बारा वर्षांची मुलगी संस्थेत आणलेली होती. पाच महिन्यांची गरोदर. तिच्या बापानंच तिच्यावर बलात्कार केला होता. आई म्हणत होती की, “या मुलीची तर पाळीही सुरू झाली नव्हती, त्यामुळे तिला इतक्या लवकर काही माहिती द्यावी, सुरक्षा-काळजी याविषयी सांगावं असं वाटलं नाही. मी कामावर जायचे, तेव्हा ती एकटी घरात नाही – रात्रपाळी करून आलेले वडील घरात असतात हे उलट सुरक्षित वाटायचं.”
आईला काम सोडून चालणार नव्हतं. केस दीर्घकाळ चालणार, तर आरोपी आणि फिर्यादी यांनी एकाच घरात राहणं उचित नव्हतं. म्हणून मुलीची रवानगी न्यायालयाने संस्थेत केलेली. तिच्या बापाचा गिल्ट वाढत गेला, समाजात वावरण्याची हिंमत ओहोटली आणि त्यानं दोनेक महिन्यांतच आत्महत्या केली. संस्थेत अजून काही कुमारीमाता होत्या, फसवलेल्या विधवामाताही होत्या. डॉक्टरांनी तिला हळूहळू सगळी वैद्यकीय माहिती दिली. तिचा आहार, औषधं यांची काळजी घेतली जात होती. तिला रात्री भयानक स्वप्नं पडायची आणि ती किंचाळत जागी व्हायची, त्याचं प्रमाणही कमी होऊ लागलं. इतक्या लहान मुलीची डिलिव्हरी करणं हे डॉक्टरांपुढचं मोठं आव्हानच होतं. प्रचंड ताणात त्यांनी डिलिव्हरी केली. ग्लानीत असलेल्या त्या मुलीला आपल्याला बाळ झालंय हे तर कळलं... पण टाके घालायला डॉक्टर वळले तेव्हा ती किंचाळली की, “बाळ तर झालं ना... आता तू खाली काय करतोस?”

डॉक्टर क्षणभर हबकलेच. मग कमालीचे संतापले. आधीच ताण, त्यात हा आरोप. मग राग काबूत आणून त्यांनी ऑपरेशन थिएटर बाहेर थांबलेल्या संस्थाप्रमुख बाईंना आत बोलावून घेतलं. त्यांनी तिला समजावून सांगितलं आणि मग टाके घातले गेले.

इतक्या लहान वयात बलात्कारातून माता होण्याचा हा प्रसंग माझ्या कायम लक्षात राहिला; कारण अशा केसेस त्या काळात – म्हणजे साधारणत्वे दहा-बारा वर्षांपूर्वी - घडत नव्हत्या असं नाही, पण मुलींचं वय निदान १४-१५ असायचं. जवळच्या नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार, बलात्कार नवे नव्हते; मात्र वडलांकडून बलात्कार हे जास्त अस्वस्थ करणारं होतं. या दहा—पंधरा वर्षांत आपल्याकडे मुलींचं पाळी सुरू होण्याचं वय घटत चाललं आहे. बलात्कार करणाऱ्यांना तर स्त्रीच्या वयाशी काही देणंघेणंच नसतं... चार-सहा महिन्यांच्या बाळापासून ते सत्तर वर्षांच्या आजीबाईपर्यंत त्यांना बाकी स्त्री दिसतच नाही, केवळ योनी दिसते. चाईल्ड अॅब्युजच्या, बलात्काराच्या तक्रारी नोंदवण्याचं प्रमाण वाढलेलं असल्याने केसेस वाढल्या आहेत असंही वाटतंय.



मैत्रेयी पुष्पा यांच्या 'गुनाह-बेगुनाह' या कादंबरीतला एक प्रसंग आठवतो. त्यात एक वेश्या पोलीसस्टेशनमध्ये आपली कहाणी सांगत असते. ती म्हणते की, "वयाच्या तेराव्या वर्षी मी वयात आले. तेव्हा आर्इनं मला सगळं समजावून सांगितलं आणि म्हणाली की, काळजी घे. काही कमीअधिक झालं तर तुझ्या वडिलांची अब्रू जार्इल. नंतर एके दिवशी आर्इ घरात नसताना वडिलांनीच माझ्यावर बलात्कार केला. आर्इ परतल्यावर तिला मी सगळं सांगितलं, तेव्हा घरात गोंधळ माजला. सगळं शमवून आर्इनं मला सांगितलं की, याबाबत कुठेही काही बोलू-सांगू नकोस. लोकांना समजलं तर तुझ्या वडिलांची अब्रू जार्इल."

सध्या वेगाने काही बातम्या आदळताहेत आणि कोणत्याही एका घटनेचा स्थिर चित्ताने विचार करावा अशी उसंतच माणसाला मिळू नये इतका त्या घटनांचा वेग प्रचंड आहे. एक बातमी चंडीगढमध्ये केवळ दहा वर्षांच्या मुलीला मामाने केलेल्या बलात्कारामुळे गरोदर राहून मूल झाल्याची आहे. ती गरोदर आहे हे ध्यानात आलं तेव्हा साडेसात महिने झाले होते; परिणामी आई व मूल दोहोंच्या जीवाला धोका संभवत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने तिचा गर्भपात करण्याबाबतची याचिका फेटाळून लावली होती. आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच तिला नुकसान भरपाई देण्याचा विचार केला जाईल, असं चंडीगढ प्रशासनानं म्हटलं आहे; त्यावर वाद सुरू झाल्याची दुसरी बातमी पाठोपाठ आली आहे. दुसरी बातमी मुंबईतल्या १३ वर्षांच्या मुलीची आहे. तीही आता सात महिन्यांची गरोदर असल्याने तिला गर्भपाताची परवानगी मिळत नाहीये. भारतात कायद्यानुसार २० आठवड्यांच्या आतच गर्भपात करता येऊ शकतो.

लैंगिकता हा शाळेत शिकवायचा विषय नाही, असं म्हणणाऱ्या पालकांनाच आता आधी वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवावा लागणार की काय असं म्हणावं वाटतंय.



हे विचार मनात सुरू असतानाच तब्बल पंधरा वर्षं सुरू असणाऱ्या रामरहीमबाबाच्या केसचा निकाल लागल्याची बातमी आली. अत्याचाराची तक्रार करणाऱ्या दोन साध्वींना न्यायालयाकडून केवळ निकाल नव्हे, न्याय मिळाला. या दोघींनाही त्यांच्या पालकांनीच ‘संन्यास घेण्यासाठी / साधू बनण्यासाठी’ बाबाकडे पाठवलं होतं. एकीचा भाऊही तिथं व्यवस्थापक म्हणून काम करत होता, त्याचा या तक्रारीनंतर खून झाला. “आपल्यासारख्या शेकडो मुली इथं ‘सेवा’ करण्यासाठी अनेक कुटुंबांमधून पाठवल्या जातात; त्यांचं स्थान देवीचं असल्याचं दाखवलं जातं, मात्र प्रत्यक्षात वेश्या म्हणूनच वागवलं जातं. इतर पुरुषांशी तर सोडाच, पण आपसात देखील बोलण्याची त्यांना परवानगी नसते; घरीही फोन करण्यास मनाई असते...” अशी माहिती त्यांनी २००२ साली पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे लिहिली होती.

वेश्यावस्त्यांमध्ये नियमित कोवळ्या मुलींची भर पडतेच आहे. कायदे होऊनही देवदासी म्हणून मुलींचं देवाशी लग्न लावून त्यांना धार्मिक वेश्या बनवणं आजही लपूनछपून सुरूच आहे. घर, रस्ता, शाळा, धार्मिक स्थळं... कोणतीही जागा स्त्रियांसाठी सुरक्षित आहे, असं खात्रीने म्हणता येत नाही. २०१६ साली भारतात बलात्काराच्या ३४,६५१ केसेस नोंदवल्या गेल्या आहेत; न नोंदवलेल्या अजून किती असतील. अशा परिस्थितीत साध्वींना न्याय मिळणं ही थोडातरी दिलासा देणारी बातमी आहे. त्यांचा संघर्ष सोपा नव्हताच... बातमी काही तासांत शिळी होऊन विरते, केस मात्र काही वर्षं सुरू राहते... त्याविषयीचा विचार आता पुढच्या लेखात करू.

चालू वर्तमानकाळ सदरातील याआधीचे ब्लॉग -

चालू वर्तमानकाळ (२) - अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!

चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब