पोळपाटावर गोळा ठेवला की त्याची गोल पोळी करायला लागतं ते लाटणं, लाटण्यानेच छोटा गोल करुन पुरी होते, शंकरपाळी,  करंज्या कुठलाही पदार्थ घ्या,एकवेळ पोळपाट नसला तर चालतो, पण लाटणं मात्र भारतीयच नाही तर जगातल्या कितीतरी खाद्यसंस्कृतीतले पदार्थ करण्यासाठी महत्त्वाचं. अगदी ब्रिटीश अँपल पायसारखा पदार्थ तयार करायचा तरी गोळा आधी लाटून एकसारखं करुन घ्यावं लागतं, गोड पदार्थ किंवा मॉडर्न डेझर्टसच्या पाककृतींमध्ये तर या गोलाकार लाटण्याला फारच महत्त्व आहे, म्हणूनच की काय परळमधल्या केक, पाय, पेस्ट्री आणि चॉकलेट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या कॅफेचं नावच आहे रोलिंग पिन म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरातला अविभाज्य घटक लाटणं.



फिनिक्स आणि पॅलेडीयम हे परळमधले मॉल्स आता तरुणाईची फेवरेट हँगिंग प्लेस झालीय, खरेदीची आवड असणाऱ्यांसाठी तर तो भाग फारच महत्त्वाचा. या सगळ्याचा विचार करुनच या मॉल्सच्या बरोब्बर समोर सुरु झालंय रोलिंग पिन नावाचा हा डेझर्ट कॅफे.



दार उघडून आत गेल्याबरोबर काचेच्या शो केसमध्ये ठेवलेले केक, पेस्ट्रीज, चॉकलेट्स आणि कप केक यांचे थक्क करणारे रंग आणि आकार पाहून आपण हरखून जातो. कारण साधारणपणे लाल जांभळे, निळे असे रंग आपण खाद्यपदार्थांमध्ये कमीच बघतो. किंबहुना बघतच नाही..असं असताना रांगेत निळी किंवा जांभळ्या रंगाची आणि तितक्याच वेगळ्या आकाराची पेस्ट्री दिसल्यावर खाणं तर दूरच पण कितीतरी वेळ ती पेस्ट्री बघण्यात घालवतो आपण..



मध्येच कुठेतरी छोट्या नावेच्या आकाराचं चॉकलेट पाय दिसतं आणि त्या बोटीला चॉकलेटचं शिड. एका शोकेसमध्ये तर चक्क चॉकलेटचा सॅंडल आणि चॉकलेटची पर्स असेही प्रकार सजवून ठेवलेले दिसतात,तेव्हा मात्र ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ची आठवण झाल्यावाचून रहात नाही.



सप्तरंगी रेनबो पेस्ट्री दिसायला जितकी आकर्षक तितकीच चवीलाही जबरदस्त,खरोखर सात वेगवेगळ्या चवींचा एका घासात अनुभव देणारी. त्याचबरोबर टार्ट्सचे कितीतरी कधीही न ऐकलेले प्रकार इथे मिळतात. टार्ट म्हणजे खालून बिस्कीटासारखा कडक आणि वाटीसारखा खोलगट प्रकार, त्यातल्या त्या वाटीसारख्या खोलगट भागात ज्या फ्लेवरचा टार्ट असेल त्याचं सिरप आणि फोडी टाकूल सजवलेलं असतं.



एपल टार्ट, चॉकलेट टार्ट, लेमन टार्ट, फ्रुट टार्ट असे कितीतरी टार्टचे प्रकार आणि हो आकारही इथे मिळतात.

काही पेस्ट्री आणि मूस तर भन्नाटच बघितले इथे. रेड व्हेलव्हेट मूस नावाचा लाल रंगाचा गोलाकार पदार्थ –छोटा केक किंवा मोठी गोल पेस्ट्री म्हणून खपेल असा, पण त्यात एका बाजपला चक्क शाई काढायला वापरतो ते ड्रॉपर खोचलेलं. त्या ड्रॉपरमध्ये रेड व्हेलव्हेट सॉस होता आणि त्या पेस्ट्रीमध्ये त्याचा थेंबथेंब पडत होता. हा प्रकार काही निराळाच वाटला बघून. पण या सगळ्याबरोबर या रोलिंग पिनमध्ये चाखलेच पाहीजे ते म्हणजे बिस्कीटांसारखे दिसणारे मॅकरुन्स. ही मॅकरुन्स गेल्या काही वर्षातच भारतात लोकप्रिय होत आहेत.



बघितल्याबरोबर रंगीत क्रीम बिस्कीट वाटावं असा हा पदार्थ..खायलाही बिस्कीटासारखाच खुसखुशीत असतो आणि दोन मॅकरुन्समध्ये क्रीम किंवा जॅमसारखा गोड पदार्थ भरलेला असतो. पण काही युरोपियन देशात हा केकचा एक प्रकार म्हणून ओळखला जातो. त्याच्या लाल पिवळ्या, निळ्या अशा चटक रंगामुळे डेझर्टसच्या डेकोरेशनध्ये तर हे मॅकरुन्स हमखास वापरले जातात. या रोलिंग पिन कॅफेतले मॅकरुन्सदेखील दिसायला सुंदर आणि चवीलाही अगदी खुसखुशीत पण चटकन जिभेवर विरघळणारे असे, त्यामुळे रोलिंग पिनला गेलेली व्यक्ती सहसा मॅकरुन्स न खाता बाहेर पडत नाही.

बरं, डेझर्टस आणि केकबद्दलचं इतकं वर्णन ऐकून जे शाकाहारी आणि त्यातही अंडंही न शिवणारे लोक असतील त्यांना हा सगळा प्रकार आपल्यासाठी नाही असं वाटण्याची दाट शक्यता आहे. पण रोलिंग पिन कॅफे मात्र प्युअर व्हेज कॅफे आहे, अगदी केकमध्येही अंडदेखील वापरलं जात नाही, त्यामुळे ही डेझर्ट्स सर्व प्रकारचा आहार करणाऱ्यांसाठी आहे.



रोलिंग पिन ही खऱ्या अर्थाने केक आणि कॉकलेटची दुनिया आहे, कारण शोकेसमध्ये इतके केक आणि चॉकलेट्स पाहून ते चाखल्यावर पुन्हा मेन्यूकार्डातही चॉकलेटचे आणखीच भन्नाट पदार्थ..थेट चॉकलेट पिझ्झा, चॉकलेट सॅंडविच आणि चॉकलेट बर्गर..इतक्या चॉकलेटच्या चॉकलेटी बेतावर मात्र चॉकलेटचा आकंठ चाहताच ताव मारु शकतो.. बरं हे कमी म्हणून की काय चॉकलेटच्या फ्लेवरची वेगवेगळी मिल्कशेक्स आहेतच, पण त्याबरोबरच चॉकलेट लव्हर्ससाठी चॉकलेट वॅफल्सचाही पर्याय आहे.

रोलिंग पिनला गेल्यावर गोड पदार्थांचा जसा मनसोक्त आनंद घेता येतो, तशीच ही जागा आपल्याला अत्यंत आकर्षक डेझर्ट्सच्या माध्यमातून एक व्हिज्युअल ट्रिट देते..ही वैविध्यपूर्ण डेझर्टस तयार होताना बघणं ही आणखी एक वेगळ्या प्रकारची व्हिज्युअल ट्रिट. रोलिंग पिनला पूर्णपणे ओपन किचन असल्यानं टेबलवर बसून प्रत्येकच पदार्थ तयार होताना बघता येतो..पण त्यातही केकवरची कलाकुसर किंवा चॉकलेटला नविन आकार देताना बघण्यात एक वेगळीच गंमत असते.

नावात कॅफे आहे आणि स्पोशालिटी डेझर्टस आहेत त्यामुळे इतर पदार्थ मिळत नसतील तर पोट कसं भरायचं असा प्रश्नही पडायचं कारण नाही कारण सिझलर, बर्गर, पास्ता, मॅक आणि चिज, सॅण्डविचेस असा भरगच्च मेन्यू आहे रोलिंग पिनच्या मेन्यू  कार्डात. पण त्यातही प्रसिद्ध आहेत ते इथले चित्रविचित्र बर्गर्स..वन पाऊंड बर्गर नावाचा एक बर्गरचा प्रकार ऑर्डर केला की मेन्यूकार्डातील त्याचं डिस्क्रीप्शन पाहून वाटतं की वेगवेगळ्या प्रकारचे बर्गर आपल्यापुढे आणून ठेवले जाणार. प्रत्यक्षात येतातही तीन बर्गर पण वेगवेगळे नाहीत तर एकावर एक रचलेले आणि मधोमध बर्गर टूथपिकच्या ऐवजी थेट चाकू घुसवून ते तीन बर्गर एकत्र केलेले, असा जायंट बर्गर खाणं म्हणजे एक कसरत ठरते, पण चवींचा ब्लास्ट मात्र एकदम परफेक्ट.



या वन पाऊंड बर्गरपेक्षाही वेगळा अख्ख्या मुंबईत कुठे मिळणार नाही असा चारकोल ब्लॅक बर्गर..पिवळसर ब्रेडचा बर्गर बन बघण्याची आपल्याला एरव्हीची सवय, ब्राऊन ब्रेडचा असेल तर  ब्राऊन दिसणारा ब्रेड दिसतो.. पण काळाकुट्ट बर्गर बन तो ही खरोखरच चारकोलच्या म्हणजेच कोळशाच्या चवीचा..बरं हा काळ बर्गर चवीलाही फार चांगला लागतो..साखर किंवा गोड पदार्थ न घालता केलेला केक असावा असा लुसलुशीत लागतो हा काळा बर्गर बन. स्वयंपाकातला एखादा पदार्थ पार बिघडला आणि जळला की ‘कोळसा झाला’ असं म्हणायची पद्धत आहे. पण रोलिंग पिनचा चारकोल बर्गर खाल्ला की कोळसा झाला म्हणायची पद्धत बदलावी लागणार असं वाटून जातं..बटाटे ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी तर पोटॅटो मॅनिया नावाचा एक वेगळा सेक्शनच आहे इथे, फ्रेंच फ्राईज, वेजेस, बेक केलेले बटाटे असे सगळ्या प्रकारचे बटाटे, हव्या त्या टॉपिंगबरोबर मिक्स आणि मॅच करुन खाता येतं इथे.



रोलिंग पिनच्या नावात कॅफे आहे म्हटल्यावर कॉफी, चहा, मिल्कशेक्स, ज्यूस यांचीही मोठी यादी असणार यात शंकाच नाही, पण त्यातही सगळ्यात वेगळ्या प्रकारची आहे ती कॉफीमधली विविधता..कॉफीप्रेमींनी एकदा तरी टेस्ट करावीच असे कॉफीचे उंची प्रकार इथे उपलब्ध आहेत..महिलांचे नेलपेण्टस किंवा लिपस्टीक्स कसे एखाद्या बॉक्समध्ये आकर्षक पद्धतीने रांगेत ठेवलेले असतात सिलेक्शनसाठी, अगदी त्याचप्रकारे जगभरातल्या सर्वोत्तम कॉफीचे प्रकार छोट्याखोट्या बाटल्यांमध्ये निवडीसाठी इथे ठेवलेले आहेत, नेस्प्रेसो असं नावं दिलंय त्यांनी कॉफीच्या या प्रकाराला..चहाचेही असेच विविध प्रकार चहाप्रेमींसाठीही आहेत.



भारतीय चहात आसामचा चहा, तर विदेशी चहांमध्ये चीन आणि श्रीलंकेतल्या चहाची चव इथे चाखता येते...केक, चॉकलेट अशाप्रकारच्या बेकिंसाठी प्रसिद्ध असलेल्या या जागी सुपर मार्केटसारखा एक छोटा सेक्शन आहे, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड, पाव, टोस्ट, कप केक आणि मफिन्स विक्रीसाठी ठेवलेले असतात..इथे आलेली व्यक्ती तिकडे जाऊन एखादा तरी ताजा ब्रेड विकत घेतेच कारण सगळीकडे ताज्या ब्रेडचा घमघमाट असतो.



सरतेशेवटी रेलिंग पिन अर्थात लाटणं असं नाव असलेल्या जा रेस्टो कॅफेत बिल येतं ते लाटण्याला गुंडाळलेलं..केक पेस्ट्रीज प्रेझेंट करण्याची इथेली पद्धत वेगळी आणि आकर्षक असल्याने किमतीही जरा जास्तच आहेत..साधारणपणे केक शॉप्समधे ज्या किमती आहेत त्यांच्या तुलनेत तर इथल्या किमती चांगल्याच जास्त आहेत..पण इथले प्रकार आणि वैविध्यही इतर ठिकाणी न मिळणारं असल्यानं रसना तृप्तीबरोबरच पदार्थांच्या डेकोरेशनचं सौंदर्य बघण्यासाठी तरी एकदा इथे जायलाच हवं.

https://twitter.com/abpmajhatv/status/885700734980825088

'जिभेचे चोचले’मधील याआधीचे ब्लॉग :


जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद



 जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार


जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव


जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन


जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन


जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची


जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास


जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’


जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती


जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू


जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस


जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’


जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार


जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 


जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट