
या उडुपी संस्कृतीचे जनक म्हणजे ए रामा नायक, १९४२ साली माटुंगा स्टेशनसमोर सुरु झालेलं रामा नायक्स श्रीकृष्ण बोर्डिंग हे उपहार गृह..इमारतीच्या पहल्या मजल्यावर या उपहारगृहात पायऱ्या चढून गेल्यावर जेवणासाठी आत जाण्याची वाट बघणाऱ्यांची प्रचंड गर्दी आधी आपलं लक्ष वेघून घेते, पण त्याचबरोबर काही पाट्याही लक्ष वेधून घेतात. त्या पाट्या दिसायला आकर्षक आहेत म्हणून नाही, तर त्यांच्यावरचा मजकूर खूप महत्त्वाचा आहे म्हणून. एका पाटीवर लिहीलेलं दिसतं – ए रामा नायक यांनी १९४२ साली सुरु केलेलं हे हॉटेल आणि उडुपी स्टाईल पहिलं रेस्टॉरन्ट अशी एक पाटी, तर दुसरी पाटी आणखीच लक्षवेधक, त्यावर लिहिलेलं दिसतं की या उपहारगृहाचं उद्घाटन १९४२ साली साने गुरुजींच्या हस्ते कऱण्यात आलं, असे हे मोठी परंपरा असलेलं मुंबईतल्या सर्वात जुन्या रेस्टॉरन्टसपैकी एक रेस्टॉरन्ट आणि आजही तितकंच लोकप्रिय असलेलं ठिकाण.
प्रचंड रहदारीच्या माटुंगा स्टेशनसमोरच्या रस्त्यावरची गर्दी आणखीच वाढते ती माटुंग्यातल्या प्रसिद्ध उडुपी रेस्टॉरन्टसमुळे. या उपहारगृहांबाहेरच्या वेटींगच्या रांगांमुळे प्रचंड गोंधळ असतो या भागात. पण याला अपवाद असतो तो मात्र रामा नायक यांच्या श्रीकृष्ण बोर्डिंगचा.
इथे खरं तर सगळ्यात जास्त गर्दी असते सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी.पण सगळं कसं अगदी शिस्तबद्ध पद्धतीने चाललेलं असतं. पहिल्या मजल्यावरच्या या उपहारगृहात जाताना जिन्यावरच कितीदा तरी आपण रांगेत सहभागी होतो.पण लगेचच कुपन घेण्याची रांग कोणती ते सांगितलं जातं आपला कुपन नंबर वर लावलेल्या इलेक्ट्रॉनिक मशीनवर दिसला की त्यानंतर केळीच्या पानावर जेवायचं की साध्या ताटात या प्राधान्यानुसार दुसरी एक रांग असते आणि अक्षरश: शंभरपेक्षा जास्त लोकांच्या गर्दीतही प्रत्येकाला पंधरा ते वीस मिनिटात जेवायला मिळेल इतक्या चपळतेनं या उपहारगृहातला स्टाफ काम करत असतो. बरं जेवण डब्यात भरुन घेऊन जाणाऱ्यांचाही त्यात मोठी संख्या असते. त्यांच्यासाठी एक वेगळी रांग. अतिशय तुटपुंज्या जागेत सूचनांच्या पाट्यांच्या माध्यामातून आणि अतिशय अलर्ट स्टाफच्या माध्यमातून ही सगळी खवय्यांची गर्दी हसतमुखानं सांभाळली जाते.
अशा सगळ्या रांगा आणि सूचनांचं योग्य पालन केल्यावर आपण जेवण जिथे वाढलं जातं त्या कक्षापर्यत पोचतो..आतलं एखादं टेबल रिकामं झालं की ते स्वच्छ होईपर्यंत आपल्याला आणखी एक सूचना मिळते ती हात धुवून घेण्याची आणि मग हात धुवून टेबलवर बसलो की केळीचं स्वच्छ पान आपल्यासमोरच्या टेबलवर आंथरलं जातं..मीठ, चटणी, लोणच्यापासून सुरुवात होऊन एकेक वेटर किमान तीन तीन पदार्थ वेगानं वाढत पुढे जाऊ लागतो, आपण जिथे जेवायला बसतो तिथे प्रचंड आवाज असतो, मोठीमोठी तीन चार ताटं घेऊन एक वेटर ‘साईड साईड’ म्हणून ओरडत असतो, दुसरा एक वेटर जागा व्हावी म्हणून मोठ्याने गात असतो, तिसरा काय वाढायचं ते वेगवेगळ्या टेबलांवर जाऊन विचारत असतो अशा सगळ्या गोंधळात तीन भाज्या, पापड, दह्याची वाटी, ताक, पुऱ्या, सांबार, रस्सम आणि पायसम किंवा आपण जो ऑर्डर करु तो एक गोड पदार्थ असा सुटसुटीत मेन्यू केळीच्या पानावर अवतरतो. प्रत्येक पदार्थ एकदम परफेक्ट, पारंपरिक पद्धतीने तयार केलेला, म्हणूनच कदाचित इथे जेवणाचा आस्वाद घ्यायला येणाऱ्यांमध्ये दक्षिण भारतीय लोकांची गर्दी जास्त असते. प्रत्येक पदार्थाची चव घेताना लक्षात येतं ते दक्षिण भारतीय पद्धतीने ओल्या नारळाचा मुबलक वापर या सगळ्या पदार्थांमध्ये दिसतो, तर लसूण आणि कांद्याचा वापर मात्र टाळलेला दिसतो.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केळ्याच्या पानावरची थाळी ही अनलिमिटेड असते. त्यामुळे आपण जेवायला सुरुवात केल्यापासूनच आपण थकून नाही म्हणेपर्यंत प्रत्येक पदार्थ वाढायला वेटर येत असतात. अगदी ताकाचा ग्लासही संपला की लगेच भरला जातो. पापडापासून ते सांबार, रस्समपर्यंत सगळं हवं तेवढं खा..पुऱ्या पोळ्या खाऊन झाल्या की भाताचा आग्रह सुरु होतो. दक्षिण भारतीय चवींच्या चाहत्यांसाठी तर ही जागा म्हणजे ‘स्वर्ग’च जणू.
या सगळ्या प्रचंड गर्दीच्या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते ती तिथली स्वच्छता. खरं तर एका चाळीसारख्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेलं हे उपहारगृह, पण जिन्यापासून कुठेही अस्वच्छता दिसत नाही..अगदी दर अर्धातासाला ५० – ६० लोक जेवत असले तरी पुढच्या माणसासाठी टेबल तितकंच स्वच्छ. बेसिनपासून खालच्या जमिनीपर्यंतही सगळं कसं एकदम स्वच्छ. थोडं लक्ष देऊन पाहिलं की लक्षात येतं की जातीनं सगळ्या गोष्टींचं नियोजन कऱणाऱ्या मालकापासून ते वेटरपर्यंत कुणाच्याही पायात चपला नसतात. इथल्या किचनवर तर पाटीही आहे की ज्याला इच्छा आहे ती व्यक्ती आमचं किचन आत येऊन बघू शकते, मात्र चप्पल बाहेर काढून या. त्याचबरोबर या उपहारगृहाचे मालकही इथेच जेवतात अशीही एक पाटी इथे लक्ष वेधून घेते.
जेवणानंतर दक्षिण भारतीय पद्धतीचं जरासं तिखट पानही या पारंपरिक दक्षिण भारतीय जेवणाबरोबरच खवय्यांसाठी आकर्षणाचा विषय असतो. आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे तिथली प्रत्येक व्यक्ती प्रचंड वेगात कामं करत असते, त्याचा परिणाम म्हणून की काय चवदार दक्षिण भारतीय जेवणाचा आस्वाद आपणही जरा वेगातच घेतो, कूपन विकत घेतांनाच तिथला मॅनेजर जेवण वाया न घालवण्याचा सल्लाही देतो, त्यामुळेही जाईल तेवढंच सगळे वाढून घेतात, अर्थात ते चवदार जेवण प्रत्येक जण मनसोक्त खातो यात शंका नाही... रामा नायकची थाळी तर खिशाला फारच परवडणारी त्यामुळेच दररोज इथे येऊन जेवणारे आणि महिन्याभराचे कूपन विकत घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे..अर्थात गरज म्हणून काय आणि निव्वळ दक्षिण भारतीय जेवणाचा आनंद घ्यायचा म्हणून काय उडुप्यांच्या या आद्य उपहारगृहाला प्रत्येक खवय्याने एकदा तरी भेट देऊन शिस्तबद्ध पण रुचकर जेवणाचा आनंद घ्यायलाच हवा.
संबंधित ब्लॉग
जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’