मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या विषयाची दाहकता दिवसागणिक वाढत असल्याचं दिसतयं. मराठा क्रांती मोर्चा नावाचं एक भलं मोठं वादळ महाराष्ट्रानं आणि देशानं पाहिलं. त्यानंतर काही काळात हे वादळ शांत होतं ना होतं तोच पुन्हा मनोज जरांगे नावाचं वादळ आलं आणि पुन्हा मराठवाड्यातील मराठ्यांमध्ये आरक्षणाची मागणी जोर धरु लागली. मनोज जरांगे यांचा आरक्षणाचा लढा एका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलेला अससतानाच जरांगेंनी एक घोषणा केली आणि तयारी सुरु झाली. खास रणनिती आखत जरांगेंनी महाराष्ट्रभरात सभांचा धडाका लावला. मात्र या सर्व घटनाक्रमात एक घटना ऐतिहासिक ठरली ती म्हणजे 14 ऑक्टोबरची अंतरवाली सराटीतील सभा. या सभेची चर्चा फक्त गर्दीसाठी होत असली तरी, या सभेतून जरांगे यांनी प्रस्थापितांना अनेक संदेश दिलेत. मनोज जरांगे हे नाव महाराष्ट्रात सध्या सोशल मीडियावर आणि लोकांच्या चर्चेचा टॉप ट्रेंडींगचा विषय आहे. मात्र, जालना आणि बीडच्या गोदापट्ट्यातल्या साधारणत: 123 गावांसाठी हे नाव नवं नाही. मागच्या अनेक वर्षांपासून मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणासाठी लढा सुरु आहे. गावागावत त्यांनी केलेल्या साखळी उपोषणाला प्रत्येक वेळी लोकांनी जबाबदारी घेत पाठिंबा दिलाय.
मात्र, यावेळी मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटीमध्ये 29 ऑगस्ट रोजी उपोषण सुरु झालं. त्या उपोषणात काही दिवसांनी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. विशेषत: पोलिसांच्या कारवाईमध्ये जखमी महिलांचे फोटो महाराष्ट्रभरात पसरले आणि मराठा समाजात एक संतापाची लाट उसळली. यानंतर सगळ्यात महत्त्वाची होती ती मनोज जरांगेंची भूमिका. तसुभरंही मागे न सरकरता जरांगे आपल्या उपोषणावर ठाम राहिले. पोलिसांच्या कारवाईविरोधात संवैधानिक पद्धतीनं विरोध करत पुढची भूमिका जाहीर केली आणि आपल्या आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच प्रत्येकवेळी हा लढा गरजवंत मराठ्यांचा असल्याचं बिंबवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच भूमिकेमुळे ते गरजवंत मराठा समाजाच्या मनात स्थान निर्माण करु शकले असं म्हणता येईल. त्यानंतर अंतरवाली सराटीच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. लोकांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला समर्थन दर्शवण्यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये गर्दी करायला सुरुवात केली. जसजसा उपोषणाचा एकएक दिवस जात होता, तसतसा सरकारवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दबावही वाढत होता. त्यामुळे सरकारच्या मंत्र्यांची जरांगेंची मनधरणी करण्यासाठी रीघ लागली.
अखेर सगळे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री शिंदे जरांगेंचं उपोषण सोडवणयासाठी गेले आणि 40 दिवसांमध्ये आरक्षणाचा जीआर काढा ही मागणी करत जरांगेंनी उपोषण सोडलं. जरांगेंची मंत्र्यांशी चर्चा करण्याची स्टाईल, सगळ्या गोष्टी थेट माध्यमांसमोरच बोलण्याची अट, बिनधास्तपणे देण्यात येणारी आश्वासनं, मनधरणीचे प्रयत्न धुडकावून लावण्याच्या पद्धतीमुळे जरांगेंची क्रेझ वाढत गेली. सत्ताधारी पक्षातल्या आमदार, मंत्री, मुख्यमंत्री ते विरोधी पक्षातील बड्या नेत्यांशी चर्चा करताना जरांगेंनी प्रत्येकाला सारखाच मानसन्मान दिला, प्रत्येकासोबत सारखं अंतर त्यांनी राखलं.
सरकारला दिलेल्या मुदतीच्या 40 दिवसांत जरांगेंनी गावागावचा दौरा केला आणि इथेच त्यांनी आपलं पुढचं धोरणंही जाहीर केलं. 14 ऑक्टोबरला अंतरवाली सराटीमध्ये मराठ्यांची महासभा घेण्याचं ऐलान जरांगेंनी केलं. गावागावात होणाऱ्या सभांमधून जरांगेंनी स्वत: सभेला येण्याचं आवाहन केलं. गावागावांमध्ये पुन्हा एकदा मराठा तरुणांच्या बैठका होऊ लागल्या. मराठा समाजातल्या लहान मुलांपासून ते महिलांपर्यंत सगळ्यांमध्येच पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीचा लढा लढण्याची उमेद निर्माण झाली. मनोज जरांगे यांच्याबद्दलच्या सगळ्या बातम्या करताना हे सगळं जवळून आणि सविस्तर पाहता आलं. त्यामुळे ही सभा नेमकी कशी होणार याबद्दल उत्सुकता होती.
14 ऑक्टोबरला होणाऱ्या या सभेला जाण्याचं ठरलं. 13 ऑक्टोबरलाच सभास्थळी जाऊन पाहणी केली आणि स्थानिक प्रतिनिधी रवी मुंडे यांच्यासोबत एक तयारीचा आढावा घेणारं लाईव्ह केलं. सभेला गर्दी होणार याचा अंदाज असल्यामुळे 14 तारखेला सकाळी 5 वाजता छत्रपती संभाजीनगरहून निघण्याचं नियोजन केलं होतं. त्याप्रमाणे स्थानिक पत्रकार आणि पत्रकारितेच्या मित्रांसह छत्रपती संभाजीनगरहून निघालो. शहराबाहेर येताच धुळे -सोलापूर महामार्गावरुन प्रवास सुरु झाला. मोठ्या प्रमाणात वाहनं अंतरवाली सराटीच्या सभेला जाताना दिसत होती. कारण जालन्याच्या दिशेला जाणाऱ्या अनेक गाड्यांवर भगवे झेंडे, मनोज जरांगेंचे, मराठा आरक्षणाबद्दलचे बॅनर दिसत होते. गाडीमध्ये बसलेले सगळेच मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागातले होते. त्यांच्या परिसरातं स्थानिक राजकारण आणि जरागेंचं आंदोलन अशी चर्चा सुरु होती. गप्पा सुरु असतानाच समोरुन एकाने शिट्टी वाजवून गाडी थांबवली. समोर उभ्या असलेल्या गाड्या पाहून अंदाज आला होता, की सभेला जाणाऱ्यांसाठी चहा, नाश्त्याची सोय करण्यात आलेली होती. आमच्या गाडीवर कुठला झेंडा, बॅनर नसताना नाश्त्यासाठी थांबवलं हे विशेष. पाचोड फाट्याजवळचं हे ठिकाण होतं. आजुबाजूच्या गावातल्या लोकांनी घरोघरी जेवण आणि नाश्ता तयार करुन ही व्यवस्था केलेली होती. याच सर्व गोष्टींचा आढावं घेणारं एक लाईव्ह करुन पुढे गेलो.
पुढे निघालो तसं गर्दी वाढत गेली. सभास्थळापासून चार-पाच किमी अंतरावरच भव्य पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. गाड्या रोखून त्या पार्किंगमध्ये लावण्याठी तरुण स्वयंसेवक काम करत होते. "एsss मीडियावाले आहे, जाऊदे..." म्हणत आमची गाडी सोडली. सभास्थळापासून काही अंतर बाकी असताना मुख्य रस्त्याजवळच्या पार्किंगमध्ये गाडी लावून आम्ही डायरी, मोबाईल, माईक घेऊन पुढे निघालो. पंढरपूरकडे जाताना दिंड्या दिसाव्यात तशी गर्दी सभास्थळाकडे जात होती. समोरच्याच्या खांद्यावर हात ठेवून, गळ्यात भगवे उपरणे, डोक्यावर पांढऱ्या आणि भगव्या गांधी टोपी घातलेले हजारो लोक चालत होते. याच गर्दीतून जाताना वेगवेगळ्या भागातल्या भाषेतील संवाद ऐकून हे कुठून आले असावेत याचा अंदाज लावण्याची प्रक्रिया डोक्यात सुरु होती.
गर्दीतून वाट काढत सभास्थळाजवळ गेलो. आधीच मैदान पाहून गेलो होतो, त्यामुळे दुसऱ्या दिवशी याच मैदानात दूरपर्यंत दिसणारे लोक पाहिल्यानंतर गर्दीचा अंदाज येत होता. मुख्य रस्त्यापासून आत जवळपास दोन ते तीन किमीच्या अंतरावर लाऊड स्पीकर लावून त्यावरुन सूचना देऊन गर्दीचं नियोजन केलं जात होतं. एका टँकरवर चढून उंचावरुन गर्दी पाहिली तर दूरवरपर्यंत डोक्यावर पांढऱ्या, भगव्या टोप्या घातलेली गर्दी दिसत होती. स्टेजसमोरच्याच एका ब्लॉकमध्ये महिलांसाठी जागा आरक्षित करण्यात आली होती आणि त्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला गोळा झालेल्या दिसत होत्या. वयोवृद्ध महिलांचीही संख्या यामध्ये मोठी होती. काही महिलांनी घरुन आणलेल्या बेसन, ठेचा भाकर खायला घेतल्या. त्यांच्याशी जावून संवाद साधला तेव्हा, "आमच्या पोरांसाठी, त्यांच्या नोकरी शिक्षणासाठी हे सगळं करतोय. शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला, मग आता आम्हाला न्याय का नाही?" ही एक साधी भावना दिसत होती. विशेषत: "मनोजदादाच मराठ्यांना आरक्षण देऊ शकत्यात, त्यामुळं त्यानला पाठिंबा द्यायला आलो" असंही या महिलांनी अगदी स्पष्ट सांगितलं. तिथेच बाजूला काही महिला आपल्या लेकरांना लहान बाळाला छत्रीखाली ठेवून दुध पाजताना दिसल्या.
सभा ऐकण्यासाठी बसावं म्हणून एका कोपरा पकडला. तिथून जरांगेंचं स्टेज आणि दुरपर्यंतची गर्दी स्पष्ट दिसत होती. बीडच्या माजलगावमधून आलेले एक बाबा भेटले. 'मी याआधी कुठल्याच सभेला गेलो नाही आणि 80 वर्षात अशी सभा झाल्याचंही ऐकलं नाही', असं ते बाबा म्हणाले."आरक्षण भेटलं तर नातवंडांना तरी नोकरी शिक्षण मिळल" अशी त्यांची भावना होती. स्टेजसमोर तयार केलेल्या रॅम्पवरुन कुठलंही सिनेमॅटीक म्युझिक न लावता, लोकांच्या टाळ्यांच्या गजरात जरांगेंची एन्ट्री झाली. सडपातळ शरिरयष्टी, थोडीशी दाढी आणि जरा जास्तच साधारण व्यक्तिमत्व असलेल्या या माणसाच्या हाकेवर सभास्थळी लाखो लोक जमले होते. आपल्या खास स्टाईलमध्ये मनोज जरांगेंचं भाषण झालं. भाषणातल्या त्यांच्या प्रत्येक वाक्यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या. पुन्हा एकदा आरक्षणाची मागणी करत 10 दिवसांत आरक्षण न मिळाल्यास 24 तारखेला पुढचा निर्णय घेऊ असं स्पष्ट केलं. पुढचं आंदोलन तीव्र असेल हे सांगताना अहिंसेच्याच मार्गानं लढण्याची शपथ देखील जरांगेंनी उपस्थितांना घातली. मैदानातून गाडीकडे परताताना जरांगेंच्या भाषणाबद्दल, त्यांच्या भूमिकेबद्दल लोकांना काय वाटलं हे जाणून घेण्यासाठी काही वृद्धांशी, तरुणांशी संवाद साधला. तेव्हा एका बाबांनी फार रागात व्यक्त होण्यास सुरुवात केली. मनोज जरांगे यांच्या भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं आणि पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, 'सगळे,आमदार,खासदार,नेते मराठ्यांचे, पण त्यांनी काहीच केलं नाही' हाच या सिनेमाचा क्लायमॅक्स आहे, असं मला वाटतं.
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त स्थिती, त्यामुळे बिघडत चाललेली शेतीची आणि शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था, जमिनीची पडत चाललेले वाटे यामुळे मराठवाड्यात लोकांमध्ये अनेक आर्थिक समस्या वाढत आहेत. जास्तीत जास्त शेतकरी, भुधारक हे मराठा असल्यानं मराठा समाजात ते प्रकर्षानं जाणवतंय. या सर्व गोष्टींमुळे नोकऱ्या मिळवण्याची स्पर्धा वाढतेय. या स्पर्धेत टीकण्यासाठी आरक्षण गरजेचं असं लोकांना वाटतंय. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीची तीव्रता ही मराठवाड्यात जास्त असल्याचं जाणवतं. कोपर्डी प्रकरणानंतर निघालेल्या मोर्चाची सुरुवात देखील मराठवाड्यातून झाली होती. त्यावेळी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षेची मागणी आणि आरक्षणाची मागणी अग्रस्थानी होती. मनोज जरांगेंच्या या लढयातून आरक्षण मिळेल का? ते शक्य आहे का? याची उत्तरं मिळणं कठीण आहे. परंतु मराठ्यांना त्यांचा खरा नेता मिळालाय.
ही सभा म्हणजे थेट प्रस्थापित मराठ्यांच्या विरुद्धचा एल्गार आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तिथल्या अनेकांच्या बोलण्यातून ते स्पष्टच दिसत होतं. यालाच दुजोरा देणारी काही चित्रं या सभेत दिसली. प्रवासाला सुरुवात केल्यापासून, पार्किंगपासून ते पुन्हा परत जाईपर्यंत एकही अलिशान कार या सभेला आलेल्या लोकांकडे दिसली नाही. सुरुवातील म्हटलं तसं पंढरपूरला जाणाऱ्या सर्वसामान्य वारकऱ्यांसारखीच माणसं इथे दिसत होती. नेते आणि त्यांचे चेलेचपाटे सुद्धा इथे दिसले नाही. हो पण काही नेत्यांनी रस्त्यात काही सुविधा पुरवत बॅनरवर लिहिल्याचं दिसलं. गोरगरिब मराठ्यांची मुलं, त्यांच्या घरातल्या महिला, तरुण मुलं, मुली या सगळ्यांची या सभेला मोठी गर्दी होती. तर दुसरीकडे काही ठराविक लोकांची अनुपस्थिती इथे प्रकर्षाने जाणवत होती. तेव्हा जरांगेंच्या एका भाषणातली क्लिप आठवली. "हे श्रीमंत मराठे लय आवघडहे...आता आंदोलनाला यायचे नाही, पण सर्टिफिकीट घ्यायला सगळ्या पुढं राहतीन..." असं जरांगे म्हणाले होते आणि यावेळी त्यांच्या या वाक्याची जाणीव इथे प्रकर्षाने झाली.
मराठा समाजानं अनेक राजकारणी, नेते या महाराष्ट्राला दिले. मात्र यामध्ये पार्श्वभूमी नसलेले, गरिब मराठा किती होते? हा प्रश्न महत्वाचा. जरांगेंच्या स्टेजवरील आयोजकांपैकी काही लोक सोडल्यास कुणालाच जागा नव्हती. नेतेमंडळींना सोडाच पण समन्वयकांनाही नाही. त्यामुळेच हे नेते, समन्वयक सभेत इथे दिसले नसावेत का? की जरांगेंच्या या आंदोलनात आपल्याला स्वार्थ साधता येणार नाही हे त्यांना माहिती असावं? असे अनेक प्रश्न सध्या पडत आहेत. कुणाच्याही पक्षाचं, नेत्याचं, संघटनेचं समर्थन न घेता, मनोज जरांगे या एकट्या माणसानं स्वत: च्या ताकदीवर हे जनआंदोलन उभं केल्याचं दिसतंय.त्यामुळे मराठ्यांना खऱ्या अर्थाने त्यांचा नेता मिळालाय असं म्हटलं तरी ते सध्याच्या घडीला वावगं ठरणार नाही. जो आक्रमक आहे, पण कट्टर नाही. जातीतील लोकांबद्दल प्रेम असणारा पण दुसऱ्या जातीचा द्वेष करणारा नाही. भारदस्त व्यक्तिमत्व नाही पण कुणासमोरही न झुकणारा आहे. बोलायला साधा पण षडयंत्र ओळखणारा आहे. त्यामुळे पुढच्या काळात आजवरचा सर्वात आश्वासक चेहरा म्हणून मनोज जरांगे यांना मराठा समाज आपला म्हणून नेता म्हणून स्वीकारेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आता जरांगेंनी त्यांची पुढची भूमिका स्पष्ट केलीये. अल्टिमेटम संपायाच्या आत आरक्षण दिलं नाही तर आमरण उपोषण करणार असल्याचा निर्धार त्यांनी केलाय. आता एकतर लढून अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठ्यांची विजय यात्रा निघेल असं म्हणताना अगदी सामान्य घरातला हा माणूस जर आता गरजवंत मराठ्यांचा नायक म्हणून उदयास येत असेल तर त्यावर मराठा समाज देखील नक्कीच विश्वास ठेवले यात शंका नाही.