दिल्ली मला कधीच आवडली नाही, याचं पहिलं कारण होतं... तिथं चांदणं दिसत नाही! चांदणं का दिसत नाही, तर तिथं धूरकं असतं. धुकं या सुंदर शब्दात ‘र’ मध्येच घुसला आणि त्यानं माणसाचा श्वास तर घुसमटवून टाकलाच, खेरीज चांदण्याचा गळा घोटला. हेच धूरकं अधूनमधून देशातल्या अजून काही महानगरं आणि शहरं देखील आपल्या कब्ज्यात घेऊ लागलं. भर दुपारी, आभाळात सूर्य दिमाखात तळपत असताना देखील त्याला तुच्छ लेखत हे धूरकं अंगणात, झाडांवर, रस्त्यांवर, वाहनांवर, बुटक्या घरांवर – उंच इमारतींवर... सर्वदूर पसरून राहू लागलं. प्रदूषणाच्या चर्चा इथंही सुरू झाल्या. डॉक्टरांच्या क्लिनिकमधली रुग्णांची वर्दळ वाढली. वातावरणात करडा रंग भरून राहिला आणि माणसांना कामंधामं करावी वाटेनाशी झाली; फूटपाथवर पेंगुळलेली कुत्री अंगाचं मुटकुळं करून पडली; पक्ष्यांचे किलबिलाट मुके झाले. संध्याकाळी पाच वाजताच काळोख उतरू लागला आणि कॉलनीतले, रस्त्यांवरचे सार्वजनिक लाईट्स लवकर लावले जाण्यास सुरुवात झाली. धुरक्यापाठोपाठ मला न आवडणारी ही दुसरी गोष्ट म्हणजे हा कृत्रिम प्रकाश!

रात्री कॉलनीतले सार्वजनिक लाईट्स रोजच लावले जात, ते सुंदर काचेच्या नक्षीदार बॉक्समध्ये असत आणि इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या खिडक्यांहून थोड्या कमी उंचीच्या खांबांवर ते बॉक्स बसवलेले होते. त्यांचा मुद्दाम मंद केलेला उजेड उशिराने घरी परतणाऱ्या लोकांसाठी पुरेसा होता आणि दिवसभराच्या कामकाजाने थकून वेळेत झोपून जाऊन पहाटे उठणाऱ्या लोकांना त्रास न देणारा देखील होता. दिवाळीत, ख्रिसमसला घरोघरचे आकाशकंदील आणि दिव्यांच्या माळांची रोषनाई यांची वेगळी – रंगीत उजेडाची भर पडे काही दिवस; तीही प्रसन्न करणारी असे. पण चांगल्याचं आयुष्य कमीच असतं की काय कोण जाणे?

गेल्या काही वर्षांत हे साधे, सौम्य, सोज्ज्वळ उजेड काही लोकांना कमी दर्जाचे, अपुरे वाटू लागले. सगळ्या जगण्यातच उथळपणा, बटबटीतपणा आल्यावर एकेक क्षेत्र तो काबीज करत जाणारच. तीव्र क्षमतेचे नवे लाईट्स आणून ते दुसऱ्या मजल्याच्या उंचीवर लावण्यात आले आणि तेही प्रत्येक इमारतीवर तीन अशा मुबलक संख्येने. परिसर उजेडाने इतका भरून गेला की खिडक्यांना जाड कापडाचे, दुहेरी, गडद रंगांचे पडदे लावून देखील उजेड त्यातून झिरपून घरात नकोशा पाहुण्यासारखा घुसून ठाण मांडून बसू लागला. जे लोक निजताना झिरो बल्ब लावत, त्यांना ती गरजच राहिली नाही; त्याहून भरपूर जास्त प्रकाश बाहेरून आत येत होताच. रात्री कुणाला संडासात  जाण्यासाठी उठावं लागलं, तरी झोपेत दिव्यांची बटनं चाचपडण्याची गरज राहिली नाही. पूर्वी घरात रात्री काही तासांसाठी कृत्रिम उजेड अत्यावश्यक वाटत होता; आता कृत्रिम अंधार कुठून मिळवता येईल का असा विचार मनात वारंवार येऊ लागला. या खोटारड्या, कर्कश उजेडाने आ वासून आमच्या सुंदर, शांत, काळोख्या, गडद रात्री गिळून टाकल्या आहेत.

उजेडाचे फायदे आहेतच, नाही असं नाही. काळोखाहून माणसांना प्रकाशात सुरक्षित वाटतं हा एक मुद्दा आहे आणि प्रकाशात माणसं जास्त कामं करू शकतात, हा दुसरा मुद्दा आहे. प्रकाश उपलब्ध आहे, म्हणून लोकं दिवसाऐवजी रात्रीही कामं करू लागली आहेत. अनेक कार्यालये, कारखाने दिवसपाळी संपून न थंडावता नव्या माणसांसह रात्रपाळीतही खडखडत राहतात. माणसांची उत्पादन क्षमता त्यातून वाढते हे खरं असलं तरी या फायद्यासाठी आपण नेमकी कोणती किंमत मोजतो आहोत, याची जाणीवच आपल्याला नाही. दुष्परिणाम अनेक आहेत. माणसाचं शरीर हे काही केव्हाही सुरु करावं, कितीही वेळ सुरु ठेवावं असं यंत्र नाही. त्याला विश्रांती, झोप आवश्यक असते. नैसर्गिक काळोखात माणसाला जशी शांत झोप लागते, तशी नैसर्गिक वा कृत्रिम कोणत्याच उजेडात लागू शकत नाही. उजेडात आणि अंधारात शरीरात वेगवेगळ्या प्रक्रिया घडत असतात, बदल होत असतात आणि ही अनेक पिढ्यांची सवय असते. ती सवय मोडली, दिनक्रम बदलला, रात्र आणि दिवस यांत फरक उरला नाही वा धूसर झाला तर माणसाला अनेक शारीरिक व मानसिक विकारांचा सामना करावा लागतो.

