क्रिकेटवेड्या भारतात कोट्यवधीजण क्रिकेट पाहतात, तर तितकेच क्रिकेट खेळतातही... आपल्यापैकी क्रिकेट खेळणाऱ्या अनेकांना लहानपणी एकदातरी आपण पण टीम इंडियाकडून खेळलो तर...असा विचार आलेलाच असतो. पण सव्वाशे कोटी लोकसंख्येतून सामना खेळणारे 11 जणच असतात, त्यामुळे किती रेस आणि कॉम्पीटीशन आहे, हे सांगायची गरज नाही. पण याच कोट्यवधी लोकसंख्येत एका पोरानं टीम इंडियाकडून खेळायचं स्वप्न पाहिलं आणि जीव तोडून कष्ट करुन फक्त आणि फक्त  मेहनतीच्या जोरावर टीम इंडियामध्ये संधी मिळवली आणि आज भारताच्या वेगवान गोलंदाजीचं भविष्य म्हणून उभा आहे अर्शदीप सिंह...


5 फेब्रुवारी 1999 रोजी मध्य प्रदेशच्या गुना या छोट्या शहरात अर्शदीपचा जन्म एका शीख परिवारात झाला. वडील सीआयएसएफ जवान असल्यानं फिरतीची नोकरी होती. अर्शदीप थोडा मोठा झाला आणि वडिलांची पोस्टींग मोहालीला झालं. अर्शदीपचे वडील दर्शन सिंग हे देखील चंदीगडकडून डिस्ट्रीक्ट लेव्हरपर्यंत क्रिकेट खेळल्याने अर्शदीपला घरातूनच क्रिकेटचं बाळकडू मिळालं होतं. वडिलांनी लहानपणीच अर्शदीपमधलं टॅलेंट पाहिलं. गोलंदाजी करताना अर्शदीपचा रनअप, त्याची इनस्वींग गोलंदाजी पाहून त्यांनी त्याला प्रोफेशनल क्रिकेट खेळण्यासाठी चंदीगडच्या सेक्टर 19 मधील गव्हर्नमेंट मॉडेल सेकेंडरी स्कूलच्या क्रिकेट अकादमीत टाकलं. पण हवा तसा गेम होत नव्हता, त्या अकादमीत सोयी-सुविधाही अधिक नव्हत्या. मग कोणाच्या तरी सांगण्यावरुन दर्शन सिंग यांनी अर्शदीपला सेक्टर 36 मधल्या गुरुनानक पब्लिक स्कूलच्या क्रिकेट अकादमीत घातलं. तिथं कोच जसवंत राय यांनी अर्शदीपमधलं टॅलेंट हेरलं आणि त्याला ट्रेन करायला सुरुवात केली.  स्कूल, अंडर 16 क्रिकेटमध्ये अर्शदीप चांगली कामगिरी करत होता. पण मी आधीच बोलो तसं कोट्यवधींची रेस असणाऱ्या भारतात चांगली कामगिरी नाही तर एक्स्ट्रा ऑर्डनरी कामगिरी केल्यावरच टीम इंडियात संधी मिळू शकते. त्यात बघता बघता 2017 उजाडलं आणि अर्शदीपकडे अंडर 19 संघात खेळण्यासाठी कमी वेळ राहिला होता. त्यामुळे त्याच्या भविष्याचा विचार करत वडिलांनी त्याला मोठ्या भावाकडे कॅनडाला पाठवण्याचा विचार केला. 


पण तेव्हाच अर्शदीपनं वडिलांकडं 1 वर्ष मागितलं आणि त्यानंतर जे झालं ते आपण सारेच पाहत आहोत. सर्वात आधी अर्शदीपनं डीपी आझाद ट्रॉफीत चंदीगड संघाकडून खेळत केवळ 5 मॅचमध्ये 19 विकेट्स घेतल्या. मग पंजाब संघातून खेळत विनू मांकड स्पर्धेत दमदार कामगिरी केली. डॉमेस्टीक क्रिकेटमध्ये कमाल कामगिरी करत अखेर इंडिया अंडर 19 संघात प्रवेश मिळवला. हा पृथ्वी शॉ कर्णधाार असणारा संघ होता. ज्याने 2018 मध्ये विश्वचषक उंचावला पण स्पर्धेत अर्शदीपला जास्त संधी मिळाली नव्हती. 


मग अंडर 19 नंतर टीम इंडियामध्ये एन्ट्रीसाठी सुवर्णसंधी म्हणजे आयपीएल...2019 आयपीएलमध्ये 20 लाखांच्या बेस प्राईसला पंजाब संघानं अर्शदीपला घेतलं. 16 एप्रिल 2019 ला राजस्थान विरुद्ध तो पहिला आयपीएल सामना खेळला..  2019-20 मध्ये त्याने खास कामगिरी केली नाही पण डेथ ओव्हरमध्ये तो चुनूकदार कामगिरी करतच होता. त्यानंतर 2021 आयपीएल मध्ये त्यानं चांगल्या इकॉनॉमीनं 12 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या. आता ही कामगिरी साधारण असली तरी डेथ ओव्हरमध्ये त्याची इकॉनॉमी 7.58 इतकी होतीजी इतरांच्या तुलनेत अतिशय उत्तम होती. केवळ स्टार गोलंदाज बुमराहच 7.38 च्या इकॉनॉमीने त्याच्या पुढे होता. त्यामुळे भारताला बुमराहसह एक आणखी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मिळेल अशा आशा व्यक्त केल्या जाऊ लागल्या. आयपीएल 2022 मध्ये उत्तम कामगिरीनंतर अखेर तो दिवस उजाडला. अर्शदीप आणि त्याच्या कुटुंबाची मेहनत रंगाला आली आणि जून 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका सिरीजसाठी अर्शदीप टीम इंडियात आला. पण त्याला अंतिम 11 मध्ये स्थान मिळालं नाही. आयर्लंडविरुद्धही त्याला संधी मिळाली पण अंतिम 11 मध्ये तो दिसला नाही. अखेर जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध अर्शदीप मैदानात उतरला आणि  पहिल्या टी-20 सामन्यात 3.3 ओव्हर टाकत त्यानं  केवळ 18 रन देत महत्त्वाचे दोन विकेट्स घेतले. यावेळी त्यानं पहिलीच ओव्हर मेडन टाकत क्रिकेट जगतात दणक्यात एन्ट्री केली.  


मग काय त्यानंतर भारतीय स्कॉडमध्ये खासकरुन टी20 मध्ये अर्शदीप संघात आहे, टी20 वर्ल्डकपमध्येही स्टार बॉलर बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आणि अर्शदीपवरच डेथ ओव्हर्सची जबाबदारी आली. जी त्यानं अगदी चांगल्याप्रकारे निभावली देखील. त्यामुळे आता हाच अर्शदीप भारताचं वेगवान गोलंदाजीचं भविष्य असणार हे नक्की...