कोरोना अजून त्याची कोणती रुपं दाखवणार आहे याबाबत विविध तर्क लढवण्यापलीकडे सध्या काहीच दिसत नाहीए. जो पर्यंत एखादी गोष्ट शास्त्रीय आधारावर सिद्ध होत नाही तोपर्यंत विज्ञान त्याला मान्यता देत नाही हे सर्वश्रुत आहे. जागतिक आरोग्य परिषदेने (डब्लू एच ओ) कोरोनाचे विषाणू हवेतून पसरू शकतात याची शक्यता वर्तविली आहे. या घटनेला तात्काळ प्रतिसाद म्हणून नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली जोडीला जगभरातील खरी-खोटी माहिती देणारं व्हॉट्सअॅप होतंच. जगभरातील 32 देशातील 239 वैज्ञानिकांनी याबाबतचे पुरावे जागतिक आरोग्य परिषदेकडे दिल्यानंतर या विषयवार चर्चा सुरू झाली. मात्र त्याचवेळी जागतिक परिषदेच्या सदस्यांनी याबाबतीतील काही पुरावे पुढे येत आहे मात्र ते अजूनही ठोस आहेतच असे नाही, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी उगीचच चुकीचा समज न करून घेता अनाठायी भीती न बाळगता मात्र सुरक्षिततेचे नियम पाळून आपला वावर ठेवला पाहिजे. त्यामुळे ते नक्कीच सुरक्षित राहतील आणि अशा या दाव्याचा सोयीनुसार अर्थ न काढता शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितले तर सर्वच प्रश्न निकाली पडतील.


दोन दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य परिषदेच्या, संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण विभागाच्या बेनेडेत्ता अल्लेग्रंझी यांनी सांगितले होते की काही तज्ञ कोरोनाचा प्रसार कशाप्रकारे होऊ शकतो त्यावर चर्चा करत असताना नाका-तोंडातून पडणाऱ्या द्रव्याचा आकार या मुद्द्यावर बोलत आहेत. त्यांच्यामते हा आजार हवेतून प्रसारित होऊ शकतो, असे काही पुरावे पुढे येत आहेत. मात्र ते अजूनही ठोस आहेतच असं नाही. त्याशिवाय याचा प्रसार सार्वजनिक स्थळी एखाद्या विशिष्ट प्रकारच्या वातावरणात म्हणजे गर्दीचे ठिकाण, हवा खेळती नसणारा परिसर, कोंदट-बंद अशा परिसरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे अनेक पुरावे अजून गोळा करण्यात येतील आणि त्यावर चर्चा करण्यात येईल. याकरिता उपाय म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे, घरात आणि कार्यालयही वातावरणात पुरेशी हवा खेळती राहण्याकरिता व्यवस्था असणे, सामाजिक अंतराचे पालन करणे आणि तोंडावर मास्क लावणे.


राज्याच्या आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात की, "पहिली गोष्ट म्हणजे कोरोनाचे विषाणू हवेतून पसरतात यावर अजून चर्चा सुरू आहे. साथीच्या आजारात अनेकवेळा काही प्रमाणात हवेचं योगदान असू शकतं मात्र हा फार छोटा अंश आहे. तोंडातून किंवा नाकातून पडणाऱ्या द्रवाचे आकारमान किती आहे यावर अनेक गोष्टी ठरत असतात. द्रवाचा आकार मोठा असेल तर खाली जमिनीवर पडेल आणि लहान असेल तर थोड्याफार प्रमाणात प्रवास करून हवेत तरंगून पडेल. तो किती काळ प्रवास करेल हे कुणी सांगू शकलेलं नाही. त्यामुळे पहिली गोष्ट तर यामुळे जराही घाबरण्याचे कारण नाही. यामुळे हवा वगैरे असं काही दूषित होत नाही आणि आतापर्यंत झालेली नाही. मात्र सगळे सांगतात तसंच काही झालं तरी सुरक्षितता महत्वाची आहे आणि ती सगळ्यांनीच घेतलीच पाहिजे."


ज्यापद्धतीने जागतिक आरोग्य परिषद, जे उपाय सुचवत आहे ते अगोदरपासूच आपल्या देशात, राज्यात, शहरात आणि सर्वच जिल्ह्यात अवलंबिले जात आहेत. आता काही लोक नियम पाळत नाही हा मुद्दा वेगळा आहे. या जागतिक आरोग्य परिषदेतील दाव्यांवर अधिक अभ्यास होण्याची गरज आहे. कारण नाका-तोंडातून पडणाऱ्या द्रव्याचे आकारमान मोठे असतील तर खाली जमिनीवर पडतील हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण द्रव्याचे बारीक कण जे सामान्यपणे डोळ्याला दिसत नाहीत, ते हवेत किती काळ तरंगत राहून ते किती दूरवर जाऊ शकतात याचा अभ्यास विस्तृतरित्या होणे गरजेचे आहे. जर असा अभ्यास पुढे आला तर, त्या प्रकारच्या प्रतिबंधात्मक सूचना नागरिकांना देणे शक्य होईल. सध्या तरी यावर शास्त्रीय आधारावर टिकतील अशा गोष्टी समोर आलेल्या नाहीत.


मुंबईच्या परळ येथील ग्लोबल रुग्णालयातील श्वसनविकार तज्ञ डॉ. समीर गर्दे सांगतात की," हा कोणता नवीन शोध आहे, जिवाणू आणि विषाणू हवेतून तर प्रवास करून इतरांना बाधित करतात. हे वर्षानुवर्षे चालत आलाय, असा काही शोध आहे की पूर्वी सहा फुटावरचा विषाणू, आता 30-40 फूट प्रवास करून लोकांना बाधित करणार आहे का? मला खरंच कळत नाही ही जुनी माहिती नव्याने का सादर केली जाते. पूर्वीपासून लोकांना ही माहिती आहे, म्हणून तर आपल्याकडे खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाकावर रुमाल ठेवा असे लहानपणापासून सांगण्यात येते. लोकं काही तुमच्या तोंडावर येऊन शिंकत किंवा खोकत नाही, काही अपवाद आहेच यामध्ये पण त्यामुळेच आपण कुणी खोकले-शिंकले की सावधान होतो आणि काही वेळा आपला रुमाल आपण तोंडावर लावतो. नाका-तोंडातून पडणारे द्रव जड असतील तर ते खाली पडतात आणि मग त्या पृष्ठभागाला हात लागला आणि तोच पुन्हा आपल्या चेहऱ्याला लागला की आपण बाधित होतो आणि हलके कण असतील तर काही वेळ हवेत तरंगतील. मला तरी वाटते यामध्ये कोणतीही नवीन माहिती नाही. लोकांनी आता घरात बसून पण मास्क लावायचं बाकी राहिलं आहे."


जागतिक आरोग्य परिषद यावर भाष्य करत आहे की, "कोरोनाचे विषाणू हवेतून पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी अधिक सतर्क राहिले पाहिजे. सुरक्षिततेचे जे नियम अगोदरपासूनच आहे त्याचं व्यवस्थित पालन केलं गेलं पाहिजे. नागरिकांनी सार्वजनिक स्थळी जाताना, कार्यालयात असताना लोकांशी सवांद साधताना तोंडावर मास्क ठेवणे बंधनकारक आहे. यामुळे ज्याला कोरोना असेल तो दुसऱ्यापर्यंत पसरणार नाही आणि आपल्या तोंडावर मास्क असल्यामुळे तो कोणाकडून आपल्याला होणार नाही, ही काळजी घेणे गरजेचे आहे. घरी आपल्याला लोकांबद्दलची माहिती असते त्यामुळे घरी एखाद्या वेळेस मास्क नाही वापरला तरी चालेल. मात्र घराबाहेर पडताना मास्क लावलाच पाहिजे. यामध्ये घाबरण्याची काहीच गरज नाही. सुरक्षिततेचे नियम हे आपल्यासगळ्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून आखून दिले आहेत. त्या नियमांचा आदर राखून प्रत्येकानेच त्याचे पालन केले पाहिजे." असे डॉ. शेखर मांडे सांगतात, ते सध्या काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थेवर महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.


सध्या तरी आपल्या देशात या दाव्याला घेऊन कुठलीही नवीन मार्गदर्शक तत्वे केंद्रीय आरोग्य विभागातर्फे किंवा राज्याच्या आरोग्य विभागातर्फे जारी करण्यात आलेली नाही. कारण आपल्या या दोन्ही विभागांनी यापूर्वीच जी काही मार्गदर्शक तत्वे दिली आहे त्याचे पालन केल्यास कुणालाही काही होणार नाही. त्यामुळे तूर्तास या हवेच्या दाव्याबद्दल न घाबरता सध्या तरी 'काय डेंजर 'हवा' सुटलीय' यावर प्रश्नचिन्हच आहे, येत्या काळात जर काही नवीन शोध लागलाच तर तो नागरिकांना कळेलच. मात्र त्यामुळे लोकांनी गाफील राहून चालणार नाही. सुरक्षिततेची सर्व काळजी नागरिकांनी घेतली तर असे कितीही दावे आले तरी त्याचा काही फरक पडणार नाही.