अनुप वशिष्ट यांनी लिहिलेलं एक गीत कार्यकर्त्यांच्या ओठी कायम असतं; त्या ओळी रोजच आठवाव्यात अशी अवस्था बनलेली आहे...

शाम सहमी न हो , रात हो न डरी
भोर की आंख फिर डबडबायी न हो 


सूर्य पर बादलों का न पहरा रहे
रोशनी रोशनाई में डूबी न हो

आता सूर्यावर ढगांचा पहारा नव्हे, सत्य काळोखावर खोटारड्या उजेडाचा पहारा आहे आणि निसर्गावर माणसांनी केलेला हा अजून एक अत्याचार आहे, ज्याचं गांभीर्य अजून लोकांना किंचितही जाणवलेलं दिसत नाहीये.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कृत्रिम उजेड, रात्रीची अनावश्यक प्रमाणात होणारी विद्युत रोशनाई, सणउत्सव – सोहळे संपल्यावर देखील निष्काळजीपणाने उगाच अजून काही दिवस वा चक्क काही महिनेही राहू दिलेली रोशनाई यामुळे दरवर्षी घराबाहेरील / सार्वजनिक ठिकाणच्या कृत्रिम प्रकाशाची वाढ तीन ते सहा टक्क्यांनी होते आहे.

काही द्रष्ट्या संशोधकांच्या नजरेतून मात्र हे संकट सुटलं नाही. त्यांनी प्रकाशाच्या प्रदूषणाचा धोक्याचा इशारा दिला आहे. सायन्स अॅडव्हान्सेस या वैज्ञानिक नियतकालिकात, उपग्रहाद्वारे जमा केलेल्या माहितीच्या विश्लेषणाच्या आधारावर एक लेख प्रकाशित करण्यात आला. त्यात असं म्हटलं आहे की, पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी महत्त्वाची असलेली रात्र जगभरात नष्ट होत चालली असून रात्रीच्या कृत्रिम प्रकाशाचं प्रदूषण हे संकटाला आमंत्रण देणारं आहे. ही माहिती चिंताजनक आहे, कारण पर्यावरणासाठी हा रात्रीचा उजेड घातक आहेच, खेरीज माणसाच्या आरोग्यावर त्याचे प्रचंड विपरीत परिणाम होऊ लागलेले आहेत. सूक्ष्म जीवाणू, किडेकीटक, सरपटणारे जीव, पक्षी, प्राणी, मासे आणि अर्थात माणसं सगळ्यांचीच उत्क्रांती दिवसरात्रीचं चक्र, त्याची गती, प्रमाण यानुसार झालेली असल्याने त्यातील बदलाचे परिणाम सगळ्यांवर दिसणारच.

वनस्पतींवर देखील हे परिणाम होताहेत. त्यात नुसती झाडंझुडुपं नव्हे, धान्य देणारी पिकंही आलीच. संशोधकांच्या माहितीनुसार पृथ्वीवरच्या एकूण सजीवांपैकी निशाचर जीवांचं प्रमाणही बरंच मोठं आहे; त्यात पाठीचा कणा असलेले ३० टक्के सजीव निशाचर आहेत आणि पाठीचा कणा नसलेले ६० टक्के सजीव निशाचर आहेत. फ्रान्झ होलकर या वैज्ञानिकाच्या मते, या कृत्रिम उजेडाच्या प्रदूषणामुळे जीवसृष्टीचं सामूहिक वर्तन वेगाने बदलत जाईल आणि त्याची पुनर्रचना होऊन विविध जीवजातींत होत असलेल्या महत्वाच्या देवाणघेवाणीच्या प्रक्रिया डिस्टर्ब होतील, काही मोडतील आणि त्या साऱ्या पुन्हा नव्याने घडवण्यात अनेक आंतरिक रचना बदलून काही सजीव नष्ट होतील, तर काही सजीवांच्या अंगभूत क्षमता नष्ट वा दुबळ्या होतील. काही वनस्पतींचं निशाचर कीटकांकडून परागण होतं, ते रोखलं जाईल. काही निशाचर पशुपक्षी बिया सर्वदूर पसरवण्याचं काम करतात, ते नीट होणार नाही. पिकं, फळबागा, जंगलं या सगळ्यांवरच त्याचा विपरीत परिणाम होईल.

आपणच आपले शत्रू बनतो आहोत आणि आपली आपल्याच विरोधात लढाई सुरू होतेय... आपणच गात हे गाणं आपल्यालाच पुन:पुन्हा ऐकावं लागणार आहे...

इसलिए राह संघर्ष की हम चुनें
जिंदगी आंसुओं से नहायी न हो...
अब तमन्नाएं फिर न करें खुदकुशी
ख़्वाब पर ख़ौफ़ की चौकसी न रहे
दम न तोड़े कहीं भूख से बचपना
रोटियों के लिए अब लड़ाई न हो ॥

चालू वर्तमानकाळसदरातील याआधीचे ब्लॉग :

चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या

चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही...

चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये!

चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं

चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन

चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’  

चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं

चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर

चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड

चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे

चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं

चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं

चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या

चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात…

चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…

चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत

चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!

चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब