या रेस्टॉरन्टच्या नावात ‘ग्लोबल’ असलं तरी या रेस्टॉरन्टचं एशियन फ्युजन नाव ठेवावं असं मांडलेल्या मेन्यूवरुन नजर फिरवल्यावर चटकन वाटून जातं. ‘मांडलेला मेन्यू’ असं म्हणण्याचं कारण इथे खाण्याच्या पदार्थांचं मेन्यू कार्ड नाही. जे काही आहे ते सगळं मांडलेलं. त्यातही चायनिज, भारतीय, जपानी, इंडोनेशियन, थाय आणि अगदी पूर्वैकडल्या भारतीय राज्यातल्या खाद्यसंस्कृतीची झलक इथे मिळते, पण ती झलकही इथे ग्लोबल फ्युजनला ती एका अनोख्या अंदाजात. एका प्रशस्त आणि प्रचंड मोठ्या सभागृहात सुंदर ओरिएन्टल म्हणू शकतं असं डेकोरेशन प्रथमदर्शनी आपल्या नजरेत ठसतं..या सभागृहात अतिशय आकर्षक पद्धतीनं बसायची व्यवस्था केलेली आहे, प्रशस्त आणि बसायला अतिशय आरामदायक. त्या खुर्च्यांच्या सगळ्या बाजुंना एखादं प्रदर्शन वाटावं असे प्लॅस्टीकमध्ये गुडांळलेले अनेक पदार्थ मांडलेले दिसतात..जिकडे नजर जाईल तिकडे अस पदार्थांचं प्रदर्शन मांडलेलं दिसतं..
त्याजवळ गेलं की दिसतं प्रत्येक टेबलवर एकाच थीमचे आठ दहा पदार्थ सजवून ठेवलेले असतात..म्हणजे मोमोजच्या टेबलवर व्हेज, नॉनव्हेज, चिज अशा सगळ्या प्रकारचे मोमोज दिसतील. चिकनच्या टेबलवर विविध पद्धतीनं तयार केलेले चिकन स्टार्टर्सच दिसणार. मग चिकन टिक्का, तेरियाकी चिकन, ओरिएन्टल चिकन असे सगळे चिकनचे प्रकार एका टेबलवर..व्हेजच्या टेबलवर गार्लिक ब्रेड, क्रिस्पी कॉर्न, हराभरा कबाब, व्हेज सिख कबाब असे सगळे शाकाहारी स्टार्टर्स दिसतील..सी फुडच्या टेबलवर मासे, प्रॉन्स आपल्याला विविध खाद्यसंस्कृतीच्या पद्धतीने तयार केलेले दिसतात. मग बेक केलेले प्रॉन्स काय किंवा प्रॉन्स टेम्पुरा म्हणजे भज्यांसारखे तळलेले प्रॉन्स असे नेहमी न दिसणारे प्रकार दिसतात. त्यांचा डिमसम किंवा डम्पलिंग किंवा मोमो, नाव कुठलंही घ्या पण तो टेबल तर मिस करायलाच नको. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे डिमसम एकाच ठिकाणी क्वचितच दिसतील. अशा प्रकारच्या किमान सात- आठ टेबलवर मिळून ५० ते ५५ स्टार्टर्स प्रदर्शनासाठी मांडलेले दिसतात. पण खरी मजा पुढे आहे. प्रत्येक टेबलवर हे सात आठ पदार्थ एकेका प्लेटमध्ये अतिशय आकर्षक पद्धतीने मांडलेले असतात, पण प्लॅस्टीकने झाकलेले असतात आणि आपण त्या डिशमधले पदार्थ उचलायचे नसतात, उलट प्रत्येक प्लेटच्या एका बाजुला एका बाऊलमध्ये त्या पदार्थाच्या नावाच्या चिठ्ठ्या ठेवलेल्या असतात, मांडलेल्या ५० – ५५ स्टार्टर्सपैकी जे आपल्याला खावेसे वाटतात त्यांच्या शेजारच्या चिठ्ठ्या आपण उचलायच्या आणि आपल्या टेबलवर परतून वेटरकडे त्या चिठ्ठ्या द्यायच्या..मांडलेल्यापैकी अगदी कितीही स्टार्टर्स आपण मागवू शकतो..त्यानंतर आपल्या टेबलवरच्या सगळ्या चिठ्ठ्या गोळा करुन वेटर एक एक करत ते गरमागरम स्टार्टर्स आपल्यापुढे आणत जातो. इतक्या मोठ्या प्रमाणात स्टार्टर्सची व्हेरायटी मुंबईत कदाचित दुसऱ्या कुठल्याही रेस्टॉरन्टमध्ये मिळणार नाही. बरं या ५० हून अधिक स्टार्टर्सच्या जोडीला दोन व्हेज आणि दोन नॉनव्हेज सुपचे प्रकार आणि पापड, क्रिस्पी स्टार्टर्स असतातच.
