के. रं. शिरवाडकर सर गेल्याची बातमी समजली. मन उदास झालं आणि मग अनेक गप्पाष्टकांच्या चांगल्या आठवणी वर उसळून आल्या...

'आपले विचारविश्व' चाळतेय आता पुन्हा!

या पुस्तकाविषयी मी त्यांना मोठं, चार पानी पत्र लिहिलं होतं. नव्या पिढीचे लोक आपलं पुस्तक वाचून कळवतात, याचा केवढा आनंद वाटलेला त्यांना...

त्यात मी लिहिलेलं :

‘आपले विचारविश्व’ हे प्राचार्य के. रं. शिरवाडकर यांचे नवे पुस्तक हाती आले, तेव्हा नेहमीप्रमाणे आधी थोडे चाळून पाहू आणि मग सवडीने निवांत वाचू, असा विचार केला. मात्र एखाद्या उत्तम कलाकृतीत सहज स्वाभाविकपणे गुंगून जावे, तसे मी सुरुवातीची सत्तरेक पाने दिवसभरात सलग वाचली. जेवण तर राहिलेच, पण दिवसभराची आखलेली सगळी कामे बाजूला पडली… आणि संध्याकाळी ध्यानात आले की पुस्तक वाचून संपेपर्यंत आता हे असेच होणार! पण तक्रार नव्हतीच, कारण असे अगदी क्वचित घडते. थोडक्यात, हे पुस्तक म्हणजे माझ्यासारख्यांसाठी एक ‘दुर्मीळ घटना’च आहे!

प्रस्तावना वाचताच ध्यानात आले की एकंदरीतच वैचारिक आळसाच्या काळात आलेले, करकचून चिमटा घेऊन जागे करणारे हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. ते जड नाही, हे त्याचे सगळ्यात सोपे वैशिष्ट्य. ते विविध विचारधारांची माहिती देते, तुलना मांडते, निष्कर्ष सांगते, हे आहेच; पण मला ते भावले याचे मुख्य कारण म्हणजे ते ‘आज’पासून आणि ‘समाजा’पासून कुठेही तुटलेले नाही. सारे धागे वर्तमानाशी, सद्यःपरिस्थितीशी जोडून घेणे; त्याकडे गांभीर्याने, तरीही साधेपणाने पाहणे; एखाद्या विचाराविषयी वा विचारवंताविषयी अधिक आपुलकी वा जवळीक वाटली तरीही (प्रभावात आल्याने) कुणाला झुकते माप न देणे; रसिक अभ्यासकाच्या अलिप्त संवेदनशीलतेने विविध विचारांचा आस्वाद घेणे; कधी मिस्कीलपणे, तर कधी किंचित उपरोधाचा आधार घेत इतरांची व स्वतःचीही भाष्ये नोंदवणे; हे सारे फार चांगले साधले आहे.

कोणत्याही विषयाची माहिती वरवर गोळा करायची, ती सखोल असल्याचा भाषिक आभास तयार करायचा, तिला चाटमसाला लावून चटपटीत करायचे आणि मग स्वतःला तज्ज्ञ म्हणून जाहीर करायचे – ही सध्याची फॅशन पाहता; या पुस्तकाचे स्वाभाविक वेगळेपण लगेच ध्यानात येते. एकेक वाक्य इतके तोलून लिहिले गेलेले आणि अर्कस्वरूप आहे की काहीही गाळून वा ओलांडून पुढे सरकणे अशक्य व्हावे. हे पुस्तक वाचताना शॉर्टकट वापरताच येत नाहीत. उत्तम कवितेतला एखादा शब्द जरी बदलला गेला, तर सारी कविता बदलते, तशी चिरेबंद काळजी इथे दिसते. अखेर विचारांचा किल्लाच आहे हा. दौलताबादच्या किल्ल्यासारखा भुईकोट आणि अनेक खर्‍या व आभासी दरवाजांनी विशेष बनलेला!



