पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक निर्णय आणि त्यानंतरच्या ऐतिहासिक गोंधळातून थोडक्यात बचावले, असं मला अमेरिकेत आल्यापासून वाटत होतं. पण एक दिवस माझ्यावरही कॅशलेस-कार्डलेस होण्याची वेळ ओढवली.


बोस्टनहून मी एकटीच न्यूयॉर्कसाठी निघाले, पण माझं क्रेडिट कार्ड बसस्टॉपवरच्या दुकानातच राहिलं. बस अर्ध्या रस्त्यात असताना मला कार्ड हरवल्याचं लक्षात आलं, ते ब्लॉक करून पुढचे सोपस्कार तर झाले. पण आता न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यावर काय करायचं असा मोठा प्रश्न उभा राहिला.
अमेरिकेतली कार्ड सिस्टिम थोडी वेगळी आहे, इथं कॅशपेक्षा कार्डमध्ये जास्त व्यवहार होतात. जास्त कॅश जवळ बाळगणंही धोक्याचं. त्यामुळं छोट्याशा गोष्टीसाठीही कार्ड स्वाईप करावं लागतं कधीकधी. एटीएममधून पैसे काढणं तुलनेनं महाग पडतं. त्यात माझं आणि प्लास्टिक मनीचं फारसं पटत नाही. स्वतःचाच रागही आला. तुलाच अॅडव्हेंचर हवं होतं ना, आता हे सावर, असं स्वतःला बजावलं.
जवळ दोन वेळच्या खाण्याइतकेच डॉलर्स शिल्लक राहिले होते आणि त्यात मी न्यूयॉर्कला उतरले. पण काही मित्र धावून आले. शॉन टंडननं कॅश हातावर ठेवली, आणि नोटांची किंमत काय असते, ते एका क्षणात उमगलं. मनात विचार आला, पैसा महत्त्वाचा आहेच, पण त्याहीपेक्षा माणसं जास्त महत्त्वाची आहेत. खरं तर शॉनची आणि माझी ती पहिलीच भेट होती. शॉन न्यूयॉर्कमधला वार्ताहर आहे आणि माझ्या एका मित्राचा मित्र. पण एका फोनकॉलवर लगेच धावून आला.



शॉन आणि त्याची पत्नी मारिया गोनुलू या दोघांनी मग मला डिनरसाठी येण्याचा आग्रह केला. काही पत्रकार एकत्र जमले आणि पुढचे काही तास गप्पांचा फडही रंगला. विषय अर्थातच ट्रम्प आणि मोदी.

नरेंद्र मोदी या नावाविषयी अमेरिकन नागरिकांच्या मनात एक कुतूहल दिसून येतं. त्यांचा नोटा अचानक रद्द करण्याचा निर्णय अनेकांना रुचलेला नाही.

दुसरीकडे ट्रम्प आपले राष्ट्राध्यक्ष होणार, पुढची किमान चार सत्तेच्या सिंहासनावर बसणार, ही गोष्ट पचवणं अनेकांना कठीण जातंय. पत्रकारांनाही अमेरिका कसा काय असा निर्णय घेऊ शकते, हा प्रश्न पडला आहे. ट्रम्पना मोठा पाठिंबा मिळेल याची खात्री अनेकांना होती. पण त्यांची निवड होईल असं वाटत नव्हतं.

गेल्या दीड वर्षापासून हिलरी क्लिंटन यांच्याविषयी वार्तांकन करणाऱ्या इव्हाननं क्लिंटन यांची प्रचार मोहिम जवळून पाहिली आहे. विजयाच्या एवढ्या जवळ जाऊन मग थेट पराभव, ही गोष्ट क्लिंटन समर्थकांना पटत नाहीये.

क्लिंटन यांनी इतर काही छोट्या राज्यांचा दौरा केला असता, आपल्यावरच्या आरोपांची थेट आणि सर्वसामान्य लोकांना पटतील अशी उत्तरं दिली असती तर चित्र वेगळं असतं. दुसरीकडे ट्रम्प आपल्या लोकांना आवडेल अशी आक्रमक भाषा बोलत होते.



