9 नोव्हेंबरच्या पहाटे अमेरिकेत मोठा राजकीय भूकंप झाला आणि त्याचे हादरे – आफ्टरशॉक्स – बराच काळ जाणवत राहतील, अशी शक्यता आहे. मुंबई ते बोस्टन प्रवासादरम्यान मला वेळोवेळी या गोष्टीची जाणीव झाली. माझी फन ट्रिप आता एक अभ्यासदौरा बनल्यासारखीच वाटू लागली आहे.

नेहमीच्या जगापासून, फोन-इंटरनेट या सगळ्यापासून जरा डिसकनेक्ट व्हायचं म्हणून हा दौरा आखला होता. पण घटनाच अशी घडली आहे, की तिच्यापासून डिसकनेक्ट राहूच शकत नाही आपण.

‘प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प’ हे शब्द आपल्यापैकी अनेकांना अजूनही खटकतायत. मग अमेरिकेतल्या नागरिकांना या बदलाविषयी काय वाटत असेल? ही उत्सुकता अमेरिकेचं एक वेगळं रूप दाखवू लागली आहे.

अमेरिकेतल्या वातावरणात एक शांत अस्थिरता जाणवते आहे- सायीखालचं दूध कसं हळूहळू उकळत राहतं, तशीच. याची पहिली झलक मुंबई विमानतळावरच पाहायला मिळाली. ११ नोव्हेंबरच्या पहाटे-पहाटे लोक फक्त दोनच गोष्टींची चर्चा करत होते आसपास- बंद झालेल्या हजार-पाचशेच्या नोटा आणि ट्रम्पच्या राज्यात आपलं कसं होणार ही चिंता.

दुबईला कनेक्टिंग फ्लाईटसाठी वाट पाहात होते, तिथं दोन अमेरिकन बायका निवडणुकीचीच चर्चा करत होत्या. दोघी रिपब्लिकन पक्षाच्याच, पण एक ट्रम्पची कट्टर विरोधक आणि दुसरीनं ट्रम्पला मत दिलं होतं. प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या जेन्ना हॅरिसला ट्रम्पची निवड म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या अंताची आणि अमेरिकेपुढच्या संकटाची सुरूवात वाटते. दुसरीकडे जरा वयस्कर लिडिया, काम “इतके दिवस दिलं ना मत राजकारण्यांना? काय बदल झाला? ओबामा नुसतं येस वुई कॅन म्हणायचे, मी पण त्यांना मत दिलं. पण काय मोठा बदल केला त्यांनी? माझ्या कित्येक मित्रमैत्रिणींना २००७मध्ये नोकऱ्या गमवाव्या लागल्या, अजूनही बेकार आहेत, या वयात कष्टाचं काम करावं लागतंय. बदल हवा असेल, तर सिस्टिमच बदलायला हवी. ट्रम्पसारखा राजकारणाबाहेरचा माणूस करू शकतो हे सगळं.”



दुबई विमानतळावर वेळ घालवण्यासाठी वृत्तपत्रं वाचत होते. न्यूयॉर्क टाईम्स, फायनान्शियल टाईम्स, खलिज टाईम्स, आणि लंडनचा द टाईम्स. जगातल्या चार वेगवेगळ्या गटांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वृत्तपत्रांच्या शुक्रवारच्या आवृत्त्यांनी अमेरिकेच्या निवडणुकीवरच प्रामुख्यानं भाष्य केलं होतं.

यंदा अगदी उघडपणे हिलरी क्लिंटन यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या न्यूयॉर्क टाईम्सनं अमेरिकेच्या राजकीय वास्तव्याविषयी परखडपणे लिहिलं आहे. मुखपृष्ठावरचे दोन स्तंभ, ट्रम्प आता राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत, त्यांचा स्वीकार करावा लागेल, हा मुद्दा मांडतात, पण वेगवेगळ्या शैलीत.

गेल कॉलिन्सनं ट्रम्प ट्रम्प कदाचित आपण समजतो त्यापेक्षा चांगले ठरू शकतील असा आशावादही मांडला आहे. ट्रम्प यांचे विरोधक, हिलरी क्लिंटन यांचे पाठीराखे आता अमेरिकाच सोडण्याची भाषा करू लागले आहेत, पण जगभरातले फारच कमी देश ‘अमेरिकन’ लोकांना आपल्या देशात आश्रय देतील हे वास्तव मांडल आहे. एरवी अमेरिकन्स कॅनेडियन नागरिकांवर जोक्स करताना दिसतात. आता कॅनेडियन लोक तुम्हाला त्यांच्या तरूण, तडफदार, विचारी आणि सुंदर पंतप्रधानाबद्दल सांगत राहतील आणि तुम्हाला शांतपणे ऐकून घ्यावं लागेल कोपरखळीही मारली आहे. ट्रम्प एरवी आक्रस्ताळेपणा करतात, पण एक माणूस म्हणून व्यक्तीशः ते वेगळे आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत ट्रम्प मोकळ्या विचारसरणीचे ‘मॅनहॅटनाईट’ होते, आणि अजूनही त्यांच्यातलं थोडं पुढारलेपण शिल्लक असेल अशी आशा कॉलिन्सनं व्यक्त केली आहे.

दुसरीकडे पॅट्रिक हेली आणि जेम्स पीटर्सनं ट्रम्प यांच्याशी पुढची चार वर्ष जुळवून घेणं किती कठीण आहे, याविषयी लिहिलं आहे. ट्रम्प यांच्याविरोधातले मोर्चे, ‘नॉट माय प्रेसिडेंट’ सारखे हॅशटॅग्ज यांमुळं लोकांमध्ये वाढत चाललेली दरी हे ट्रम्प यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे असं या दोघांना वाटतं.



फायनान्शियल टाईम्सनं डोनाल्ड ट्रम्प-बराक ओबामा यांच्यातल्या भेटीचं वर्णन ऑकवर्ड असं केलं आहे. तर खलिज टाईम्सची हेडलाईन आहे अमेरिका जखमेवर उपचारांच्या प्रतीक्षेत आहे. खलिज टाईम्सनं अमेरिकेत सुरू झालेल्य विरोधाचं चित्रण केलंय. युवा पिढीनं मोठ्या प्रमाणात क्लिंटनना मतदान दिलं हा मुद्दाही खलिज टाईम्सनं अधोरेखित केलाय. म्हणजे एरवी अमेरिकन वृत्तपत्र पश्चिम आशियातल्या निदर्शनांविषयी लिहितात, त्याच्या नेमकं उलटं चित्र आहे हे.

द टाईम्सनं ओबामा-ट्रम्प भेटीची तुलना रिआलिटी टीव्ही शोसोबत केली आहे. ट्रम्प निवडून आल्यानं युरोपातल्या हालचाली कशा वाढल्या आहेत, याविषयीही लिहिलं आहे.

न्यूयॉर्क टाईम्सनं हिलरी क्लिंटन यांच्या पराभवाची मिमांसा केली आहे. एमी कोझिकनं हिलरी यांना लोकांच्या मनातला असंतोष जोखता आला नाही, हा मुद्दा मांडला आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्येच पीटर एस गुडमनचा लेख जगभरातल्या आणि विशेषतः युरोप-अमेरिकेत वाढत्या उजव्या विचारसरणीवर, धृवीकरणावर आणि भांडवलशाहीच्या मर्यांदांवर प्रकाश टाकतो.



उजव्या विचारसरणीनं सत्ता जिंकण्याचा मुद्दा आला, की आपल्या देशातलं भाजप सरकार आठवल्याशिवाय राहात नाही. अनेकजण नरेंद्र मोदींची तुलना ट्रम्प यांच्यासोबत करतायत. याचं कारण आहे दोघांभोवती झालेलं धृवीकरण. २०१४ साली मोदींची लाट आली होती, त्यानंतर भारतातही मोदी समर्थक आणि विरोधक असे गट निर्माण झाले आहेत. पण अमेरिकेत फक्त दोन गटांमधला केवळ वैचारिक संघर्ष नाही, तर त्याचा उद्रेकही होण्याची भीती अनेकांना प्रकर्षानं जाणवते आहे. पोर्टलंडमध्ये तसा उद्रेक झालही आहे.

अशा ध्रुवीकरणाच्या काळातच लोकशाहीची खरी कसोटी लागते. पराभव पचवणं आणि विरोधकांच्या मतांचा आदर राखणं ही लोकशाहीची मूळ तत्त्व आहेत. ती टिकवणं ही भारत आणि अमेरिका या जगातल्या प्रमुख लोकशाहींसमोरची मोठी आव्हानं आहेत.

जाता-जाता माझ्या दुबई-बोस्टन प्रवासादरम्यानचे आणखी दोन अनुभव सांगावेसे वाटतात. आईसलँडवरून उडताना विमान अचानक थरथरू लागलं. जमिनीपासून 33-34 हजार फुटांवर ढगांतून, हवेच्या झोताविरुद्ध उडताना टर्ब्युलन्स जाणवत होता. जीवाचा थरकाप उडवणारे हादरे चांगले अर्धा तास सुरू होते. अर्ध्या दिवसाचा थकवणारा प्रवास, अजून सहा तास असंच हवेत तरंगत राहायचंय हा विचार आणि त्यात विमानात जाणवणारे धक्के, आणि समोरच्या स्क्रीनवर बीबीसी-सीएनएनच्या बातम्यांमध्ये ट्रम्प. कसा योगायोग असतो!

त्या विमानात कॅथरीन आणि मरीन या दोघी केनियन-अमेरिकन मायलेकी माझ्या शेजारी होत्या. कॅथरीन पेशानं नर्स तर मरीन कॉलेजात शिकते आहे. १५-१६ तासांच्या प्रवासात मरीन जवळपास सगळा वेळ फिल्म्स पाहात होती तर कॅथरीनची नजर बातम्यांवर खिळली होती. आम्ही तिघींनीही कुठलीही राजकीय चर्चा टाळली, एकमेकांच्या देशांबद्दल, पेशाबद्दल आणि हो, क्रिकेटबद्दल बोलत होतो. पण व्हेटरन्स डेच्या निमित्तानं, निवृत्त सैनिकांच्या सभेत बराक ओबामांचं भाषण सुरू झालं, तेव्हा कॅथरीननं अक्षरशः टाळ्या वाजवल्या. आपल्या नेहमीच्या नर्मविनोदी शैलीत, ओबामांनी सैनिकांच्या जीवदानाचं महत्त्व सांगितलं आणि या घडीला अमेरिकन नागरिकांनी एकजुटीनं उभं राहायला हवं, असा विचार मांडला.

ओबामांचं भाषण संपलं, तेव्हा कॅथरीनच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. ती फक्त एवढंच म्हणाली “I’m going to miss him...” तिच्या त्या एका वाक्यातच सारं काही आलं. Catherine, we are going to miss him too. आम्हालाही ओबामांची आठवण येत राहील. आम्ही नकळत एकमेकींचे हात हातात घेतले आणि समोर स्क्रीनवर मेसेज झळकू लागला- वेलकम टू युनायटेड स्टेट्स. अमेरिकेत तुमचं स्वागत आहे...

-  जान्हवी मुळे