लखनौच्या (Lucknow) मैदानात रोहितसेनेने (Rohit Sharma) आपलं रोम रोम शहारुन टाकणारा विजय साकारलाय. 229 चा स्कोर सध्याच्या टी-ट्वेन्टीच्या जमान्यात फार काही मोठा नसतो. तरीही या खेळपट्टीतले निखारे आणि भारतीय गोलंदाजांचा अंगार यामुळे इंग्लिश (England Cricket Team) फलंदाजी भाजून निघाली, होरपळून निघाली. 229 चा स्कोर गाठताना त्यांना तब्बल 100 धावा कमी पडल्या. विली, वोक्स आणि कंपनी गोलंदाजी करताना त्यांना मिळत असलेला बाऊन्स, वेग पाहता या खेळपट्टीवर 250 चं लक्ष्यही गाठताना नाकात दम येईल असं वाटत होतं. त्यात रोहित वगळता भारताची आघाडीची फळी कोसळली. कोहली चक्क शून्यावर बाद झाला. ही ब्रेकिंग न्यूज होती. त्याच्या या अपयशानंतर पुढच्या सामन्यांमधल्या संघांची काही धडगत नाही असंच दिसतंय. श्रेयस अय्यरने जणू विकेट फेकण्याचा चंगच बांधलेला दिसतोय. पुन्हा एक अवसानघातकी फटका त्याने मारला आणि तोही परिस्थिती प्रतिकूल असताना. त्याने या सामन्यातली रोहितच्या फलंदाजीची कॅसेट पाहावी. तिसऱ्या ओव्हरमध्ये एक चौकार, एक षटकार ठोकत रोहितने इरादे स्पष्ट केले होते. पण, आजुबाजूचे सहकारी साथ सोडू लागल्याने त्याने लगेच गाडीचा गीयर चेंज केला.
मान खाली घालून एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला. त्याच वेळी खराब चेंडूंना त्यांची जागा दाखवली. त्याच्या 101 चेंडूंमधील 87 धावांना शतकापेक्षा जास्त मोल आहे. तिच गोष्ट राहुल आणि सूर्यकुमारची. दोघंही मोठे फटके खेळत धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात बाद झाले. पण, त्यांच्या 39 आणि 49 धावांनी संघाला 229 पर्यंत नेलं. इंग्लंडच्या विली, वोक्स आणि कंपनीने मात्र आतापर्यंत चौकार, षटकारांवर पोट भरणाऱ्या भारतीय फलंदाजांना एकेरी-दुहेरी धावांवरच भूक भागवावी लागेल, असा परफॉर्मन्स दिला. याही स्थितीत रोहितचे 10 चौकार, 3 षटकार सुवर्णमोलाचे आहेत. याचं कारण रोहितने मारलेल्या चौकारांची आणि अख्ख्या इंग्लंड टीमच्या फलंदाजांनी मारलेल्या एकत्रित चौकारांची संख्या सेम आहे ती म्हणजे 10. असं असलं तरीही 230 चं लक्ष्य गाठताना इंग्लंडने सुरुवातही झोकात केलेली.
5 षटकांत 30 धावा फलकावर होत्या. त्याचवेळी बुमराने मलानला डाव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूच्या जाळ्यात ओढलं आणि इंग्लंडला पहिला सुरुंग लागला. पुढच्याच चेंडूवर रुटला त्याने पॅव्हेलियनचा रुट दाखवला. हा ड्रीम बॉल होता. दुसऱ्या एन्डने सिराजला धावाही जातायत आणि विकेटही मिळत नाहीये, असं दिसल्याने रोहितने तात्काळ शमीला आणलं. जसा या सामन्याचा अपवाद वगळता कोहली किंवा सलामीवीर कर्णधार रोहित पॅव्हेलियनमध्ये सेट होऊन फलंदाजीला उतरतायत असं वाटतंय. तसं शमी पॅव्हेलियनमध्येच रनअप घेऊन इथे गोलंदाजी करतोय, अशा फॉर्मात कमाल सातत्य दाखवतोय. शमीच्या आजच्या स्पेलने भारतीय वेगवान मारा किती ताकदवान आहे, याची पुन्हा एकदा प्रचीती दिली. बोलर्स हंट इन पेअर्स असं म्हणतात, नेमकं तेच शमी-बुमराने करुन दाखवलंय.
लखनौच्या खेळपट्टीवर नागासारख्या डसणाऱ्या आपल्या वेगवान गोलंदाजांच्या चेंडूंनी इंग्लंडच्या फलंदाजांना दंश केला आणि धारातीर्थी पाडलं. प्लॅन करुन विकेट काढणं म्हणजे काय हे शमीने आज स्टोक्सची विकेट काढत दाखवून दिलं. डाव्या आणि उजव्या फलंदाजांना लागोपाठच्या चेंडूंवर गोलंदाजी करताना शमी, बुमरा जी अचूकता दाखवतायत, वेगातलं वैविध्य, चेंडूंमधलं वैविध्य दाखवतायत ते कमाल आहे. वेगवान आणि स्विंग माऱ्यावर पोसलेल्या फलंदाजांची आपले वेगवान गोलंदाज त्रेधातिरपीट उडवतायत हे चित्र सुखावह होतं. फिरकीपटूंचीही त्यांना छान साथ लाभतेय. जडेजाने काढलेली वोक्सची विकेटही अभ्यासपूर्ण होती. कुलदीपने मात्र बटलरला मामा केला.
गोलंदाजांच्या जमलेल्या या भट्टीने इंग्लिश आर्मीच्या फलंदाजीची चव घालवली आणि 229 चा स्कोर 250 प्लसचा भासवला. या स्पर्धेत सलग पाच वेळा धावांचा पाठलाग केल्यानंतर आपण पहिल्यांदाच धावांचं संरक्षण करत होतो. गेले पाच सामने फलंदाजांच्या बळावर जिंकल्यानंतर आता गोलंदाजांनीही मॅचविनिंग परफॉर्मन्स दिलाय तेही लक्ष्य माफक असताना. धावांची छोटी टेकडीही गोलंदाजांच्या अफलातून कामगिरीमुळे आणि रोहितने केलेल्या गोलंदाजीतील कल्पक बदलांमुळे मोठ्या डोंगरासारखी भासली आणि इंग्लंडचा आत्मविशास आपण त्याखाली चिरडून टाकला, रोहितसेनेने आता दिमाखात सेमी फायनलकडे आणखी एक पाऊल टाकलंय. सहा सामने जिंकलेत, पाच बाकी आहेत. म्हणजे सेमी फायनल आणि फायनलसकट म्हणतोय हा. आता थांबायचंय ते 19 नोव्हेंबरला विश्वचषक उंचावूनच.