BLOG : देशातील एक महत्वाच्या राजकीय नेत्या आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. त्यांच्या या वक्तव्याने देशातील राजकारणात विशेषतः लोकसभा निवडणुकीपूर्वी तयार झालेल्या इंडी आघाडीत वादळ उठवले आहे. ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर भलतेच आरोप केलेत तर इंडी आघाडीतील काही पक्षांनी ममता बॅनर्जी यांना समर्थनही दिले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला आगामी काळात आणखी कोणते धक्के बसणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

खरे तर इंडी आघाडीत सुरुवातीपासून मतभेद सुरु झाले होते. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रोखण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली होती. इंडी आघाडीमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आपसह 28 पक्ष सामील झाले होते. मात्र ज्या नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीची मोट बांधली त्यांनीच नंतर आघाडीतून बाहेर पडून पंतप्रधान मोदींना समर्थन दिले आणि आघाडीत पहिली बिघाडी झाली. मात्र तरीही इंडिया आघाडीने बऱ्यापैकी मोदींविरोधात वातावरण तयार केले आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 वर रोखण्यात यश मिळवले. मात्र या निवडणुकीनंतर अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली आणि हरियाणामध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. मात्र 89 जागा लढवूनही आपच्या वाट्याला एकही जागा आली नाही. बहुतेक सर्व जागांवरील उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आपने काँग्रेसशी नाते तोडले आणि दिल्ली विधानसभेला एकट्याच्या बळावर लढण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसशी आघाडी फक्त लोकसभेपुरती होती असेही आपने स्पष्ट केले होते. या सर्व प्रकाराकडे पाहिल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी इंडी आघाडीशी एक प्रकारे फारकत घेतल्याचेच दिसून येत आहे.
 
संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही काँग्रेसने अदानींविरोधात वातावरण तापवले तसेच संसदेबाहेर निदर्शनेही केली. मात्र तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने काँग्रेसला साथ दिली नाही. अदानींविरोधातल्या काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी न होत संसदेचे कामकाज या विषयावरून बंद पाडण्यास विरोधही केला होता.
हा सर्व इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ममता बॅनर्जी यांचे ताजे वक्तव्य. शुक्रवारी एका मुलाखतीत बोलताना ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतील मुख्य पक्ष काँग्रेसच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आणि त्यामागे कारण होते महाराष्ट्रात काँग्रेसचा झालेला दारुण पराभव. ममता बॅनर्जी यांनी इंडी आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार असल्याचे म्हटले आणि इंडी आघाडीला हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. खरे तर तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी याची सुरुवात केली होती. त्यांनी म्हटले होते इंडिया आघाडीने आपला अहंकार बाजूला ठेऊन ममता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सांभाळण्यास द्यावी. त्यानंतर ममता ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीवर वार करीत इंडी आघाडीची मी सुरुवात केली होती, मात्र इंडी आघाडीची समिती नीट काम करू शकत नाही तर मी काय करू? मी फक्त एवढेच म्हणेन की सगळ्यांना सोबत घेऊन चालले पाहिजे. ते जर इंडी आघाडीचे नेतृत्व करू शकत नसतील तर मी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार आहे. समाजवादी पक्षानेही ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.
 
ममता बॅनर्जींच्या या वक्तव्याला काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार संदीप दीक्षित यांनी ममता बॅनर्जी या भाजपच्या एजंट असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे दुसरे नेते इम्रान मसूद यांनी ममता बॅनर्जींचा दावा फेटाळून लावत काँग्रेस अखिल भारतीय पातळीवरील पक्ष असल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी हे आघाडीचे नैसर्गिक नेते असल्याचे वक्तव्य केले आहे. तर भाजपने ममतांच्या वक्तव्याचा आधार घेत काँग्रेसला टोला लगावत राहुल गांधींच्याच नेतृत्वार प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शरद पवार यांनीही एक प्रकारे ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्याचे समर्थनच केले आहे. शरद पवार म्हणतात ममता बॅनर्जींमध्ये इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, त्यांनी घेतलेली भूमिका आक्रमक आहे, त्यांनी अनेक माणसं उभी केलेली असल्याने त्यांना असं म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसला धक्का नक्कीच बसेल. इंडिया आघाडीतील सदस्यांनाच राहुल गांधी योग्य नेतृत्व करीत नसल्याची जाणीव झाल्याचे म्हटले आहे. इंडी आघाडीत होणारा बेबनाव भाजपला एका दृष्टीने फायदेशीरच आहे यात शंका नाही.

दुसरीकडे असेही म्हटले जाते की पश्चिम बंगालमध्ये 2026 मध्ये निवडणुका होणार आहेत. काँग्रेससोबत राहिले तर यश मिळू शकणार नाही असा अंदाज ममता बॅनर्जी यांना आला आहे, आणि त्यामुळेच त्या इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याचे सूतोवाच केले आहे. यात काही अंशी तथ्य असू शकते. मात्र इंडिया आघाडीत अशी बिघाडी झाली आणि एकेक पक्ष बाहेर पडू लागले तर 2029 च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राहुल गांधींना ते खूपच अडचणीचे ठरू शकते. काँग्रेस आणि राहुल गांधी यातून कसा मार्ग काढतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.