“विचार हा शब्द मी खूपवेळा वापरते, पण प्रत्यक्षात त्या भावना असतात आणि मी विचार करत नाही, तर भावना करते,” हे ध्यानात आले तेव्हापासून मला या विषयामध्ये रस निर्माण झाला. ऋग्वेद तर मला फार आवडला होता, कारण त्यातले सृष्टिविषयक संदर्भ. पुढे घरातल्या वैचारिकतेनुसार घरात जी पुस्तकं होती तीच वाचली गेली. त्यामुळे सावरकर मी फारच उशिरानं वाचले. संतसाहित्य काय किंवा इतर समाजशास्त्र-मानसशास्त्र-अर्थशास्त्र इत्यादी विषयांची पुस्तकं काय नाकळतेपणी वाचत ( किंवा खरंतर चरत) राहिले. त्यातलं जे नकळत मनात साठून राहिलं त्याचे थोडे थोडे अर्थ आता उलगडू लागले आहेत. पण मुंबईत आल्यानंतर जगण्यातले प्राधान्यक्रम बदलले आणि पुस्तकं ही चैनीची वस्तू झाली; वाचन म्हणजे मजेची गोष्ट बनली; इतकं सगळं दैनंदिन जगणं इतरांच्या हातात गेलं. नांदेडच्या पिपल्स कॉलेजची तळघरातली लायब्ररी आणि तिच्यातली पुस्तकं आणि तिच्या अभ्यासिकेच्या खिडकीतून दिसणारी सूर्यफुलांची शेतं… सारं स्वप्नदृश्य बनून राहिलं.

आदिवासींमध्ये काम करताना अनेक विचारप्रवाहांचा फोलपणा इतक्या उघडेवाघडेपणाने समोर दिसत गेला की भांबावलेपण प्रत्येक फटीतून मनात शिरत गेलं. आदिवासींच्या विश्वउत्पत्तीच्या कथा, त्यांच्या मौखिक साहित्यातून आणि जगण्यातूनही दिसणारं तत्त्वज्ञान अचंबित करणारं होतं. या काळात माझं पुस्तकांचं वाचन शून्य होतं; पण माणसं त्यांचं जगणंमरणं आणि निसर्ग हे मात्र मी मनसोक्त वाचले. अनेक प्रश्न त्यातून मनात उगवले. एकाठिकाणी एखादा विचारप्रवाह फोल ठरतो, तरीही तो दुसरीकडचे लोक आजमावून का बघतात? एका विशिष्ट विचाराने झपाटलेली माणसं एकदम दुसर्‍या टोकाच्या विचाराची कशी बनतात? विचाराला किती जागा असते आणि कृतीला किती? विचार कृतीची पद्धतही ( रेसिपी) सांगतात का? भ्रमनिरास होऊनही त्याच विचारात (वा त्या विचारवंतात ) लोक कसे अडकतात आणि घुसमटतात? आपल्यासाठी दुसर्‍या कुणीतरी विचार करावा आणि निर्णय घ्यावेत, इतके टोकाचे वागण्याइतकी चापलूस निष्क्रियता कुठून येते? अनुयायांमुळेच विचारांची वाट कशी लागते? – असे काहीच्याबाही विस्कळीत प्रश्न, ज्यांची उत्तरे शोधण्याची सवड परिस्थितीने मला दिलीच नाही. अपुर्‍या अनुभवांमधून, भावनांमधून, उसन्या विचारांचे टेकू घेऊन चाचपडत चालणे होत राहिले. ब्र लिहिली त्या सुमारास तर शतपाद किडा आणि विचारवंत यांची गोष्ट सांगून “विचार खूप झाले, आता कृतिची गरज आहे,” असा निष्कर्ष काढून मोकळी झाले होते. दरम्यान ‘भिन्न’च्या वेळी पुन्हा वैचारिक गोंधळ सुरू झाले आणि शेतकरी आत्मह्त्यांचा अभ्यास करताना तर ‘योग्य वैचारिक मांडणीचा अभाव’ हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे, असे जाणवले. नेमक्या या टप्प्यावर हे पुस्तक हातात पडणे म्हणजे माझ्यासारख्या भावनांच्या गलबल्यात आणि वैचारिक संभ्रमात अडकून निष्क्रिय बनलेल्या बाईला खड्ड्यातून ( नव्हे कोरड्या विहिरीतून) बाहेर येता येईल, अशी आशा वाटणे आहे.