इव्हान आता काही दिवस ट्रम्प टॉवरमधून रिपोर्टिंग करणार होता. डोनाल्ड ट्रम्प याच इमारतीत राहतात, आणि त्यांना भेटण्यासाठी आजकाल बरेच लोक ये-जा करत असतात. ट्रम्पनी कुणाची भेट घेतली, कुणाची कुठल्या पदावर नियुक्ती होणार याविषयी न्यूयॉर्कमध्ये चर्चांना उधाण आलंय. आणि सामान्य न्यूयॉर्कवासियांना या चर्चेचा त्रासही होतोय.
आमच्या गप्पांदरम्यान मारियानं एक वेगळा मुद्दा मांडला. आर्थिक मंदीमुळं गेल्या 9-10 वर्षांत अनेक अमेरिकन नागरिकांना नोकरी, घर गमवावं लागलंय. अशा परिस्थितीत लोक कुठलाही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळं लोकांना थेट दोषच देता येणार नाही. ओबामांनी म्हटल्यानुसार लोकांना बदल हवा होता, पण नेमका कोणता बदल, हेच लक्षात आलेलं नाही. डेमोक्रॅटिक पक्षाच्या समर्थकांनीच नाही, तर जगभरातल्या विचारी लोकांना हे समजून घ्यावं लागेल.
इकॉनॉमी रन्स द वर्ल्ड – अर्थव्यवस्थेवरच जग चालतं. पण ट्रम्प यांच्याकडे अर्थव्यवस्थेसाठी कुठलीच ठोस विकासयोजना दिसत नाही. अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज 19 ट्रिलियन डॉलर्सच्या पलिकडे गेलं आहे. दर सेकंदाला वाढणारा कर्जाचा आकडा नियंत्रणाखाली आणण्याचं आव्हान ट्रम्पना पेलावं लागणार आहे. नाहीतर दुसरं आर्थिक संकट उभं राहण्याची भीती शॉननं व्यक्त केली.
न्यूयॉर्क म्हणजे जगातल्या आर्थिक उलाढालींचं सर्वात महत्त्वाचं केंद्र. वॉल स्ट्रीट असो वा गजबजलेला टाईम्स स्क्वेअर. ट्रम्प यांच्या निवडीनंतर या दोन्ही ठिकाणी चिंतेचं वातावरण आहे.
मारिया मूळची ग्रीसची आहे तर इव्हान फ्रान्सचा. त्यामुळं साहजिकच आमच्या गप्पांचा ओघ युरोपियन राजकारणाकडेही वळला. ब्रेक्झिट आणि अमेरिकन निवडणुकीनंतर आता फ्रान्समध्ये काय होणार अशी चिंता इव्हाननं व्यक्त केली.

गप्पांच्या ओघात आणखी एक मुद्दा समोर आला. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी आवश्यक २७० इलेक्टोरल मतं जमा केली. पण थेट लोकांनी केलेल्या मतदानाच्या आकडेवारीत (पॉप्युलर व्होट्स) ते बरेच मागे पडले आहेत.
ताज्या आकडेवारीनुसार अमेरिकेत यंदा 13,24,39,666 लोकांनी मतदान केलं. अमेरिकेची लोकसंख्या जवळपास ३२ कोटी आहे. त्यातले २५ कोटी ११ लाख लोक मतदानायोग्य वयाचे आहेत. म्हणजे एकूण लोकसंकोख्येच्या जवळपास 50 टक्के आणि मतदानायोग्य लोकसंख्येच्या 52 टक्के लोकांनीच मतदान केलं. या 13 कोटी 24 लाख मतदारांपैकी डोनाल्ड ट्रम्प यांना 6,18,64,015 मतं मिळाली. तर 6,35,41,056 मतदारांनी हिलरी क्लिंटन यांच्या बाजूनं कौल दिला. म्हणजे क्लिंटन यांना ट्रम्प यांच्यापेक्षा जवळपास 14 लाख मतं जास्त मिळाली.
अमेरिकेच्या संविधानानुसार लोकांच्या मतापेक्षा राज्यांचं मत जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं पॉप्युलर व्होट्समधला विजय निरर्थक आहे, पण पॉप्युलर व्होट्सची आकडेवारी समोर आल्यानं लोकांमधली, विशेषतः तरुणांमधली नाराजी वाढते आहे. अमेरिकन समाज दुभंगला आहे, आणि ही दरी इथं अधूनमधून जाणवत राहते.
त्या रात्री उशीरा डिनरनंतर मी, इव्हान, शॉन आणि मारिया मॅनहॅटनच्या रस्त्यांवरून फिरायला निघालो. चार वेगवेगळ्या देशांतले आम्ही चौघंजण, पण चौघांच्या मनातले प्रश्न एकमेकांशी मिळतेजुळते आहेत. ते मिटणार की नाहीत, हे काळच ठरवेल.

एक मात्र खरं, अमेरिका आजवर अनेकांना सुरक्षित देश – सेफ हेवन - वाटत होता, पण तिथेही लोकांच्या मनातली असुरक्षिततेची भावना वाढू लागली आहे. कुणी तर देश सोडून जाण्याची भाषा करू लागलं आहे. अमेरिकेतला वर्णद्वेष कमी झाला असला तरी संपलेला नाही, हेही वास्तव आहे.

संबंधित ब्लॉग :

बोस्टन टी पार्टी आणि चाय पे चर्चा


अमेरिकेतील राजकीय भूकंप, थेट अमेरिकेतून