अस्मा जहांगीर यांच्या निधनाची बातमी कळल्यावर पायाखालची वाळूच सरकली. जगातील मानवाधिकार चळवळ अस्मा यांच्या रुपाने खऱ्याखुऱ्या लढवय्यी रणरागिनीला मुकली आणि मी माझी एक चांगली सहकारी अन् मैत्रीण गमावली.

मुंबईत माझ्या घरात चरखा चालवणाऱ्या महात्मा गांधीजींचं एक मोठं चित्र आहे. हे चित्र काही वर्षांपूर्वी अस्मानेच मला भेट म्हणून दिलं होतं. अस्मा जन्माने आणि नागरिकत्वाने पाकिस्तानी असली, तरी  माणुसकी, धर्मनिरपेक्षता आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य ही भारताकडून मिळालेली भेट आहे असं ती सांगायची. शांतता, मानवाधिकार आणि लोकशाहीसाठीची तिची वचनबद्धता ही राष्ट्रांच्या मानवनिर्मित सीमेच्या पलिकडची होती.

भारत आणि पाकिस्तानमधील लोकांमध्ये संवादाचं नातं निर्माण व्हावं आणि दोन्ही देशातील तणावाचे वातावरण कमी व्हावं, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पाकिस्तान-इंडिया पिपल्स फोरम फॉर पिस अँड डेमोक्रसी (PIPFPD) या संस्थेच्या त्या संस्थापक सदस्या होत्या. तिचे विचार आणि झोकून देऊन काम करण्याची तिची पद्धत नक्कीच आठवत राहील. शिवाय, मला माझी एक मेन्टॉर गमावल्याचंही दु:ख आहे.

पाकिस्तानात मानवाधिकार आयोग आणि वुमेन अॅक्शन फोरमची स्थापना करण्यात अस्मा यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. न्यायासाठीचा लढा सरकारविरोधातील असला तरी त्या निर्भिडपणे लढल्या. त्या एक सर्वोत्तम वकील होत्या. त्यांच्या लढाईचं भारतासह जगभरात कौतुक झालं.

धर्माच्या नावाने लोकांचं विभाजन करुन किंवा समाजात भेदाची भावना निर्माण करुन सत्ता मिळवू पाहणाऱ्यांना भेटण्यास अस्मा कायमच नाखुश असायच्या. खोट्या प्रतिष्ठेसाठी हत्या करणाऱ्यांविरोधात तिने अभियान चालवलं होतं. पाकिस्तानातील महिला, अल्पसंख्यांक किंवा कष्टकरी जनता कायमच अस्मा यांच्याकडे आशेने पाहायची आणि तिनेही त्यांना कधी निराश केले नाही. अस्मा यांनी कायमच धर्मनिरपेक्षता जपली, जी पाकिस्तानात अत्यंत कठीण गोष्ट आहे.

एकदा अस्मा भारतात आल्या होत्या. त्यावेळी मुंबई, पुणे आणि इतर शहरातील तिच्या बैठकींवेळी मी सोबत होतो. तिच्यासोबत पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती नासीर अस्लम झहीद होते. त्यावेळचं माझं निरीक्षण असंय की, अस्मा त्यांच्या प्रत्येक भूमिकेवर ठाम राहत आणि अत्यंत तार्किकपणे मुद्दा मांडत. त्या प्रचंड शांत स्वभावाच्या होत्या. मतभेद असणाऱ्यांवर ती क्वचितच रागावत असे.

2008 च्या मार्च महिन्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर मी अस्मा यांच्यासोबत गेलो होतो. अस्मा यांनी ‘धर्म आणि श्रद्धा यांचं स्वातंत्र्य’ यासंबंधी संयुक्त राष्ट्राची प्रतिनिधी म्हणून बाळासाहेबांची भेट घेतली. त्या भेटीवेळी अस्मा अत्यंत धाडसी भासल्या. त्यांनी बाळासाहेबांना विचारलं, “तुम्ही धर्माच्या नावावर लोकांना का चिथावता?” त्यावर बाळासाहेब म्हणाले, “मी कुणालाही चिथावत नाही. मात्र इतरांच्या चिथावणीवर फक्त प्रतिक्रिया देतो.”

बाळासाहेबांना तिने विचारलेल्या प्रश्नाबद्दल मला प्रचंड आश्चर्य वाटलं. कारण मुंबईतील एक पत्रकार म्हणून मी पाहिले होते की, इथले पत्रकार आणि सरकार बाळासाहेबांशी कसे वागायचे. त्यांना अगदी हलके-फुलके आणि साधे प्रश्न विचारायचे. त्या भेटीवेळी अस्मा यांच्याकडून मला खूप शिकायला मिळाले.

अस्मा आणि बाळासाहेबांच्या भेटीच्या फोटोने पाकिस्तानात गदारोळ झाला. मात्र आपण केवळ आपलं कर्तव्य बजावत असल्याचे अस्मा यांच्या मनात स्पष्ट होते.

त्याच दरम्यान, अस्मा या गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनाही भेटल्या. त्यांनी मोदींना धार्मिक ध्रुवीकरण आणि अल्पसंख्यांकांबद्दल अत्यंत कठीण प्रश्न विचारले. इतक्या उच्चपदस्थ व्यक्तींना कठीणात कठीण प्रश्न विचारल्याने त्या आपल्याला हुशार वाटू शकतात. पण खरंतर त्या मुळातच भयमुक्त होत्या.

अस्मा जेव्हा सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षा होत्या, त्यावेळी त्या पाकिस्तानचे सरन्यायाधीश इफ्तिकार चौधरींना पुन्हा पदावर घेण्यासाठी जी वकिलांची चळवळ उभी राहिली होती, त्याचं नेतृत्त्व अस्मा यांनी केलं होतं. अस्मा आणि त्यांची बहीण हिना गिलानी या दोघी वुमेन अॅक्शन फोरमच्या अविभाज्य भाग होत्या.

1971 साली पाकिस्तानात अय्युब खान यांचं सरकार असताना, अस्मा यांचे वडील मलिक गुलाम गिलानी यांना अटक करण्यात आली होती. एंकदरीत त्यांच्या घरातूनच तुरुंगासारख्या गोष्टींची परंपरा होती, जी अस्मा आणि हिना यांनीही अधिकारांच्या लढाईसाठी सुरु ठेवली.

यश चोप्रांच्या ‘विर-झारा’ सिनेमातील राणी मुखर्जीची ‘सामिया सिद्दिकी’ ही भूमिका अस्मा यांच्यावर आयुष्यावर आधारित होती, असं म्हटलं जातं. हा सिनेमा भारतासह पाकिस्तानातही प्रचंड गाजला होता. मला आठवतंय,‘विर-झारा’ सिनेमाच्या प्रदर्शनानंतर अस्मा काही भेटीगाठींसाठी मुंबईत आल्या असताना, बॉलिवूडमधील अनेकांना भारत-पाकिस्तान संबंधांबाबत बोलण्याची इच्छा होती.

अस्मा या स्वभावाने लाजाळू होत्या, मात्र भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध सुधारण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे हक्काने पाहिले जायचं.

(या लेखातील मते लेखकाची वैयक्तिक आहेत.)