‘भिन्न’च्या दरम्यान माझी वैद्यकविज्ञान वाचायला सुरुवात झाली होती. ( त्यापूर्वी राज्य मराठी विकास संस्थेत काम करत असताना मी ‘वैद्यकग्रंथसूची’ बनवली होती.) त्यातील संशोधन, मन-मेंदू इत्यादीविषयीचे तपशील आणि नवी विचारपद्धती चक्रावून टाकणारी होती. ईश्वर, नियती अशा शब्दांच्या जागी जनुक हा शब्द ठेवला की बाकी सारे सारखेच विचार आहेत की काय असे वाटायला लागले होते. या पुस्तकात तीही शाखा असायला हवी होती असे वाटले.

अभ्यास म्हणजे काय चीज असते, हे विद्यार्थी-प्राध्यापकांना दाखवण्यासाठी जे म्युझियम नजीकच्या काळात आपल्याकडे उभारलं जाईल, त्यात हे पुस्तक पहिल्या फळीवर असेल… हे निश्चित!!
....

संवाद साधताना सरांनी कधी वयाचं अंतर जाणवू दिलं नाही. भाषाविषयक अनेक प्रश्न मी त्यांना विचारत असे आणि नव्या साहित्यातली उदाहरणे देत सर शांतपणे, सोप्या भाषेत समजावून सांगत. भाषा ही आशयाचं कवच असते, असं त्यांनी एकदा बोलताना सांगितलं होतं. आता संवाद तुटलेले असण्याच्या, कामापुरते किंवा व्यावसायिक हेतूच मनात ठेवून औपचारिक संवादाचे तुकडे शिल्लक असण्याच्या काळात शिरवाडकर सरांसोबतची ही प्रश्नोत्तरे माझ्या आठवणीतला एक विशेष कप्पा बनून राहिलेली आहेत, हे समाधानाचं आहेच. माणसं गेली तरी त्यांच्या चांगल्या आणि फक्त चांगल्याच आठवणी मागे राहणं हे किती दुर्मिळ आहे.

आदरांजली!

‘चालू वर्तमानकाळ’मधील याआधीचे ब्लॉग -

चालू वर्तमानकाळ : (31) आमचा काय संबंध!
चालू वर्तमानकाळ (31) : शेवटचा दिस गोड व्हावा
चालू वर्तमानकाळ (30) : बाई, आई, स्तनपान, चर्चा... वगैरे
चालू वर्तमानकाळ (29) : बरी या (अकलेच्या) दुष्काळे पीडा केली!   
चालू वर्तमानकाळ (28) : सुंदर, सजलेल्या, तरुण बाहुल्या
चालू वर्तमानकाळ (27) : दुसरी बाजू… तिसरी, चौथी, पाचवी बाजू वगैरे 
चालू वर्तमानकाळ (26) : द आदिवासी विल नॉट डान्स
चालू वर्तमानकाळ : 25 : कौमार्य चाचणीचा खेळ व पुरुषार्थ चाचणीचं दिव्य
चालू वर्तमानकाळ (24) : पॅनिक बटण आणि इ–संवाद वगैरे
चालू वर्तमानकाळ (23) : पितात सारे गोड हिवाळा?
चालू वर्तमानकाळ २२. लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत?
चालू वर्तमानकाळ (21) : आनंदाची गोष्ट
चालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं
चालू वर्तमानकाळ (19) : रोशनी रोशनाई में डूबी न हो… 
चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या
चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही…
चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये!
चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं
चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन
चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’  
चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं
चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर
चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड
चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे
चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं
चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं
चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या
चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात…
चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…
चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत
चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!
चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब