वेसण, आक्रमण, चुरस, आनंदाची उधळण. भारत-न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खेळातले हे चारही रंग पाहायला मिळाले. टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणाऱ्या न्यूझीलंडला आपल्या फिरकीने वेसण घातली आणि २५१ वर रोखलं. नंतर रोेहितने पहिल्याच ओव्हरपासून गियर टाकत न्यूझीलंडची गोलंदाजी फोडून काढली. लक्ष्य फार मोठं नव्हतं. तरीही रोहितने फेरारीच्या स्पीडने गाडी चालवली. किवींच्या कोणत्याही गोलंदाजाचा सिग्नल त्याने जुमानला नाही. गिलसह त्याच्या १०५ धावांच्या सलामीने किवी टीमला बॅकफूटवर पाठवलं. पुढे खेळपट्टी फिरकीचे रंग दाखवू लागली. त्यामुळे या भागीदारीचं मोल मोठं आहे. गिल पाठोपाठ विराट आऊट झाल्यावर किवींच्या आव्हानात थोडी धुगधुगी निर्माण झाली. त्यात एखाद-दोन ओव्हर्स कमी रन्सच्या गेल्याने रोहितनेही रवींद्रला पुढे येत आक्रमक फटका खेळण्याच्या नादात आपली विकेट गमावली. तेव्हा ब्लडप्रेशर १२०-८० वरुन वाढू लागलं. सामना सी-सॉ होणार की काय आणि किवी कमबॅक करतायत की काय, असं वाटू लागलं. इथे आपले मधल्या फळीतले दोन हीरो ज्याचं पाहिजे तेवढं कौतुक झालं नाहीये, त्यांनी वर्चस्वाचा झेंडा आपलाच राहील याची पुरेपुर दक्षता घेतली. हे दोन हीरो म्हणजे श्रेयस आणि राहुल. अगदी मोक्याच्या क्षणी भागीदारी करत, काही वेळा जोखमीचे फटके खेळत त्यांनी न्यूझीलंडच्या आशांवर पाणी फेरलं. अर्थात एखाद-दोन वेळा दक्ष न्यूझीलंडकडून सुटलेल्या कॅचेसचीही आपल्याला मदत झाली, पण, खेळात अशा गोष्टी होत असतात. आपल्याकडूनही काही कॅचेस सुटले होते. हल्लीच्या क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहता असे कॅचेस सुटणं अपेक्षित नसतं. तरीही खेळाचा एक भाग म्हणून आपल्याला तो स्वीकारावा लागेल.


धावगती सहाच्या आसपास असल्याने मोठे फटके खेळणं गरजेचं नव्हतं. तरीही आपल्या काही विकेट्स टोलेबाजीच्या मोहात आपण गमावल्या. अर्थात तशा फटक्यांच्या मोहात आपल्याला पाडणाऱ्या झुंजार किवी टीमलाही याकरता गुण द्यावे लागतील. आपल्या फलंदाजीतली खोली, आठव्या नंबरपर्यंत असलेल्या फौजेने किवींना या महायुद्धात आणि मनोयुद्धातही चीत केलं. आधी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप खिशात आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा. रोहित शर्माच्या या टीमचं कौैतुक करावं तेवढं थोडं आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये आपण एकही सामना न गमावता आपण बाजी मारली. त्याआधीच्या वनडे वर्ल्डकपमध्येही फायनलला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होण्याआधी आपला विजयरथ कायम राहिलेला. अर्थात सांघिक कामगिरीचं हे फलित असलं तरी रोहितच्या कॅप्टन्सीबद्दल त्याची पाठ थोपटावी लागेल. त्याने श्रेयस अय्यरसारख्या बॅट्समनला दिलेला पाठिंबा, तर इथे दुबईत चार फिरकीपटू खेळवणं, अक्षर पटेलला फलंदाजीत बढती देत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आणणं. पंतसारखा स्फोटक फलंदाज संघात असतानाही दुबईत राहुलवर विश्वास दाखवत त्याला सपोर्ट करणं हे डावपेच कमाल होते. वनडेतील मिस्टर कन्सिस्टंट विराट कोहलीची पाकिस्तान आणि ऑसींविरुद्धची चॅम्पियन इनिंगही मनात कोरुन ठेवण्यासारखी होती. कसोटी क्रिकेटमध्ये विजयगाथा लिहिणारे फिरकीपटू वनडेच्या क्रिकेटमध्येही मानाचं पान लिहून जाऊ शकतात हे आपण दाखवून दिलंय. आजही एक बाद ६९ अशा स्कोअरनंतर पुढच्या ४० षटकांत न्यूझीलंडला फक्त १०३ धावाच करता आल्या. फिरकीपटूंनी लावलेल्या ब्रेकनेच हे शक्य झालं. यावरुन ही बाब अधोरेखित होते. कुलदीपने घेतलेल्या विल्यमसन आणि रवींद्रच्या दोन विकेट्स या सोन्याच्या मोलाच्या होत्या. तर, या सामन्यासह संपूर्ण स्पर्धेत वरुण चक्रवर्तीच्या जादुई स्पिनने प्रतिस्पर्धी टीमच्या प्रमुख गोलंदाजांना नामोहरम केलं. जडेजा, अक्षरच्या अचूक टप्प्याने त्याने भंडावून सोडलं. या साऱ्यांमुळे बुमराची अनुपस्थिती कुठेही जाणवली नाही.

ऑस्ट्रेलियातील अग्निपरीक्षेत कसोटी मालिका गमावल्यावर आपण पहिलीच मोठी स्पर्धा खेळत होतो. मायदेशात इंग्लंडला धूळ चारलेली असली तरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मंचावर आपला खरा कस लागणार होता. पण, आपण या परीक्षेची तयारी उत्तम केली आणि आपण समोर ठेवलेल्या प्रश्नांवर प्रतिस्पर्ध्यांकडे उत्तरं नव्हती. आपण पहिले येणारच होतो.

तब्बल १२ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपण नाव कोरलंय. धोनीने केलेल्या पराक्रमाची अक्षरं रोहितने पुन्हा गिरवली. रोहित आणि टीमचं मनापासून अभिनंदन.


संबंधित बातमी:


Champions Trophy 2025 Virat Kohli: मेरा भारत महान! एकीकडे जंगी सेलीब्रेशन, दुसरीकडे मायेचा हात; विराट कोहली तिच्याजवळ गेला अन्..., PHOTO