26 जुलै 2005 ला बरोबर सोळा वर्षांपूर्वी चिपळूणात भयंकर पुराचं रौद्र रुप लोकांनी पाहिलं. त्यानंतर स्वप्नातही कल्पना केली नसेल अशी परिस्थिती चिपळूणवासियांवर उद्भवली. 22 जुलै 2021, गुरुवार नेहमीसारखाच दिवस उजाडला मात्र त्यानंतरचा दिवस न भूतो न भविष्यती असाच काहीसा होता. मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाच होता आणि कोकणासाठी मुसळधार पाऊस नवा नाही. सकाळी लवकरच घरी फोन झाला पण, आईचा सूर मात्र काहीतरी वेगळं सांगत होता. “अक्षरश: ढगफुटी व्हावी असा पाऊस झालाय, यावेळी आपल्याकडेही पाणी भरणार", असं ती म्हणून गेली.


त्यावेळी थोडी धास्तावले पण, स्वत:लाच धीर देत फोन ठेवला. व्हॉट्सअप स्टेटसला एकाचा व्हिडीओ पाहिला आणि जागीच खाली बसले. बहादूरशेख नाक्यामधील परिसरात संपूर्ण पाण्याचं साम्राज्य होतं, त्यामध्ये कार तरंगताना दिसत होत्या. कोकणात झालेल्या प्रचंड पावसामुळं खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, लांजा, रत्नागिरी या भागांना मोठा फटका बसला. चिपळूणकरांनी ती रात्र भयावह अंधार, सर्वत्र पूर आणि मदतीसाठी आस अशा परिस्थितीत काढली.


बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळं वाशिष्ठी व शिवनदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी गुरुवारी पहाटेपासूनच चिपळूण, खेर्डीमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली. या पाण्याने काही वेळातच रौद्र रूप धारण केलं. 26 जुलै 2005 च्या महापुरापेक्षा भयाण महापूर चिपळूणवासियांनी अनुभवला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ‘कोकणातील लोकांना पुराची आणि प्रमाणापेक्षा बाहेर पडणाऱ्या पावसाची सवय आहेच’ की हे वारंवार ऐकलंय. कदाचित याच विचाराने सर्वच स्थरातून कोकणाला गृहीत धरलं गेलं.


त्याचेच पडसाद यावेळी प्रशासनाच्या कृतीतून पाहायला मिळाले. सकाळी 10 वाजता जवळपास सर्वच वृत्तवाहिन्यांवर चिपळूणच्या पुराची परिस्थिती दाखविण्यात आली. खासदार विनायक राऊतांनी सकाळीच एनडीआरएफ पथकासाठी मुख्यमंत्र्यांना फोन केला असल्याची माहिती दिली. तरीदेखील एनडीआरएफचं पथक संध्याकाळी 6-7 च्या दरम्यान दाखल झालं, सर्वत्र अंधार पसरला होता. वीज, पाणी आणि घरात तुडुंब पाणी भरले असताना जीव मुठीत धरून चिपळूणकरांनी दिवस काढला. पाण्याच्या पातळीत वाढ होत होती आणि लोकांच्या नजरा लागल्या होत्या फक्त एका मदतीच्या हाताकडे! नौसेना, एनडीआरएफ तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील अनुभवी बचाव पथकांनी चिपळूणमध्ये धाव घेऊन अनेक कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले.


मात्र एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी उशीर झाला. काहींनी दिवस तर काहींनी संपूर्ण रात्र पुराच्या पाण्यात काढली. जीव वाचवण्यासाठी घरावरी पत्र्यांवरही जाऊन बसले. हळूहळू पुराच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने संपूर्ण चिपळूण शहराला पुराने वेढले. पूर इतका वाढला सुरुवातीला घरांमध्ये पाणी शिरले. कालांतराने काहींचे पहिले मजले तर काहींच्या घरातील पोटमाळ्यापर्यंत पाणी गेलं. स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी टेरेस गाठले. सुरुवातीच्या टप्प्यात तितकीशी यंत्रणा नव्हती. घरातील पाण्याची पातळी इतकी जास्त होती की, काहींना घराची कौलं फोडून बाहेर काढण्यात आलं. हे लिहिताना, फोटो-व्हिडीओ पाहताना वाटणारी भीती आणि त्याहीपलीकडे चिपळूणवासियांनी अनुभवलेला तो दिवस अंगावर काटा उभा करणारा आहे.


पण, ही वेळ का आली? मानवनिर्मित परिस्थिती नसली तरी मात्र, नैसर्गिक आपत्तींसाठी प्रशासन आणि व्यवस्था कितपत खंबीर होतं? आधी चक्रीवादळाचा फटका आणि आता पुरानं कोकणातील जनतेचं प्रचंड नुकसान झालंय. सकाळी साडेसात ते साडेआठ या एका तासात होत्यातं नव्हतं झालं. वरून कोसळणारा पाऊस, समुद्राला भरती आणि कोळकेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग... या एका तासात आठ ते दहा फूट पाणी बाजारपेठेत आलं. झालेल्या नुकसानामुळं आम्ही दहा वर्ष मागे गेले आहोत अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केलीये.


आयुष्यभर कष्ट करुन उभारलेल्या घराचं डोळ्यादेखत नुकसान झालं. आर्थिक नुकसान आहेच पण तितकचं भावनिकही आहे. चिपळूणवासियांच्या संतप्त भावना आहेत. त्याला पुरेशी कारणंही आहेत. चिपळूणकरांना धरणातील पाणी सोडणार असल्याची कल्पना देण्यात आली असली तरी, स्थलांतर करण्यासाठी लोकांना वेळ मिळाला नाही. स्थलांतर करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी शासनाचे नियोजन होते का? या पुरामध्ये कोरोना रुग्णांबाबत घडलेली घटना सर्वांत हृदयद्रावक होती. आठ कोरोना रुग्णांना या नैसर्गिक आपत्तीमुळे आपला जीव गमवावा लागला. शहरातील नगर परिषदेसमोरील अपरांत हॉस्टिपलमध्ये हे रुग्ण उपचार घेत होते. पाणी ओसरलं असलं तरी, अजुनही संघर्ष संपलेला नाही. याउलट संघर्ष सुरु झालाय. गाड्या, घरं, सामान, धान्य दुकानं, वस्तू, ऑफिस सर्वकाही पुराच्या पाण्यात वाहून गेलंय किंवा जे राहिलंय ते वापरण्याजोगं नाही. चिपळूण शहरातील परिस्थिती फारच भयावह होती. बहादूर शेख नाक्यावरील पुल कोसळला होता.


एनरॉलचा पूलसुद्धा खचलेला दिसला. गोवळकोट पुलावरूनही गाड्या जात नव्हत्या. पाणी ओसरलं मात्र शहरात सर्वत्र चिखल पाहायला मिळाला. अजूनही काही भागात स्वच्छतेचं, चिखल काढण्याचं काम सुरूच आहे. पुढील 2-3 दिवस अनेकांकडे पिण्याचे पाणी, वीज, रेंज आणि अन्न नव्हते. चिपळूणात पूर का येतो ? चिपळूण शहराच्या चारी बाजूंनी डोंगरांच्या रांगा आहेत आणि मधल्या खोलगट भागात हे शहर आहे. चिपळूणमध्ये जाताना घाट चढून जावे लागते. त्यामुळे पाऊस चिपळूणात पडल्यावर पाणी खोलगट भागात अर्थात चिपळूणातच येऊन साठते.


इथं दोन नद्या आहेत वाशिष्ठी नदी व गावाच्या मध्यातून वाहणारी शिवनदी. या नद्या गाळाने इतक्या भरून गेल्या आहेत की पाण्याचा निचरा होत नाही. त्यात अनेक ठिकाणी भराव घालून ईमारती उठविण्यात आल्या आहेत. कोळकेवाडी धरणातून सोडले जाणारे पाणी. ही काही प्रमुख कारणे आहेत त्यामुळे चिपळूणातच वारंवार पूरजन्य परिस्थिती ओढवते. वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढण्यावर प्रामुख्याने भर दिला गेला पाहिजे. शिवाय शहरात सुरू असणारं रस्त्याचं रुंदीकरणाचं काम आणि त्यासाठी आवश्यक ड्रेनेजची सोय याचा विचार व्हावा.


रस्ते आणि महामार्ग बांधताना पाण्याचे मार्ग अडवू नयेत. चिपळूणची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता पाण्याच्या निचरा होण्यासाठी नियोजन व्हावे. पाणी ओसरल्यानंतर शहरात दुर्गंधी, गाळ, चिखल दिसला. सध्या तिथं मदतीचं काम सुरू आहे. सोशल मीडियावरुन चिपळूणकर एकमेकांना आधार देत आहेत. अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावल्याअसून राज्यभरातून मदतीचा हात पुढे येतोय. मात्र तरीही सर्वकाही गमावलेल्या अनेकांना सुरुवातीपासून सुरुवात करावी लागणार आहे.


कोकणसाठी अतिवृष्टी नवी नाही तर, मग अशा नैसर्गिक परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या प्रसंगांसाठी बचाव कार्यालयाची आणि NDRF चं पथक हे कायमस्वरूपी कोकणात असावं. चिपळूणला पुन्हा उभं करण्यासाठी वेळ लागणार आहे. एकीकडे चौपदरीकरण, पुलाचं काम सुरू असल्याने चारही बाजूंनी चिपळूण आवळलं गेलंय. एरवी झुकतं माप घेणाऱ्या कोकणवासियांना यावेळी मात्र संपूर्ण साहाय्याची आणि आधाराची गरज आहे. येत्या काळासाठी सरकार आणि प्रशासनाकडून ठोस नियोजनाची अत्यंत गरज आहे. जनतेच्या मनात रोष आहे, आक्रोश आहे, मनस्ताप आहे. कोकणचा कॅलिफोर्निया कधी होईल सांगता येणार नाही. मात्र, कोकणचं नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी प्रयत्न व्हावेत ही अपेक्षा आहे.