आज 'जागतिक महिला दिन'... आपल्या मातृशक्तीला सलाम करण्याचा दिवस. जगात नवनिर्मितीच्या सृजनाची शक्ती महिलांच्या ठायी आहे. यातूनच त्यांनी अनेक क्षेत्राला गवसणी घातली आहे. महिलांच्या कर्तृत्वाला कोणत्याच क्षेत्राच्या मर्यादा नाहीत. पंरतु, काही महिला मळलेल्या वाटा सोडत एखाद्या प्रवाहापलिकडचं क्षेत्र निवडतात. त्यांच्या कामानं समाज समृद्ध होतो, शिक्षितही होतो अन् त्यांचं काम 'चळवळ' होऊन जातं. 


आज आपण अशाच एका चाकोरीबाहेरचं काम उभं त्याला एका 'चळवळी'चं रूप देणाऱ्या तरूणीची ओळख करून घेणार आहोत. स्नेहल चौधरी-कदम असं तिचं नाव आहे. एखाद्या सामाजिक विषयातलं झपाटलेपण काय असतं याचं उदाहरण म्हणजे स्नेहल. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या या तरूणीनं या विषयावर जनजागृती करण्यासाठी लाखो रूपयांचं पॅकेज असलेली नोकरी सोडली. एकीकडे नव्या पिढीतील तरूणाई 'मी, माझं अन् पैसा'च्या मोहात पडत 'करियर ओरीएंटेड' होत असताना स्नेहलनं 'सोशल ओरिएन्टेशन' महत्वाचं मानत 'करियर'वर पाणी सोडलं. स्नेहल यांनी आतापर्यंत राज्यभरातील 40 हजारांवर मुली आणि महिलांना मासिक पाळीसंदर्भात जागृत केलं आहे. यासाठी त्यांनी 'क्षितीज फाऊंडेशन' या संस्थेची स्थापना केली. वेगळी वाट चोखाळत समाजाला जागृत आणि शिक्षीत करण्याच्या स्नेहलच्या या प्रयत्नांची राज्य, देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठी दखल घेतली जात आहे. 


भारतात आजही अनेक ठिकाणी मासिक पाळीला विटाळ आणि निषिद्ध मानलं जातं. आपल्या देशात याबद्दल प्रचंड मोठे गैरसमज आहेत. जवळपास सगळीकडेच यावर खुलेपणानं बोलणंही टाळलं जातं. मात्र, गेल्या दोन दशकांत यासंदर्भात चर्चा झडायला सुरुवात झाली आहे. या काळात महिलांसोबत कुटुंबियांच्या आणि समाजाच्या व्यवहार-वागण्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. त्यातून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न असणाऱ्या या मुद्द्याभोवतालचं मळभ काहीसं दुर व्हायला सुरुवात झाली. अन् या सकारात्मक आणि भगीरथ प्रयत्नांचे दृष्य परिणाम अलिकडे आता दिसायला सुरुवात झाली. 




त्यामुळेच अलिकडच्या काळात 'कुछ दाग अच्छे होते है' सारख्या 'टॅगलाईन'मुळे मासिकपाळीबद्दल समाज आता सामाजिक बदलांकडे जात असल्याचं सुखावह चित्र निर्माण झालं आहे. या वैचारिक क्रांतीच्या मुळाशी समाजात याबद्दल नेटानं प्रयत्न करणाऱ्या अनेकांचे प्रयत्न, सामाजिक बंड आणि जनजागृती आहे. त्यामुळेच कधीकाळी निषिद्ध समजल्या जाणाऱ्या विषयावर आता सार्वजनिक चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. शाळेतील अभ्यासक्रम, व्याख्यानं, चर्चासत्र आणि समुपदेशनातून ही चळवळ आता पुढे जात आहे. 
       
अन् 'ती'नं बदलली करियरची मळलेली पायवाट  


स्नेहल चौधरी या वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातल्या शेलूबाजार गावाच्या. याच गावात त्यांचं बालपण गेलं. बालपणापासून त्यांनी मासिक पाळी काळात ग्रामीण भागातील महिलांची होणारी कुचंबणा, दु:ख पाहिलीत. मासिक पाळी काळात ग्रामीण भागातील महिलांसोबत होणारा सापत्न व्यवहार, त्यांना तीन दिवस वाळीत टाकल्यासारखं आयुष्य जगावं लागत असल्याच्या गोष्टी स्नेहल यांच्या मनात खोलवर रूतल्या होत्या. त्यामुळेच मासिक पाळीबद्दलच्या समाजाच्या चुकीच्या आणि बुरसटलेल्या भावना, गैरसमज यामुळे त्यांना प्रचंड दु:ख होत होतं. साधारणत: बारावीत असतांना विद्यार्थ्यांवर अभ्यास, परीक्षा आणि पुढच्या शिक्षणाला प्रवेशाचा मोठा ताण असतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. असाच काहीसा ताण स्नेहल यांच्यावरही होता. यावेळी यातून बाहेर पडण्यासाठी स्नेहल गावातील अनाथाश्रमात जावू लागली. तेथील मुला-मुलींशी बोलू लागली. स्नेहलचं नियमित अनाथाश्रमात येणं, सहज गप्पा मारणं यातून तिच्यात आणि या मुलांत एक भावनिक नातं निर्माण झालं. यातील किशोरवयीन मुली आता त्यांच्या स्नेहलताईंशी मासिक पाळीबद्दलचे अनेक समज-गैरसमजांबद्दल चर्चा करायला लागल्यात. त्यांच्या प्रश्नातून स्नेहलने यासंदर्भात अधिक अभ्यास करणं सुरू केलं. शरीरशास्त्रांवरची अनेक पुस्तकं वाचलीत. युट्युबवरील अनेक व्हिडिओ बघितलेत, अनेक डॉक्टरांशी चर्चा केली. यातून स्नेहलचं मासिक पाळी संदर्भातील ज्ञान वाढत गेलं. 


आता ती मुलींना अधिक परिणामकारकरित्या या काळात घ्यायची काळजी, त्याबद्दलचे गैरसमज यावर मार्गदर्शन करायला लागली. आता स्नेहल हे विचार जाहीर भाषणांमधून अनेक शालेय कार्यक्रमाच्या व्यासपीठांवरून मांडायला लागली. पुढे बारावीनंतर स्नेहलनं यवतमाळच्या 'जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालया'तून 'सॉफ्टवेअर इंजिनिअर'ची पदवी घेतली. या शिक्षणाच्या काळातही तिची मासिक पाळीसंदर्भातील जनजागृतीचं काम थांबलेलं नव्हतं. वर्गातील मित्र-मैत्रीणींना सोबत घेत तिने यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक गावं पालथी घालत तेथील स्त्रिया, मुलींना बोलतं केलं. पुढे इंजिनियर झाल्यानंतर स्नेहलला वोक्हार्ट' या बहुराष्ट्रीय कंपनीत लाखो रूपयांचं पॅकेज असलेली नोकरी लागली. ती या कंपनीत 'महिला आणि बालकल्याण विभागा'ची भारताची विभागप्रमुख होती. मात्र, तिचं यात मन लागत नव्हतं. कारण, तिला मासिक पाळीसंदर्भातील समजांमूळे ग्रामीण भागातील महिलांचे होणारे हाल, ससेहोलपट आणि हाल अस्वस्थ करीत होते. त्यामुळे तिने नोकरी सोडत कायम याच विषयावर आयुष्यभर जनजागृती करण्याचं ठरविलं. तिच्या लाखोंची नोकरी सोडण्याच्या निर्णयाला घरून आणि जवळच्या नातेवाईकांकडून मोठा विरोध झाला. मात्र, आपलं ठरवलेलं ध्येय साध्य करण्याच्या विचारांवर स्नेहल ठाम होती. आता स्नेहलच्या कामाची 'क्षितीज' आणखी वाढणार होती. तिनं सोडलेली नोकरी एका मोठ्या चळवळ आणि विचारांची नांदी होती. 




'ति'च्या प्रयत्नांतून बदलत आहे समाजाचं मासिक पाळीबद्दलच्या विचारांचं 'क्षितीज' 


आठ वर्षांपुर्वी स्नेहल यांचे मासिक पाळीबद्दल जनजागृतीच्या चळवळीला सुरूवात झाली. कामाच्या सुरूवातीला 'क्षितीज गृप' या नावाने त्यांनी ग्रामीण भागात मासिक पाळीविषयक जनजागृती करायला सुरूवात केली. आधी या विषयावर मुली बोलायला काहीशा घाबरायच्या, लाजायच्यात. मात्र, हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. आता अलिकडे मुली या विषयावर न लाजता, बेधडक बोलायला लागल्यात. प्रश्न विचारत व्यक्त व्हायला लागल्यात. पुढे चार वर्षांपूर्वी त्यांनी 'क्षितीज फाऊंडेशन' या संस्थेची स्थापना करीत आपल्या कामाला व्यापक करण्याचा प्रयत्न केला. गेल्या सात वर्षांत स्नेहल यांनी महाराष्ट्रातील अनेक शाळा, महाविद्यालयं, गाव, वाडे आणि राज्यांमधून या जनजागृतीसाठी प्रवास केला. आपल्या भाषण आणि व्याख्यानांतून त्यांनी आतापर्यंत चाळीस हजार मुली आणि स्त्रियांमध्ये प्रत्यक्ष जात जनजागृती केली. 


'ब्लीड द सायलंस' चळवळीला जगभरातून पाठिंबा


मासिक पाळीबद्दल तरुणईला बोलतं करण्यासाठी त्यांनी 2016 मध्ये 'ब्लीड द सायलंस' (#bleedthesilence) ही चळवळ 'सोशल मीडियावर सुरू केली. या माध्यमातून मासिक पाळीला सन्मान आणि समाजमान्यता देण्याचा त्यांचा हेतू होता. त्यांनी मुलांना पण या चळवळीत सक्रीय सहभाग घेण्याचं आवाहन केलं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुलंही मोठ्या प्रमाणात यात सहभागी झालेत. ते या विषयावर बोलू लागलेत. त्यांचेही याबद्दलचे बरेच गैरसमज दूर होऊ लागलेत. 'ब्लीड द सायलंस' (#bleedthesilence) हा विचार 'सोशल मीडिया'वर चर्चेतला 'ट्रेंड' ठरला. 'हॅशटॅग' वापरत ब्लीड द सायलंस'(#bleedthesilence) या चळवळीची मोठी चर्चा देशासह जागतिक पातळीवर व्हायला लागली. 'बॉलिवूड' तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील मधील अनेक अभिनेते-अभिनेत्रींनी या चळवळीला पाठिंबा दिला. जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, प्रतिक्षा लोणकर, शुभांगी गोखले, अभिनेते जयंत वाडकर, सुयश टिळक, 'सख्या रे' मालिकेची टीम यांनी या चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. यासोबतच युरोप, फ्रांस, जपान, जर्मनी, थायलंड, अमेरिका आणि रशियासह इतर अनेक देशातील नागरिकांनीही याला मोठा पाठिंबा दिला. 


कुटूंबियांच्या सक्रीय पाठिंब्यानं विस्तारते आहे 'ती'ची चळवळ 


स्नेहल यांचं काम अन् त्यातून उभी राहिलेली चळवळ समाजाच्या प्रचलित विचारसरणीला छेद देणारी होती. त्यामुळे ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य घरातील मुलीनं मासिक पाळीबद्दल सार्वजनिक मंचावरून बोलणं ही गोष्ट मोठ्या धाडसाचीच होती. मात्र,स्नेहलच्या आई-वडिलांच्या खंबीर पाठिंब्यामुळे ती ही बंड करू शकली. शेलूबाजारला असतांना स्नेहलच्या या कामात तिच्या आई-वडिलांनी कधीच आडकाठी आणली नाही. अनेकदा लग्नानंतर सासरच्या मंडळींना न आवडणाऱ्या गोष्टींना मुरड घालावी लागते. मात्र, स्नेहल यांना त्यांच्या कामात सासरच्या मंडळींनी नेहमीच प्रोत्साहीत केलं. चार वर्षांपूर्वी स्नेहल यांचा विवाह पोलीस उपअधिक्षक सचिन कदम यांच्याशी झाला. सचिन कदम सध्या अकोला येथे शहर पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कदम यांची ओळख पोलीस खात्यात शिस्तप्रिय आणि मितभाषी अधिकारी अशी. कदम यांनीही लग्नानंतर आपल्या पत्नीच्या या आभाळभर कामाला प्रोत्साहित करीत हातभार लावला आहे. यासोबतच स्नेहल यांच्या 'क्षितीज फाऊंडेशन'ची 'टीम' ही अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या चळवळीच्या कामाच्या कक्षा रूंदावतांना दिसत आहेत. 


पुरस्कारांतून मिळाली कौतूकाची थाप 


स्नेहल यांच्या कामाची आता राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाऊ लागली आहे. या कामासाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारांमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा युवा पुरस्कार, 'समाज मानव पुरस्कार, 'एंबेसिडर ऑफ चेंज पुरस्कार', जागर पुरस्कार 2019, 'शुर तेजस्विनी पुरस्कार', द बेटर इंडिया पुरस्कार, प्रियदर्शिनी अवार्ड, युएसए मॅगझिनच्या 'द वंडर वूमन पुरस्कार', महाराष्ट्र शासनाचा 'जिल्हा युवा पुरस्कार' या पुरस्कारांचा समावेश आहे. 


नवा सक्षम आणि सुंदर भारत घडविण्यासाठी आपल्याला जुन्या काळातील बुरसटलेल्या चुकीच्या रूढी, परंपरांना मूठमाती देणे गरजेचे आहे. स्नेहलसारख्या नव्या पिढीच्या तरुणाईने आतापर्यंतच्या रुळलेल्या आणि मळलेल्या वाटा सोडत नव्या प्रयत्नांची क्षितीजं धुडाळणं गरजेचं आहे. यातूनच आपण एका विज्ञाननिष्ठ आणि माणुसकीची कास धरणारा समाज आणि भारताचा पाया घालू शकू. एका बुरसटलेल्या विचाराला नवतेचं लेणं देऊ पाहणाऱ्या स्नेहल चौधरी या रणरागिणीच्या आभाळभर कामाला 'जागतिक महिला दिना'ला 'एबीपी माझा'चा सलाम आणि शुभेच्छा!