अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत रेस्टॉरन्टमध्ये जाऊन जेवणं म्हणजे पंजाबी पदार्थांवर ताव मारणं असं समीकरण होतं. पंजाबी पद्धतीने केलेल्या भाज्या पनीरच्या भाज्या आणि तंदूरमधल्या रोट्या याच प्रकारचं जेवण रेस्टॉरन्टमध्ये मिळायचं, नाही म्हणायला जेवण नाही पण स्नॅक्स कॅटेगिरीमध्ये कायमच दक्षिण भारतीय पदार्थांचा पर्याय होता पण इडली, डोसे भरपेट जेवणाची जागा घेऊ शकत नसल्यानं बाहेरचं जेवण म्हंटलं की मात्र पंजाबीच. गेल्या काही वर्षात मात्र चायनिजपाठोपाठ इतरही देशी विदेशी खाद्यसंस्कृतीतले जेवणाचे पर्याय उपलब्ध झाल्यानं खास करुन युवापिढीत पंजाबी जेवणाची आणि पंजाबी खाद्यपदार्थांची क्रेढ जरा कमी झालीय असं वाटत असताना मुंबई आणि उपनगरात मात्र अचानक पंजाबी थीम रेस्टॉरन्ट मोठ्या प्रमाणात सुरु होऊ लागले आणि त्यांना प्रचंड प्रतिसादही मिळू लागलाय.. याच नव्यानं सुरु झालेल्या पंजाबी थीम रेस्टॉरन्टसपैकी लोकप्रिय होऊ लागलेलं ठाण्यातलं रेस्टॉरन्ट म्हणजे चौबारा ६०१.



पूर्णपणे हायवेच्या ढाब्याचा अनुभव देणारं नविन रेस्टॉरन्ट म्हणजे चौबारा ६०१. ओपन एयर टेरेस रेस्टॉरन्ट आहे, ढाब्यासारखं वातावरण आहे, हे गेल्या गेल्या लक्षात येतंच पण चौबारा या नावाबरोबर ६०१ का? असा प्रश्न समस्त मुंबईकरांना पडेल, पण ठाणेकरांना मात्र पडणार नाही, कारण थोडासा विचार केला की लक्षात येतं ६०१ हा ठाण्याचा पिन कोड आहे..



खरं तर ठाणे शहरात सगळी मोठी रेस्टॉरन्टस एकाच भागात एकवटली आहेत. ठाणे शहरातून जाणाऱ्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागून असलेल्या सर्विस रोडवर मोठमोठे मॉल्स आहेत तसंच ठाण्यातील नामवंत रेस्टॉरन्टही आहेत. पण चौबारा ६०१ आहे ते थेट जुन्या ठाणे शहरात. अतिशय प्रसिदध् अशा सीकेपी हॉलच्या टेरेसवर थाटलंय हे ढाबा थीमचं चौबारा ६०१.

खरं तर सीकेपी क्लब हे ठाण्यातलं एक सांस्कृतिक केंद्र. अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने ठाणेकरांचं या हॉलला कायम जाणं होतं, पण आता मात्र हॉलच्या आवारात प्रवेश केल्याबरोबर दिसते ती एक रंगबिरंगी ट्रकची प्रतिकृती..तिथूनच ढाब्याच्या थीमची सफर खऱ्या अर्थाने सुरु होते. चौथ्या मजल्यावरच्या टेरेसवर जाताना लिफ्टमध्येही या पंजाबी ढाबा थीमची छोटीशी चुणूक दिसते. कारण लिफ्टच्या आतमध्येही मस्त रंगिबेरंगी सजावट दिसते..चौथ्या मजल्यावर पोहोचल्यावर तर खरोखर पंजाबातल्या एखाद्या ढाब्यावर प्रवेश केलाय असंच वाटतं..



दर्शनी भागात एक सजवलेली सायकल, विहीरीची प्रतिकृती, भिंतीवर लटकवलेले पंजाबी ढोल, रंगीत उखळ असे पंजाबी संस्कृतीतील अविभाज्य घटक आपलं या ओपन एयर रेस्टॉरन्टमध्ये स्वागत करतात. या ओपन एयर रेस्टॉरन्टमधली एकमेव भिंत रंगीत म़डक्यांनी सजवलेली दिसते, ती भिंत तर सेल्फी आणि फोटो प्रेमींसाठी सेल्फी पॉईंट ठरावी अशीच आहे. सायकलच्या चाकांचाही फार कल्पक वापर यासजावटीत दिसतो. विहीरीचा ‘फिल’ देण्यासाठी बैलगाडीच्या चाकाचाही वापर अगदी छान केलाय.



या ठिकाणाबद्दल महत्त्वाचं म्हणजे हे रेस्टॉरन्ट ओपन एयर टेरेस रेस्टॉरन्ट आहे त्यामुळे केवळ संध्याकाळीच सुरु असतं..इथली बैठक व्यवस्थाही अगदी एखाद्या ढाब्याला साजेशीच आहे.. गच्चीच्या दोन्ही कठड्यांना लागून छोटे छोटे शामियाने उभारलेत..आणि त्या शामियान्यात मस्त आरामदायक अशी भारतीय बैठक व्यवस्था.. आठ- दहा जणांचा ग्रुप आरामात या शामियान्यात बसून जेवणाचा आनंद घेऊ शकतो. दोन जणांची बसण्याची व्यवस्था तर आणखीच वैशिष्ट्यपूर्ण आहे..हायवेंवरच्या ढाब्यांवरचा अविभाज्य घटक म्हणजे खाटा, या खाटांच्याऐवजी इथे आरामशीर गाद्या असलेले छोटे छोटे पलंग आणि त्याला जोडलेले टेबल असा थाट आहे..थेट ढाब्याच्या फिल साठी काही खाटाही आहेत आणि या वेगळ्या आसनव्यवस्थेव्यतिरिक्त ज्यांना टेबल खुर्चीवर बसूनच जेवायचं आहे त्यांच्यासाठीही तशी सोय आहेच..



पंजाबी ढाब्याची सगळी सजावट आणि टेरेसच्या थेट दुसऱ्या टोकाला आहे ते ओपन किचन, पठाणी आणि पंजाबी कपड्यातले बल्लवाचार्य आपल्यासमोरच विविध पदार्थांची निर्मिती करत असतात. त्या ओपन किचनसमोर तर स्वयंपाकघरातील जुन्या वस्तूंचं छोटेखानी प्रदर्शनच मांडलेलं दिसतं.. जुने बंब, थाळ्या,सुरया असं सगळं काही सुबक पद्धतीनं मांडलेलं दिसतं..अगदी चिनी मातीचे कुल्लड, प्लेट्स आणि काचेची जुनी वेगवेगळ्या आकाराची भांडीही या इवल्याशा प्रदर्शनात दिसतात. विटांच्या छोट्या छोट्या चुली करुन त्यावर मोठा स्वयंपाक करण्यासाठी वापरली जाणारी मोठाली भांडीही लक्ष वेधून घेतात.



इतका सगळा पंजाबी थाट पाहिल्यावर मेन्यू कार्डातही पंजाबी चवींचे पदार्थ दिसणार या अपेक्षेनी आपण मेन्यूकार्ड उघडतो, पण आपल्या अपेक्षेपेक्षा अधिकच अशी जुन्या दिल्लीतली अगदी खास चांदनी कौकातली चुणूकही आपल्याला दिसते ती चांदनी चौक दे चाट सम्नाट या नावाने. चांदनी चौकातील प्रसिद्ध भल्ले,टिक्की, गोलगप्पे (पानी के बताशे), समोसे, कचोरी आणि पराठे अशी सगळ्या चमचमीत पदार्थांची जंत्री वाचत असताना पितळेच्या गारगार लोट्या आपल्या पुढे येतात. या सुबक लोट्यांमधून पाचक जलजिरा  आपल्या पुढ्यात येतो. त्यासोबत तोंडी लावायला कांद्याची कोशिंबिर आणि सुरणाची चाट..या तीन पदार्थांचा अस्वाद घेऊन मगच पंजाबी खाद्यसफरीचा श्रीगणेशा करायचा असतो.



जुन्या दिल्लीतल्या चमचमीत चाटसदृश पदार्थांबरोबरच खास तंदूरमधले स्टार्टर्स म्हणजे पंजाबी जेवणाची चटपटीत सुरुवात – खास तंदूरमध्ये ग्रील केलेले व्हेज आणि नॉनव्हेज स्टार्टर्स.. साधारणपणे पंजाबी पदार्थ सर्व्ह कऱणाऱ्या रेस्टॉरन्टसमध्ये जे पदार्थ मिळतात, ते तर इथे मिळतातच पण काही खास पदार्थ जे इतरत्र मिळत नाही, अशाही काही पदार्थांचा इथल्या मेन्यूकार्डमध्ये समावेश दिसतो..त्यातले दोन लक्ष्यवेधी पदार्थ म्हणजे अमृतसरी चुरचुर नान आणि श्रीमाल..



अमृतसरी चुरचुर नान हा नान थेट कुस्करुन आपल्या ताटात वाढला जातो आणि आलुपराठ्यासारखा बटाटे भरलेला असतो..इतर पराठ्यांच्या मानाने जास्त कुरकुरीत असतो. हा चुरचुर नावाचा वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ चवीला एकदम युनिकच. तसाच युनिक आहे तो गोडसर श्रीमाल. केशर आणि विलायचीच्या चवीबरोबरच गोडसर चवीची रोटी म्हणजे श्रीमाल.. सब्जीबरोबर तसंच दुधाबरोबरही खाता येणारा पदार्थ किंवा पराठा म्हणजे श्रीमाल.



रबडी पराठा हा तसाच एक युनिक पदार्थ भाज्यांच्या ऐवजी थेट रबडी भरुन तयार केलेलं पंजाबी डेझर्ट. अर्थात या काही युनिक पदार्थांबरोबरच पंजाबी बिर्याणी, लच्छेदार पराठे, पनीरच्या वैविध्यपूर्ण भाज्या, पंजाबी कढी चावल अशा पदार्थांबरोबर, मत्स्यप्रेमींसाठी खास पंजाबी मसाल्यांमध्ये शिजवलेलं सी फुड हे आणखी एक आकर्षण.. अमृतसरी फिश करी, तंदुरी फिश असा स्टार्टर्स ते मेन कोर्स सी फुडचा पर्यायही इथे मिळतो. या सगळ्या बरोबर खास पंजाबी लस्सीचा आस्वाद तर घ्यायलाच हवा.



गेल्या काही वर्षात हायवेवरच्या ढाब्यांची संस्कृती जवळजवळ नष्ट झालीय..शहराबाहेर ज्यांना आपण ढाबा म्हणतो ते ढाबेही आता ढाबे कमी अन् रेस्टॉरन्ट जास्त झालेत. अशावेळी काहीशा विस्मरणात गेलेल्या ढाबा थीमचं शहराच्या मध्यभागी असलेलं हे रेस्टॉरन्ट फॅमिली आऊटींगसाठी नक्कीच उत्तम पर्याय आहे. मोठ्या ग्रुपमध्ये निवांत वेळ घालवत पोटभर जेवणासाठी पर्यायांच्या शोधात असलेल्यांसाठी तर चौबारा ६०१ हा नक्कीच उत्तम पर्याय आहे.



संबंधित ब्लॉग

जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन

जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर

जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट

जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन

जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद

जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई

 जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार

जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव

जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन

जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन

जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची

जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास

जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’

जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती

जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू

जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस

जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’

जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार

जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 

जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट