कमी कपडे घातलेली सेक्सी मॉडेल वा अनेक सेक्सी मॉडेल्सचा घोळका जरी दिसला तरी त्यावर जाऊ नये, कारण विक्रीविषय काहीही असो, त्यात बाई हवीच असते. ग्राहक केवळ पुरुष असतो, कारण कमावता असो-नसो घरच्या आर्थिक नाड्या त्याच्या हातात असतात, बायकांनी खरेदी केली तरी बिलं भरणारा तोच असतो अशी गृहितकं जोवर प्रचलित होती – आहेत तोवर पुरुषांसाठी ‘आकर्षक वस्तू’ म्हणून कोणत्याही जाहिरातीत स्त्रीचा वापर केला जाणं हे कितीही टीका, टिंगल झाली तरी जाहिरातविश्वाने निर्ढावून ठरवून टाकलेलं होतं. काळ बदलला तशी या पासष्टाव्या कलेची अशी जुनी गणितं बदलू लागली.



खास पुरुषांसाठीची सौंदर्यप्रसाधनं बाजारात येण्यास सुरुवात झाली, हे जाहिरातविश्वासाठीचं वेगळं आव्हान होतं. पुरुषांसाठीचे फेसपावडर, पुरुषांनी गोरं दिसण्यासाठीची क्रीम्स, पुरुषांसाठी खास ‘हिरॉईन्स’चा मक्ता सांगणारे लक्ससारखे ‘हिरो’ साबण यांची रेलचेल बाजारात वाढली. सौंदर्याचा मक्ता बायकांकडे आणि पुरुष फक्त शूरवीर, कर्तृत्ववान असले तरी पुरतं अशा विचारांची उलथापालथ झाली. पुरुषांच्या कपड्यांचे मोजके रंग जाऊन तिथंही इंद्रधनुष्यं झळकू लागली. इथं पुरुषांना ‘तू देखणा दिसतोस’ हे सांगायला पुन्हा बायका हव्या होत्याच. पण त्यातही आमची प्रॉडक्टस् वापरली तर बायका तुमच्याकडे पाहतील, वश होतील असंच सांगितलं होतं. म्हणजे बायकांचा ‘अप्सरा मोड’ बदलला जाण्याची विशेष चिन्हं दिसत नव्हतीच. अगदी सुटाबुटातल्या उच्च अधिकारी स्त्रिया हिऱ्यांच्या जाहिरातीत दाखवून देखील त्यांना ठसठशीत दागिनेच कसे आवडतात, अशा साचेबंद कल्पनाच लादल्या जात होत्या; त्यात प्रत्यक्षात अशा उच्चपदस्थ स्त्रिया नेमके कसे कपडे / दागिने वापरतात याचं सर्वेक्षण करण्याची आवश्यकता जाहिरात कंपन्यांना वाटली नव्हतीच.



या सगळ्याला सध्या एक जोरदार धक्का दिला आहे, तो ‘सूटसप्लाय’ या कपडय़ांच्या आंतरराष्ट्रीय ब्रॅन्डने. या कंपनीने न्यूयॉर्कमध्ये ‘सूटस्टुडिओ’ नावाचा वेगळा विभाग सुरू  करताना ज्या जाहिराती केल्या आहेत, त्या सध्या प्रचंड चर्चेत आहेत. यात ग्राहक आहेत स्त्रिया. स्त्रियांचे सूट ही या विभागाची खासियत. त्यासाठी वापरलेल्या देखण्या काळ्या मॉडेल्स पाहूनच मला उगाच ‘काळा सूर्य’ ही प्रतिमा आठवलेली. बाकी कादंबरीचा इथं संदर्भ नाही. हे कपडे बायकी धाटणीचे नाहीत... म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कितीही अंगभर असलेले रेडीमेड कपडे बहुतांशवेळा स्त्रीदेहाची वळणं – वळसे, उभार आणि खाचाखळगे नीट कळतील असे घट्टमुट्ट असतात. अगदी किती ओढण्याबिढण्या पांघरल्या तरी तमाम मॉडेल्सच्या स्तनांमधल्या मदनघळ्या दिसणं अत्यावश्यक मानलं जातं. तुम्ही लाख ग्राहक असाल, पण आमच्या दृष्टीने पुरुषांसाठी उपयुक्त असलेली एक वस्तूच आहात हे अशा असंख्य लहानमोठ्या गोष्टींमधून सूचित केलं जातं. पण ‘सूटस्टुडिओ’ची नवी रेंज याला अपवाद आहे. तिच्या जाहिरातींची टॅगलाईन आहे : ‘नॉट ड्रेसिंग मेन.’



यात खास स्त्रियांसाठी डिझाईन केलेले शर्टस, ट्राउझर्स, जॅकेट्स, कोट इत्यादी आहेत. ते परिधान केलेल्या बहुतांश उंच, सडपातळ काळ्या मॉडेल्स आहेत; क्वचित एखादी व्हाईट. त्यांच्या चेहऱ्यावर फक्त निर्विकारपणा आहे. देहबोलीतून प्रचंड आत्मविश्वास झळकतो आहे. उंच फ्रेंच विंडोजमधून दिसणारं उजळ निळे महानगर, अलीकडे प्रशस्त करडे सोफे, त्यावर उशा आणि देखणी फर, उन्हाच्या तुकड्यांनी चढती सकाळ दाखवणारं वुडन फ्लोअरिंग आणि यात एक जिवंत वस्तू असावी तसा देखण्या बांधेसूद देहाचा नग्न पुरुष... नर म्हणा! “पुरुषांचे नग्न देह कुरूप दिसतात, म्हणून बिछान्यात बायका डोळे मिटून घेतात,” असे कुबट डायलॉग मारणाऱ्यांनी एकदा तरी या जाहिरातींमधले ग्रीक पुतळ्यासारखे दिसणारे सुंदर मधाळ रंगाचे पुरुषदेह पाहावेतच. यात या पुरुषांचे चेहरे जवळपास दिसतच नाहीत. एक तर पालथा निजलेला आहे सरळ. ते पाहून चाळवायला होत नाही... सगळी नग्नता पोर्न नसते हे इथंच साबीत होतं. अगदी एका छायाचित्रात तर ती मॉडेल शांतपणे आपला एक पाय, सँडलसह त्या पुरुषाच्या गुप्तांगावर ठेवून सोफ्याच्या पाठीवर बसली आहे; तेही अश्लील वगैरे वाटत नाही.

आता पुरुषदेहाचा असा ‘देखणी वस्तू’ म्हणून जाहिरातीत वापर करावा की करू नये, हा मुद्दा वादाचा आहे. वाद झाले तरी स्त्रीदेहांचं वस्तूकरण थांबलं नाही, कारण बाजाराचा रेटाच तितका होता; त्यामुळे हेही थांबेल असं चिन्ह दिसत नाही. बाकी चर्चा सुरू आहेत, राहतील, राहोत!

चालू वर्तमानकाळ’ सदरातील याआधीचे ब्लॉग –

चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड

चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे

चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं

चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं

चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या

चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात…

चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…

चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत

चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!

चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब