जे स्वप्न मी गेली १० वर्ष म्हणजे बुद्धिबळ खेळायला सुरुवात केल्यापासून पाहत होतो, ते आता मी जगतोय. विश्वविजेता बुद्धिबळपटू डी.गुकेशचे हे बोल. 


गुरुवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास भारतात सूर्य अस्ताला जात असतानाच भारतीयच नव्हे तर जागतिक बुद्धिबळाच्या क्षितिजावर नव्या विश्वविजेत्याचा उदय झाला. त्याचं नाव डोम्माराजू गुकेश. 


सिंगापूरला झालेल्या विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत गुकेशने चीनच्या चिवट डिंग लिरेनचा पराभव केला आणि तमाम भारतीयांची छाती अभिमानाने फुलून आली. तब्बल १२ वर्षांनी म्हणजे २०१२ नंतर भारताला पुन्हा विश्वविजयाचा आनंद मिळाला. याआधी २०१२ मध्ये विश्वनाथन आनंदने ही पताका फडकवली होती. त्याच आनंदच्या अॅकॅडमीत बुद्धिबळाच्या चाली शिकत गुकेशने चौसष्ठ चौकटींचा राजा होण्याचं स्वप्न साकारलं. तेही वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी. सातव्या वर्षी या पटावर पहिली चाल खेळणाऱ्या गुकेशने ११ वर्षात या पटावरचं सम्राटपद मिळवलं. डॉक्टर वडील आणि मायक्रोबायॉलॉजिस्ट आईची भक्कम साथ लाभलेल्या गुकेशने कमाल केली.


स्टॅमिना वाढवण्यासाठी त्याने टेनिसची कास धरली. तर, एकाग्रतेसाठी कठोर योगाभ्यास तो करतोय. त्याची टीम,  त्याचे आईवडील त्याच्या दिमतीला आहेतच.


याशिवाय या मानसिक युद्धाच्या खेळामध्ये त्याला मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अप्टन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. ते म्हणतात, एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये नवोदित खेळाडू चुकीच्या पद्धतीने विचार करतात त्यांना असं वाटतं काहीतरी वेगळं आणि विशेष करून दाखवायला हवं. खरंतर त्याची गरज नसते. गरज असते ती सातत्यपूर्ण खेळाची. आजपर्यंत जे करत आलात ते सर्वोत्तम करण्याची. एकावेळी एका चालीचाच विचार करायचा इतकं साधं सरळ सूत्र त्यांनी गुकेश समोर ठेवलेलं... या लाख मोलाच्या सल्ल्याने गुकेशला विश्वविजयाच्या शिखरापर्यंत न्यायला किती मदत झाली असेल हे वेगळं सांगायला नको. विशेष म्हणजे हेच अप्टन 2011 मध्ये धोनीच्या भारतीय टीमने जेव्हा वर्ल्डकप जिंकला तेव्हा भारताच्या टीमचेही मानसिक स्वास्थ्य प्रशिक्षक होते. तर याच अप्टन यांनी भारताचा दिग्गज गोलकीपर श्रीजेश यालाही गाईड केलंय. चॅम्पियन खेळाडूंना मानसिक युद्धात तरबेज करण्याची हातोटी अप्टन यांच्याकडे आहे. ज्याचा गुकेशलाही खूपच फायदा झाला.






गुकेशच्या विश्वविजयी कामगिरीनंतर दोन चॅम्पियन खेळाडूंनी त्याची पाठ थोपटलीय. सचिन तेंडुलकर म्हणाला, गुकेशने प्रेरणादायी कामगिरी करत एक असं दार उघडलंय, जिथे जग पादाक्रांत करण्याचं स्वप्न तुम्ही साकार करु शकता. 


तर, विश्वनाथन आनंद म्हणाला, भारतासाठी, माझ्या अॅकॅडमीसाठी आणि माझ्यासाठी हा खूप मोठा क्षण आहे.


विश्वविजय साकारल्यावर गुकेशने आपल्या भावनांना डोळ्यातून वाट करुन दिली. त्याच्या आनंदाश्रूंमधूनच उद्याच्या विजेत्यांचं बीज रोवलं जावं आणि त्याच्या याच अश्रूंच्या सिंचनातून अशीच कसदार विश्वविजयाची फळं आपल्याला चाखायला मिळावीत, याच अपेक्षा. गुकेशचं अभिनंदन करुया आणि ज्या शिखरावर तो पोहोचलाय तिथे अनेक वर्ष राज्य करण्यासाठी त्याला शुभेच्छाही देऊया.