सोनाराच्या दुकानासमोर जे गठाई करणारे व्यक्ती बसतात ते जेव्हा चांदीच, सोन्याचं काम करतात तेव्हा त्यांचे काम करतेवेळी चांदीचा सोन्याचा काही किस जमिनीवर मातीवर पडतो, त्या संपूर्ण भागातील माती झाऱ्याद्वारे, चाळणीद्वारे धुवून परिसर अगदी आरश्या सारखा स्वच्छ करतात आणि समोर नाली असेल तर तिथे चाळणीने हजारोवेळा पाणी गाळून काही चांदीचा किस तुकडा मिळतेय काय याचा शोध घेतात ते हे सोनझरी.



यवतमाळच्या तलाव फैल भागात 5 बाय 7 च्या अरुंद खोलीत एक कुटुंब याप्रमाणे 70 च्या आसपास ही लोक राहतात. नदी, नाल्यात आणि दूषित पाण्यात उतरून हजारोवेळा गढूळ पाणी चाळणीने छाननी करून काही हातात पडते काय याचा शोध घेणारे हे सोनझरी सारंकाही दोन वेळच्या भाकरी साठी करतोय.



प्रामुख्याने सोनझरी महिलांची सकाळ पहाटे 5 वाजतापासून सुरू होते. सूर्योदयापासून सोनाराच्या दुकानासमोरचा भाग स्वच्छ करण्यापासून सुरुवात होते आणि दुपार गढूळ वाहत्या नाल्याच्या पाण्यात उतरून होते. दुपारपर्यंत लोखंडी चाळणीत झाऱ्यात रोजच्या भाकरीसाठी काही मिळते काय? याचा सतत शोध सुरू असतो. तर पुरुष मंडळी परगावी जाऊन नदीच्या संगमावर पाण्यात डुबक्या मारत मनुष्याच्या मृत्यूनंतर जी (राखड) राख पाण्यात शिरवितात त्यातून काही मिळते काय यासाठी एका लोखंडी चाळणीने तेथे काही मिळते काय यासाठी नशीब आजमावत असतात.



नदी काठी राहुटी करून राहणाऱ्यांना अनेकदा पाण्यातून रिकामे हाथाने परत यावे लागते. आज मात्र सर्वत्र लॉकडाऊन आहे. सोनाराची दुकान बंद, गठाई कामगारांचे दुकान बंद, बाहेरगावी जाणे येणे बंद, त्यामुळे लॉकडाऊनपासून दोन वेळच्या जेवणाची सोय राहिली नाही. गळ्यातळे डोरलं आणि कानातल टाप्स होते ते सारं सोनाराकडे गहाण पडलं. आता आम्ही एकच वेळ जेवतो असेही येथील चंदा मडावी या महिलेने सांगितले. सोनझरीचे हे काम केले नाही तर घर चालत नाही.त्यामुळे धोका पत्करून सोनझरी भाकरीचा शोध घेतात. जगण्याचा प्रश्न त्यांच्या समोर असल्याने आता पुढची चिंता लागली आहे, असे या भागातील विना मडावी या महिलेने सांगितले.



अशा अनेक महिला आहेत ज्यांची लहान वयातच लग्न झाली. त्यानंतर कुटुंबाची लवकरच जबाबदाऱ्या आल्या अन् सोनझरीच्या कामावर जाण्याची सुरुवात झाली. त्यांच्या अनेक पिढ्यांनी सोनझरीचे काम केले. आता मात्र नव्या दमाच्या नव्या पिढीला हे परांपरागत काम करायचे नाही त्यांना शिक्षण घ्यायचे आहे, पुढे जायचे आहे नोकरी करायची आहे. हे काम करताना नाल्याच्या गढूळ पाण्यात उतरावे लागते. त्यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्याना यांना सामोरे जावे लागते.



एवढ जोखीमेच काम करूनही यात काही उरत नाही. अस कसं जगायचं असे तरुणांचे म्हणणं आहे. या भागातील अभय मडावी याने यंदा 10 वीची परीक्षा दिली. तर श्याम मडावी याने यंदा 12 ची परीक्षा दिली आहे. त्यांना सोनझरीचे काम करायचे नाही शिक्षण घेऊन नोकरी करायची आहे. काही मुलांचे शिक्षण हे सोनझरीच्या कामकाजावर जात असल्याने मधात सुटले आहे. त्यामुळे ती मुलं आता ही सोनझरीचे काम करतात.



या समाजातील अनेक मुलींना शिक्षणाची ओढ आहे, त्या सर्वाना पुढे शिक्षण घेता यावे, अशी मनोमन इच्छा. जुन्या चालीरीतीमध्ये काळानुसार बदल झाला पाहिजे. मुलींना उच्च शिक्षण घेऊ दिले पाहिजे असे नववी शिकणाऱ्या शीतल मडावी आणि राखीचे म्हणणं आहे. दूषित गढूळ नाल्याच्या पाण्यात माती धुणे, गाळणे, सोनाराच्या दुकाना समोरचा परिसर झाडून आरश्या सारखा स्वच्छ करण्याच हे पारंपरिक काम नकोय. शिक्षण हाच प्रगतीचा पाया आहे, असेही येथील तरुण सांगतात.



यवतमाळच्या तलाव फैल परिसरात हे 70 सोनझरी लोकांचे वास्तव्य आहे. आपसात ते गोंडी भाषा बोलतात. अगदी छोट्याश्या 5 बाय 7 खोलीत राहतात. लॉकडाऊनमुळे भाकरी मिळणे बंद झाली. काही व्यक्तींनी यवतमाळच्या नगर परिषदच्या अंतर्गत घंटा गाड्यावर स्वच्छतेचे काम केले. मात्र, दोन महिने काम करून पैसे मिळाले नाही. आता लॉकडाऊनमध्ये जगण्यासाठी काय करावं? असा प्रश्न त्या सर्वांना पडलाय.