Jayant Sawarkar Blog : जयंत सावरकर (अण्णा) (Jayant Sawarkar) यांच्या निधनाची बातमी येताच शब्दच सुचेनासे झाले. माझ्या आजोबांसोबत माझं खूप घट्ट नातं होतं. त्यांच्या निधनानंतर 'जयंत सावरकर' नामक एक व्यक्ती आमच्या घराजवळ राहायला आहे. सेलिब्रिटीपेक्षा एक आजोबा म्हणून ते माझ्या संपर्कात आले. पुढे त्यांच्या कामाबद्दल कळू लागलं आणि त्यांच्याविषयीचा आदर दिवसेंदिवस वाढू लागला. 


हसरा चेहरा, कपाळावर टिळा, डोक्यात स्टाइलिश टोपी , गळ्यात मफलर असा काहीसा सावकर आजोबांचा लूक सर्वांनी पाहिला असेल. मी त्यांना ओळखू लागल्यापासून ते आजपर्यंत त्यांचा हा लूक कायम राहिला. एखाद्या तरुणाला लाजवतील इतके शिस्तबद्ध, कामाशी प्रामाणिक सावरकर आजोबा मी खूप जवळून पाहिले आहेत. 


ठाण्यात आईचं पोळी-भाजी केंद्र आहे. जयंत सावरकर हे कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण करण्यापेक्षा माझ्या आईच्या हातचं खायला नेहमी पसंती दर्शवत असत. त्यामुळे ते आमचे नेहमीचे ग्राहक होते. मला अगदीच आठवतंय, मी शाळेत असताना आजोबा एकदा जेवण घ्यायला आले होते. दरम्यान मी भाजी घेऊन त्यांना देण्यासाठी गेले आणि म्हटलं आजोबा पिशवी पुढे करा भाजी टाकते. त्यावेळी ते म्हणाले होते,"बाळा भाजी टाकत नाहीत.. ठेवतात... कचरा टाकला जातो". अशा छोट्या-छोट्या गोष्टी सावरकर आजोबांनी शिकवल्या सांगितल्या आहेत. 


एक किस्सा अगदीच सांगावसा वाटतो. सावरकर आजोबा माझ्या घराजवळ राहत असल्याने आणि त्यांचे आमच्यासोबत चांगले संबंध असल्याचं माझ्या कॉलेजमध्ये माहिती होतं. त्यामुळे माझा एक मित्र त्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावरकर आजोबांना विचार असं सांगून मला घेऊन त्यांच्या घरी गेला. त्यावेळी सावरकर आजोबा त्याला म्हणाले,"कार्यक्रमाला मी नक्की येईल. अर्थात जास्त वेळ उभं राहायला मला जमणार नाही. पण नक्कीच येईल". दरम्यान माझ्याकडे पाहत ते म्हणाले,"मंजिरीची आई आमची अन्नदाती आहे. त्यामुळे तिने सांगितलेल्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो नाही तर आमच्या जेवणाचं अवघड होईल". 


साधी राहणी आणि उच्चविचारसरणी काय असते हे सावरकर आजोबांकडे पाहिल्यावर कळतं. अण्णा आजोबांचे सासरे म्हणजे मामा पेंडसे. स्वत: एक उत्कृष्ट रंगकर्मी, अनेक गाजलेल्या नाटकांत, सिनेमांत काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जयंत सावरकर सर्वांनीच पाहिले आहेत. पण रंगमंचावरील त्यांचं काम मला प्रत्यक्ष पाहता आलं याचा आनंद वेगळाच आहे.


'एकच प्याला' या नाटकात जयंत सावरकरांनी साकारलेली तळीरामाची भूमिका चांगलीच गाजली. तळीरामाच्या भूमिकेत त्यांनी 100% दिले आहेत. दारुच्या आहारी गेलेल्या तळीरामाचं पात्र त्यांनी चांगलचं रंगवलं आहे. अनेक कार्यक्रमात त्यांनी तळीराम सादर केला आहे. राम गणेश गडकरींचे संवाद आणि जयंत सावरकर यांचा दर्जेदार अभिनय यामुळे 'एकच प्याला' या नाटकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 


मामा पेंडसे यांची लेक अर्थात सावरकर आजोबांची पत्नी यादेखील त्यांच्याप्रमाणेच कडक शिस्तीच्या. सावरकर आजोबांचं आजीवर खूप प्रेम होतं. कोरोनाआधी सावरकर आजोबा आजीला घेऊन दररोज न चुकता एक फेरफटका मारायचे. त्यावेळी त्या दोघांना पाहताना आपण एखादा सिनेमा पाहतोय असं वाटायचं. 


घरातील छोट्या-मोठ्या गोष्टी सावरकर आजोबा स्वत: खरेदी करायचे. किराणा सामान असो, भाजी घेणं असो वा आमच्या घरी येऊन जेवण घेणं असो. अभिनयाप्रमाणेच या सर्व गोष्टी करायची सावरकर आजोबांना आवड होती. आजींची तब्येत अनेकदा ठिक नसे. त्यावेळी आजीचा हात पकडून आजीला दवाखान्यात घेऊन जाताना आजोबांना मी पाहिलं आहे. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात प्रेम, काळजी दिसायची.    


सावरकर आजोबांना व्यायामाची खूप आवड होती. त्यांनी कधी लिफ्टचा वापर केलेला मी पाहिलेलं नाही. पाचव्या-सहाव्या मजल्यापर्यंत जिन्याने जात असत. आपण काय आहार घेतो याकडे त्यांचं लक्ष असे. जयंत सावरकर यांच्या चेहऱ्यावर वागण्या-बोलण्यात कायम उत्साह असे. मला आठवतंय, सावरकर आजोबा रस्त्यावरून जाताना कायम त्यांच्या आसपासची लोक 'अरे हे सेलिब्रिटी आहेत ना' अशा प्रकारची कुजबूज करत असत. 


काम मिळत नाही म्हणून निराश झालेलं सावरकर आजोबांना कधीही पाहिलेलं नाही. नाटक, वेबसीरिज, सिनेमे आणि मालिकांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. सावरकर आजोबांच्या निधनाने मनोरंजनसृष्टी पोरकी झाली आहे.