पण स्टार्टर्सचा हा बुफे इथेच संपत नाही, रेस्टॉरन्टच्या अगदी मधोमध अतिशय आकर्षक गोलाकार टेबल लावलंय, त्या टेबलच्या तीनही बाजुंनी बर्फावर प्लेट्समध्ये सजवून ठेवलेला असतो इथला सगळ्यात लोकप्रिय पदार्थ ‘सुशी’. व्हेज आणि नॉन व्हेज सुशीचे अनेक अनेक प्रकार..सुशी हा जपानी पदार्थ, तिथली राष्ट्रीय डिश म्हणता येईल असा पदार्थ..व्हिनेगार टाकलेल्या चिकट भाताच्या मधोमध, भाज्या, चिकन आणि प्रामुख्याने सी फुड टाकून तो छोटासा चौकोनी किंवा गोल आकाराचा पदार्थ खाण्याची पद्धत आहे. हे सुशी दिसायला फारच आकर्षक असतात, अगदी मधोमध लाल, पिवळा, हिरव्या रांगाच्या भाज्या किंवा सीफुडचा तुकडा असतो आणि त्याच्या चारही बाजुंनी तो व्हिनेगार चवीचा राईस. सुशी हा पदार्थ थंडगार आणि भातातल्या भाज्या किंला मांस हे रॉ म्हणजे कच्चंच खाल्लं जातं. मात्र भारतीय चवींना अगदी कच्चा पदार्थ आवडत नसल्यानं, भारतात सुशी करताना मात्र आतलं मांस किंवा भाज्या किंचित शिजवल्या जातात. जपानी खाद्यसंस्कृती अजून चायनिज इतकी आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीत मुरली नसली तरी जगभरातील वेगवेगळे खाद्यपदार्थ चाखून पाहण्याची इच्छा असलेले अनेक खवय्ये आहेत, अशा खवय्यांमध्ये सुशी, जपानी स्टीकी राईस असे पदार्थ चांगलेच लोकप्रिय होऊ लागलेत. अशा खवय्यांसाठी आणि सुशीप्रेमींसाठी ग्लोबल फ्युजन ही अगदी परफेक्ट जागा आहे.
इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आशियाई स्टार्टर्सपैकी काही चाखले तरीही पोट भरतं, पण पुढे मेन कोर्सचा मोठा बुफे असतो. त्यातही नेहमीच्या पदार्थांना फाटा देत युनिक आशियाई पदार्थांचा समावेश या एशियन बुफेमध्ये दिसतो. म्हणजे नेमहमीचे हक्का नुडल्स तर असतात पण त्याबरोबर थाय करी, जपानी फ्लॅट नुडल्ससारखे मेन कोर्स पदार्थ इथे चाखता येतात.. सी फुड लव्हर्ससाठी तर स्टार्टर्सनंतर मेने कोर्सही जबरदस्त ठरतो..कारण फिश, प्रॉन्सनंतर मेन कोर्समध्ये मिळतो तो क्रॅब. त्याशिवाय वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीतल्या भाताच्या रेसिपीज हेही ग्लोबल फ्युजनच्या मेन कोर्समधलं एक आकर्षण. एशियन खाद्यपदार्थांपैकी चायनिज तर भारतात फारच लोकप्रिय झालंय, थाय करीसारखे पदार्थही बऱ्याच ठिकाणी मिळतात, पण जपानी पदार्थ मग सुशी, तेरियाकी चिकन किंवा स्टिकी राईस सगळीकडे मिळत नाहीत. त्यांची चव घ्यायची तर ‘ग्लोबल फ्युजन’ गाठायलाच हवं..
इतके सगळे प्रकार खाल्ल्यानंतर पुन्हा डेझर्टसचा अख्खा सेक्शन आपली वाट बघतच असतो. मुंग डाळ हलवा, गुलाबजाम, मावा केक अशा भारतीय चवींच्या गोड पदार्थांपासून आलमोंड केक, पिनट बटर केक, चिज केक, वेगवेगळ्या फ्लेवरच्या पेस्ट्रीज, सुफले असे सगळ्या प्रकारचे डेझर्टस इथे चाखता येतात. आईस्क्रीममध्ये तर एखादा फ्लेवर नाही थेट बास्कीन रॉबीन्स या आईस्क्रीमच्या ब्रॅण्डचा अख्खं काऊंटर आहे आईस्क्रीमच्या चाहत्यांसाठी. कुठलंही मेन्यूकार्ड नसतानाही इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे अक्षरश: शेकडो पदार्थ इथे चाखायला मिळतातच पण त्याबरोबरच ५०० मीटरच्या नियमामुळे वैतागलेल्यांसाठीही एक दिलासा आहे. कारण कॉकटेल्स आणि मॉकटेल्सचा मोठा मेन्यू इथे मद्यप्रेमींसाठी आहे..मोईतोपासून वेगवेगळे मॉकटेल्सचाही आस्वाद वेगवेगळ्या स्टार्टर्सच्या जोडीला घेता येऊ शकतो. बरं पदार्थांची इतकी व्हेरायटी असूनही हा बुफे खिशाला परवडणाराही आहे. अगदी पंचतारांकित हॉटेलच्या बुफेइतके पदार्थ असूनही म्हणजे लॅव्हिश स्प्रेड म्हणावं असा बुफे असुनही इतर बुफे थिम रेस्टॉरन्टइतकीच या बुफेची किंमत आहे. तेव्हा खास आशियाई पदार्थांचा अशा वेगळ्या पद्धतीने आस्वाद घ्यायला एकदा तरी ग्लोबल फ्युजन ला भेट द्यायलाच हवी.
सर्व फोटो : भारती सहस्रबुद्धे