दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस ठरलाय आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा क्रिकेटर.


राजस्थान रॉयल्सनं मॉरिसवर तब्बल सव्वा सोळा कोटी रुपयांची बोली लावून, त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं. आयपीएलच्या लिलावात मॉरिसला मिळालेल्या चढ्या भावानं युवराजसिंगच्या नावावरचा सर्वात मोठ्या बोलीचा विक्रम मोडीत काढला. रॉयल चॅलेजर्स बंगलोरनं 2015 साली युवराजला सोळा कोटी रुपयांत विकत घेतलं होतं. ख्रिस मॉरिसनं युवराजच्या नावावरचा तो विक्रम पंचवीस लाखांनी आणखी उंचावला.


ख्रिस मॉरिसवर लागलेल्या विक्रमी बोलीचं वैशिष्ट्य म्हणजे राजस्थाननं त्याला 75 लाख या मूळ किमतीच्याही एकवीस पट अधिक रक्कम मोजली. खरं तर विराट कोहलीच्या बंगलोरनं मॉरिसला गेल्या मोसमासाठी दहा कोटीत विकत घेतलं होतं. युएईतल्या आयपीएलमध्ये त्यानं 11 विकेट्स काढून गोलंदाजीत समाधानकारक कामगिरी बजावली. पण फलंदाज म्हणून त्यानं निराशा केली होती. त्यामुळं बंगलोरनं मॉरिसला आपल्या कॉन्ट्रॅक्टमधून मोकळं करून नव्या लिलावात त्याला स्वस्तात विकत घेण्याची कॉर्पोरेट रणनीती आखली.


बंगलोरची ही व्यूहरचना ख्रिस मॉरिसचंच उखळ पांढरं करणारी ठरली. कारण मिनी ऑक्शनमध्ये फ्रँचाईझीना मोजक्याच जागा भरायच्या असतात. त्यासाठी त्यांच्यासमोर उत्तम पर्यायही मोजकेच असतात. त्यामुळं एक अनुभवी अष्टपैलू म्हणून ख्रिस मॉरिसचं नाव येतच, त्याच्यासाठी बंगलोर, मुंबई आणि राजस्थान या तीन फ्रँचाईझींमध्ये चढाओढ सुरु झाली. त्या चढाओढीत मॉरिसचा भाव दहा कोटीवर पोहोचला आणि बंगलोरला माघार घ्यावी लागली. त्यानंतर राजस्थाननं मुंबईवर कुरघोडी करून मॉरिसवर सव्वा सोळा कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली.


आयपीएलच्या या 'मिनी ऑक्शन'मध्ये न्यूझीलंडचा मध्यमगती गोलंदाज काईल जेमिसनची पाचही बोटं तुपात राहिली. जेमिसनची मूळ किंमत केवळ 75 लाख रुपये होती. पण लिलावातल्या चढाओढीत विराट कोहलीच्या बंगलोरनं त्याला 75 लाखांवरून 15 कोटी रुपयांचा रॉयल भाव दिला. आयपीएलच्या गेल्या मोसमात फ्लॉप ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेललाही बंगलोरनं सव्वा चौदा कोटीचा भाव दिला. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सवरचा भार हलका करण्यासाठी बंगलोरला मॅक्सवेलमध्ये गुंतवणूक आवश्यक होती.


ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनही दीड कोटीच्या मूळ किमतीवरून तब्बल 14 कोटी रुपयांचा मालक झाला. प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सनं त्याच्यावर यशस्वी बोली लावली. काईल जेमिसनसाठी त्याची सुपर स्मॅश लीगमधली, तर रिचर्डसनसाठी त्याची बिग बॅश लीगमधली कामगिरी कोटीच्या कोटी उड्डाणं करण्यासाठी लाभदायक ठरली.


भारतीय वीरांमध्ये कर्नाटकच्या कृष्णाप्पा गौतमच्या अष्टपैलू गुणवत्तेला सव्वा नऊ कोटींचा चढा भाव आला. कोलकाता आणि हैदराबादमध्ये गौतमसाठी झालेल्या चढाओढीत चेन्नई उशीरा दाखल झाली. पण लिलावाची बाजी त्यांनीच जिंकली. राजस्थानकडून पंजाबकडे आलेल्या गौतमवर गेल्या मोसमातही 6.20 कोटी रुपयांची घसघशीत बोली लागली होती. यंदा त्याला अष्टपैलुत्वामुळंच तीन कोटींनी जादा भाव आला.


यंदा मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी ट्वेन्टी गाजवणारा तामिळनाडूचा शाहरुख खान पंजाब किंग्सच्या ताफ्यात सामील झाला आहे. शाहरुख खानची मूळ किंमत जेमतेम वीस लाख रुपये होती. पण प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सनं सव्वा पाच कोटी रुपयांची बोली लावून, त्याच्यावर सव्वीस पटीनं अधिक विश्वास व्यक्त केला आहे. तीच बाब मूळच्या मुंबईच्या शिवम दुबेची. विराट कोहलीच्या बंगलोरनं त्यालाही आपल्या कॉण्ट्रॅक्टमधून मोकळं केलं होतं. आयपीएलच्या लिलावासाठी त्याची मूळ किंमत फक्त 50 लाख होती. पण राजस्थाननं शिवम दुबेवर 4.4 कोटी रुपयांची बोली लावली.


खरं तर आयपीएलच्या आगामी मोठ्या लिलावाआधीचा हा शेवटचा लिलाव होता. तरीही या लिलावात 57 खेळाडूंवर मिळून तब्बल 145.30 कोटी रुपयांची दौलतजादा करण्यात आली. याचं कारण आयपीएलच्या रणांगणात दोन वर्षांनी एक किंवा दोन नव्या फौजांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यावेळी सारी समीकरणं पुन्हा बदलणार आहेत. त्यामुळं यंदाच्या मोसमात आठही फ्रँचाईझी आयपीएलच्या विजेतेपदासाठी निकराचा प्रयत्न करणार आहेत. आणि त्या प्रयत्नांची सुरुवात आयपीएलच्या लिलावात दौलतजादा करुन झाली.