रेस्टॉरन्टमध्ये गेल्यावर खाण्याच्या आवडत्या पदार्थांच्या यादीत इतर पदार्थांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सिझलर जोडले गेले त्यालाही आता साधारण 20 वर्षांचा काळ होऊन गेलाय. पूर्वी सिझलर ही शहरातल्या अगदी काही निवडक रेस्टॉरन्टसची स्पेशालिटी असायची आणि इतर पदार्थांच्या तुलनेत दुपटीहूनही अधिक किंमत असल्याने मेन्यूकार्डातील हा चॉईसही निवडक लोकांचाच असायचा. कधीतरी कुणी सिझलर मागवलं की चुर्रर्रर आवाज करत मोठ्या लाकडी प्लेटवर आणला जाणाऱ्या या पदार्थाकडे सगळ्या टेबलवरचे लोक वळून वळून बघायचे.



गेल्या काही वर्षात मात्र हे चित्र बदललं. एरव्ही रेस्टॉरन्टमध्ये जाऊन पंजाबी सब्जी रोटी खाणाऱ्या लोकांचा मेनकोर्सचा हमखास चॉईस सिझलर होऊ लागला. इतकंच नाही तर गेल्या काही वर्षात केवळ सिझलर सर्व्ह करणाऱ्या अनेक रेस्टॉरन्ट चेन्सही निघाल्या. मग फाऊंटर सिझलर, योको सिझलर असे ब्रॅण्ड निर्माण झाले. त्यांचे मुंबई पुण्यापाठोपाठ छोट्या शहरातही आऊटलेट्स निघाले.

पण हा सिझलर नावाचा चार पाच पदार्थांची एकत्रित खिचडी असलेला पदार्थ आला कुठून, हा प्रश्न नेहमीच पडतो. टेप्पानयाकी नावानी ओळखले जाणारे जपानी पदार्थ असे गरमागरम तव्यावर तयार करुन तसेच सर्व्ह केले जातात. वेगवगळे चार पाच भाजलेले किंवा शॅलो फ्राय केलेले पदार्थ गरम तव्यावर पुन्हा ग्रील कऱण्याची ही जपानी पद्धत आहे. साधारण दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर अमेरिकन रेस्टॉरन्टसना या ‘टेप्पानयाकी’ प्रकाराचं आकर्षण वाटू लागलं आणि त्यातूनच अमेरिकेत पहिल्यांदा सर्व्ह केलं गेलं आत्ताचं सिझलर.



अमेरिकेतल्या विविध शहरांमध्ये अल्पावधीतच सिझलर प्रचंड लोकप्रिय झालं, पण मुंबईत आणि पर्यायानं भारतात सिझलरची ओळख पहिल्यांदा खवय्यांना झाली ती 1960 च्या काळातल्या अतिशय लोकप्रिय अशा ‘द सिझलर’ नावाच्या फोर्ट भागातल्या रेस्टॉरन्टनी. साधारण 1965 साली हे रेस्टॉरन्ट सुरु झालं आणि त्यांनी सिझलरचे व्हेज आणि नॉनव्हेज प्रकार लोकांपर्यंत पोहोचवले.

आता मात्र प्रत्येक मल्टीक्युझिन रेस्टॉरन्टमध्ये सिझलर हा आवश्यक पदार्थ झालाय. अगदी एकेकाळी केवळ इडली डोशासाठी प्रसिद्ध असलेल्या उडपी रेस्टॉरन्टमध्येही एखादा सिझलरचा प्रकार असतोच. शेफ्सनीही मग त्यात नवनवीन बदल करायला सुरुवात केली, त्यामुळे सिझलरच्या सिझलिंग प्लेटवरच्या पदार्थांमध्ये वैविध्य आलं आणि वरुन ओतल्या जाणारे सॉस किंवा ग्रेव्हीमध्येही वैविध्य आलं.

चायनिज, मेक्सिकन, इंडियन अशा वेगवेगळ्या चवींचे सिझलर्स मिळू लागले आणि अनेक रेस्टॉरन्ट्स त्यांच्या सिझलर्ससाठी नाव कमाऊ लागले. अशाच सिझलरसाठी प्रसिद्ध असलेल्या पूर्व उपनगरातलं रेस्टॉरन्ट म्हणजे फुड स्टुडियो. मुलुंड पूर्व आणि वाशी अशा फुड स्टुडियोच्या दोन शाखा आहेत आणि दोन्हीकडे खवय्ये गर्दी करतात ते त्यांच्या सिझलर्ससाठीच.



अगदी पंधरा वर्षापूर्वी खाल्लेलं सिझलर आठवण्याचा प्रयत्न केला तर आठवतं ते लाकडी गोलाकार प्लेटला जोडलेली त्याच्या आतली लोखंडी प्लेट आणि त्या प्लेटवरचं एक आकाराने मोठं पॅटीस,स्टफ केलेले टोमॅटो आणि शिमला मिर्ची, राईस आणि फ्रेंच फ्राईज. पण फुड स्टुडियोत मात्र हा सिझलरचा पारंपारिक प्रकार बदलून सिझलरही मेक टू ऑर्डर करुन मिळतं. म्हणजे आपण ऑर्डर करतो त्या सिझलिंग प्लेटवरचा प्रत्येक पदार्थ काय असेल हे आपणच ठरवायचं.

सर्वात आधी व्हेज, चिकन, लॅम्ब किंवा सीफुड यातला कुठला मुख्य पदार्थ आपल्या सिझलिंग प्लेटवर असेल ते आपण ठरवायचं,  त्यानंतर समजा व्हेज सिझलर खायचं असेल, तर पनीर स्टीक सारखे पनीरचे विविध प्रकार, पोटॅटो टिक्की, मशरुम बॉल्स यातला एक मुख्य पदार्थ निवडायचा, तुम्ही निवडलेल्या पदार्थाच्या साथीला काय चांगलं लागेल याचा विचार करुन राईस किंवा नुडल्स यापैकी एक आपणच निवडायचं.



मग वेळ येते ती सिझलर वर जी ग्रेव्ही ओतायची ती निवडण्याची पेरी पेरी, गार्लिक, माखनी, बार्बैक्यु अशा देशी विदेशी चवीच्या पाच सहा ग्रेव्हीच्या प्रकारांपैकी एक ग्रेव्ही सिलेक्ट करायची. मग सिझलरवर जे आणखी पदार्थ असतात ते ही आपणच निवडायचे फ्रेंच फ्राईज, पोटॅटो वेजेस, कॉर्न विदेशी भाज्या,टॉर्टिला चिप्स, शिजवलेले मशरुम यातलंही जे काही हवं ते आपण सांगायचं. अशी सगळी दीर्घ यादी आपल्या सिझलरसाठी दिल्यावर त्याचं एकत्रित मिश्रण जे आपल्या पुढ्यात येतं, ते मात्र जबरदस्त चवदार असतं. चिकन, मटण, सी फुड कशाचेही चाहते असोत, सिझलरबरोबर या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर मात्र फुड स्टुडियोला भेट देतातच.

फुड स्टुडियोतला सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ सिझलर आहे, तरीही काही वैशिष्ट्यपूर्ण स्टार्टर्ससाठीही ही जागा चांगलीच लोकप्रिय आहे. चारग्रील्ड पेस्तो पनीर हा तसलाच एक लोकप्रिय पदार्थ. कोळशावर ग्रील केलेले पनीर हिरव्या रंगाच्या पेस्तो सॉसबरोबरचं हे स्टार्टर नेहमीच्या स्टार्टर्सपेक्षा वेगळा ठरतो. मिनी चिजी टॅकोज हे ही एक लोकांचं आवडतं स्टार्टर. मेक्सिकन टॅकोज म्हणजे कॉर्नच्या पिठाच्या कडक पुऱ्या खरं तर आकाराने मोठ्या असतात पण इथे मात्र त्या आकाराने छोट्या छोट्या असतात आणि त्यात राजमा, चिज आणि इतर भाज्या टाकून शेवपुरीसारखा फिल दिला जातो.



मेक्सिकन गार्लिक ब्रेड हा ही एक लहान मोठ्यांना आवडणारा पदार्थ. एरव्ही आपण खातो त्या चिज गार्लिक ब्रेडवर कॉर्न, रंगीत शिमला मिर्च, सॅलड लिव्हज घालून छोटयाशा पिझ्झाची चुणूक दाखवली जाते. त्याशिवाय मेनकोर्समध्ये इतर पदार्थांबरोबरच मेन्युकार्डात दिसतं ते आशियाई पदार्थांचं बाहुल्य. आशियाईमध्ये चायनिज, जपानी, थाय पदार्थांबरोबरच फारसा चाखता न येणारा ब्रह्मदेशातला पदार्थ खॉ से ही मिळतो. खॉ से याला खरं नुडल्स आणि सूपचा मिलाफ म्हणता येईल. कोकोनट ग्रेव्हीबरोबर नुडल्स आणि त्यांच्या सोबतीने खाण्यासाठी छोट्याछोट्या वाट्यांमधून अनेक पदार्थ असा हा खॉ से. एरव्ही आपण खातो त्या गोल नुडल्सपेक्षा वेगळे फाड थाय नुडल्सही इथल्या इतके चांगले क्वचितच कुठे मिळत असतील. तितकेच चांगले इथले मोमोज किंवा डंपलिंग्सजचे प्रकार. अतिशय पातळ अशा पारीमुळे इथले मोमोज तोंडात विरघळतात.

इथले स्टार्टर्स, मेनकोर्स आणि डेझर्ट यांच्याबरोबरच युवापिढीसाठी आकर्षणाची आणखी दोन कारणं आहेत. एक तर या रेस्टॉरन्टचा रेस्टो बार किंवा स्पोर्टस बारसारखी सजावट आहे. फुटबॉल आणि क्रिकेटच्या मॅचेस बघण्यासाठी दोन मोठमोठ्या स्क्रीन्स युवापिढीला चांगल्याच खुणावतात. त्याचबरोबर इथला सुसज्ज बार काऊंटर  हे इथल्या गर्दीचं आणखी एक कारण. 500 मीटरच्या नियमामुळे अनेक ठिकाणचे मद्यपरवाने रद्द झाले आहेत, पण इथे मात्र कॉकटेल्स, मॉकटेल्सचे अनेक प्रकार मिळतात. त्यामुळे मद्यप्रेमींसाठीही फुड स्टुडियो हा एक आवडता पर्याय आहे.



बसण्याची व्यवस्थाही इथे अशाच प्रकाराने केलेली आहे की एकेका टेबलवर मोठा ग्रुप बसू शकेल. त्यामुळे मित्र मैत्रिणींच्या ग्रुपने निवांत गप्पा मारत मॉडर्न खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचा असल्यास पूर्व उपनगरातला बेस्ट पर्याय आहे फुड स्टुडियो. अर्थात रेस्टो बार असल्यानं मोठ्या आवाजातलं म्युझिक काहींना कर्कश्श वाटू शकेल. पण ती रेस्टॉरन्टची थिम असल्यानं त्याला पर्याय नाही.

संबंधित ब्लॉग

जिभेचे चोचले : 'फ' से फ्यूजन... 'फ' से फूड

जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601

जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन

जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर

जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट

जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन

जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद

जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई

 जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार

जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव

जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन

जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन

जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची

जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास

जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’

जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती

जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू

जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस

जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’

जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार

जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 

जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट