जगभर विविध प्रलयकथा आहेत, त्यातली ही एक कथा आहे. अरुणाचल प्रदेशातल्या गालो भाषेतल्या लोकप्रिय कथागीताची ही कथा.
जायोबोने ही पृथ्वीची लेक! ती लावण्याची देवता म्हणून ओळखली जाई. ती इतकी देखणी होती की अवघ्या विश्वात तिची कुणाशीही तुलना होऊ शकली नसती. सूर्यात देखील उष्णता आहे आणि चंद्रावर देखील डाग आहेत, मग तिला उपमा तरी कुणाची देणार? बीरो तापू हा जलदेव... त्यानं तिच्या सौंदर्याची स्तुती ऐकली. तिला विवाहाची मागणी घालण्यासाठी तो जलजगतातून पृथ्वीवर आला. जायोबोनेला प्रत्यक्ष पाहून तो तिच्या प्रेमात पडला. जायोबोने देखील त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली.
त्याच काळात पावसाचा राजकुमार दिदुकुबो देखील जायोबोनेला पाहण्यासाठी पृथ्वीवर उतरुन आला. जायोबोनेला तोही आवडला. तिला आता निर्णय घ्यायचा होता. अखेर तिनं जलादेव बीरो तापूला निवडलं आणि दिदुबुकोला धोका देऊन ती बीरो तापूसोबत जलजगतात निघून गेली.
दिदुकुबोला हे समजल्यावर तो संतापाने वेडापिसा होऊन भयानक गर्जना करू लागला. त्याच्या संतापातून सर्वदूर विजा कडाडू लागल्या. बघता बघता काळ्या ढगांनी आकाश भरून गेलं आणि पृथ्वीवर काळोख दाटला. सर्व जलाशयांवर विजा कोसळू लागल्या. विजांनी नद्यांचे मार्ग बदलले. डोह खळबळून उठले. धबधब्यांच्या धारा विखंडित झाल्या. बीरो तापूचा एकेका जागी पराजय होऊन त्याला मागे हटावं लागू लागलं.
तरीही दिदुकुबोचं समाधान होईना. त्याला जायीबोयेने आपल्याला फसवलं आहे असं वाटत होतं आणि तिचा बदला घेण्याच्या विचारांनी तो धुमसत, गर्जत नवनव्या कल्पना शोधत होता.
होथिन नावाची मुंगसाची एक जात आहे. त्या मुंगसानं दिदुकुबोला सांगितलं की दोकामुरा या विषारी झाडाची फळं दगडाने कुटून पाण्यात टाकली की मासे मरून पाण्यावर तरंगू लागतात आणि पाण्यातले बाकी सर्व जीवजंतू देखील नष्ट होऊन ते पाणी मृतवत होतं.
प्रेम गमावून निराश झालेल्या दिदुकुबोने काहीएक विचार न करता डोकामुराची फळं गोळा केली आणि बीरो तापू व जायोबोये ज्या जलस्थानी लपले होते, तिथं ती टाकली. थोड्याच वेळात पाण्यातले मासे तडफडून मरू लागले. सगळं पाणी विषारी झालं आणि बीरो तापू व जायीबोये देखील त्या विषाने तडफडून मेले. आपला बदला पूर्ण झाला म्हणून दिदुकुबो पृथ्वीवरून निघून गेला.
इकडे पृथ्वीकन्या जायोबोये आणि जलराजा बीरो तापू यांच्या विरहाने पृथ्वीवर आणि जलजगतात हाहा:कार माजला. सगळीकडे प्रलयाच्या लाटा उसळू लागल्या. सर्व नद्या आणि नद, पर्वत आणि खडक, झाडं आणि झुडुपं प्रलयात नष्ट झाली. उंचच उंच पर्वतांची शिखरं मोडून तुटून खाली कोसळू लागली. किती हरणं आपल्या हरणींपासून दुरावली. पृथ्वीवर राहणं अवघड बनून गेलं. किती प्राणी वाहून गेले, किती पक्षी लाटांनी गिळंकृत केले. पृथ्वीवर राहणं अवघड बनून गेल. कुणी जिवंत दिसेनात. चहूकडे दु:खाचा सागर तेवढा लहरत होता. जायीबोनेच्या एका चुकीने जगात प्रलय आला आणि सृष्टीचा नाश झाला.
ईशान्येकडील राज्यांमध्ये आजही दोकामुराची झाडं सापडतात. आणि अजून थोडं दूर गेलं तर लेह-लडाख भागात मृत पाण्याची सरोवरंदेखील दिसतात. एकही जीव त्या पाण्यात जगत नाही. जलजगताची तऱ्हाच या प्रलयानंतर बदलून गेली.
अरुणाचल प्रदेशातली अजून एक लोककथा आठवली...
कोणेएके काळी सूर्य आकाशात नव्हे, तर पृथ्वीवरच राहत असे. छाया ही त्याची पत्नी होती. सूर्याच्या उष्णतेने कोळपून तिचा रंग काळा पडला होता. शेवटी त्या तापाला कंटाळून ती ध्रुवप्रदेशात निघून गेली. सूर्याची मुलं यम आणि यमुनाही त्याच्यापासून दूर निघून गेली. मग सूर्याच्या तेजाचा ताप त्याच्या घराबाहेरच्या बाकीच्या लोकांना होऊ लागला. उष्णतेनं होरपळून माणसं, पशुपक्षी आजारी पडू लागले, मरू लागले. लोकांनी ईश्वराकडे सूर्याच्या तापातून वाचवण्यासाठी प्रार्थना सुरू केल्या. त्या ऐकून अखेर ब्रम्हदेवाने सूर्याला पृथ्वी सोडण्यास सांगितलं आणि आकाशात जाऊन राहण्याची आज्ञा केली. म्हणून नाइलाजाने सूर्याला पृथ्वी सोडावी लागली. आकाशात जाण्यासाठी तो अरुणाचल प्रदेशातल्या पहाडांवरूनच वर झेपावला. तरीही त्याचं मन इथंच गुंतलेलं असल्यानं त्याचे पहिले किरण प्रथम या भूमीवर पडतात.
इथल्या भाषेत सूर्य ‘तो’ नसतो, तर ‘ती’ असतो! म्हणजे स्त्रीलिंगी. इथले लोक सूर्याची पूजा करतात आणि त्याला माता किंवा आई म्हणतात. लोहित जिल्ह्यातलं डोंग नावाचं एक सुंदर आणि अगदी लहानसं गाव आहे. भारतातला सूर्याचा पहिला किरण इथं पडतो. ते तेजूपासून २०० किलोमीटरवर वालाँग सर्कलमध्ये आहे. तिथून हिमशिखरं आणि पाईनची जंगलं फार सुंदर दिसतात. चहूबाजूंनी उंच शुभ्र बर्फाचे पर्वत... पाईनची हिरव्याशार सुयांची उंच देखणी झाडं... सूर्य उगवायला लागला की, त्या बर्फाचा रंगदेखील हळूहळू बदलून जातो आणि मग सूर्यकिरणांच्या केशरी सुया त्या बर्फात उब पेरत खुपसल्या जातात.
दिरांगकडे जाताना पर्वतावरून दरीत उतरताना सोनेरी चमकणारी हिमशिखरं आणि चीडवृक्षांचं जंगल अवर्णनीय दिसत होतं. महानगरांमध्ये उंच इमारतींमुळे आकाश दिसत नाही, इथं चक्क उंच पर्वतांमुळे आकाश दिसत नव्हतं. अर्थात आकाश दिसत नसलं, तरी काही विशेष फरक पडत नव्हता, कारण पर्वतांवरही पाहण्यासारख्या पुष्कळ गोष्टी होत्या. उताराच्या रस्त्यावरून सावकाश जाताना जागोजाग दिसणारे धो धो कोसळणारे धबधबे मोजून बोटं संपतात, पण धबधबे संपत नाहीत.
इथं सूर्यास्त लवकर होत असल्याने दिरांगला सात वाजताच मध्यरात्रीसारखा गडद काळोख पसरला होता. त्यात हॉटेलजवळची नदी दिसत नसली, तरी तिचा खळखळाट ऐकू येत होता. पोटभर मोमोज आणि थुम्पा असं डिनर आटोपून, खोलीत हीटर लावून उबदार रजई पांघरून झोपून गेले. तीन वाजताचा अलार्म लावला. सकाळी लवकर उठून नदीकाठी भटकायचं होतं आणि दिरांगचा बौद्धविहारही पाहायचा होता.
सकाळी फिकट निळं निरभ्र आकाश, त्याचं निळं प्रतिबिंब लेऊन वाहणारी नदी, कोवळ्या प्रकाशात चमचम करणारी वाळू आणि अर्थातच हिरव्या रंगाच्या अगणित छटा ल्यालेली वृक्षराजी... नदीकाठी खूप वेळ शांत बसून राहिले... बौद्धविहार वेगळा पाहण्याची गरज नाही, इतकं शांत इथंच वाटत होतं.
संबंधित ब्लॉग :
घुमक्कडी : २२. त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!
घुमक्कडी (२१) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो
घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू