अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 92 व्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवियत्री अरुणा ढेरे यांची सन्मानाने निवड करण्यात आली. आतापर्यंतच्या इतिहासात निवडणुकीद्वारेच पद मिळत होते. मूठभर लोक मतदान करायचे आणि मतांचा बाजार व्हायचा असा आक्षेप अनेक साहित्यकांनी यापूर्वी नोंदवला होता. कर्तृत्व प्रतिभा, साहित्य सेवा अशा कोणत्याच गुणांचा विचार न करता केवळ आणि केवळ मतांचे राजकारण ज्याला जमते असेच लोक निवडणुकीत उभे राहायचे. त्यामुळे कवी विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अशा अनेक मातब्बरांनी या निवडणुकीपासून आणि राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. बारा कोटी मराठी जनतेचे प्रतिनिधित्व करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ संमेलनाचा अध्यक्ष निवड करण्यासाठी हे सगळे मतदार साहित्यिक होते असंही नाही. त्यामुळे मतदान करणाऱ्याला आपण कोणाला मतदान करतोय याची जाण आणि भान नव्हते. तर केवळ अकराशेच लोक मतदान करत असल्यामुळे मोठी टीका टिप्पणी केली जात होती. काही ठिकाणाहून एकट्टा मतदान यायचे त्यामुळे ठराविकच लोकांची अध्यक्ष निवडण्याची एक प्रकारे मक्तेदारीच झाली होती. या सर्व प्रक्रियेवर मान्यवरांचा मोठा आक्षेप असायचा. दोन मतप्रवाह होते. मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवी अशी एक मागणी होती तर दुसरीकडे साहित्य संमेलनाचे पद हे सन्मानाने दिले जावे अशीही मागणी केली जात होती. गेली कित्येक वर्ष यावर खल सुरु होता.


पूर्वीची पद्धत बदलायची असेल तर साहित्य महामंडळाच्या घटनेमध्ये बदल करणे आवश्यक होते. गेली काही वर्ष साहित्य महामंडळामध्ये घटनेत बदल व्हावा यासाठी प्रयत्न सुरु होते मात्र त्याला यश येत नव्हते. महामंडळाच्या दहा घटक संस्थापैकी महाराष्ट्रातील चार घटक संस्था महत्वाच्या आहेत. त्या मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ आणि मुंबई साहित्य संघ. या चार घटक संस्थापैकी मुंबई आणि विदर्भ घटनादुरुस्तीच्या बाजूने होते. मराठवाडा विरोधात होता. मात्र महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साताऱ्यातील फलटण येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत सातारा जिल्ह्याच्य प्रतिनिधी आणि महामंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद निवडणुकीतून देण्याएवजी सन्मानाने द्यावे असा ठराव मांडला. तो ठराव परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी उचलून धरला. सर्व साहित्य संस्थाची मातृसंस्था महाराष्ट्र साहित्य परिषद असल्यामुळे आपण परिवर्तनाची भूमिका बजवायला हवी असे मत मिलिंद जोशी यांनी बैठकीत मांडले. रविंद्र बेडकिहाळ यांनी त्याला पाठिंबा दिला. सर्व सदस्यांनीही त्याला पाठिंबा दिला त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीत एकमताने निवडणुकीऐवजी सन्मानाने अध्यक्षपद दिले जावे असा ठराव मंजूर झाला.

घटनादुरुस्तीच्या दृष्टीने महाराष्ट्र साहित्य परिषदेचे हे पाऊल क्रांतिकारी आणि ऐतिहासिक ठरले. यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या नागपूर येथे झालेल्या बैठकीत बहुमताने घटनादुरुस्ती मंजूर झाली. या घटनादुरुस्तीसाठी महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी आग्रही होते. घटनादुरुस्ती मंजूर झाल्यानंतर सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण करुन, ही घटनादुरुस्ती मुंबईच्या धर्मदाय आयुक्त कार्यालयात पाठवण्यात आली. ही सर्व प्रक्रिया एका बाजूला सुरु असताना संमेलनाच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. परंतु घटनादुरुस्ती झाल्यामुळे यंदाच्याच वर्षीचे अध्यक्षपद हे सन्मानानेच द्यावे अशी मागणी सातत्याने सातारा जिल्ह्याने श्रीपाद जोशी यांच्याकडे केली होती. त्यानंतर श्रीपाद जोशी यांनी निवडणुकीची प्रक्रिया रद्द केल्याची घोषणा केली आणि सर्व घटक संस्थाकडून संमेलन अध्यक्ष निवडण्यासाठी नावे मागवली. महाराष्ट्रातील प्रमुख चार घटक संस्थांना प्रत्येकी तीन नावे देण्याचा अधिकार आहे त्या चारही घटक संस्थाकडून प्रत्येकी तीन अशी बारा नावे मागवली गेली. महाराष्ट्राबाहेरच्या सहा घटक संस्थाना प्रत्येकी एक नाव देण्याचा अधिकार असल्याने अशी सहा नावे आली. ज्या ठिकाणी संमेलन होते त्या ठिकाणच्या संस्थेला एक नाव देण्याचा अधिकार आहे आणि विद्यमान अध्यक्षांना एक नाव देण्याचा अधिकार आहे. अशी दोन्ही निमंत्रक संस्था आणि विद्यमान अध्यक्ष यांनी प्रत्येकी एक अशी एकूण वीस नावांची यादी आली. या वीस नावांपैकी मराठवाडा साहित्य परिषदेत आपली तीन नावे सभेपूर्वीच मागे घेतली. त्यामुळे बैठकीत सतराच नावे चर्चेत राहिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेने तीन नावांपैकी अरुणा ढेरे यांचे नाव पुढे केले. महाराष्ट्राबाहेरील इतर दोन संस्थानीही अरुणा ढेरे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी पुढाकार घेऊन मुंबई आणि विदर्भाच्या संस्थांना अरुणा ढेरे यांच्या नावाला पाठिंबा द्यावा असा आग्रह धरला होता.

बैठकीच्या आदल्या दिवशी अरुणा ढेरे ह्या सर्वसंम्मतीने अध्यक्ष होतील याची खात्री मिलिंद जोशी यांना झाली होती. त्यामुळे उदयपूर येथे कार्यक्रमासाठी गेलेल्या अरुणा ढेरे याच्याशी संपर्क साधून सन्मानाने तुमच्या नावाचा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही तुमची अनुमती द्यावी अशी विनंती अरुणा ढेरे यांना मिलिंद जोशी यांनी केली. अरुणाताई यांनी मिलिंद जोशी यांना धक्काच दिला. अरुणाताई यांनी त्यांना नम्रपणे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. संमेलनामध्ये होणारे आरोप-प्रत्यारोप, राजकारण, वादविवाद यामध्ये आपण पडायला नको आणि एवढे मोठे पद जरी मला सन्मानाने मिळत असेल तरी ते मला स्वीकारायला संकोच वाटतो, असे त्यांनी सांगितले. मिलिंद जोशी यांनी त्यांचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्या आपल्या नकारावर ठाम राहिल्या. त्यानंतर रात्री मिलिंद जोशी आणि विनोद कुलकर्णी यांनी त्या विषयावर चर्चा केली. ताईंनी दिलेला नकार हा आपण बैठकीत मांडायचाच नाही, अशी भूमिका या दोघांनी घेतली. महामंडळावर जर अरुणाताईंच्या नावावर एकमत झाले तर पुन्हा महामंडळ त्यांना विचारेल आणि त्यावेळी जर त्यांनी नकार दिला तर त्यांचे पुन्हा आपण मन वळवण्याचा प्रयत्न करुया, असाही निर्णय झाला. घाईघाईत आपण कुठलीही भूमिका घ्यायला नको असा निर्णय घेतला.

दुसऱ्या दिवशी रविवारी बैठक झाली. बैठकीत विनोद कुलकर्णी यांनी 91 वर्षात फक्त चारच महिलांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे, महिला निवडणुकीपासून लांब राहतात, त्यामुळे महिलांना हे पद द्यावं अशी जोरदार मागणी केली. त्याला सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. एकूण तीन नावावर चर्चा झाली. त्यामध्ये अरुणा ढेरे यांच्या नावावर एकमत झाले. त्यावेळी श्रीपाद जोशी यांनी अरुणा ढेरे यांना बैठकीतूनच फोन लावला आणि स्पीकर ऑन करुनच त्यांची संमती विचारली. त्यावर अरुणाताई यांनी सर्वच उपस्थित सदस्यांना आश्चर्याचा धक्का दिला. अध्यक्षपद स्वीकारण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. श्रीपाद जोशी यांनी त्यांची विनवणी केलीच, शिवाय त्यांना दहा मिनिटाचा वेळ देऊन तुम्ही पुन्हा विचार करावा अशी विनंती केली. त्यानंतर मिलिंद जोशी आणि विनोद कुलकर्णी यांनी त्यांच्याशी सातत्याने फोनवर संपर्क साधला. त्यावेळी मिलिंद जोशी यांच्याशी ते बोलले. संधी गमावू नका आणि तुम्ही पद मागितलेले नाही,. आम्ही तुम्हाला हे पद सन्मानाने देत आहोत. यात कोणते राजकारण नाही, अशी विनंती केली. अखेर मिलिंद जोशी यांच्या प्रयत्नांना यश आले आणि अरुणाताई यांनी मिलिंद जोशी यांच्या मोबाईलवर मॅसेजद्वारे आपला होकार कळवला. हा होकार बैठकीत सांगताना मिलिंद जोशी यांना आपले आनंदाश्रू अनावर झाले आणि बैठकीतला सगळा माहोलच बदलला आणि अरुणाताई यांच्या निर्णयाच महामंडळांच्या सर्व सदस्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्याच्या तिन्ही प्रतिनिधिंनी अरुणा ढेरे यांचे नाव महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सुचवले होते. त्यामुळे दोन वेळा नकार आणि शेवटी होकार असे साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीचे रहस्य उलगडले.